…राणी टिपणीसपुऱ्याच्या घरात येईपर्यंत दिघ्यांची स्त्री ओठाणाचा उंबरठा ओलांडून दादांच्या तक्तपोसाजवळ कधी उभी झाली नव्हती. राणीने हे सुरू केलं.
“दादा, तुम्ही नागपूरचे मेयर होणार होता ना?” राणीने अमृतरावांना विचारलं.
“तुला कोणी सांगितलं?” सुनेचा हा प्रश्न त्यांना धीट वाटला.
“आई म्हणाल्या. ह्यांनीपण सांगितलं.”
“झालो असतो बेटा आम्ही मेयरही. पण काय करायचंय ते पद घेऊन?” अमृतराव म्हणाले.
“दादा, चांगल्या माणसांनी सत्ता नाकारली, तर बाबूरावांसारख्या बेरक्यांचं फावतं!”
सुनेने लहान तोंडी मोठा घास घेतल्याचं अमृतरावांना आवडलं नाही.
“बेटा, कोण माणूस कसा आहे ह्याच्या आपल्याला कशाला हव्यात बारा पंचायती?” अमृतरावांनी राग आवरला होता.
“बाबूराव तसेच आहेत ना?” राणीने विचारलं.
“कोणाबद्दलही बोलताना संयमाने बोलावं,” अमृतरावांनी अल्लड सुनेला बजावलं.
“आईच तसं म्हणत होत्या,” सासरा चिडलाय हे राणीला कळलं होतं.
“जा, तुझी टकळी बंद कर आणि माझी टकळी आणून दे. सूत कातायचंय,” अमृतरावांनी मंद हसत म्हटलं.
दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडून राणी आली असली, तरी हा उंबरठा अनुल्लंघनीय नाही हे तिला माहीत होतं. राणीसाठी कुठलीही गोष्ट अनुल्लंघनीय नव्हती. एखादी गोष्ट मनात आणली की, ती करायची आणि ओठात आली की, ती बोलायची हा राणीचा खाक्या. तर एखादी गोष्ट मनात आली तरी ती करायची नाही, आणि ओठात आली तरी ती बोलायची नाही, हा सुलभाचा खाक्या.
राणीचा स्वभाव इतका बेदरकार व्हायचं कारण, कदाचित तिच्या बालपणात असावं. तिचा जन्म झाला आणि श्रीनिवासरावांची कचेरीत प्रगती सुरू झाली. “माझी राणी चांगल्या पायगुणाची आहे,” असं कर्णिक साहेब बोलून दाखवायचे. राणी झाली आणि कर्णिकांच्या घरात सगळं अनुकूल घडू लागलं. त्यामुळे लहानपणापासूनच राणीचे खूप लाड झाले.

Chetuk BC
चेटूक कादंबरी : मलपृष्ठ

‘बिशप कॉटन रॉयल स्कुल’ त्या काळी इंदोरमधली नावाजलेली शाळा होती. तिथे उच्चभ्रू व दरबारी घरातली मुलं शिकायला जायची. ह्या शाळेत कर्णिकसाहेबांनी राणीला घातलं. इथेच शिंदे, होळकर, जाधव, निंबाळकर, किबे ह्या नामांकित घरातली मुलं आणि मुली शिकायला यायच्या. सामान्य मुली परकर-पोलकी घालून शाळेत जायच्या, त्या वेळी राणी निळा स्कर्ट, पांढरा ब्लाऊज, काळे बूट आणि निळे मोजे असा गणवेष घालून शाळेत जायची. शाळेत अर्धा डझन इंग्लिश शिक्षक होते. शाळेतली शिस्त कडक होती. वातावरण अभ्यासू होतं. तिथे मुलं-मुली भेद नव्हता.
रोज सकाळी नऊ वाजता गणवेष घालून राणी घराबाहेर थांबलेल्या घोड्यांच्या बग्गीत बसायची. श्रीनिवासरावांचा इमानदार पट्टेवाला– रामप्रसाद राणीला बग्गीत चढायला हात द्यायचा. उग्र मिश्यांचा रामप्रसाद राणीशी मऊ वागायचा. इंदोरच्या निरुंद रस्त्यांवरून राणीला शाळेत नेणारी होळकर संस्थानाच्या मालकीची, दुडक्या गतीने धावणारी ती ऐटदार बग्गी बघून रस्त्यांवरच्या दुकानांतले जैन आणि मारवाडी मालक घोड्यांच्या टापांच्या तालावर पुढे जाणाऱ्या राणीकडे कौतुकाने बघायचे. आपण कुठेही गेलो तरी लोक आपल्याकडे कौतुकाने बघतात, हे राणीला लहानपणापासून कळलं. घरात, शाळेत, रस्त्यावर आणि सर्वत्र राणीच्या वाट्याला कौतुक आलं. म्हणून राणीला हे जग खूप सुंदर वाटायचं. तिचं रम्यतेचं, भव्यतेचं, उदात्ततेचं वेड इथूनच सुरू झालं असावं. त्यात साहित्यिक वाचनाची भर म्हणजे आगीत तेल.

राणीला श्रीनिवासरावांचे कचेरीतले सोबती लाडाने ‘महाराणी’ म्हणायचे. आपणही एक ना एक दिवस अहिल्याबाई होळकरांसारखी महाराणी होणार, असं राणीला वाटायचं. साहित्य वाचून राणीचं मन कल्पक, अधीर आणि स्वप्नाळू झालं. शेले, कीट्स, वर्डस्वर्थ ह्यांच्या कविता शाळेत शिकलेल्या राणीला अण्णांच्या खासगी ग्रंथसंग्रहातल्या मराठी कवींनीही वेड लावलं होतं. आठवीतील राणीने गोविंदाग्रज, तांबे, माधव ज्युलियन, बालकवी, यशवंत ह्या कवींना आपलं हृदय देऊन टाकलं. “कवी एकटाच जगतो, बाकी सारी माणसं रखडतात,” असं तिने अण्णांना सांगितलं. ते ऐकून श्रीनिवासरावांनी आपल्या मुलीचा गालगुच्चा घेतला होता.

दिघ्यांच्या घरात आल्यानंतर राणीला आपल्या बालपणाचे एकेक प्रसंग आठवायचे. ‘अण्णांनी आपलं किती कौतुक केलं. आपल्यावर किती आशा लावल्या. आपण मात्र एका भाबड्या, प्रीतीच्या कलेत अडाणी असलेल्या, पण मीलनासाठी उतावळ्या झालेल्या माणसावर सर्वस्व ओवाळून टाकलं. त्याला भरभरून पत्रं लिहिली. त्याच्याकडून मोठाली पत्रं लिहून घेतली. त्याला पेलणार नाहीत, अशी त्यावर प्रीती केली. त्याच्या मातीच्या घरात आलो. रात्रीच्या अंधारात व्यर्थ झुंजलो. चुली समोर तिखट पिवळा धूर गिळत, डोळे पुसत, ठसके देत पोळ्या शेकल्या, तिखट रश्शांची आणि आमट्यांची वाटणं वाटली, दुपारी मागून दुपारी जमिनीवर फतकल मारून फक्त गहू, तांदूळ आणि डाळी निवडल्या, सासूबार्इंच्या हुकमानुसार पंधरा दिवसांतून नियमित काळा मसाला कुटला. दर रविवारी मटणासाठी पसाभर लसूण सोलले…

‘दिघ्यांच्या घरात माणसांना ह्या गोष्टीत केवढा आनंद मिळतो! दादा देशसेवेच्या नावाने कळकट आणि बावळट कार्यकत्र्यांना विनामूल्य उपदेश करतात. गांधी टोपी घातलेल्या साध्याभोळ्या वऱ्हाडी माणसांना दादा ‘हे करा अन् ते करू नका’ असं दिवसभर सांगतात. ही भाबडी माणसं दादांना ‘काकाजी’ म्हणतात. त्यांना गावोगावी बोलावतात. त्यांचा उपदेश मागतात आणि त्यांना देवासारखं मानतात. सासूला वाटतं, आपला नवरा म्हणजे स्थानिक महात्मा गांधीच! ह्या स्थानिक गांधीबुवांची एकमेव उपलब्धी म्हणजे चालून आलेलं, पण नाकारलेलं मेयरपद. सत्ता नको, पैसा नको, मानमरातब नको, अशा ह्या सासऱ्याला काय हवं? साधनशुचितेच्या आणि सुराज्याच्या गप्पा केल्या की, दादांचं भागतं. ज्या माणसाने गेली अनेक वर्षं स्वत:चा व्यवसाय केला नाही; उलट बुडवला, नोकरी करून एक दमडी कमावली नाही, त्या माणसाला शहरात एवढा मान कसा मिळू शकतो? तिला अण्णा माहीत होते. त्यांचा अधिकार ढळढळीत होता.

  • चेटूक
  • लेखक : विश्राम गुप्ते

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०१९


विश्राम गुप्ते लिखित त्रिधारेतील पहिली कादंबरी…

Chetuk

चेटूक

वसंताच्या प्रेमात वेडी झालेली कविहृदयाची राणी, दिघ्यांच्या घराचा उंबरठा ओलांडते खरी; पण लग्नानंतर काही दिवसातच तिला प्रीती सुकून गेल्यासारखी वाटते. आपल्या जीवनात वसंत फुलवणारा तिला वैशाखवणव्यासारखा वाटू लागतो. चेटूक झाल्यागत ती उदात्त प्रीतीचा शोध घेऊ लागते आणि सुरुवात होते संघर्षाला…
म्हंटलं तर या कादंबरीचं हे थोडक्यात आशयसूत्र असलं, तरी त्यात बहुस्तरीय सूत्रांचा पेड विणण्यात आला आहे. त्यात स्वातंत्र्योतर काळातील नागपूरचं मानववंशशास्त्रीय विवेचन येतं, तसंच मानवी जीवनाच्या अपूर्णतेवर चिंतनशील भाष्यही येतं.
जागतिक वाङ्मयात अभिजात ठरलेल्या आना क्यारनीना व मादाम बोव्हारी या कादंबऱ्यांची बरीच कथन वैशिष्ट्य यात एकवटलेली दिसली, तरी ‘चेटूक’चा प्रवास हा समांतरपणे होताना दिसतो. तीत प्रीती म्हणजे काय? ती शारीर कि अशारीर? केवळ भावुकतेवर मानवी व्यवस्था सुफल होऊ शकते का? असे प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. गुतंवून ठेवणारी, अस्वस्थ आणि अंतर्मुख करणारी कादंबरी…

395.00Add to cart


Vishram Gupte Photo
कादंबरीकार, समीक्षक विश्राम गुप्ते यांच्याबद्दल अधिक जाणून घ्या…

धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात.

वाचा…


विश्राम गुप्ते लिखित trilogy बद्दल अधिक जाणून घ्या…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *