मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)

फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख…
वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक शेवटी दिलेली आहे.

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

सुमित्रा भावेंचा दिठी मी सर्वाधिक उशिरा पाहिला. ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेचा पहिला अंमल दहावीच्या सुट्टीत जून आरंभी मोसमीपूर्व धो-धो पावसात वाचल्यामुळे अंमळ अधिक पडला असल्यामुळे चित्रपट पाहण्याचे मुद्दाम खूप दिवस लांबवून ठेवले. दि.बा. मोकाशी आवडणाऱ्या प्रत्येकाची बहुतेक आवडती कथा ‘आता आमोद सुनासि आले’च असल्याचे बऱ्याच जणांशी चर्चेतून समोर आले होते. नॅशनल बुक ट्रस्ट विविध भाषांतील सर्वोत्तम लेखकांच्या मास्टरपीस कथांचा संग्रह काढते. दोन दशकांपूर्वी मराठी लघुकथांचा जो संग्रह भालंचंद्र फडके यांच्या संपादनाखाली काढला, त्यातही दि.बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’चा समावेश आहे. दूरदर्शनवर कथा रूपांतरण करणाऱ्या मालिकेत एक भाग या कथेवर आधारित होता. तो मी आवडीने पाहिला होता. पण संपूर्ण दीड-दोन तास लांबीचा चित्रपट पाहण्याची खूप भीती वाटत होती. या लेखाच्या निमित्ताने तो अनुभव घेतला. भरपूर उदोउदो झालेल्या या चित्रपटातील एकखांबी किशोर कदम यांच्या कामाखेरीज भावलेले थोडेच घटक होते. बाकी धोपट आणि भूमिकांत न शोभणाऱ्या काही ‘दिग्गजांची मांदियाळी’ या सरधोपट विशेषणापलीकडे या चित्रपटाविषयी फार मत बनवता आले नाही. तरी या चित्रपटामुळे आता आमोद सुनासि आले वाचण्याचे कष्ट मोठ्या प्रमाणावर घेतले गेले असतील असे वाटते तरी!

आस्तिकालाही आनंद देत नसेल इतका आनंद मला देऊळ देते. विशेषत: हेमाडपंथी देऊळ. त्यातल्या देवाचे मला महत्त्व नसते. देऊळ या वास्तूचे असते. माणसाची वास्तू जे, घर, त्याहून ते अगदी निराळे असते. घर हे सुख, दु:ख, रागलोभ, आनंदउत्सव, माया व मोह यांनी खडबडलेले असते. पण देऊळ हे साहित्यनिर्लेप आणि निर्विकार आनंदाची वास्तू मला वाटते.

-दि.बा. मोकाशी

ललित मासिकाच्या १९७३ सालच्या अंकामध्ये दि.बा. मोकाशींनी आपल्या लेखनावर आणि विशेषत: ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर एक टिपण लिहून ठेवले होते. वारी आणि दिठीसंपृक्त वाचक-दर्शकांंसाठी ते मुद्दाम इथे विस्ताराने देत आहे –

‘माझ्या कथांचा विषय केवळ प्रेम नसतो. जन्म, मृत्यू, देव, विकृती, निराशा, अपघात, नुकसान, दारिद्रय, श्रीमंती अनेक विषय असतात. ज्या काही गोष्टी माझ्या कल्पनेला आनंदाने डिवचतात, त्यांत देवळे, नदीकाठ, पाऊस, संध्याकाळ या आहेत. एखादा स्वभाव मनात रेंगाळत राहिला नसेल, एवढी देवळे माझ्या मनात रेंगाळत राहिली आहेत. मी स्वत: नास्तिक आहे व देवळात जाऊन देवाला नमस्कार न करता यावे, इतका उद्धट आहे. पण आस्तिकालाही आनंद देत नसेल इतका आनंद मला देऊळ देते. विशेषत: हेमाडपंथी देऊळ. त्यातल्या देवाचे मला महत्त्व नसते. देऊळ या वास्तूचे असते. माणसाची वास्तू जे, घर, त्याहून ते अगदी निराळे असते. घर हे सुख, दु:ख, रागलोभ, आनंदउत्सव, माया व मोह यांनी खडबडलेले असते. पण देऊळ हे साहित्यनिर्लेप आणि निर्विकार आनंदाची वास्तू मला वाटते. तेथे गेल्यावर आपण जे खरे असतो, त्याचे भान येते. देवळात वाटणार्यात या निर्लेप आनंदाने मला माझी काही कथानके सुचली आहेत.

मला छोट्या व्यावसायिकांचे आकर्षण आहे. मी छोटा व्यावसायिक असल्याने ते असेल. या छोट्या व्यावसायिकांतही कष्टाने जगणारे मिस्त्री, लोहार, मॅकेनिक, सुतार, गवंडी, शेतकरी, मजूर यांच्याबद्दल मला विशेष वाटते. यांतून जे वारकरी पंथाचे आहेत. ते मला विशेष निकटचे वाटतात. ज्या लोकांकडे आपण आत्मीयतेने आणि आनंदाने पाहतो त्यांच्यातूनच कथेचे विषय मिळत असतात. ते चूक का बरोबर हा मुद्दा नाही किंवा त्यांतून श्रेष्ठ किंवा कनिष्ठ कथा होईल हा मुद्दा नाही. या लोकांविषयी लिहिण्यात मला आनंद वाटतो.
‘आता आमोद सुनासि आले, ही माझी कथा मला एका लोहार वारकऱ्यावरून सुचली. त्याचे दुकान स्टॅण्डवर असल्याने मी गावी उतरताच त्याच्याशी पहिला रामराम झडे. घरी जाऊन दुपारपर्यंत मी त्याच्याशी गप्पा मारीत बसे. ‘दिगंबर केव्हा आलास?’ हे त्याचे पहिले वाक्य असे. मी स्टुलावर बसून भाता हलवी व आमचा प्रेमसंवाद सुरू होई.
मला त्याच्या शांतपणाचे नेहमी कौतुक वाटे.त्याचे धावा बसविण्याचे काम सुरू असता मी त्याला हात देई किंवा तापवलेले लोखंड घणाने मारायचे असे तेव्हा मी घण मारी. तो नेहमी म्हणे ‘ देवाने आपल्याला भरपूर दिले आहे. आणि कमी दिले, तरी त्यात त्याचा हेतू असेल. तो म्हणे- ‘रात्री अंथरुणावर पडून ‘रामकृष्ण गोविंद’ म्हणताच आपल्याला झोप येते. काळजी वाटावे असे घरात काहीच नाही.’ पुष्कळदा तो ज्ञानेश्वरीतील ओव्या म्हणून दाखवे.आल्या गेल्या साधूसन्यासी भिकाऱ्याला देण्यासाठी त्याने बाजूला एक दगडी ठेवली होती. तो म्हणे- ‘दिगंबर, हे गरीब आहेत हा आमचाच दोष आहे. आणि जरी मागच्या जन्मीच्या पापाने ते या जन्मी गरीब असतील, तरी आपण त्यांचे दु:ख थोडेतरी कमी करायला हवे. तो म्हणे- ‘तू आणि मी किती सुखी आहोत. आपल्याला रस्त्यावर, धर्मशाळेत निजावे लागत नाही. तो म्हणे- ‘विठ्ठलाचे नाव आमच्या लोहारांच्या भट्टीसारखे आहे. भट्टीतला अग्नीच तोच. पण हिवाळ्यात सुख देतो. उन्हाळ्यात घाम काढतो. विठ्ठलाचे नाव तेच. पण तो ज्या वृत्तीने घेतो, तसे ते त्याला पावते किंवा पावत नाही.’
माझ्या या लोहार मित्राने (मला बाळ म्हणावे इतका तो माझ्याहून मोठा होता.) मला एके दिवशी समोरच्या वाण्याच्या माडीवर त्यांचे गुरुवारचे पोथीवाचन ऐकावयास बोलावले. आणि ते ऐकत असतानाच माझ्या ‘आमोद सुनासि आले’ या कथेचे बीज मनात पडले असावे.
माझ्या त्या मैत्रीने मला पुष्कळ दिले. कामाचे प्रेम दिले आणि समाधानी कसे व का रहावे, हेही शिकविले. पण मी गोष्ट लिहिली. तिचा आनंद झाला. काही वाचकांनाही झाला.पण मी लिहून दुसरे काय साधले? ज्याच्यामुळे मी कथा लिहिली त्याने ती वाचलीही नाही. कधी त्या कथेमुळे त्याच्या आयुष्यात मी काही घडवून आणले असेही नाही.
लिहिण्यातली ही हिरवळ आहे. एखादा भाव पकडणे. मग तो सुखाचा असो, दु:खाचा असो. भाव पकडता आला याचा आनंद. भाव पकडता आल्याने काय होते? ठाऊक नाही. समाधीच्या आनंदाबाबत सांगतात तसा तो आनंद असतो. समाधी लागल्याने काय होते? तेही सांगता येत नाही.’

हा लेख ‘माझे आवडते लेखक दि.बा.मोकाशी’ या शीर्षकसाध्यर्माचा निबंध नाही. दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यांच्या कित्येक कथांना स्थल-काळाचे बंधन नसल्यामुळे त्या आजही आवडीने वाचल्या जाऊ शकतात हे मधल्या काही वर्षांत त्यांचे संग्रह पुन्हा वाचताना लक्षात आले. आपल्याकडे एखाद्या लेखकाचा भक्तपंथ तयार होतो आणि हा पंथ लेखकाला कित्येक वर्षे मोठा करण्याचा विडा उचलतो. हा पंथ उच्चरवात ‘लाडक्या व्यक्तिमत्वां’ना देव्हाऱ्यात ठेऊन त्याची पूजा करताना पुढील पिढ्यांमध्ये आपल्या विचारसरणीची ज्योत पसरवितो. सुदैवाने त्या ‘जनदेवतां’चे साहित्य आकळून घेऊनही एकाच लेखकात अडकून पडण्याच्या पंथात शिरण्याचा मोह मला कधीच झाला नाही. किंबहुना या पंथाच्या एकसुरी विचारांची गंमतच वाटत गेली. मोकाशी माझे आवडते लेखक असले, तरी इतरही शेकडो देशी-विदेशी लेखकांच्या कथाशैलीने मला तितकेच भारावून टाकले. जुन्या आणि नव्या मराठी वाचन पसाऱ्यात मनावर गोंदल्या जाणाऱ्या कथांची अनुभूती मात्र दि.बा. मोकाशींनी अंमळ अधिक दिली. या लेखकाच्या कथांसोबत वाढताना आपल्यातही त्याचे काही गुण-अवगुण उतरत गेले आहेत का, याची शोधप्रक्रिया इतर साहित्य वाचताना निरंतन सुरू राहीलच.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचे मागीत तीन भाग

D.B. Mokashi
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१)

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


रोहन-मुद्रेतील लक्षणीय सर्जनशील लेखन

One Response

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *