मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२) (दि.बा. मोकाशी स्मृतिदिन विशेष)

फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख…
वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक शेवटी दिलेली आहे.

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

पत्रकारितेत आल्यानंतर कामाचा भाग म्हणून इंग्रजी सुधारण्यासाठी समकालीन आंग्लकथा वाचन करताना त्याचा नाद लागेल असे कधी वाटले नाही. समकालीन अमेरिकी-ब्रिटिश कथा लेखकांचे आधी आणि ज्ञात झाल्यामुळे क्लासिक्सचे वाचन नंतर सहज घडत गेले. अमेरिकी विद्यापीठात कथालेखन शिकणारे लेखक आणि दिग्गज-दादांच्या फिक्शन वर्कशॉप्समध्ये कथेचा श्रीगणेशा करणाऱ्या साहित्यिकांची विभागणी लक्षात आली. बेस्ट अमेरिकन शॉर्ट्स स्टोरीचे खंड हाताळता हाताळता साठोत्तरी अमेरिकी कथेत प्लेबॉय मासिकाने केलेली क्रांती, न्यू यॉर्कर आणि हार्पर्समधून घडलेले लेखक आणि कुठल्याही विद्यापीठात न जाता आपल्याकडे रहस्यकथांना वळण देणाऱ्या लेखकांतील साध्यर्म्य समजून घेता आले. अमेरिकेत हेमिंग्वे कालबाह्य होऊन रेमण्ड कार्वरचे युग अवतरले आणि मौजेतील राम पटवर्धनांप्रमाणे एकाच काळात तिकडे गॉर्डन लीश नावाचा एक संपादक एकेक कथा रिपेअर करीत अमेरिकी नवकथेला आकार देत होता, हे जाणून घेताना कथन साहित्यावरचे प्रेम आणखी वाढायला लागले. तेव्हा मराठीत सत्यकथेतून लिहिणाऱ्यांत बाळकृष्ण प्रभूदेसाई, अनिल डांगे, नरेश कवडी, सुरेश मथुरे यांचे दर्जेदार आणि विसरले गेलेले साहित्यही वाचायला मिळाले. दि.बा. मोकाशींच्या कथांवरची भक्ती कायम असली, तरी माझ्या वाचनात इंग्रजी आणि हिंदीतल्या कथा, दीर्घकथांची, उत्तम अनुवादीत कादंबऱ्यांची, भारत सासणेंच्या समग्र साहित्याची भर पडत होती. समकालीन ताज्या लेखकांच्या वाचनानंतरही माझ्या डोक्यातील मोकाशींच्या कित्येक कथावाचनाचा प्रभाव ओसरला नसल्याचे मला लक्षात आले.

जागोजागीचे रद्दीवाले आणि ग्रंथदालने यांतून मोकाशींची मिळतील तितकी पुस्तके मी जमविली होती. पण ‘घणघणतो घंटानाद’ या अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’ या कादंबरीचा अनुवाद त्यांचे मजजवळ असलेले सर्वात दुर्मीळ पुस्तक असल्याचा समज गेली दहा-बारा वर्षे मी करून घेतला होता. तो अलीकडेच ते पुस्तक अनेक संग्रहकांकडे असल्यानंतर पूर्णपणे फिटला.

जयवंत दळवी जेथे काम करीत होते, त्या ‘यूसीस’ या अमेरिकी संस्थेद्वारे त्यांनी अमेरिकी साहित्याला मराठीत आणण्याचा विडाच उचलला होता. त्यातून १९६०च्या दशकात मराठीतल्या नामवंत साहित्यिकांकडून बरेच अनुवाद घडले. मॅजेस्टिक प्रकाशनाला त्यातील महत्त्वाची पुस्तके प्रकाशित करता आली. ‘प्रतिभेची फुले’ या मालिकेअंतर्गत ही पुस्तके आली. त्यात दि.बा. मोकाशींनी अर्नेस्ट हेमिंग्वेच्या पुस्तकाचा अनुवाद केला. तसाच भा.रा.भागवतांनी मार्क ट्वेनच्या ‘अॅडव्हेन्चर्स ऑफ हकलबरी फिन’चा भटकबहाद्दर, कवीवर्य मंगेश पाडगावकरांनी जेम्स फेनिफोर कूपर यांच्या ‘पाथ फाइंडर’चा वाटाड्या, दुर्गा भागवतांनी थोर तत्त्वचिंतक हेन्री डेव्हिड थोरो यांच्या ‘वॉल्डन’चा ‘वॉल्डनकाठी विचारविहार’, शंकर पाटील यांनी नॅथिनिल हॉथार्न यांच्या ‘हाऊस ऑफ सेव्हन गेबल्स’चा शापित वास्तू. कमला फडके यांनी एडगर एलन पो यांच्या दीर्घ कथांचा तीन चित्तथरारक कथा असा, मालती बेडेकरांनी सिंक्लेअर लुईस यांच्या ‘अॅरोस्मिथ’ या कादंबरीचा डॉक्टर आणि गंगाधर गाडगीळ यांनी हेन्री जेम्सच्या ‘अमेरिकन’ या कादंबरीचा ‘संघर्ष’ नावाने अनुवाद केला होता. आज यातील बरीचशी पुस्तके दुर्मीळ म्हणून ओळखली जातात.या मालिकेतील इतर पुस्तके आपल्यासाठी अप्राप्य असल्याचे मला कित्येक वर्ष वाटत होते. पण रहस्यकथांच्या शोधार्थ गावोगावच्या पुस्तक खरेदीसाठीच्या भेटीत वरील मालती बेडेकर आणि शंकर पाटील यांच्या अनुवादाखेरीज इतर सारी पुस्तके माझ्या दालनात दाखल झाली. अन् मोकाशींच्या ‘घणघणतो घंटानाद’च्या पहिल्या आवृत्तीच्या चक्क दोन प्रती मला मिळाल्या. घणघणतो घंटानाद पुन्हा प्रकाशित होऊन मिळू लागल्यानंतर त्याची दुर्मीळता नष्ट झाली आणि मोकाशींचे कुठलेच दुर्मीळ पुस्तक आपल्याजवळ नसून होते ते ‘रेडिओ दुरुस्ती’ गमावल्याची खंत आता अधिक वाटायला लागली होती. पण एका पुस्तक पर्यटनात मोकाशींचे मला आणि कित्येकांना माहिती नसलेले पुस्तक अचानकपणे माझ्यासमोर आले आणि ‘रेडिओ दुरुस्ती’ गमावल्याचे दु:ख विसरायला झाले.

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद. पुण्याच्या राजस प्रकाशनाने पॉकेट बुक्सची मालिका सत्तरच्या दशकात काढली होती. अशी पॉकेट बुक्स काढण्याची टूमच गुरुनाथ नाईक, दिवाकर नेमाडे या रहस्यकथाकारांमुळे तेव्हा आली होती. कारण मराठी रहस्यकथाकारांपैकी सर्वच लेखक जेम्स बॉण्ड, शेरलॉक होम्सला आदर्श ठेवून आपले नायक घडवितात असा समज झाला होता. रहस्यकथांची तडाखेबंद विक्री होत असतानाच कुणी शेरलॉक होम्सच्या ओरिजनल्स आणून मराठी वाचकांना अस्सल देण्याचा प्रयत्न करीत होते, तर कुणी जेम्स बॉण्ड कादंबरी मालिका, जेम्स हॅडली चेजची पॉकेटबुक आवृत्ती काढत होते. तुटपुंज्या खर्चात आणि स्वस्तातल्या कागदात लेखकांकडून घाईत करण्यात आलेले ते अनुवाद होते. अनेक मोठ्या लेखकांनी या पॉकेटबुक्स आवृत्त्यांना योगदान दिले असले, तरी बहुतेकांची पुस्तके आज वाचनालयांतूनही गायब झालेली आढळतील. जेम्स बॉण्ड मालिकेत मूनरेकरचा अनुवाद सत्यकथेत सातत्याने कथा लिहिणाऱ्या मंगेश पदकी यांनी केला होता. तर यू ऑन्ली लिव्ह ट्वाईस या कादंबरीचा अनुवाद ग.रा. टिकेकर यांनी केला होता. रॉबर्ट ब्लॉक या लेखकाच्या सिनेमामुळे आणखी गाजलेल्या ‘सायको’ कादंबरीचा अनुवादही या प्रकाशनासाठी ग.रा. टिकेकर यांनी केला होता. शेरलॉक होम्सही या प्रकाशनाने मराठीत आणला होता. परवानगी न घेता वेगात रूपांतर करणारी आणि १९६८ साली दोन-तीन रुपयांत पुस्तके उपलब्ध करून देणारी ही अंडरग्राउंड प्रकाशन यंत्रणा फारशी चालली नाही. या मालिकेतील बरीच पुस्तके मला जुनी पुस्तके मिळणाऱ्या पुण्याच्या रस्त्यावरील ग्रंथदालनात उपलब्ध झाली. त्यातूनच दि.बा.मोकाशींनी अनुवाद केलेली डॉ.नो. ही एक बॉण्डकथा मला वाचायला मिळाली.

बॉण्डसिनेमा आणि बॉण्डकथांमध्ये बराच फरक आहे. इयन फ्लेमिंगच्या या कादंबऱ्यांतील कथानक सहज-सोप्या भाषेत रंगवले आहे. सतत बॉण्डला अवघड कामगिऱ्यांवर राबविणाऱ्या ‘एम’ला बॉण्ड शिव्या देताना आढळतो. सिनेमॅटिक चकमक या कादंबऱ्यांमध्ये आढळत नसली, तरी पडद्याावरचे त्याचे अजिंक्य रूप या कादंबऱ्यांमुळेच साकारले. बॉण्ड अंतर्बाह्य समजून घेण्यासाठी म्हणूनच सिनेमांपेक्षा पुस्तके अधिक कामी येतात.

दि.बा. मोकाशींनी हा अनुवाद अक्षरश: धावत पळत नाही, तर शब्द तुडवत केला असावा. त्याची प्रचीती घेण्यासाठी एक नमुना येथे जोडतो –
‘नमस्ते साहेब.’
एमची खोली पूर्वी आठवत होती, तशीच बॉण्डला दिसली. महिनेच्या महिने या इस्पितळातून त्या इस्पितळात त्याने काढले होते. आणि मोठ्या कष्टाने तो पूर्ववत झाला होता. त्या रशियन बाईने बुटाच्या लाथेने जे विष त्याच्या अंगात टोचले, त्यानं तो मृत्यूच्या पाशात जाऊन परत आला होता. जवळ-जवळ पुनर्जन्मच तो. पुन्ह कामाला लागायचं याच जिद्दीनं त्या विषाच्या परिणामांशी तो झगडला होता. आणि या ऑफिसमध्ये पुन्हा बोलावणं येणं म्हणजे प्रकृती पूर्ववत झाल्याचीच खूण होती. त्याने एमच्या धूर्त नजरेत पाहिले. काय भानगड काय आहे? मागच्या कामगिरीतील चुकांबाबत ताशेरे? का एखादी नवी, छानपैकी मुद्दाम आपल्यासाठी ठेवलेली कामगिरी?
‘कसं वाटताय आता? परत कामावर आल्यानं बरं वाटत असेल?’ एमने म्हटले.
‘फार बरं वाटताय साहेब. प्रकृतीही छान आहे.’
‘मागच्या केसबद्दल काही सांगायचं उरलाय? तुम्ही ठीक होईपर्यंत त्याचं काही विचारायचं नाही असं ठरवलं होतं. मी चौकशी करायचा हुकूम दिला होता.’
बॉण्ड म्हणाला ‘माझाच मूर्खपणा झाला तेव्हा. त्या बाईच्या इतक्या जवळ उभा राहिलो. तिनं असं काही निर्वाणीचं अस्त्र छपवलं असेल हे लक्षांत यायला हवं होतं.’
‘तेही आहेच.’ एम म्हणाला. ‘पण मला आठवताय त्याप्रमाणे तुमचं पिस्तुल उडालं नाही. बिघाड झालाय का त्यात? असली चूक आपल्याला पुन्हा परवडायची नाही. तुमच्या मागचं झीरो झीरो हे तुमच्या खास कामाचं द्योतक आहे. नाही तर हे काम सोडा. साधं काम घ्या.’
‘वाटताय’, ‘उरलाय’, ‘होताय’, ‘जाताय’ हे वाचताना जेम्स बॉण्ड आणि एम हे ब्रिटिश हेरखात्यातील सदस्य नसून कोकणातील खेड्यांत पूजा सांगायला जाणारे भट असल्याचे क्षणभर वाटू लागते.

अर्थात या भाषिक उच्चारण पद्धती, हनी या नावाचे हॉनी आणि रिचमंड भागाचे रिचमॉण्ड असे खटकणारे उल्लेख वगळता अनुवादात दि.बा. मोकाशींनी पूर्ण रंगत आणली आहे. त्याकाळात शहरातील थिएटरात बॉण्डपट पाहताना त्यातल्या इंग्रजीला मख्खपणे टाळत आपल्या वकुबाप्रमाणे कथानकाचे आकलन करणाऱ्या मराठी वाचकवर्गाला संपूर्ण कथानक बारीक-सारीक तपशीलासह कळण्याचा मार्ग म्हणून या पुस्तकांकडे पाहावे लागेल. पण हे पुस्तक विक्रीयंत्रणेतून त्याच दशकात हद्दपार झाले. त्यास अनुवादातील घाई आणि प्रकाशनमूल्य हे दोन्ही कारणीभूत आहे. दि.बा. मोकाशींमधील निष्णात कथाकार या अनुवादात कुठेच सापडत नाही. जी.ए. कुलकर्णी यांच्या प्रत्येक अनुवादात त्यांची शैली उतरत जाते. तसे मोकाशींनी केलेल्या घणघणतो घंटानादमध्येही दिसत नाही.

आर्थिक गरज, प्रकाशक मित्राला दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या निमित्ताने किंवा हौस म्हणून मोकाशींनी या पुस्तकाचा अनुवाद केला असावा. कारण त्याबाबत त्यांनी कुठे फारसे उल्लेख केल्याचे सापडत नाहीत. कित्येक संग्रहकांना विचारूनही अशा प्रकारचे पुस्तक मोकाशींनी अनुवादित केले असल्याचा आणि त्याची प्रत कुठेही पाहिल्याचे समजले नाही.

अर्थात त्याच्या अनुवादात त्रुटी आढळल्या तरी माझ्या आवडीच्या लेखकाने बॉण्ड कादंबरीचाही अनुवाद केला म्हणून, तो बाजारातून अनुपलब्ध आणि जाणकारांची नजर चुकवून माझ्यासमोर एका प्रतीच्या रूपात का होईना जिवंत आहे, त्यामुळेच माझ्याकडचे मोकाशींचे सर्वात दुर्मीळ पुस्तक म्हणून मला ते महत्त्वाचे वाटते.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचे पुढील भाग


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४)

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

लेख वाचा…


– या लेखाचा पहिला व दुसरा भाग –

D.B. Mokashi
मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (१)

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


लक्षणीय कथासंग्रह


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *