फॉन्ट साइज वाढवा

२९ जून हा मराठीतले श्रेष्ठ लेखक दि.बा. मोकाशी यांचा स्मृतिदिवस. त्या निमित्ताने लेखक व विचक्षण वाचक, पुस्तकप्रेमी व संग्राहक पंकज भोसले यांनी दिबांच्या दुर्मीळ पुस्तकांवर, त्यांच्या पुस्तकांच्या शोधप्रवासावर, दिबांच्या लेखकीय वेगळेपणावर लिहिलेला हा दीर्घलेख…
वाचनसोयीसाठी आम्ही इथे हा लेख चार भागांत प्रकाशित करत आहोत. पुढील भागांची लिंक शेवटी दिलेली आहे.

१. एक गमावलेले दुर्मीळ पुस्तक…

दि.बा. मोकाशींचे एक सर्वांत दुर्मीळ पुस्तक माझ्याकडे होते. त्यांच्या कथांचे चाहते असणाऱ्यांकडेही न सापडू शकणारे. त्यांच्या लेखनशैलीशी सुतराम संबंध नसलेले. उत्कंठावर्धक मजकूर अथवा विनोद-भयकारी आशयाशी विरहीत असलेले. ‘रेडिओ दुरुस्ती’ नामक हे मराठीतील पुस्तक १९९७ साली ठाण्यात राम मारुती रोडकडून घंटाळीकडे जाणाऱ्या रद्दीच्या दुकानात आढळले, त्या काळात मराठी साहित्य वाचन-लेखन-पुस्तक खरेदीबाबत अपकर्षाला आरंभ झाला होता. नवकथेच्या सांगोवांगीच्या शिलेदारांपैकी एकट्या व्यंकटेश माडगूळकरांखेरीज वाचनालयांतून अरविंद गोखले आणि गंगाधर गाडगीळ यांची कथा वाचकांच्या दृष्टीने सॅच्युरेटेड अवस्थेला पोहोचली होती. पु.भा. भावे आणि शांताराम आवर्जून मागून वाचणारेही विरळ झाले होते. वाचणाऱ्यांची बुजूर्ग पिढी या ‘आपल्या’कालीन लेखकांची पालखी घेऊन ‘आजचे’कालीन साहित्य कसे मृत पावत चालले आहे, हे उच्चरवात सांगत होती. तर या काळात तुरळक प्रमाणात उगवलेली नववाचकांची पिढी ‘नक्की काय खरं मानायचं’ हा प्रश्न घेऊन आफाट मानसिक गोंधळातून जात होती. ‘महाराष्ट्राचे एकच लाडके व्यक्तिमत्त्व’, ‘महाराष्ट्राचे बंडखोर, तरीही चीरतरुण लाडके मिशीश्रेष्ठ’, ‘जाज्वल्य इतिहासाचे लाडके कादंबरीकार’, ‘ विस्थापित दीन-दुबळ्यांच्या दु:खांचा डोंगर उभारणारा लाडका जाड-कादंबरीकार’, ‘विकीपिडीयावर पहिला कब्जा करणारे लाडके माहिती-माफिया मुसाफिर’ यांची पुस्तके वाचली, की मराठी साहित्याचा क्रॅशकोर्स पूर्ण होत असे. त्यामुळे मधल्या दशकांत उत्तम लिहूनही महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व बनण्यात हुकलेल्या शेकडो साहित्यिकांची उपलब्ध होणारी कुठलीही जुनी पुस्तके माझ्यासाठी दुर्मीळ होती.

त्या काळात बॉक्स क्रिकेट, व्यायामशाळा, हिंदी पॉप अल्बम्स, एमटीव्ही-व्ही चॅनल, मोजके बॉलिवुडी हिट चित्रपट यांच्या धबडग्यातही माझ्यात शिरलेल्या वाचन-उधाणात दि.बा.मोकाशींच्या कथेकडे जाण्याचा माझा ‘एण्ट्री पॉइंट’ दहावीला असलेला त्यांचा ‘रेडिओची गोष्ट’ हा धडा होता. मला दहावीनंतर शिकायचे नव्हते. मोठा भाऊ बीएसईला होता. वडील अॅपलाब इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीत सुपरवायझर होते. वडिलांच्या जागी त्यांच्या कंपनीत चिकटण्याची परंपरा जपणाऱ्या शेवटच्या पिढीचा मी प्रतिनिधी होतो. त्यामुळे व्यावसायाभिमुख शिक्षण म्हणून दहावीच्या निकालाआधीच मला एका खासगी संस्थेत इलेक्ट्रॉनिक्सचा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स देण्यात आला होता. तो डिप्लोमा घेतल्यानंतर मला वडिलांच्या कंपनीत नोकरीचा मार्ग मोकळा होणार होता. त्या कोर्समध्येच रेडिओ-टीव्ही दुरुस्तीची माहितीही शामील असल्याने दि.बा. मोकाशींचे रेडिओ दुरुस्तीचे पुस्तक रद्दीत सापडल्यावर मला आनंद झाला होता. पण ते पुस्तक वाचताना त्यातील ‘फॉल्ट फाइंडिंग’चा तपशील हा जुन्या व्हॉल्व्ह रेडिओ आणि नव्वदीच्या अस्ताला कालबाह्य झालेल्या सर्किट्सबाबत असल्याने माझ्या कोर्समधील ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने उपयुक्त ठरले नाही. पण दि.बा. मोकाशींच्या कथांनी मला त्या कालावधीत कधीच निराश केले नाही. त्यांचे लेखन मी १९९७च्या मध्यात सुरू केले आणि थोड्याच दिवसांत वाचनालयात असलेली त्यांची सारी पुस्तके वाचून संपवली. एखाद्या लेखकाचे सलग सर्व वाचल्याचा आनंद मला दि.बा. मोकाशींच्या बाबतीत पहिल्यांदा घेता आला. वर उल्लेखलेले तत्कालीन (आणि दुर्दैवाने अजूनही तसेच राहिलेले) महाराष्ट्राचे यच्चयावत लाडके लेखकही मला तितके समाधान का देऊ शकले नाहीत, याची कारणे आता मी मुद्दाम तपासून पाहत आहे.

दहावीची परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १ एप्रिल १९९७ रोजी मी ठाणे नगर वाचन मंदिर वाचनालयाचा सभासद झालो आणि परीक्षेचा निकाल लागेपर्यंत मोकाट वाचनात बुडून गेलो. वाचन आधीही होत होते, पण ग्रंथालयात दररोज नवे पुस्तक बदलण्याइतपत गंभीर नाही. एप्रिल-मे आणि जूनच्या मध्यावर निकाल लागण्याच्या कालावधीपर्यंत लायब्ररीतल्या जुन्या पुस्तकांचा एक विशिष्ट गंध, दररोज वाचत असलेल्या जुन्या कथा-कादंबर्‍यांतील प्रसंग आणि नववी-दहावीतील मराठी-बालभारती पुस्तकांत आवडलेल्या धड्यांचे लेखक शोधून शोधून त्यांचे वाचन करण्यातून माझ्या स्वप्नांनाही कथात्मक अस्तर लागायला सुरुवात झाली होती. याच दरम्यान ‘वृत्तमानस’ या ब्रॉडशीटमध्ये निघणाऱ्या रविवारच्या वृत्तपत्रांतून साहित्याविषयी नव्या आकलनांची एकलव्यी शाळाही माझ्या वाचनाचा स्तर बदलत होती.

त्या तीन महिन्यांत मी जे काही वाचले, त्यात पुसट आठवतात त्या भास्कर चंदनशिवांपासून ते रुस्तुम अचलखांब, अण्णाभाऊ साठे, उत्तम बंडू तुपे, व्यंकटेश माडगूळकर यांच्या ग्रामीण कथा. कथाभारतीच्या नॅशनल बुुक ट्रस्टच्या भारतीय भाषांतील माला. (यात कन्नड-तेलुगू-उर्दू सर्वात भावलेल्या. बंगाली, पंजाबी, गुजराती, हिंदी फारशा न आवडलेल्या.) जी.ए. कुलकर्णी यांचा ‘कुसुमगुंजा’ वाचल्यानंतर त्यांतल्या ओ.हेन्रीएटीक परिणामांमुळे त्यांच्या आधीच्या आणि नंतरच्या कथासंग्रहांची केलेली ओरपणी. श्री.दा. पानवलकर यांच्या सूर्य-औदुंबरमधील कथांचे अवाक् होऊन झालेले वाचन. रंगनाथ पठारेंची ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ ही कादंबरी. सुनील गंगोपाध्याय या बंगाली लेखकाचा मराठीत अनुवादित झालेला ‘आई एका पक्ष्याची’ हा थोर संग्रह. नॅशनल बुक ट्रस्टमुळे उपलब्ध झालेल्या तमीळ लेखक जयकांतन यांच्या कथा. अफसाना नावाचा उर्दूतल्या खूप क्लासिक्स असलेल्या कथांचा जाडजड ठोकळा. इस्मत चुगताई, सआदत हसन मंटो यांच्या त्यातील आवडलेल्या कथांमुळे त्यांचे अनुवादित संग्रह मिळवून त्यांचे वाचन. चिं.त्र्यं. खानोलकरांच्या ‘गणुराया’ आणि ‘चानी’पासून उपलब्ध झालेल्या कादंबऱ्या. जयवंत दळवी यांच्या कादंबरीवर अल्बम नावाची दूरदर्शनवरील मालिका आवडलेली असल्यामुळे त्यांचे मिळेल ते लेखन. अन् या तीन महिन्यांतील वाचलेल्यांत लख्ख आठवतात, त्या दिगंबर बाळकृष्ण मोकाशी म्हणजेच दि.बा. मोकाशी यांच्या कथा.

दि.बा. मोकाशी यांच्या कथांची वैशिष्ट्यं न जाणवताही मी त्या झपाटल्यासारख्या वाचत होतो. त्यांच्या पन्नास वर्षांपूर्वी लिहिलेल्या (१९४० ते ५०) लामणदिवा संग्रहातील ‘रेडिओची गोष्ट’ वाचल्यावर लक्षात आले, की दहावीच्या मुलांची मानसिक जडण-घडण पाहता, मूळ कथेतील काही मजकूराला काट देऊन तो बालभारतीच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला होता. तो मजकूर दहावीच्या मुलांना वाचूनही आक्षेपार्ह वाटला नसता असा होता. या संग्रहातील एकेक कथा मला त्यांच्या लेखनाचा भक्त बनवू पाहत होती. त्यात प्रेमकथा होती तीही वेगळ्या ढंगाची. कुटुंबकथा होत्या, त्याही नेहमीच्या नसलेल्या. प्रेमविरह कथा, बंडखोरीच्या कथा, वाताहतीच्या कथा, समाज बदलाच्या जाणिवांवर आधारलेल्या आणि समाजवादी विचारांचा पगडा असलेल्या काही कथा होत्या. त्या काळात बंगालमध्ये झालेला भीषण दुष्काळ, भूकबळी आणि सरकारी यंत्रणेतील गैरप्रकारातून भुकेकंगाल झालेल्या जनतेच्या वृत्ताने देशभरातील जनता हळहळली. मराठीत काकोडकरांनी ‘कुणाच्या स्वातंत्र्यासाठी’ या कादंबरीतून त्या भावनेला शब्दरूप दिले. तर दि.बा.मोकाशी यांनी रिपोर्ताजी शैलीत ‘आज बंगालचे शरदबाबू असते तर-’ ही कथा लिहिली.

त्या काळात बॉक्स क्रिकेट, व्यायामशाळा, हिंदी पॉप अल्बम्स, एमटीव्ही-व्ही चॅनल, मोजके बॉलिवुडी हिट चित्रपट यांच्या धबडग्यातही माझ्यात शिरलेल्या वाचन-उधाणात दि.बा.मोकाशींच्या कथेकडे जाण्याचा माझा ‘एण्ट्री पॉइंट’ दहावीला असलेला त्यांचा ‘रेडिओची गोष्ट’ हा धडा होता.

दहा ते पंधरा पाने या आटोपशीर आकारात उत्तम कथेचा पसारा. अजिबातच अलंकारी नसलेली, साधी-स्पष्ट, तरी पकड घेणारी भाषा. अतिशय चपखल इण्ट्रो. (रेडिओची गोष्टचा इण्ट्रो पाठ्यपुस्तकातील धड्यात गाळला आहे.) मुळात अनेक कथा या कथांचे विषय होऊ शकणार नाहीत, अशा असल्याने त्यांच्याबद्दलचा आदर दर कथावाचनागणिक दुणावत गेला. तरुणी नववारी शालूतून गोल पातळ नेसू लागल्याच्या घटनेतील सामाजिक स्थित्यंतर कथेतून टिपण्याची आणि समाजवादाचा शहरी मध्यमवर्गीय कुटुंबावरचा आरंभिक प्रभाव पकडण्याची हातोटी त्यांच्या सुरुवातीच्या कथेत दिसू शकते. ‘भावभावनांचे पदर उलगडणाऱ्या’ आणि ‘किडक्या सामूहिक मनोवृत्ती’चे दर्शन घडविणाऱ्या वगैरे चावून चोथा झालेल्या विशेषणांनी नटलेल्या नवकथेच्या फौजेतल्या इतर कथाकारांहून म्हणूनच मोकाशींची कथा भिन्न ठरली. शिळी झाली नाही. ‘माझ्यावर गोष्ट लिही’ ही त्यांची माझी सर्वाधिक आवडती कथा. तेव्हाही मी ती कितीतरी वेळा वाचलेली आणि आजही सोपी कथा लिहिणे किती अवघड आहे, याचे उदाहरण जाणून घेण्यासाठी म्हणून अधून-मधून त्याचे पारायण होत राहते. मोकाशींच्या अनेक कथा इतरांना कथाविषय म्हणूनही पटणार नाहीत, किंवा निष्णात कथाकारालाही सुचले तरी उतरवता येणार नाहीत, इतक्या विलक्षण धाटणीच्या आहेत. त्यांची ‘रेडिओची गोष्ट’ जशी चाळीत रेडिओतील सिग्नल ऐकून बुडणाऱ्या जहाजाला वाचविण्याच्या घटना तपशिलाला एका उत्कंठावर्धक अवस्थेत घेऊन जाणारी आहे, तशीच ‘माझ्यावर गोष्ट लिही’सारखी मास्टरपीस कथा त्यांच्या इतर कोणत्याही समकालीन कथाकाराला उभारता आलेली नाही. आठ-दहा पानांत सर्वोत्तम घाटदार मजकूर या कथेमध्ये अनुभवायला मिळतो. या कथेची सुरुवात इथे मुद्दाम देतो –

‘वयाच्या सोळाव्या वर्षी मी एक प्रसिद्ध लेखक होतो. आमच्या गल्लीत कुठंही माझं नाव तुम्हाला ऐकू आलं असतं. तसं म्हटलं तर माझी एकही गोष्ट प्रसिद्ध झाली नव्हती. पण गल्लीतला लहानमोठा नागरिक रस्त्यावरून जाऊ लागला की, खिडकीकडे तोंड करून ओरडायचा.
काय लेखक, लेख लिहिता काय?
त्या मुर्खांना लेख नि गोष्ट यांतील फरकही ठाऊक नव्हता. तरी त्यांचे हे पुकार ऐकून मी स्वत:वर खूष होई; नि त्यावेळी वडिलांनी धाडलेल्या पैशांचा हिशेब करण्याचं काम चालू असेल, तर हिशेब लागत नसलेले पांच रुपये किरकोळ खाती घालून मी मोकळा होत असे. हिशेबासारख्या किरकोळ गोष्टींत मन घालणं का लेखकाचं काम आहे? ’ ( कथासंग्रह : लामणदिवा)

नेमाडेंचा ‘ब्रह्मांड’प्रसिद्ध पांडुरंग सांगवीकर जन्माला येण्याच्याआधी वीस वर्षांपूर्वीतरी ही कथा लिहिली गेली आहे. पांडुरंग सांगवीकरसारखाच शिक्षणासाठी दूरच्या गावातून शहरात (बहुदा पुण्यातच) आलेल्या नायकाची विचारसरणी, त्याचा भवताल आणि त्याची बंडखोरी, लेखनआस आणि लिहिण्यातील मर्यादा यांचे रसकारी अनुभव यात सापडू शकतील. गोष्टीत गोष्ट रचत जाण्याचे हे विरळा उदाहरण आजही शिळे वाटत नाही, हे मोकाशींचे यश.

मध्यंतरी सत्यकथा मासिकांच्या कित्येक वर्षांच्या बाइंड संग्रहाचे गठ्ठे मला प्राप्त झाले. त्यांत मोकाशींनी आपल्या आरंभिक लेखनाचा घेतलेला आढावा ‘पहिली पावलं’ या १९६४ सालात लिहिलेल्या लेखात सापडला. त्यात त्यांनी माधव मनोहर यांच्या मित्राला त्याच्या नव्या मासिकासाठी ‘माझ्यावर गोष्ट लिही’ ही कथा लिहून दिली होती, म्हटले आहे. माधव मनोहरांच्या विनंतीवरून ही कथा लिहिली गेली होती. त्यांच्या मित्राने काही मासिक काढले नाही. म्हणून त्यांनी मोकाशींना त्या कथेची पाने परत केली. ही कथा मग सत्यकथा मासिकात प्रसिद्ध झाली आणि पुढे लामणदिवा या मोकाशींच्या पहिल्या कथासंग्रहात विसावली. बडोद्याच्या पद्मजा प्रकाशन या आज अज्ञात असलेल्या प्रकाशनाने हा संग्रह प्रकाशित केला. हा संग्रह प्रकाशित करण्यासाठी माधव मनोहरांनी शिफारस केल्याचा उल्लेखही मोकाशी यांनी सत्यकथेमधील लेखात केला आहे.

मोकाशींच्या प्रत्येकाला सर्वाधिक आवडणाऱ्या वेगळ्या कथा असू शकतील. ‘आता आमोद सुनासि आले’ ही बऱ्याच जणांची आवडती कथा असते. पण या संपूर्ण नास्तिक असलेल्या माणसाने देऊळ, देव, वारकरी आणि विशुद्ध भक्ती यांविषयी पुरेपूर सुंदर कथा लिहून वर विज्ञानकथाही हाताळून पाहिल्या आणि भयकथेचाही अंगीकार केला. राम कोलारकरांच्या ‘सर्वोत्कृष्ट मराठी विनोदी कथांं’च्या खंडांमध्येही त्यांची हजेरी दिसते आणि नारायण धारपांनी संपादित केलेल्या सर्वोत्कृष्ठ मराठी भयकथांमध्येही त्यांची कथा आढळते.

दहावीच्या परीक्षेनंतरच्या सुट्टीत वाचलेली ‘व्हिलन’ ही कथादेखील मला लख्ख आठवते. प्रेमाचा त्रिकोण वगैरे असल्याचा आभास निर्माण करीत ती झर्रकन दुसऱ्याच वळणावर वाचकाला घेऊन जाते. ‘शेवटचा खटला’ ही एक गावात खटले लढण्याचे व्यसन लागलेल्या म्हाताऱ्याच्या मुलाची कथा आठवते. यात खटल्यासाठी लागणारा पैसा नुकताच लग्न होऊन शहरात विसावलेला मुलगा पाठवत असतो. अन् बापाच्या खटलेबाजीला कंटाळून तो बापावरच खटला टाकतो आणि गंमत उडते असे काहीसे कथानक होते.

‘ग्रहयोग’ या कथेमध्ये षण्मुग नावाच्या कित्येक प्रकाशवर्ष दूरच्या ग्रहावरून पृृथ्वीवरील शास्त्रज्ञाला रेडिओ संदेश येतो. पृथ्वीहून प्रचंड प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या ग्रहावरून विशिष्ट मागणीसाठी तेथली एक व्यक्ती येते. याच ग्रहावरील माणसांनी दहा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीला भेट देऊन तेव्हा काही चमत्कारी वास्तूंचे तंत्रज्ञान पृथ्वीवरील माणसांना दिलेले असते. रेडिओ संदेशांचा प्रभावी वापर या कथेत आहेच. पण आज आपण ऑडिओ-व्हिडीओ संवाद साधू शकतो, त्याची काल्पनिक रचना त्यात आहे. १९७०च्या आसपास लिहिल्या गेलेल्या या कथेचा शेवट विलक्षण प्रभावी आहे. ‘आता आमोद सुनासि आले’मधून भक्तीरसाचा मळा फुलविणारे दि.बा. मोकाशी यांनी मराठीत उत्तम सायन्स फिक्शन लिहिल्या आहेत, याबाबतची चर्चा त्यांच्या वाचकांनी घडविल्याचे ऐकिवात नाही.

ज्ञात तपशीलांवर आणि व्यक्तींवर कुणीही ढीगाने मजकूर उभा करू शकतो. मात्र १९६५ पासून सलग आठ दहा वर्षं संशोधन आणि कल्पना यांची सरमिसळ करीत कामसूत्रकार वात्सायन या तिसऱ्या शतकातील ग्रंथकारावर मोकाशींनी दीडशे पानांची कादंबरी लिहिली. या काळात राज्यातील विविध मासिक, दिवाळी अंकात त्यांचे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन होत असले, तरी वात्सायन नायक म्हणून उभा करणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.

गंमत म्हणजे याच काळात पुढे रहस्यकथांमध्ये काम आणि शृंगाराची मशागत करणाऱ्या सुुभाष शहा या अवलिया लेखकाने ‘राणी’, ‘प्यारी’, ‘मस्ती’ आणि ‘कामदेवी’ या बेळगावी मासिकांतून जना-मनांतील कामसूत्राला प्रोत्साहन देत आफाट माया गोळा केली होती. अन् त्यांच्या अनुकरणातून लेखकांची पोर्नोफळी शृंगाराच्या नावावर अश्लील साहित्य प्रसविण्यास सज्ज झाली होती. या सगळ्या व्यवहारांच्या निरीक्षणातून मोकाशी यांची ‘मी सेक्सी होतो’ या शीर्षकाची कथा लिहिली गेली आहे. आम्ही मराठी माणसे या संग्रहात ती वाचायला मिळू शकेल.

१९७२ सालच्या ‘ललित’ मासिकाच्या दिवाळी अंकात ‘वात्सायन आणि मी’ हा लेख मोकाशींनी लिहून ठेवला आहे. त्यात या माणसावर कादंबरी लिहिण्याची सात-आठ वर्षांची त्यांची धडपड येते. वात्सायनाने त्यांना कसे झपाटून टाकले, याचीही माहिती आहे. त्यांत शेवटाला ते लिहितात –
‘मला वाटते सतराशे वर्षांनंतरही आपला ग्रंथ कामोत्तेजक औषधीसारखा वापरला जाईल, हे बेट्याला ठाऊक असावे. सतराशे वर्षांनंतरही त्याने केलेली कामाची व्याख्या, बरोबर ठरून सर्वमान्य झाली आहे. तसेच त्याच्यावेळी, कामशास्त्र शिकण्याची आवश्यकता नाही; ते ज्ञान नैसर्गिक येते- असे सांगणारे जुनाट लोक होते. त्यांचे म्हणणे त्याने खोडले आहे. आजही ते मत सर्वत्र आहे. र.धो. कर्वे यांना त्यासाठी आयुष्य द्याावे लागले. वात्सायनाच्या वेळी जो कला, विचार यांचा मोकळा आविष्कार होता, तो आपण केव्हाच गमावला आहे. आपण आज अनेक तऱ्हेने विकृत झालो आहोत. माझ्या कादंबरीमुळे या विकृत्या जातील असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. वात्सायनाचा तो मोकळा काळ मला मांडता आला तरी पुरे.’

गेल्या दहा वर्षांत अमेरिकेतील पोर्नउद्योग वात्सायनाच्या सूत्रांबरहुकूम विस्तारत चालला आहे. त्या उद्योगाला उघड विकृत मानणारी सांप्रतकाळातील दोन किंवा तीन वयोगटातील पिढ्या छुप्या मार्गाने त्यांचा अंगीकार करीत आहे. मोकाशींच्या काळात समाजात असलेली दांभिकता कणानेही पुढे सरकलेली नाही. त्यांची वात्सायनावरील कादंबरी सगळ्या वाचनालयात वाचायला मिळतेच असे नाही. पण कित्येकांना मोकाशींच्या या योगदानाबाबत माहिती नसते, तसेच त्यांच्या रिपोर्ताजी पुस्तकांबाबतही.

१९६७ साली ‘अन्नधान्य स्वतंत्रता संचलनाची’ एक योजना ‘माणूसकार’ माजगावकरांनी राबविली होती. वेरुळच्या कैलास लेण्यांपासून मुंबईच्या गेटवेपर्यंत सुमारे दोन महिने चालणारी तीनशे मैलांची पदयात्रा केली. त्यांच्या यात्रेत निरीक्षक म्हणून दि.बा. मोकाशी सहभागी झाले. वाटेत येणारी गावे, शहरे, माणसे आणि त्यांचे अन्नदु:ख आणि सुख यांची पाहणी ‘अठरा लक्षं पावलं’ या पुस्तकात शब्दबद्ध झाली. महाराष्ट्रात फोकनाड आणि पाणचट विनोदी किश्श्यांत, भावभावनांच्या कल्लोळांच्या डबक्यांत सुजलेल्या कथाकथनकारांच्या पुस्तकांत अधिक रमणाऱ्या मराठीतील काही वाचनपिढ्यांना मोकाशींच्या या पुस्तकाचे महत्त्व उमजले नाही. (मिलिंद बोकिलांची शाळा कादंबरी डोक्यावर घेणाऱ्या वाचकांना त्यांचेच ‘समुद्रापारचे समाज’ हे सुंदर पुस्तक माहितीही नसते.तसेच हेही.)

मोकाशींनी वारीवर लिहिले, वारकऱ्यांवर लिहिले, माणसांतल्या देवभोळेपणाची अनेक रूपे त्यांच्या कथात दिसतात. समाजाच्या बदलत्या विचारसरणीची पत्रकारी निरीक्षणे त्यांनी कथन साहित्यात उतरविली. त्यांच्या वाचनालयात असलेल्या साऱ्या पुस्तकांना खाऊन झाल्यानंतर ‘रेडिओ दुरुस्ती’वरचे त्यांचे रद्दीत सापडलेले पुस्तक मी बऱ्यापैकी कालबाह्य असूनही तीन-चार वर्षे नेटाने बाळगले होते.

दहावीचा निकाल लागल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्सच्या डिप्लोमा एके डिप्लोमा करीत मराठी कथा-कादंबऱ्यांचे वाचन करण्याच्या माझ्या निश्चयात थोडा बदल झाला. संध्याकाळी डिप्लोमाचे वर्ग भरीत. सकाळच्या वेळेत कॉलेज करता येऊ शकेल, असे नातेवाइकांपैकीच कुणीतरी माझ्यावर बिंबवले. दहावीतील बऱ्याच तुटपुंज्या मार्कांनीशी मी कोणत्याही कॉलेजमध्ये जायचे स्वप्न पाहिले नव्हते. ठाण्यात ज्युनिअर कॉलेज असणाऱ्या शाळेचा फॉर्म आणला. अकरावीचा फॉर्म भरण्याची मुदत संपण्याच्या अर्धा तास आधी तळ्यात-मळ्यात मन:स्थितीत तो भरला. पुढे तेथून बारावी आणि नंतर मोठ्या कालेजातून आणि विद्याापीठातून डबल एम.ए. (इतिहास आणि मराठी) करेस्तोवर माझ्या वाढलेल्या मराठी पुस्तकसंग्रहात मोकाशींच्या इतर कथांच्या पुस्तकांसह ‘रेडिओ दुरुस्ती’चे पुस्तकही टिकून होते. समकालीन आणि समवयीन वाचक मित्रांना सांगण्यासाठी मराठीतील आवडता लेखक म्हणून सांगण्यासाठी मोकाशींच्या वाचलेल्या कथासंग्रहांची, कथाबाह्य पुस्तकांची नावे पाठ होती. नवकथेच्या फळीतील कथाकारांत त्यांचे लेखन वेगळे उठून दिसणारे कसे आहे, याची वाद घालता येण्याइतपत हुकूमत आली होती.

२००३ साली पत्रकारिता करीत असताना ठाण्यात नव्याने घेतलेल्या मोठ्या घरात राहायला गेल्यानंतर तिथल्या माळ्यांवर माझा तोपर्यंतचा पुस्तकसंग्रह साठला होता. २००५-६ च्या पावसाळ्यात त्या माळ्यांना ओल पडल्याचे लक्षात येईस्तोवर तेथील बर्या.च पुस्तकांचा बळी गेलेला होता. त्यात मोकाशींच्या वणवा, आम्ही मराठी माणसं या काही पुस्तकांना वाचविता आले, तरी तळात असलेल्या ‘रेडिओ दुरुस्ती’ पुस्तकाची विल्हेवाट लागली होती. ओलामुळे तुकडे पडणार्यात त्या पुस्तकाला वाचविण्याची कोणतीही शक्यता उरली नव्हती. हे पुस्तक गमावल्याचे दु:ख झाले, तरी पुन्हा केव्हातरी ते रद्दीत मिळू शकेल, अशी आशा मला होती. पण पुस्तक भटकंतीसाठी राज्यातील विविध दुर्मीळ पुस्तकांची दालने धुंडाळूनही गेल्या चौदा ते पंधरा वर्षांत ते पुस्तक कधी दृष्टीस पडले नाही.

– पंकज भोसले


या दीर्घलेखाचे पुढील भाग

मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (२)

२. एक उशिराने कमावलेले दुर्मीळ…

हे पुस्तक आहे इयन फ्लेमिंगच्या जेम्स बॉण्ड कादंबरी मालिकेतील ‘डॉ.नो.’ या पुस्तकाचा मोकाशींनी केलेला अनुवाद./p>

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (३)

३. मोकाशींची लेखन भूमिका

साधी भाषा हीच खरी, या निर्णयाला मी आलो. साध्या भाषेतून वाटेल तो आशय मांडता येईल, याचा मला आत्मविश्वास होता.

लेख वाचा…


मोकाशींच्या कथांसोबत वाढत जाताना… (४)

४. ‘दिठी’उत्तर काळातील मोकाशी…

दि.बा. मोकाशी यांच्या एका कथेवर पन्नास-साठ वर्षांनंतरही चित्रपट निघू शकतो, हे दिठी चित्रपटाच्या निमित्ताने पाहायला मिळाले.

लेख वाचा…


रोहन शिफारस

नाइन्टीन नाइन्टी

आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक सचिन कुंडलकर… या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !

1990-Cover

340.00Add to cart


रोहन प्राइम

वाचकांसाठी एक खास सभासद योजना!

‘रोहन प्राइम’ म्हणजे भरघोस सवलती, विशेष कार्यक्रम आणि नावीन्यपूर्ण उपक्रम… फक्त सभासदांसाठी! मेंबरशिप घेतल्यावर रु.१००चे कूपन भेट…. हक्काची २५ टक्के सवलत आणि बरंच काही…

अधिक माहिती जाणून घ्या..

250.00Add to cart


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *