फॉन्ट साइज वाढवा
अनेक वेळा आपण पाहतो की, एखादं पद भूषवण्यासाठी महिलेचीच निवड करण्यात येते किंवा एखाद्या कार्यक्रमाचं उद्घाटन महिलेच्या हस्ते करण्यात येतं. समाजातलं महिलांचं स्थान अधोरेखित करण्यासाठी ती एक प्रतीकात्मक कृती असते. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे… भारतात ५२ वर्षांपूर्वी इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, याला त्यांचं महिला असणं कारणीभूत नव्हतं. आणि पुढे स्वबळावर त्यांनी ते पद १५ वर्षं केवळ भूषवलं नव्हे, तर गाजवलं. याउलट अमेरिकेसारख्या प्रगत लोकशाही राष्ट्रात आजही हिलरी क्लिंटन अध्यक्षपदाची निवडणूक हरतात, याला त्यांचं महिला असणं हेही एक कारण असतं. हे खरं असलं, तरी भारतात महिलांबाबत आजही समाजमनं पुरेशा प्रमाणात बदलली नाहीत हे वास्तव राहतं. अनेक शतकांपासून चालत आलेल्या परंपरांनी समाजमनांना घेरलं आहे. त्यात पुरेशा प्रमाणात बदल होण्यास आणखी कालावधी लागेल. पण एवढं निश्चित की, त्या दिशेने आज आपण मार्गक्रमण करत आहोत.
‘प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते’ या एका ‘सुप्रसिद्ध सुवचनाची’ रेकॉर्ड अनेक सत्कारांच्या कार्यक्रमांत वाजवली जाते. ‘रोहन प्रकाशन’चं गेल्या ३५ वर्षांचं रेकॉर्ड तपासलं तर दिसून येईल की, ‘रोहन’च्या यशात लेखिकांचा मोठा वाटा आहे. इथे असं आवर्जून सांगावसं वाटतं की, हे मी एक वास्तव म्हणून सांगत आहे, ‘सुवचनाची रेकॉर्ड’ म्हणून नव्हे… मंगला बर्वे, वसुमती धुरु, कमला सोहनी, वर्षा जोशी, उषा पुरोहित, शोभा बोंद्रे, सुलक्षणा महाजन, स्नेहलता दातार, प्रमिला पटवर्धन, रोहिणी पटवर्धन, प्रतिभा काळे, सुजाता चंपानेरकर, माया परांजपे, लता दळवी, मीना चंपानेरकर, वैजयंती केळकर, निर्मला मोने, नंदिनी दिवाण, नंदिनी उपाध्ये, विद्या बाळ, मंगला गोडबोले, सरोज देशपांडे, गीता अय्यंगार, नीलिमा भावे, रमा हर्डीकर, सुनीति जैन, विजया फडणीस, शुभदा चौकर, शकुंतला पुंडे, सुनीता भोसले, मीनाक्षी भोसले, शुभदा पटवर्धन, लिली जोशी, निशा शिवूरकर, उल्का राऊत, मीना वैशंपायन, पुष्पा भावे, शारदा साठे, मृदुला दाढे-जोशी अशी ही न संपणारी लेखिकांची/अनुवादिकांची मांदियाळी आहे. पुस्तकांसाठी आजवर आम्ही अनेक विषय निवडले. त्या प्रत्येक विषयात लेखिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला-दिना-निमित्ताने हे सर्व आवर्जून सांगावंसं वाटलं.
मागील अंकाच्या मनोगतात मी अशोक जैन, अरुण टिकेकर व श्रीकांत लागू या साहित्य वर्तुळातील माझ्या मित्रांविषयी लिहिलं होतं. या अंकात याच साहित्य वर्तुळातील स्त्री-स्नेह्यांविषयी थोडं लिहावं म्हणतोय…
व्यवसाय म्हटलं की, अनेक माणसं जोडली जाणं आलं. विशेषत: प्रकाशन व्यवसायात नवनवी माणसं जोडली जाणं सहाजिकच आहे. नव-नवे लेखक-लेखिकांची ओळख होत जाते. काहींशी व्यवहारापुरती संबंध राहतात, पण असे जुजबी संबंध राहण्याचं प्रमाण फार कमी. बहुतेकांसोबत निकोप, सुदृढ नातं निर्माण होतं. कामाव्यतिरिक्तही भेटणं होतं, अनेक विषयांवर चर्चा होतात, ऋणानुबंध निर्माण होतात. आणि काही जणांशी या ऋणानुबंधांचं रूपांतर एका चांगल्या स्नेहात होतं, मैत्रीत होतं. लेखिकांपैकी अशा काही जणींशी माझा उत्तम स्नेह जुळला आहे.
मंगला बर्वे या ‘रोहन’च्या पहिल्या स्त्री लेखिका. १९८३ साली त्यांना विषय देऊन पहिलं पुस्तक लिहायचं सुचवलं, तेव्हा त्यांचे पती अच्युत बर्वे यांचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. त्यांची मन:स्थितीही त्यामुळे ठीक नव्हती. मात्र, या पुस्तकाच्या कामाने त्यांना उमेद दिली असं त्यांनी त्यांच्या मनोगतातच लिहिलं आहे. पुढे मंगलाताई आणि आमचं कुटुंब यांत एक स्नेहभाव जुळला. त्याचबरोबर ‘रोहन’साठी त्यांनी जवळ जवळ वीस-बावीस पुस्तकं लिहिली. पण प्रेम, आस्था, माया हेच सर्व या नात्यातले स्थायीभाव राहिले. मंगलाताई या महिला-उपयुक्त पुस्तकं लिहिणाऱ्या, तर पुष्पा भावे या महिलांच्या हक्कांसाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणाऱ्या आणि चळवळींतही सहभागी होणाऱ्या. पुष्पाताईंशी ओळख २५ वर्षांची. या दरम्यान आमच्यात उत्तम स्नेह जडला. पुष्पाताई म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्त्व. बाहेर त्यांचं करारी, तत्त्वांसाठी लढा देणारं व्यक्तिमत्त्व जवळच्या मंडळीत थोडं पालटतं. गप्पांच्या चर्चेत त्या भाग घेणार, पण त्यात एक प्रकारची गंभीरता जाणवणार. बोलण्यात धार असणारच, परंतु त्याला मृदुतेची जोड असणार. आपुलकी, स्नेह व्यक्त करायचीही त्यांची एक लोभस पद्धत… कोणत्यातरी निमित्ताने मी त्यांना त्यांची आवड लक्षात घेऊन सिल्कची साडी दिली होती. त्याची पोच फोनवर देताना त्या म्हणाल्या, ‘‘अहो, म्हाताऱ्या मैत्रिणीचे कशाला एवढे लाड करता?’’ आणि काही महिन्यांनंतर माझ्या घरी येताना आवर्जून ती साडी त्या नेसून आल्या होत्या. राजकारण, समाजकारण यांवर त्यांच्याशी बोलताना आपल्या कन्सेप्ट्सना स्पष्टता येते. अशोक जैनसोबतच्या माझ्या मैत्रीमुळे जुळलेल्या अशा स्नेहबंधांचा गोतावळा पुढे वाढत गेला. सरोज देशपांडे, मीना वैशंपायन, उल्का राऊत आणि अशोकची पत्नी सुनीति यांचा या गोतावळ्यात समावेश होत गेला. या स्नेहबंधांतूनच त्यांच्यासोबत पुस्तकंही झाली.
सरोजताई म्हणजे एक शिस्तशीर व्यक्तिमत्त्व. विविध विषयांचा त्यांचा अभ्यास. त्यांच्या अभ्यासपूर्णतेला नीटनेटकेपणाची जोड असते. कोणत्याही गोष्टी सखोलतेने, निश्चित दिशेने करायचा त्यांचा पिंड. मग ते वाचन असो, लिखाण असो नाहीतर एखादा अभ्यास करणं असो. त्यांच्याशी सहजतेने मैत्रीपूर्ण बोलणं हा एक आनंदानुभव असतो. गप्पांच्या ओघात एखादा तिरकस बाणही त्या सोडतात, व गप्पा वेगळ्या उंचीवर जातात. त्यांच्याप्रमाणेच मीना वैशंपायन या एक व्यासंगी, अभ्यासू, शिस्तशीर व्यक्तिमत्त्व. एका पुस्तकाच्या निमित्ताने आमचा परिचय झाला आणि पुढे आमच्यातला स्नेह दुणावत गेला. त्यात ‘एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’च्या दोन कमिटीवर आम्ही एकत्र काम करत असल्याने त्यांच्या कामाचा आवाका लक्षात आला. त्या वेगवेगळ्या पातळींवरची वेगवेगळी कामं तन्मयतेने आणि विलक्षण कार्यक्षमतेने करत असतात.
मुंबईहून पुण्यात स्थलांतर केल्यानंतर लेखिका म्हणून प्रथम स्नेह जडला तो उषा पुरोहित यांच्याशी. उषा पुरोहित म्हणजे मूर्तिमंत उत्साह! मोकळ्या मनाच्या उषाताई कधी आपल्याला ठणकावून काही सांगणार, तर कधी आपल्या अडचणी मनापासून समजून घेणार ! तक्रार करणार तीही हक्काच्या माणसाकडे करावी तशी ! त्यांच्या इतकी सकारात्मक व्यक्ती भेटणं विरळाच. त्यांचे पती म्हणजे एअर व्हाइस मार्शल पी.एल. पुरोहित (निवृत्त). तेही उमद्या व्यक्तिमत्त्वाचे. उषाताईंच्या हातचे स्वादिष्ट पदार्थ, पुरोहितांकडून त्या सोबतीला बिअरचा ग्लास आणि भारतीय हवाई दलाच्या कहाण्या… अशा आमच्या कितीतरी मैफली जमल्या आहेत.
खऱ्या अर्थाने एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व म्हणावं ते म्हणजे उल्का राऊत. त्यांचं वाचनही भरपूर. मुंबईत गेलो, थोडा निवांत वेळ असला तर मी त्यांच्याकडे आवर्जून जातो. पुस्तकांवर बोलतो, मोकळ्याढाकळ्या गप्पा होतात. त्यांना मैत्रीण म्हणावं असं आमच्यातलं नातं. पण समवयस्क असतानाही त्यांच्याशी बोलताना मी त्यांना ‘अहो-जाहो’ करतो व गंमत म्हणजे ‘उल्का राऊत’ अशा पूर्ण नावानेच त्यांना संबोधतो. आमच्यात जो स्नेह आहे त्याच्याशी या दोन्ही गोष्टी मला विसंगतच वाटतात. पण एकदा वहिवाट अंगवळणी पडली की, ती बदलणं कठीण असतं आणि अशा विसंगती निर्माण होतात.
घट्ट मैत्री म्हणावी असं नातं जडलेल्या सुनीति जैनविषयी लिहिल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही. सुनीतिशी ओळख झाली ती अशोकची पत्नी म्हणून. परंतु नंतर थोड्याच दिवसांत तिच्याशी स्वतंत्र नातं प्रस्थापित झालं. सहकार्य करायला नेहमीच तत्पर असलेली सुनीति जे काही करणार ते मन लावून. सुनीतिकडे कधीही हक्काने जातो. किंवा ‘येतो’ सांगून आयत्या वेळी ‘येत नाही’ असं तिला बिनदिक्कतपणे मी सांगू शकतो, तिच्या रागाची पर्वा न करता. कोणत्याही वेळेला खायला काही मागू शकतो, किंवा ‘जेवायलाच येईन’ असं सांगून आयत्यावेळी पलटी खाऊ शकतो. मला त्यात फार भीड वाटत नाही. शेवटी मैत्री अशीही हवी जिथे आपल्याला मोकळेपणाने आणि हक्काने थोडं बेशिस्तपणे वागता येईल!
…मैत्री किंवा स्नेहभाव हा निरपेक्षच असतो, पण त्यात रागवायलाही मोकळीक असली पाहिजे. लिली जोशी, वर्षा जोशी, मृदुला दाढे-जोशी, स्नेहलता दातार यांच्याशीही माझा छान स्नेह जुळला असतानाही त्यांच्याविषयी मी केवळ जागेअभावी लिहू शकलो नाही. मात्र नंतर कधी आवर्जून लिहिणार आहे. तोपर्यंत त्यांना, स्नेहापोटी रागवायची मोकळीक असणार आहे. आणि स्त्री-पुरुषांतील सर्वच नात्यांत असाच स्नेहभाव वृद्धींगत होत गेला तर जागतिक महिला दिनाचं औचित्य ते काय उरणार?
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मार्च २०१९
स्त्री-लेखिकांची लक्षणीय पुस्तकं
आनंदी शरीर आनंदी मन
बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी
डॉ. लिली जोशी
सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला ‘आनंदी’ ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर ‘आनंदी’ हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक…. ‘आनंदी शरीर, आनंदी मन!’
एक सायंकाळ एक पदार्थ
रात्रीच्या जेवणाचे ‘शॉर्टकट’ पर्याय
मंगला बर्वे
काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख…इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.
स्वयंपाकघरातील विज्ञान
विविधांगी शास्त्रीय माहिती, मार्गदर्शन व अनेक उपयुक्त सूचना
[taxonomy_list name=”product_author” include=”391″]
स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा…
विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते?
प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते?
विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात?
आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील?
विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल?
डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत.
आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक…
स्वयंपाकघरातील विज्ञान!
महात्म्याच्या प्रतीक्षेत
आर.के. नारायण
अनुवाद : उल्का राऊत
‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘गाइड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाइड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात.
अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी कोणतंही कर्तव्य नसलेला श्रीराम भारतीच्या प्रेमात पडतो आणि तिच्यामुळे स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतो. निवांत व सुखासीन आयुष्य जगणारा श्रीराम तिला भेटल्यानंतर त्याने विचारही केला नसेल अशा प्रकारचं आयुष्य जगतो.
भारती बुद्धिमान, तडफदार आणि देशाला वाहून घेतलेली व्यक्ती आहे. त्याउलट हा सामान्य, दिशाहीन आणि कोणतंही ध्येय नसलेला! त्यामुळे दोघांमध्ये होणाऱ्या संवादात एक प्रकारची खुसखुशीत जुगलबंदी वाचायला मिळते.
आर.के. नारायण यांनी गांधीजीची व्यक्तिरेखा या कादंबरीत विविध पैलूंमधून रेखाटली आहे. एकाचवेळी गांधीजी स्वातंत्र्य लढ्यातले लोकप्रिय लोकनेते आहेत, भारतीचे सर्वेसर्वा आहेत तर श्रीरामच्या दृष्टीने त्याच्या व भारतीच्या लग्नाला संमती देणारी एक महत्त्वाची व्यक्ती आहे. अशा सर्वच व्यक्तिरेखांचं रंगतदार चित्रण आर. के. नारायण या कादंबरीत प्रभावीपणे करतात आणि त्याचबरोबर अनेक घटना व प्रसंगांद्वारे कथेतील उत्कंठाही वाढवत नेतात.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…
आयुष्य संपन्न करणारे तीन बाबू मोशाय
या तिघांत गुणविशेष असले तरी, त्यांच्या व्यक्तिमत्त्वांत अनेक विसंगतीही होत्या. पण त्याचमुळे नात्यात ‘मनॉटनी’ येत नाही, नाती अधिक दृढ होतात…