आशिष काळकर लिखित ‘युक्रेन युद्ध सत्तासंघर्ष की ऊर्जासंघर्ष?’ हे पुस्तक रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असणार्‍या युद्धाचा बातम्यांपलीकडे मागोवा घेतं. पुस्तकामध्ये यूएसएसआर अर्थात विघटन होण्याच्या आधीचा रशिया, झार राजांच्या काळातील रशियाच्या महत्त्वांकाक्षा यांचा तपशीलवार मागोवा घेण्यात आलेला आहे. आपलं साम्राज्य मोठं करायचं ही साम्राज्यवादी प्रेरणा रशिया घडण्यामागे कशी होती, हे काळकर पहिल्या काही प्रकरणांतून सांगतात. त्याच बरोबर शीतयुद्धाच्या काळातील रशिया आणि यूएसएसआरचं विघटन झाल्यानंतर रशियाची झालेली शकलं, त्याचे जगाच्या राजकारणावर झालेले परिणाम यांचाही मागोवा घेतात. थोडक्यात पुस्तकाच्या या भागामध्ये रशियाचा अलीकडच्या काळातील इतिहास येतो. कारण हा इतिहास समजून घेणं हे युद्ध समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.विघटन झाल्यानंतर रशियातून अनेक प्रांत वेगळे झाले, त्यातला सर्वांत महत्त्वाचा प्रांत आणि नंतर स्वतंत्र झालेला देश म्हणजे युक्रेन. आपल्याला युक्रेनची ओळख आहे ती जगाचं धान्याचं कोठार म्हणून.

रशियाच्या दृष्टीने युक्रेन आणि क्रिमिया प्रांत व्यापाराच्या दृष्टीने, तसंच नैसर्गिक वायूच्या पाइपलाइनसाठी किती महत्त्वाचा आहे, याचा व्यामिश्र ऊहापोह पुस्तकात करण्यात आला आहे. त्यातून रशियासाठी युक्रेनवर वर्चस्व असणं किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. या पुस्तकात नाटो देश, त्यांचं राजकारण, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षा यांचाही वेध घेतला आहे. तसंच युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झिल्येन्स्की यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख मांडून त्यांची पार्श्वभूमीही विशद केली.या पुस्तकातील सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो जगाला तेल पुरवणार्‍या आखाती देशांची संघटना ओपेक, नैसर्गिक वायूची जगाला – खासकरून युरोपला असलेली गरज, रशियात असलेले जीवाश्म इंधनांचे प्रचंड साठे, त्या जोरावर रशिया कशा प्रकारे आपलं वर्चस्व स्थापन करायचा प्रयत्न करते आहे याबद्दलचा ऊहापोह. यामधून या युद्धाबाबत वरवर ज्या गोष्टी आपल्याला कळतात, त्यापलीकडे किती गोष्टी दडलेल्या आहेत, किती मोठ्या प्रमाणात यावर जागतिक राजकारण खेळलं जातं आहे हे पुस्तकातून समजतं.

काळकर यांनी या राजकारणाचे गुंतागुंतीचे पदर अभ्यासपूर्णरीत्या मांडले आहेत. ते आपल्या मनोगतात लिहितात -‘२००८ सालच्या ‘सबप्राइम क्रायसिस’च्या वेळी दुबईमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, त्यामुळे तेल आणि तेलाचं अर्थकारण या विषयाकडे माझा ओढा वाढू लागला. झालं असं, की अचानक एकामागोमाग एक मोठमोठे प्रकल्प अनिश्चित काळासाठी बंद केले गेल्यामुळे त्या त्या ‘क्लाएंट’कडे आम्ही ‘थकबाकी वसुली’ची बोलणी करायला आम्ही जाऊ लागलो, आणि त्या निमित्ताने तेल – अर्थकारण सतत चर्चेचा विषय होऊ लागलं. २००१ सालच्या ९/११ च्या घटनेनंतर आखाती देशात घडत गेलेल्या अनेक घडामोडी या निमित्ताने वेगवेगळ्या अंगांनी मला समजून घेता आल्या. सद्दाम हुसेन, यासर अराफत असे पाश्चिमात्य देशांनी ‘खलनायक’ ठरवलेले अरबी नेते त्या त्या देशांच्या नागरिकांच्या मनात काय स्थान राखून आहेत, हे समजल्यावर या सगळ्या विषयाचा जमेल तितका सखोल अभ्यास करायचं मी ठरवलं. या वाळवंटातलं सतत अस्थिर राहिलेलं राजकारण ज्या ऊर्जाक्षेत्राच्या आसपास घुटमळत, ते ऊर्जाक्षेत्रच या निमित्ताने मला अनुभवायला मिळालं. तेल, नैसर्गिक वायू आणि या दोन घटकांशी संलग्न असलेली महाकाय ऊर्जा – अर्थव्यवस्था हळूहळू मला उमजायला लागली, ती याच सगळ्या अभ्यासातून.’पुस्तकाच्या शेवटच्या भागात या सगळ्या युद्धाच्या परिस्थितीत भारताची भूमिका, भारताचं वाढतं महत्त्व यांबद्दलही ऊहापोह केला आहे. पुढील काळात, जागतिक राजकारण, सत्ताव्यवस्था कशी बदलू शकते याचं सूचन काळकर करतात.


 युक्रेनयुद्ध सत्ता संघर्ष की ऊर्जा संघर्ष  लेखक : आशिष काळकर  किंमत रु.३००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *