शाळेत असताना इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकात एक गोष्ट होती. वडील, मुलगा आणि त्यांचं एक गाढव यांची. ती साधारण आठवते ती अशी…
दुकानात नव्या चीजवस्तू भरण्याच्या दृष्टीने एक छोटा व्यापारी खरेदीसाठी जवळच्या लहान शहरात जायला निघतो. सोबतीला आपला १२-१४ वर्षांचा मुलगा घेतो. माल वाहून आणण्याच्या दृष्टीने सोबत आपल्या गाढवालाही घेतो. तिघं चालत निघतात. वाटेत एक परिचित भेटतो. इकडच्या-तिकडच्या गप्पा मारल्यानंतर तो वाटसरू म्हणतो, ‘‘मूर्ख आहात काय? सोबत एवढं गाढव असताना तुम्ही दोघं पायी का चालता? बसा त्याच्या पाठीवर.’’ वडलांना वाटतं, ‘खरंच की,…!’ आणि ते मुलासह गाढवावर बसतात. पुढच्या वाटेला लागतात. वाटेत आणखी एक जण भेटतो. आपली नाराजी व्यक्त करतो. म्हणतो, ‘‘या मुक्या प्राण्यावर किती भार देता? मरेल की तो तुमच्या वजनाने.’’ मुलाला सांगतो, ‘‘अरे, तू तर चांगला धडधाकट तरुण आहेस, उतर खाली.’’ झालं… आता वडील गाढवावर… मुलगा पायी चालतो आहे. पुन्हा एक वाटसरू त्यांना हटकतो. वडलांना म्हणतो, ‘‘काय शोभतं का तुम्हाला? लहान मुलाला उन्हात चालवताय आणि स्वत: ऐटीत गाढवाच्या पाठीवर बसलायत?’’ बाप आणि मुलगा दोघंही गोंधळतात. करावं तरी काय? आता मदतीला आणलेल्या त्या गाढवालाच खांद्यावर घेण्याचं बाकी आहे.
या गोष्टीतून तात्पर्य काय निघतं, तर ‘ऐकावं जनाचं, करावं मनाचं.’
या गोष्टीची आज आठवण येण्याचं कारण काय? तर अर्थातच सध्याचं सर्व ‘कोरोनामय’ वातावरण. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव व्हावा म्हणून सावधता बाळगणं, प्रतिबंधित गोष्टी टाळणं, प्रतिबंधात्मक उपाय योजणं इत्यादी सर्व गोष्टी सर्वसामान्यांकडून अपेक्षितच आहेत. पण त्यासाठी योग्य ती मार्गदर्शक तत्त्वं तर नेमकेपणाने कळली पाहिजेत ना? या संदर्भातली माहिती, सूचना, इशारे अनेक स्रोतांतून विविध प्रकारे सर्वसामान्यांपर्यंत पोचवले जात आहेत. त्यांत विविध विज्ञान संस्था, संशोधन संस्था, वैद्यकीय क्षेत्र, विविध पातळींवरील सरकारी यंत्रणा यांच्यातर्फे विविध माध्यमांतून माहिती प्रसृत केली जात असते. अनेक ‘महामारी तज्ज्ञांनी’(Epidemiologists) विविध माध्यमांतून लेख प्रसिद्ध केले. काही वर्तमानपत्रांनी जगभरातून प्रसृत होणारी निरीक्षणं, अभ्यास-लेख यांचा सामान्यजनांसाठी संक्षिप्तात गोषवारा काढून दिला. त्यासाठी कॉलम चालवले, आपली लेखणी खर्च केली. त्यात आणखी समाज-माध्यमातून येणारी माहिती, इशारे यांची पडणारी अनियंत्रित भर वेगळी!
सामान्य जनतेवर असा सर्व; माहितीचा, विश्लेषणांचा, सूचनांचा, इशाऱ्यांचा; भडिमार झाला आहे. अनेक वेळा अशा सर्व माहितीत तफावत आढळून येत आहे. मत-मतांतरं दिसून येत आहेत. तर कधी सुचवलेल्या उपाययोजनांमध्ये विसंगती दिसून येत आहेत. जागतिक कीर्तीच्या संस्थांकडूनही एखादी माहिती प्रसृत होते आणि ८-१५ दिवसांतच ती मागे घेतली जाते. यासाठी ‘लॅन्सेट’ या जागतिक कीर्तीच्या सायन्स जर्नलने आपला अहवाल मागे घेतल्याचं उदाहरण देता येईल. काही औषधांविषयीच्या बातम्यांनी अनेक वेळा लोकांच्या आशा पल्लवित केल्या, आणि तितक्याच वेळा या आशांवर पाणी फेरलं आहे. त्यातच लस र निर्मितीच्याही रोचक बातम्या अधून-मधून येतात आणि नंतर विरून जातात. या सर्वांमुळे भ्रमनिरास होत राहतो.
काही डॉक्टर किंवा तज्ज्ञ ‘मास्क’चा सतत वापर करायला सांगतात, तर काही डॉक्टर त्याचा फारसा उपयोग होणार नाही म्हणून सांगतात. काही म्हणतात, चालताना मास्क घालू नये, ऑक्सिजन लेव्हल कमी होऊ शकते, तो लावल्याने. पण पोलीस सांगतात, मास्क घातलाच पाहिजे, नाही तर दंड भरा. तेव्हा शास्त्रावर आधारलेलं ‘लॉजिक’ आणि केलेले नियम किंवा कायदे हे परस्परांना छेद देणारे ठरतात. लक्षणांबाबतही नित्यनेमाने वेगवेगळी माहिती येत राहते. गेल्या काही आठवड्यांत याविषयी असं सत्य उघडकीस आलं की, कोणतीही लक्षणं नसताना प्रत्यक्ष चाचणीत मात्र, कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. दुसरं म्हणजे जिभेची चव जाणं, वास न येणं ही लक्षणंही कोरोनाची असू शकतात असंही निरीक्षणांत आढळून आलं आहे म्हणे. तसं म्हटलं, तर ही आणि अशी अनेक कोरोना संसर्गाची लक्षणं इतर कोणत्या साध्या आजाराचीही लक्षणं असू शकतात. पण आपण असं काही झालं की, त्याचा संबंध कोरोनाशी जोडतो. म्हणजे आपल्या सर्वांच्याच मनात सततच भीती… अर्थात, बाधित असण्याची! एकतर सर्वत्र असं भीतीचं, संशयाचं, काळजीचं वातावरण, अशा वेळी नेमकी विश्वासार्ह माहिती कोणती? काय नेमकं करावं याविषयी संभ्रम निर्माण होणं सहाजिक आहे.
परंतु हेही समजू शकतं की, हा विषाणू नव्याने विकसित झाला आहे, तेव्हा त्याविषयीचे अभ्यास सतत वेगळं काही सांगणार, निष्कर्ष अधून-मधून बदलणार. नवनव्या रुग्णांच्या तक्रारींनुसार, डॉक्टरांच्या अनुभवांनुसार, निरीक्षणांनुसार, त्यानुसार मिळालेल्या आकडेवारीनुसार अभ्यास करून, अंदाज वर्तवून नवे सिद्धांत मांडावे लागणार. हे सर्व साहजिक आहे. पण आपल्याला दुसऱ्या बाजूला दैनंदिन जीवनही चालू ठेवायचं असतं, आरोग्य सांभाळण्यासोबत. आता इथे मी सुरुवातीला मांडलेला ‘ऐकावं जनाचं, करावं मनाचं’ हा मुद्दा पुढे येतो.
‘लॉकडाऊन’मुळे उद्योग-व्यवसायाचं अपरिमित नुकसान झालं आहे आणि त्याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होत आहेत, होणार आहेत. त्यात अजूनही आपण सगळे, सर्वच आघाड्यांवर अनिश्चिततेच्या सावटाखाली आहोत हे अलाहिदा. व्यवहार त्यातल्या त्यात सुरळीत कधी होणार? अर्थकारणाचं चक्र सुरू होऊन किमान पातळीवर कधी पोचणार? असे सर्व प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत. मुख्य म्हणजे, आपल्या आरोग्याला जपत हे सर्व रुळावर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. तेव्हा कोरोनाविषयी जी माहिती मिळते आहे, विविध स्तरांतून जे सल्ले मिळताहेत, जी मार्गदर्शक तत्त्वं आखून दिली जात आहेत, त्यांवर नीट विचार करून, त्यांची विश्वासार्हता तपासून त्या सर्वांचा एकत्रित विचार करून आपली आपण सूत्रं शोधून काढून कामं सुरू करणं हाच मार्ग आपल्याकडे उरतो. आपल्या जीविताचा हा प्रश्न असल्याने आणि इथे शास्त्र किंवा विज्ञानाशी थेट गाठ असल्याने ‘…करावं मनाचं’ अंमलात आणणं इतकं सोपं नाही. पुष्कळ विचार करून कोणते प्रतिबंधक उपाय योजायला हवेत, कोणती सावधता बाळगायची; हे सर्व ठरवूनच आपल्या कामाला लागायला हवं, आपली कर्तव्यं पार पाडायला हवीत आणि आपला दिनक्रम ठरवायला हवा.
जगभरातील अनेक उद्योग-व्यवसायांप्रमाणेच मराठी पुस्तक-व्यवसायाच्या अर्थकारणाचं चक्रही आज खोल रुतलेल्या अवस्थेत आहे. त्याला थोडी चालना देऊन, हळूहळू त्याला गती प्राप्त होईल यासाठी जिकीरीचे प्रयत्न करणं आवश्यक आहे. या व्यवसायाबाबत येणाऱ्या बातम्या अतिरंजित येत आहेत असं इथे नमूद करावंसं वाटतं. काही प्रकाशक व पुस्तकविक्रेते घाईगडबडीत टोकाची प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आणि त्याप्रमाणे वर्तमानपत्रातून परिस्थितीचा विपर्यास करणाऱ्या बातम्या येत आहेत. याबाबत इथे दोन टोकाची उदाहरणं देता येतील. पहिलं उदाहरण म्हणजे लॉकडाउन जाहीर झाल्यावर काही दिवसांतच काही प्रकाशकांनी नकारात्मक सुरातील मुलाखती दिल्याने, ‘पुस्तक प्रकाशन-व्यवसाय मोठ्या अडचणीत, डबघाईलाही येऊ शकेल…’ अशा अर्थाची मोठी बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. वास्तविक इतक्या कमी दिवसांत कोणत्याही व्यवसायाविषयी अंदाज येणार नाही. दुसरं उदाहरण द्यायचं म्हणजे १ जूनपासून लॉकडाउन थोडा शिथिल केल्यानंतर पुन्हा काही प्रकाशक-विक्रेत्यांनी पुढच्याच दिवशी ‘लॉकडाउन उठताच पुस्तकाच्या दुकानांत पुस्तकांसाठी गर्दी’, ‘पहिल्याच दिवशी लाखो रुपयांची विक्री’ अशा अर्थाच्या मुलाखती वर्तमानपत्रांना दिल्याने तशी बातमी ठळकरीत्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाली. वास्तविक या दोन्ही प्रतिक्रिया परिस्थितीचा विपर्यास करणाऱ्या टोकाच्या आहेत. अशा प्रतिक्रियांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. आणि त्यामुळे गैरसमज जास्त निर्माण होणार. पहिली प्रतिक्रिया अनेक लहान-मोठ्या प्रकाशकांना नाउमेद करणारी आहे, तर दुसरी प्रतिक्रिया ही सगळ्यांचीच दिशाभूल करणारी आहे. अशा घाईघाईने माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं पाहिजे. त्यातच वातावरणात सध्या मोठी अनिश्चितता आहे. त्याचं एकच उदाहरण द्यायचं म्हणजे ‘आय.सी.एम.आर.’ने काही आठवड्यांपूर्वी अंदाज वर्तवला होता की, भारतात कोरोना साथीचा फैलाव जुलै-ऑगस्टच्या दरम्यान पुन्हा उसळी घेणार. नंतर नव्या माहितीच्या आधारे त्यांनी याबाबतचा नवा अंदाज वर्तवला आहे तो नोव्हेंबरचा…आणि आता पुन्हा चार दिवसांत हा अहवाल ‘आय.सी.एम.आर.’ने मागे घेतला आहे. अशा परिस्थितीत व्यवसायाचं नियोजन तरी कसं करायचं? कारण अशा विपरीत परिस्थितीचे दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम मोठे असतात. परंतु जे काही वास्तव आहे त्या वास्तवाला सामोरं जाऊनच या वैश्विक संकटाला सामोरं जायला हवं. सकारात्मकता तर हवीच हवी, पण त्याला व्यवहार्यतेची जोड हवी. नवं-साहित्य निर्मिती होतच राहायला हवी. उत्तम नवी पुस्तकंही प्रकाशित व्हायलाच हवीत, उत्तम लिखाण, उत्तम साहित्य छापील पुस्तकस्वरूपात येत राहायलाच हवं. मात्र, परिस्थितीचा अंदाज घेतच पुढची पावलं टाकायला हवीत.
रोहन प्रकाशन या ‘सावध-सकारात्मकते’शी कटिबद्ध आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत आमची काही नवी पुस्तकं प्रकाशित होणार आहेत. पण सध्या वातावरण कसं आहे? सर्वांच्या डोक्यात नाही म्हटलं तरी विषय एकच आहे- ‘कोविड-१९.’ या सूक्ष्मशा अशा व्हायरसने अख्ख्या जगाचा ताबा घेतला आहे. सर्व स्टॅच्युमय स्थिती… सर्वत्र अस्वस्थता. मनात सोशल डिस्टंस्निंगचं दडपण, क्वारंन्टाइनचा धसका आणि डोकावणारे मरणाचे विचार… अशा वातावरणात वेगवेगळया नात्यांमध्ये फुलणारं प्रेमच नव्याने जगण्याची उमेद देऊ शकेल. या वस्तुस्थितीशी, या वर्तमानाशी नाळ ठेवत नव्याने लिहिलेल्या काही कथांचा संग्रह आम्ही लवकरच प्रकाशित करणार आहोत. या संग्रहात काही सध्याच्या आघाडीच्या लेखकांच्या, तर काही नव्या दमाच्या लेखकांच्या कथा असणार आहेत. विषय आहे… ‘लव्ह इन टाइम ऑफ कोरोना!’ तेव्हा प्रकाशनातला लॉकडाउन या ताज्या विषयाच्या कथासंग्रहाच्या चावीने उघडण्याचा आमचा प्रयत्न असेल. इथे मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, या कथासंग्रहाची मी ज्या-ज्या लेखकांना संकल्पना विस्ताराने सांगून कथा लिहिण्याची विनंती केली त्या सर्वांना ती संकल्पना आवडली व त्यांनी कथा देण्याचं मान्य केलं आहे.
ताजा विषय आणि नवं आगामी पुस्तक यावरून आठवलं… ‘रोहन’ची काही जुनी पुस्तकं… ज्यांचे विषय वेगळे आहेत, तर काही पुस्तकांचे विषय म्हणजे तेव्हाचे प्रयोगच म्हणता येतील असे… पण तरीही ही पुस्तकं काळाच्या निकषावर टिकून राहिली. प्रथम प्रकाशित होऊन अनेक वर्षं झाली तरी काही अजूनही चालत आहेत, तर काही पळत आहेत. थोडक्यात सांगायचं, तर ती आजही उपलब्ध आहेत. तर, या अंकापासून अशा काही पुस्तकांचं आम्ही नवं सदर सुरू करत आहोत… ‘रोहन क्लासिक्स.’ असं पुस्तक प्रकाशित होण्यामागे काही पूर्वपीठिका असली, तर ती देऊन, पुस्तकाची संक्षिप्तात माहिती द्यायची असं या छोटेखानी सदराचं स्वरूप असेल. थोडा नॉस्टालजिया, आणि थोडं जुन्याला ‘मैफली’त स्थान देण्यासाठी हे प्रयोजन!
…कोरोना हे विश्वसंकट आहे. आरोग्याच्या दृष्टीने, जीवितहानीच्या दृष्टीने ते मोठं संकट आहेच आहे, परंतु आर्थिक संकटामुळे, पैशाच्या अभावामुळे करोडो लोकांचं सन्मानाने जगणंही संकटात आलं आहे. मराठी पुस्तक प्रकाशनविश्वापुरता विचार करता, अशा आर्थिक संकटातही नवनिर्मितीचा ओघ भविष्यातही चालू ठेवायचा असेल, तर येत्या काळात लेखक, संपादक, चित्रकार, प्रकाशक, पुस्तकविक्रेते यांचं एकमेकांत सहकार्य असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हो, वाचकांनीही या नवनिर्मितीच्या प्रक्रियेत प्रतिसादाच्या स्वरूपात आपला महत्त्वाचा वाटा उचलणं आवश्यक आहे, जेणेकरून आम्हां सर्वांचं मनोबल उंचावेल…!
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जुलै २०२०
‘रोहन’चे उपयुक्त तसंच रंजन करणारे संच
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…
स्टॅच्यू… पण वाचायला मुभा आहे!
करोना परिास्थितीचे दूरगामी परिणाम जगभरच्या समाजजीवनावर होतील. गेली काही दशकं ‘ग्लोबलायजेशन’चा पुरस्कार करणाऱ्या, ‘उदोउदो’ करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना, लॉबीजना, देशांना पुढील काळात कदाचित या धोरणांचा फेरविचार करावा लागेल किंवा कदाचित तात्पुरत्या अर्थकारणाला महत्त्व दिलं जाईल, न की मानवजातीच्या दूरगामी अस्तित्वाला.