फॉन्ट साइज वाढवा
केवळ भारतीयच नाही, तर जागतिक व्यासपीठावर आज भारतीय संगीत-नृत्याची ठसठशीत मोहोर उमटलेली आहे. किंबहुना भारताचा समृद्ध कलावारसा म्हणून जगभरात आज भारतीय संगीत-नृत्याकडे अभिमानाने पाहिलं जात आहे. मात्र याच ‘समृद्ध’ भारतीय कलावारशाला अगदी आताआतापर्यंत, म्हणजे पाऊणशे ते शंभर वर्षांपर्यंत अगदी हीन लेखलं जात होतं. भारतीय संस्कृतीला लागलेला कलंक असा या गायन-नृत्याकडे पाहण्याचा तथाकथित पांढरपेशा समूहाचा दृष्टिकोन होता. कारण या संगीत-नृत्याच्या परंपरेचा वाहक होता – इथला देवदासी संप्रदाय! देवाचं मन रिझवण्यासाठी गायन-नृत्य करण्यातूनच भारतातील देवदासी प्रथेचा उगम झाला. पुढे कालौघात देवाच्या या ‘देवदासी’ पुजारी, राजा व सामान्यांच्याही ‘भोगदासी’ कधी झाल्या ते कळलंच नाही. किंबहुना तथाकथितांनी ही परंपराच निर्माण केली होती, आपल्या सोयीसाठी.
मात्र या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतरातही देवदासींनी आपल्या नृत्य-गायनादी कला जपून ठेवल्या. म्हणूनच म्हणतो, की आज आपण ‘आपल्या आपल्या’ म्हणतो त्या कलापरंपरा आपल्या होत्याच कुठे? त्या तर होत्या देवाच्या मंदिरात नृत्य-गायन करणाऱ्या देवदासींच्या, राजदरबारात नाचणाऱ्या राजनर्तकींच्या, कोठीवर मुजरा करणाऱ्या तवायफ महिलांच्या ते अगदी दिवाणखान्यात-कनातीत नाच-गाणं करणाऱ्या महार-मांग-कोल्हाटी बायांच्या…
म्हणून तर सुशिक्षित लब्धप्रतिष्ठितांच्या घरात नाच-गाणं शिकायला सक्त बंदी होती. आपल्या मुलींनी नाच-गाणं शिकणं म्हणजे, या पांढरपेशा समूहाच्या दृष्टीने ‘बाजारबसवी’ होणंच होतं. त्यामुळेच भारतीय कलेतिहासाकडे नजर टाकली, तर नाटक-सिनेमा-ध्वनिमुद्रण या साऱ्याच क्षेत्रांत सुरुवातीच्या काळात देवदासी परंपरेतील महिलांचाच अधिक भरणा असलेला दिसतो. कारण नाच-गाणं त्यांच्या रक्तातच वाहत होतं. या कला म्हणजे त्यांच्यासाठी जणू तो त्यांचा जैविक मातृवारसाच होता, परंपरेने चालत आलेला.
अभिजनांच्या तर या कला कधीच नव्हत्या, त्या केवळ बहुजनांच्याच कला होत्या. त्यातही निम्नस्तरातील कायमच अव्हेरल्या गेलेल्या समाजाच्या! म्हणून तर १९व्या शतकात इंग्रजी शिकलेल्या तत्कालीन पहिल्या भारतीय पांढरपेशा शिक्षित पिढीने या कला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं. व्हिक्टोरियन मोरॅलिटीच्या प्रभावाखाली येत या उच्चभ्रू शिक्षित समूहांनी, मूळ कलावंत असलेल्या या महिलांना सरसकट वेश्याच ठरवून टाकलं आणि या कलापरंपरा नष्ट करून टाकण्याचा विडाच उचलला. त्यासाठी Anti-nautch movement (नृत्यविरोधी चळवळ) सारखी मोहीमही त्यांनी सुरू केली. तत्कालीन मद्रासपासून (आता चेन्नई) पंजाबपर्यंत संपूर्ण देशभर ही मोहीम जोरकसपणे राबवली गेली. परिणामी १९व्या शतकाचा मध्य आणि उत्तरार्ध हा भारतीय कलांसाठी एकप्रकारे अंधारयुग होता. मात्र २०व्या शतकात जेव्हा, अॅना पाव्लोवासारख्या बॅले नर्तिकांमुळे नृत्य-संगीतादी कला हेच आपलं पारंपरिक सांस्कृतिक धन आहे हे उमगलं, तेव्हा या कला शिकून घेण्यासाठी हाच पांढरपेशा समाज सगळ्यात पुढे होता… आणि इथेही त्याने मखलाशी केलीच. परंपरेने नाच-गाणं करणाऱ्या देवदासी समूहातील कलावंतांकडूनच त्याने या कला शिकून घेतल्या, मात्र कालांतराने, या कलापरंपरा जपणाऱ्या समाजाची नाममुद्राच त्याने पुसून टाकली. परिणामी आपापल्या कलेच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊनही गायन-नर्तन करणाऱ्या पारंपिरक महिलाकलावंत कायम उपेक्षितच राहिल्या. अर्थात तरीही त्यांनी आपला हक्काचा अवकाश शोधलाच. खरंतर या कलावंत महिलाच होत्या खऱ्या अर्थाने भारतीय कलांच्या अनभिषिक्त सम्राज्ञी!
…म्हणूनच संधी मिळेल तेव्हा विजेगत झळाळलेल्या, तर कधी अंधारातच विझून गेलेल्या देशभरातील या कलावंत महिलांची आणि त्यांच्या उज्ज्वल परंपरेची ओळख करून देणारं हे सदर – कलावादिनी!
आजन्म वेदविद्येचा किंवा ब्रह्मविद्येचा अभ्यास करणाऱ्या प्राचीन काळातील स्त्रियांना गौरवाने ‘ब्रह्मवादिनी’ अशी उपाधी लावली जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय कलेचा अवकाश आपल्या कलागुणांनी उजळून टाकणाऱ्या या महिलांसाठी मी ‘कलावादिनी’ अशी उपाधी योजली आहे.
– मुकुंद कुळे
(पत्रकारितेचा प्रदीर्घ अनुभव, लोककला-संगीत -साहित्य यांमध्ये विशेष रूची असून त्याबद्दल लेखन केलं आहे.)
—
या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
कलावादिनी
या सदरातील पहिला लेख…
बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!
या सदरातील तिसरा लेख…
आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?!
या सदरातील चौथा लेख…
बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…!
या सदरातील पाचवा लेख…
शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !
या सदरातील सहावा लेख…
भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण!
या सदरातील सातवा लेख…
थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली!!
या सदरातील आठवा लेख…
बैठकीच्या लावणीतला टवटवीत गुलाब
…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.
या सदरातील नववा लेख…
ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी….
या सदरातील दहावा लेख…
तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…
या सदरातील अकरावा लेख…
विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत
मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.
या सदरातील बारावा लेख…
मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य
भारतीय शृंगार साहित्यात मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आगळवेगळं आहे, कारण ते पुरुषाऐवजी एका स्त्रीने लिहिलेलं आहे.
या सदरातील तेरावा लेख…
देवदासीआटम ते भरतनाट्यम हे परिवर्तन होताना, मूळ कलावंतसमाजाचं अस्तित्वच पुसलं गेलं.
या सदरातील चौदावा लेख…
बैठकीच्या लावणीचं हे कलामूल्य जपण्याचं काम गोदावरीबाई, भामाबाई, यमुनाबाई, गुलाबबाई यांच्यानंतर मोहनाबाईंनी एखाद्या तपस्विनीप्रमाणे केलं..
या सदरातील पंधरावा लेख…
भरतनाट्यमची अनभीशिक्त सम्राज्ञी
आजही भरतनाट्यमच्या रंगमंचावरील जादुगारीण म्हणूनच टी. बालसरस्वती अम्मा ओळखल्या जातात.