फॉन्ट साइज वाढवा
काही काही कार्यक्रम असे असतात, की त्याविषयी काही लिहू नये, बोलू नये… केवळ असीम शांततेत त्यांचा आठव मनात आणावा आणि तृप्त मनाने ते क्षण पुन:पुन्हा जगावेत. काही लिहू नये, याचं दुसरं एक कारण असं, की अशा अनुभूतीचं शब्दांकन कायमच तोकडं, थिटं वाटतं. जे अलौकिक अनुभवलंय ते शब्दांच्या चौकटींनी बद्ध करणं म्हणजे वेडेपणा आहे, असं मन सारखं सांगत असतं. त्यामुळं या वाटेला जाऊ नये, असा विचारच योग्य असतो. पण मग तरीही का लिहायचं? ते एवढ्यासाठीच, की जे काही मोडकंतोडकं सांगितलं जाईल, ते वाचून निदान तो संपूर्ण अनुभव घेण्यासाठी कुणी उद्युक्त व्हावं, प्रेरित व्हावं… कारण हा मंचीय कार्यक्रम असल्यानं त्याची पुन:पुन्हा अनुभूती घेता येणं शक्य आहे. आपणही घ्यावी आणि तोच आनंद दुसऱ्यांनाही मिळू द्यावा एवढाच या शब्दच्छलाचा मर्यादित हेतू!
नमनाला घडाभर तेल खर्च केल्यावर सांगतो, की मी हे ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे…’ या अप्रतिम कार्यक्रमाविषयी हे बोलतो आहे. कविता म्हणजे काय, कवितेत जगणं म्हणजं काय, जगण्याची कविता होते म्हणजे काय, कविता आणि जगणं हेच अभिन्न होतं म्हणजे काय… या आणि अशा कित्येक प्रश्नांची उकल हा कार्यक्रम पाहिल्यावर होते. एक तर कविता प्रिय, त्यात कार्यक्रमाचे नायक-नायिका साक्षात पु.ल. देशपांडे आणि सुनीताबाई आणि त्यांच्यासोबत येणारे बोरकरांपासून कुसुमाग्रजांपर्यंतचे एक से एक कवी… आनंदानं जीव कुडीत मावेनासा होणं म्हणजे काय याचा प्रत्यय पडदा उघडल्यापासूनच येऊ लागतो. सुरेख नेपथ्य… मंचाच्या दोन्ही बाजूंना पु.ल. आणि सुनीताबाई या ‘महाराष्ट्राच्या फर्स्ट कपल’च्या देखण्या चित्रांच्या स्टँडी, मागे व्हिडिओद्वारे पडद्यावर साकार होणारी मिलिंद मुळीक यांची – कविताच होऊन उतरलेली – देखणी चित्रं आणि मधोमध अमित वझे, मानसी वझे, मुक्ता बर्वे, अपर्णा केळकर, जयदीप वैद्य व निनाद सोलापूरकर ही जीव ओवाळून टाकावीशी वाटणारी गुणी कलावंत मंडळी… अमितच्या कमालीच्या पकड घेणाऱ्या आवाजातून निवेदन सुरू झालं आणि अक्षरश: दुसऱ्या मिनिटांपासून डोळ्यांतून धारा वाहायला लागल्या. काहीतरी अफाट आणि केवळ अद्भुत असं काही तरी आपल्यासमोर साकार होतं आहे, याचा तो निखळ आनंद होता. हल्ली डोळ्यांतील उष्ण, खारट पाण्यानं दोन्ही गालांना अर्घ्य देण्याचे प्रसंग फार कमी झाले आहेत. या कार्यक्रमानं माझे दोन्ही गाल आनंदानं भिजवून टाकले. मी ते पुसायचेही कष्ट घेतले नाहीत, याचं कारण सभागृहातील तमाम मंडळींची अवस्था जवळपास तीच झाली होती.
खरंतर पुण्यात असे कवितांचे, अभिवाचनाचे कार्यक्रम भरपूर होतात. खूप गुणवंत मंडळी ते सादर करतात. पु.ल. देशपांडे आवडते हे खरं, पण त्यांच्यावरचेही अनेक कार्यक्रम सादर होतातच की. पण कुठल्याच कार्यक्रमानं एवढा, पोटात मावेनासा आनंद दिल्याचं आठवत नाही. सहज विचार केल्यावर लक्षात आलं, की या कार्यक्रमाचा आत्मा कविता आहे. कविता हा माणसाच्या अभिव्यक्तीचा प्युअरेस्ट फॉर्म समजला जातो. इतका, की कवीच्या मनात आलेला शब्द पेनाच्या साह्यानं कागदावर टेकला, तरी त्याच्या शुद्धतेत न्यून आलं असं मानलं जातं. (मनात आधी उमटते तीच सर्वांत शुद्ध अभिव्यक्ती! हे जरा पावसासारखं झालं… पावसाचा थेंब म्हणजे पाण्याचा प्युअरेस्ट फॉर्म मानला जातो… तो थेंब जमिनीवर पडेपर्यंत!) अर्थात अगदी शुद्ध सोन्याचेही दागिने होऊ शकत नाहीत, त्यात थोडा का होईना, इतर कुठला तरी धातू मिसळावा लागतो, तितपतच हे शुद्धतेतलं न्यून… पावसाचा थेंब थेट पिण्यासाठी चातकाचीच चोच हवी. आपलं तेवढं कुठलं भाग्य असायला! पण हे किंचित न्यून ल्यायलेली अभिव्यक्तीही एवढी देखणी, की तिच्या आस्वादासाठी तरी चातकाचं भाग्य आपल्या ललाटी यावं…
डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाची रंगावृत्ती लिहिली आहे. पुलंच्या अखेरच्या काळात, म्हणजे १९९८मध्ये डॉ. कुलकर्णी आणि पु.ल. व सुनीताबाई यांच्यात घडलेल्या एका प्रसंगाचा धागा हा या कार्यक्रमाचा पाया आहे. (या प्रसंगावर आधारित ‘तप:स्वाध्याय’ हा डॉ. कुलकर्णी यांचा ललितबंध ‘अनुभव’ मासिकात प्रसिद्ध झाला होता.) डॉ. कुलकर्णी यांच्या एका भित्तिपत्रकासाठी त्यांना रवींद्रनाथांची एक कविता हवी असते. ती पु.लं.कडे मिळेल, या भावनेनं ते काहीसे चाचरतच सुनीताबाईंकडं विचारणा करतात.
आयुष्याच्या सांध्यपर्वात, समृद्ध जगण्यातून तेजाळून उठलेली ही दोन शरीरानं थकलेली वृद्ध, पण मनानं चिरतरुण माणसं पुढील काही दिवस त्या एका कवितेच्या शोधासाठी काय काय करतात, याचा कवितेच्याच माध्यमातून अवतरलेला प्रवास म्हणजे हा कार्यक्रम. अर्थात हेही या कार्यक्रमाचं पूर्ण वर्णन नाहीच. त्यात सुनीताबाई साकारणाऱ्या मुक्ताचे संवाद आहेत, स्वगत आहे, कवितावाचन आहे, निनादचं पुलंची आठवण करून देणारं पेटीवादन आहे, अपर्णा व जयदीप यांची कवितेच्या हातात हात घालून गुंफलेली सुरेल गाणी आहेत आणि मानसी व अमित यांचं या साऱ्याला मोगऱ्याच्या गजऱ्यासारखं एका सूत्रात ओवणारं नेटकं, धीरगंभीर निवेदन आहे. हे सगळं मिळून जे काही समोर येतं ते केवळ थक्क करणारं आहे. आपल्या मनातलं कविताप्रेम आणि पु.ल. – सुनीताबाईंविषयीचा उमाळा किती आहे, यावर विशेषणांची तीव्रता कमी-जास्त होऊ शकेल. माझ्यासाठी तरी सगळ्या सुपरलेटिव्ह्जच्या पलीकडं नेणारा हा अनुभव होता, यात वाद नाही.
आपण मोठे होत जातो, तसे अधिकाधिक रुक्ष, कोरडे होत जातो, ही जगरहाटी आहे. तरीही कुठं तरी आत ओल शिल्लक असेल, तर त्या आधारावर बाहेरच्या सगळ्या दुष्काळावर मात करीत एक तरी शुद्ध सर्जनाचा कोंब तरारतोच! आपल्यात हे जिवंतपण शिल्लक आहे, याची जाणीव असे कार्यक्रम करून देत असतात. म्हणून कृतज्ञतेनं, समाधानानं, आनंदानं डोळे झरतात आणि आपल्या जिवंतपणाची पावती देतात. आपल्या जगण्यातल्या प्रत्येक क्षणाला या कवितेनं सुंदर शब्दांची आरास केली आहे. आपल्या अनेक भावनांना कवितेनंच शब्दरूप दिलंय. बा.भ. बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, अनिल असतील, पद्माताई असतील, शान्ताबाई असतील, पाडगावकर असतील, महानोर असतील, ग्रेस असतील किंवा आरती प्रभू असतील. या साऱ्यांचं आपल्या घडण्यात, आपल्या जगण्यात किती मोलाचं स्थान आहे, हे सांगायला नको. यांच्या शब्दांचंच बोट धरून आपण जगण्याच्या वाटेवर चालू लागलो. या सर्व प्रवासात पु.ल. आणि सुनीताबाई आपल्यासोबत होतेच. जगण्याचा उत्सव कसा साजरा करावा, आयुष्य भरभरून कसं जगावं, दाद कशी द्यावी, आस्वाद कसा घ्यावा हे सगळं तर त्यांनीच आपल्याला शिकवलं. त्यांनी या मंडळींच्या कविता वाचल्या आणि मग आपणही त्या कवितांच्या प्रेमात पडलो, असंही अनेकांच्या बाबतीत झालं असेल.
रवींद्रनाथांची कविता शोधण्याच्या निमित्तानं ‘संधीप्रकाशात अजून जो सोने’ असण्याच्या काळात या देखण्या दाम्पत्यानं ते काही दिवस जे काही अनुभवलं, ते खरं जगणं असं वाटून जातं. आपण नुसतेच जन्माला येतो. पण जगण्याचं प्रयोजन आपल्याला कितीसं कळतं? कळलं तरी तसं जगता येतं? पु.ल. आणि सुनीताबाईंना हे प्रयोजनही समजलं होतं आणि त्यांनी तसं जगूनही दाखवलं. म्हणून तर सर्व ऐहिकाची ओढ कायम असली तरी जडाचा मोह त्यांना कधीही नव्हता. श्वास सोडावा तितक्या सहजतेनं त्यांनी दानधर्म केला. ऐहिक गोष्टींत कधी अडकले नाहीत. एक पेटी, एक कविता आणि आसमंतातले सात सूर यांच्या आधारे शेवटपर्यंत जगले. या गोष्टींचं मोल त्यांना कळलं होतं. आपल्याला ते जाणवू लागतं आणि मग आपल्या आतापर्यंतच्या जगण्यातलं वैयर्थ जाणवून हुंदका दाटून येतो. हा एक काहीसा वेदनेचा हुंदका आणि त्यांच्या जगण्याचीच झालेली कविता पाहून येणारा विलक्षण आनंदाचा हुंदका असा अनोखा संगम दोन्ही डोळ्यांत साजरा झाल्याशिवाय राहत नाही.
आपल्यातलं जगणं सार्थ करायचं असेल, जगण्याचं प्रयोजन शोधायचं असेल, मनातली कविता पुन्हा जागवायची असेल, तर ‘प्रिय भाई…’ हा कार्यक्रम अनुभवण्यास पर्याय नाही.
– श्रीपाद ब्रह्मे
या सदरातील लेख…
वाचकांच्या मनात ‘पुढे काय होणार?’ हा तीनाक्षरी प्रश्न जन्माला येण्यातच हेरकथांचं, रहस्यकथांचं सार्थक असतं.
साधारणत: मृगाचा पहिला पाऊस पडून गेला, की दिवाळी अंक काढणारी संपादक मंडळी एकदम ‘चार्ज’ होतात.
स्वरांच्या या परब्रह्माला साक्षात बघण्याचे, भेटण्याचे अगदी मोजके प्रसंग माझ्या आयुष्यात आले. माझ्या पत्रकारितेच्या पेशामुळंच हे शक्य झालं.
कुठलीही सूक्ष्म, अमूर्त किंवा तरल भावना जाणण्याचा प्रयत्नच न करणं किंवा त्या गोष्टी हसून, चेष्टेवारी नेऊन सोडून देणं हे सध्या सर्रास होताना दिसतंय.
रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.
रसिक म्हणून आपल्या मनातला हा घनघोर अंधार ‘मी वसंतराव’ एखादी ज्योत होऊन उजळवतो.
आपल्याला माणूस म्हणून जरा अधिक उन्नत व्हायचे असेल, तर या उत्सवाला पर्याय नाही!
साहित्यानंद वर्धिष्णू होवो… (‘पेन’गोष्टी)
आता विदर्भ साहित्य संघाचं आदरातिथ्य अनुभवण्याची संधी संपूर्ण राज्यभरातील साहित्यरसिकांना मिळणार आहे.
दुभंगलेल्या काळाचा खेळ (‘पेनगोष्टी’)
‘पुनश्च हनीमून’ नाटक आपल्याला या भीतीसोबतच शेवटी एका दिलाशाची सोबत देते.