फॉन्ट साइज वाढवा

हेल्गाच्या निमित्ताने भेटलेली ही सुंदर माणसं. त्यांची जीव लावणारी नाती काही काळ न भेटल्यामुळे अधिक जवळची वाटणारी. गाणं हा एक दुवा. जगण्याच्या मनस्वी शैली हा त्यामुळे गवसलेल्या अमोल ठेवा…. वाचा –

गाणं हा एक दुवा असतो. ऐकणाऱ्यांना त्यातून गाणाऱ्याचं मन कळतं. हीव्यक्ती कशी असेल याची उत्सुकता वाटते. गप्पा सुरू होतात. मैत्रीची वीण बांधली जाते… असाच काहीसा अनुभव गिझेला होन या मैत्रिणीच्या बरोबर आला. एका मैफलीनंतर श्रोत्यांशी मी गप्पा करत होते. थिएटरच्या बाहेर एका कोपर्‍यात गिझेला उभी होती. माझं लक्ष वेधून घेण्याचा तिने प्रयत्न देखील केला नाही. शांतपणे गोरीपान गिझेला मी थोडी मोकळी होण्याची वाट पाहात होती. माझं लक्ष गेल्यावर तिने हात हलवला. मी तिच्याजवळ गेले. हस्तांदोलन करून ती म्हणाली, “मला तुझं गाणं आवडलं. उद्या सकाळी माझ्या घरी जेवायला येशील का? मला खूप आवडेल तू आलीस तर.” मी होकार तर दिलाच, पण आमच्या मैत्रीला तिथेच प्रारंभ झाला. चर्चमधल्या क्वायर्समध्ये ती नेहमी गाते. 

तिच्या आयुष्यात तीन सूत्रं तिनी जपली आहेत. जर्मन ही तिची मातृभाषा. फ्रेंच तिला उत्तम येतं. संगीत ही तिची तिसरी भाषा. सुरुवातीला एका ग्रॅमर स्कूलध्ये ती शिकवायची. मग एका रिसर्च इस्टिट्यूटमध्ये काम करायची. नंतर बरीच वर्षं पॅरीसमध्ये एका खासगी शाळेत जर्मन शिकवायची. १९७१मध्ये ती स्ट्युटगार्टला आली, आणि तिने एका खासगी शाळेत फ्रेंच शिकवायला सुरुवात केली. क्वायरमध्ये गाणं मात्र ती लहानपणापासून आजवर करतेच आहे. तिच्या त्रिसूत्री आयुष्यात विवाहाचं दालन तिने कधी उघडलंच नाही. तिचं साधं, सरळ, निरलस, प्रेमळ आयुष्य ती एकटेपणानेच व्यतीत करते. तिचं म्हणणं असतं, “एकटी आलीस तर माझ्याकडे राहा. दोन माणसं माझ्या घरात राहू शकणार नाहीत.” मुंबईतली दाटीवाटीत राहणारी असंख्य कुटुंब पाहिल्यावर गिझेलाचं सांगणं मला गमतीदार वाटे. पण ती तिची आवड होती. मध्यंतरी तिला अर्धांगवायूचा त्रास होत होता. तिच्या शेजार्‍यांनी तिची पूर्ण काळजी घेतली. पण या शेजार्‍यांना मी कधीच भेटलेली नाही. मी तिची जवळची मैत्रीण. पण आयुष्यातले अनेक विभाग एकत्र जोडणं तिला गरजेचं वाटलेलं नाहीय. त्या त्या नात्याच्या मर्यादा तिने सहजपणे स्वीकारल्या आहेत. अनेक नाती एकत्र आणण्याचा मेळ तिला हवासा वाटलेला नाहीय. मी तिला म्हणते, “तू ईमेल करायला लाग. वाय्-फाय् घेऊन टाक.” पण तिच्या शब्दकोशात हा विभाग तिने येऊ दिला नाहीय. वाढदिवसाला, नव्या वर्षाला सुंदर पत्र लिहिणं ही तिची हौस आहे. त्याला दाद देण्याचा, प्रतिसाद देण्याचा मी प्रयत्न केला. पण गेली चार-पाच वर्षं मी अधूनमधून तिला फोनच करून टाकते. ती खूश होते. पण म्हणते, “आता थांब, तुझे पैसे जाताहेत.” मी म्हणते, “जाऊ देत.” ती म्हणते, “असं करू नको. पुरे.” अशी ही जिव्हाळ्याने काळजी करणारी गिझेला. 

भारतीय समाजात रक्ताच्या नात्यांना फार जवळचं मानलं जातं. “काही झालं तरी” ती गृहीत धरली जातात. याचा अर्थ फायदा घेणं असाही असतो. पण तो अपरिहार्य मानला जातो. अगदी नि:शंक मनाने युरोपमधल्या शहरातली नाती पाहिली, अनुभवली, की माणुसकीची जी नाती कळतात, त्यांचा रक्तसंबंधांशी काहीच संबंध नसतो. 

आपल्या समाजाच्या संदर्भात अशी जवळीक कुठे आढळून येते, निदान येऊ शकते, तर ती सामाजिक-राजकीय चळवळीच्या संदर्भात. मनाचा मंच इतका समावेशी राखणं घराच्या भिंती चार आकड्याच्या कितीही पलीकडे जाऊ देणं, वटवृक्षाला वर्षानुवर्ष पांरब्या फुटू द्याव्यात, तशी आपुलकीची नाती, तसे मेळावे या पर्यायी संस्कृतीच्या प्रेमिकांना साधून ठेवता येतात. मग ती मार्क्सवादी चळवळीत जिवाभावाने सामील झालेल्यांची असतात. गांधीवादी चळवळीत सर्व बंध आपले समजणार्‍यांचे असतात, लोकशाही समाजवादी पर्याय जगण्यातून अनुभवणार्‍यांची  असतात, माणसाच्या भलेपणावर विश्वास ठेवून नकारात्मक घडामोडींकडे “जाऊ देत” असं म्हणणार्‍यांची असतात.

जर्मनीत मला भेटलेली माणसं, त्यांची जगण्याची शैली मला अशी लोभस वाटली. मॅक्स, बिंडर या मित्राने सहजगत्या सांगितलं, “खूप विनाश पाहिला आहे या शहरांनी आणि शहरवासीयांनी. आता निर्मितीची वाट पाहणार्‍या आम्हा मंडळींना विश्वास आणि प्रेम एवढाच आधार हवा आहे.”

या संहाराचं दर्शन शक्य तितक्या माणसांनी घ्यावं आणि त्यावरून शांततेची भावना जागवत राहावं, अशा इच्छेनी स्ट्युटगार्ट शहरात एक भली मोठी टेकडी उभारली आहे. दुसर्‍या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या स्टयुटगार्टमधल्या अनेक इमारतींचे ढिगारेच्या ढिगारे व्यवस्थितपणे मांडून ही टेकडी निर्माण केली आहे. तिच्या गोलाकृती रस्त्यावरून चढत जाताना वाटेत सिमेंट, दगड, विटा, दरवाजे, लाकडी वेलबुट्ट्या असलेल्या एकेकाळी सुंदर दिसणार्‍या दरवाजांच्या पट्ट्यांचे तुकडे, संगमरवराचे तुकडे, अशा नाना गोष्टी दिसतात. संहारक शक्तींनी निर्मितीचे कसे धिंडवडे काढले, त्याचं क्रूर नग्न स्वरूप पाहताना मनात यातनांचं काहूर उठतं. सत्तेची हाव, क्रौर्य आणि मानवी वेदनेचा कल्लोळ या दोन्ही बाजू एकाच वेळी पाहताना केवळ करुणेचा पाझर फुटतो. टेकडीच्या शिखरावर सर्व बाजूंना बसायला बाकं ठेवली आहेत. तिथून स्ट्युटगार्ट शहराचं वर्तुळ स्तिमित करतं. टेकडीचं आरोहण कराना घेतलेलं संहाराचं दर्शन आणि नंतरचा मानवी निर्मितीचा सौंदयर्यपूर्ण अवतार!!

इथे मला घेऊन यायची कल्पना स्टीफन कुट्झलरची. त्याने दिलेला हा अनुभव अविस्मरणीय होता आणि आहे. “स्टीफन मी तुझे किती आभार मानू? क्रौर्याच्या भयानक इतिहासात मला नेलंस आणि आजच्या दिवसावर आपण येऊन ठेपलोय. हा प्रवास अफलातून होता. मनावर कायम  कोरला जाईल असा.”

“चल. नीला आता आपण इथल्या भल्या मोठ्या कुरणावरून चालत जाऊ. माझी गाडी तिथे आहे. गाडीतून ‘कोहिनूर’ हॉटेलमध्ये जेवण करू.” हा बेत दिलासा देणारा होता. कुरणावरून चालताना मी आठवत होते रॉबिन हूड आणि त्याचे रंगेल गडी. शरवुडच्या जंगलात मी आजवर गेले नाहीय. पण भा.रा. भागवतांच्या लेखणीला धरून तिथलं नाट्यमय जगणं, अतुलनीय प्रेम आणि रक्ताची नाती सोडून आलेली, नव्या नात्यांशी एकरूप झालेली, प्रस्थापित व्यवस्थेशी झगडून स्वातंत्र्याचा आनंद लुटणारी माणसं, त्यांचं कुरणावरचं राहणं-जगणं हे सर्व लहानपणी सोसासोसाने नसेनसेत भरून घेतलंय, ते आठवणं अनिवार्य होतं. स्टीफनला त्याविषयी मी सांगत होते. या हुशार, संवेदनाशील ‘जर्मन’ युवकानी रॉबिनसारखा ब्रिटिश हिरो आणि त्याच्या कहाण्या अनुभवल्या नव्हत्या!!

कुरणांच्या प्रदेशातून बाहेर येऊन आम्ही गाडीतून कोहिनूर हॉटेलमध्ये पोचलो. रवींद्र इस्सार नावाच्या पाकिस्तानी माणसाचं हे हॉटेल. इथल्या झकास जेवणाचा आम्ही आस्वाद घेत होतो, तेवढ्यात इस्सारसाहेब आले, “बहेनजी, कितनी दिन के बाद आई हैं आप! खुशहाल हो ना?” 

“आपकी दुवा है साब! आज बहोत कुछ देखकर थक गये हम – स्टीफन और मैं। यहाँ का बेहतरीन खाना और आपसे मुलाकात। बस. दिल भर गया हमारा।”

“बहेनजी, अपने देशसे कोई आता है, तो उम भी खूश हो जाते हैं। ये हमारे दोस्त! जहाँगीरसाब। इनसे मिलीये। वो कह रहे हैं, अपने देशसे कोई आए हैं। उनसे मिलवा दीजिये।” इस्सारसाहेब सांगत होते. दोन तासांपूर्वी संहाराचा एक अनुभव पाहिला. आता संहारातून देखील टिकवलेल्या माणुसकीचा हा दुसरा अनुभव. भारताबाहेर गेलं, की कराचीचे, लाहोरचे रहिवासी आपले जवळचे मित्र असतात. आपल्यासाठी काहीही करायला तयार असलेले, आतिथ्यशील मित्र. एरव्ही शासन आणि सत्ता यांचा लोभ माणसांची नाती पूर्णपणे विसरायला लावतो.

हेल्गाच्या निमित्ताने भेटलेली ही सुंदर माणसं. त्यांची जीव लावणारी नाती काही काळ न भेटल्यामुळे अधिक जवळची वाटणारी. गाणं हा एक दुवा. जगण्याच्या मनस्वी शैली हा त्यामुळे गवसलेल्या अमोल ठेवा.

इतक्या सहजपणे जगण्याची जिद्द राखणं हेल्गाला जमलेलं आहे की, त्याचं राहून राहून कौतुक वाटतं. तिच्याकडे येणार्‍या जर्मन प्रेक्षकांना देखील. तिचे कळसूत्री बाहुल्यांचे कार्यक्रम किंवा भारतीय संगीताचे कार्यक्रम ती अत्यंत नीटनेटके आखून सादर करते. या गडबडीत घराकडे लक्ष देणं तिला अजिबात जमत नाही. परंतु त्याची चिंता तिलाही नसते आणि प्रेक्षकांनाही नसते. 

रोमन सैन्यात शिपाई होता. एकदा बर्फ पडत असताना त्यानी एका विवस्त्र भिकार्‍याला पाहिलं. तात्काळ अंगावरचा कोट फाडून त्यानी त्याला पांघरला. असं म्हणतात की रात्री येशू त्याच्या स्वप्नात आला आणि त्याचा कोट पूर्ववत झाला. हेल्गा मुलांना घेऊन जवळच्या टेकडीवर जाते. हातात मेणबत्त्या घेऊन मुलं जातात. एक गाणं म्हणतात. सेंट मार्टिनचं नाटुकलं सादर होतं. हेल्गा मुलांना खाऊ देते. कार्यक्रम संपतो. मुलं आपल्याला आई-वडलांबरोबर घरी जातात. 

या टेकडीवर येण्याचं आणखी एक निमित्त आता निर्माण झालं आहे. २००७मध्ये हेल्गाचा नवरा कार्ल गेला. त्याचा देह या टेकडीवरच्या स्मशानभूमीत विलीन झालेला आहे. त्यावरच्या चौथर्‍याभोवती ताजी फुलं बाहिलेली असतात. २००७मध्ये मी कार्यक्रमासाठी गेले. त्या दिवशी संध्याकाळी हेल्गा म्हणाली, “चल आपण कार्लला भेटायला जाऊ.” आम्ही दोघींनी हातात फुलं घेतली. टेकडीवर स्मशानभूमीत गेलो. कार्लच्या चौथर्‍यावर फुलं वाहिली. तिथे जवळच्या बाकावर शांतपणे बसून राहिलो. “मला खूप आवडतं इथे यायला. कित्येक जण इथे अस्तंगत झाले आहेत. त्यांच्याजवळ बसलं की शांत वाटतं. आसुसलेलं जगणं विसरून अनंत काळाशी नातं जोडावं तसं वाटतं.” मी हेल्गाकडे पाहत होते. तिच्या डोळ्याल्या शांत हास्याचा थांग लागतो का ते शोधत होते. हातात हात घेऊन आम्ही टेकडीवरून उतरलो. थिएटर अ‍ॅम फॅडेनमधल्या बाहुल्यांच्या विश्वात सामील झालो.

– नीला भागवत


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)

जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे./p>

लेख वाचा…


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (2)

एका रशियन लोककथेवर आधारलेलं हे बाहुल्यांचं नाटक  आहे./p>

लेख वाचा…


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (3)

भेद विसरून परस्पर मेळ साधणार्‍या या जोड्या पाहताना संस्कृती कशा एकजीव होतात ते जाणवतं./p>

लेख वाचा…


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (४)

भेद विसरून परस्पर मेळ साधणार्‍या या जोड्या पाहताना संस्कृती कशा एकजीव होतात ते जाणवतं./p>

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *