फॉन्ट साइज वाढवा

औद्योगिकीकरण झालेल्या युरोपमध्ये यंत्राचा अनेक प्रकारे वापर होऊ लागला, तसतसं मूलभूत आणि अस्सल वस्तूंचं प्रेमही वृद्धिंगत होत गेलं! हेच पहा ना!

६० जणांच्या बसण्याची व्यवस्था असलेल्या हेल्गाच्या थिएटरमध्ये ध्वनिवर्धक यंत्रं नसतात. कलाकारांचा खरा आवाज थेट प्रेक्षकांपर्यंत पोचावा ही कल्पना त्यामागे आहे. काळ्या रंगाचं कापड मागच्या भिंतीवर लावलेलं असतं. रंगमंचासाठी प्रकाश व्यवस्थापन हा कार्लचा आवडता विषय असे. मैफलीच्या वेळेआधी अर्धा तास कलाकारांच्या बसण्याची योजना पक्की केली जाते. श्रोत्यांच्या करता अंधुक प्रकाश असतो. हेल्गा सुरुवातीला एकेकाची ओळख करून देते. आधी मुख्य कलाकार आणि नंतर संगतकार. आपलं नाव पुकारल्यावर आपण आपल्या जागी जाऊन साज जुळवायला लागायचं. हेल्गा केवळ एका वाक्यात प्रत्येकाची ओळख करून देते. श्रोते आदरसत्कार करतात. ते कलाकाराचं गायन वा वादन ऐकून. ते आवडलं तर.

युरोपमधल्या सर्व मैफलींमध्ये मी नेहमी रागाची वैशिष्ट्यं सांगते. बंदिशीचा अर्थ सांगते. त्यामुळे गायनातून काय अपेक्षा करायच्या, ते श्रोत्यांना माहीत होतं. आपले खास श्रोते अशा संवादामधून घडत जातात. मैफल संपल्यावर मगच टाळ्यांचा गजर होतो. एकेका रागाच्या वा बंदिशीच्या सादरीकरणानंतर कित्येकदा श्रोते शांत राहतात. टाळ्या अखेरीस देतात. मग मात्र  थांबतच नाहीत. खाली वाकून, नमस्कार करून, किंवा सर्व कलाकारांनी हात धरून खाली वाकून श्रोत्यांची दाद कृतज्ञतेनी स्वीकारली, म्हणजे टाळ्या थांबतात. गायन खूपच पसंत असेल, तर टाळ्या थांबतच नाहीत. खूप काळ ताणून धरलेला संयम उसळून, उफाळून व्यक्त होतो. ही खास युरोपियन शैली आहे. भारतात असं क्वचितच होतं. अनेक जण नंतर भेटायला येतात. त्यातले कुणी शिकायला येतात. कधी तिथे असताना तर कधी नंतर ऑनलाईन शिकू लागतात. अनेक जण व्हिझिटिंग कार्ड्स घेतात. आपणही ती खिरापतीसारखी वाटत जायचं असतं. 

हा अनुभव सर्वत्र सारखाच असतो. त्यामुळे मी हेल्गाकडच्या मैफलीविषयी लिहिता लिहिता अनेक ठिकाणी फिरून आले. या मैफली आणि अशी दाद मनात उत्कंठा निर्माण करते, पुन्हा पुहा तो अनुभव घेण्याची. 

आपल्या देशात परतायचं असतंच. पण गायनाचा हा अनुभव खुणावत राहतो. नकळत हवेमध्ये मन तरंगू लागतं. डोळ्यांसमोर वेगवेगळी प्रेक्षागृहं आणि श्रोत्यांचे चेहरे तरळू लागतात.

एकदा एका मैफलीत मीरेचं एक पद मी अर्थ सांगून गायले होते. त्याचा अर्थ मीरेचं कृष्णावरचं प्रेम किती उत्कट आहे असं सांगणारा होता. “लोक माझी निंदा करतात, याचा अर्थ माझं प्रेम, खरं आणि उत्कट आहे, दुसरं काय? इतकचं काय मला ही निंदा गोडच वाटते.” असं मीरा म्हणते. “राणाजी म्हाने बदामी लागे मीठी,” असे ते शब्द आहेत. प्रेमानुभव कुणाला कसा वाटेल हे आपण कसं सांगणार?

मैफल संपली. एक तरुण मुलगी सर्वांत शेवटी भेटायला आली. तिनी माझे हात धरले. हातावर डोकं टेकलं. आणि रडायला लागली. तिचे अश्रू वाहू देण्याखेरीज मी काहीच करू शकत नव्हते. नंतर हळूच तिने डोकं वर केलं, म्हणाली, “तू मीरेबद्दल सांगितलंस ती माझीच कहाणी आहे. पण तिच्याएवढी ताकद नाहीय माझ्याकडे.” तिला अश्रू आवरेनात. मी रंगमंचावरून खाली उतरले. तिला जवळ घेतलं. आम्ही दोघी कितीतरी काळ तशाच उभ्या होतो. हेल्गा आली. म्हणाली, “चला जेवण तयार आहे.”

हेल्गाकडे भेटलेला एक भारतीय श्रोता म्हणजे डॉ. रमाकांत अय्यंगार. हा मर्सिडीज बेन्झमध्ये काम करणारा इंजिनियर. १९६२मध्ये पंतप्रधान नेहरूंनी ज्या तरुण मुलांना पूर्व जर्मनीत शिकायला पाठवलं, त्यातला एक. अत्यंत हुशार. मनातून भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेला. पण जर्मन मुलीशी लग्न केल्यामुळे अय्यंगार कुटुंबानी त्याला पूर्णत: नाकारलं. पूर्व जर्मनीत तो आनंदानी राहत होता. त्याला दोन मुलगे होते. एक दिवस तिथल्या साम्यवादी सरकार सांगितलं, “इथे राहायचं असलं, तर इंटेलिजन्स सर्विसमध्ये नोकरी कर नाही तर देश सोडून जा.” त्याने देश सोडला. पश्चिम जर्मनीत तो आला. त्याची बायको, मुलगे तिथेच राहिले. ही जखम मनात घेऊन तो स्ट्युटगार्टला आला. हेल्गाच्या थिएटरमध्ये एका कार्यक्रमाला तो आला. हेल्गा आणि कार्लची त्याची दोस्ती झाली. १९८१पासून थिएटरमध्ये होणारे भारतीय संगीताचे कार्यक्रम हा त्याच्या भारतीय मनाला फार मोठा दिलासा होता. राहायला घर शोधता शोधता त्याची रेनाटेशी ओळख झाली आणि तिच्या घरी तो राहू लागला. ती एकटी. तो एकटा. त्यांनी लग्न केलं की नाही कोण जाणे. पण त्यांचं नातं जुळलं. पति-पत्नीच्या कोशात ते नकळत विसावले. रेनाटेला हेमोफीलियाचा त्रास होता. रमाकांत तिची पूर्ण काळजी घेऊ लागला. ८०च्या दशकात शुब्रतोरॉय चौधरीसारखे सतारवादक त्यांच्या घरी राहत असत. संगीतप्रेमी रमाकांत त्यात रमून जायचा. या प्रक्रियेत केव्हातरी रेनाटेला रमाकांतचं संगीतप्रेम नकोसं झालं. हळूहळू त्यांच्या एकत्रपणाला तडा जाऊ लागला. एकत्र राहताना देखील ते एकाकी झाले. हेल्गाच्या थिएटरमध्ये रमाकांत हमखास असायचा. तो त्याचा विसावा होता. त्याचं भारतीय मन संगीत आणि संगीतकार यांच्यात रमू लागलं. हेल्गाला तो मदत करायचा. तशीच माझ्यासारख्या नेहमी तिथे जाणार्‍या संगीतकारांसाठीही खूप करायचा. स्टयुटगार्टच्या गल्ल्यांमधून आम्ही खूप भटकायचो. तिथली टर्किश लोकांची छोटी दुकानं म्हणजे एक मायाबाजार असतो.  तिथे ठिकठिकाणच्या वस्तू अकल्पितपणे सापडतात. एखादा छोटा मॉल असावा, तशीही दुकानं असतात. तिथली काही दुकानं चटकदार खाद्यपदार्थ विकण्याचं काम करतात. भारतात सर्वप्रिय असलेला बटाटावडा, समोसा इथे मिळतो. इथल्या इराण्याच्या दुकानांसारखी दुकानं न्याहारीच्या छोट्या गोष्टी आणि जेवणाचे पदार्थ – रोटी, सबजी-दाल, बिर्याणी, इत्यादी तेही इथे ठेवतात. सामिष, निरामिष दोन्ही पदार्थ इथे असतात. रमाकांत बरोबर असा खरपूस समाचार घ्यायला मिळायचा. ती मेजवानी गप्पांची, मैत्रीची आणि खाण्याचीही असायची. पाकिस्तानातून तिथे काही निमित्ताने गेलेले अनेक जण हे असे व्यवसाय करतात. त्यांना भेटल्यावर एकमेकांत बोलताना म्हणतात, “अरे, यार अपने देशसे मेहेमान आए है। उन्हे अच्छासा खाना खिलाएंगे।”  स्ट्युटगार्टमध्ये भारत-पाक शत्रुत्व सुंष्टात आलेलं असतं. सर्व जण आशियातले समान दुवे असलेले परस्परांवर प्रेम करणारे सखेसोबती असतात. रमाकांतने अशा काहींची माझी ओळख करून दिली होती. तसनीम खान, जहाँगीर फुंकस (हे त्यांनी घेतलेलं नाव होतं.) जर्मन बायको आणि पाकिस्तानमधला स्ट्युटगार्टमध्ये राहू लागलेला मुस्लिम नवरा, अशी ही जोडपी होती. मला भेटलेले हे दोघं. पण अशा अनेक जोड्या इथे दिसतात. देश, सवयी-भाषा, आहार-विहार यात पुष्कळ फरक असतात. पण भेद विसरून परस्पर मेळ साधणार्‍या या जोड्या पाहताना संस्कृती कशा एकजीव होतात ते जाणवतं. मन विस्मयचकित होतं. 

तिथल्या एका मैफलीत रमाकांत मला म्हणाला, “आज मुझे दरबारी कानडा और पूरिया सुनने का मूड है। आप गाएंगी ये राग?” दोन्ही माझे आवडते राग. मध्यंतराच्या आधी मी दरबारी गायले. नंतरच्या मैफलीत मारवा आणि पूरिया धनाश्री असा मेळ असलेली एक कथक ठुमरी गायले. भैरवी टप्पा गाऊन मैफल संपवली. अनेक जण भेटत होते. रमाकांत कुठे दिसत नव्हता. थिएटरमधून मी बाहेर आले. रमाकांत कुठून तरी जवळजवळ धावतच आला. “नीलाजी एक तो आपने मेरी फर्माइश मान ली। मैं खूश हुआ। क्या गाया आपने। ऑखोंमें आँसू आ गये।” असं म्हणून तो खरोखरच रडू लागला. त्याच्या पाठीवर हात ठेवून मी उभी होते. दुसर्‍या बाजूला नंदू उभा होता. आलेले श्रोते अवाक् होऊन हे दृश्य पाहत होते. रमाकांत अश्रू आवरू शकत नव्हता. जवळजवळ अर्धा तास स्तब्ध राहून आम्ही रमाकांतला धीर देत उभे होतो. ही परिस्थिती त्याच्या लक्षात आली. “लेट मी बी अलोन. हेल्गा आय विल सिट इन द थिएटर फॉर सम्टाईम्.”

हेल्गाने इतरांना जेवायला बोलावलं आम्ही जेवत होतो. सुन्न झालो होतो. मूकपणे जेवणाची दखल घेत होतो. 

रमाकांत अजून थिएटरमध्येच होता. थिएटरचं दार कलतं करून मी हाक मारली, “रमाकांत”, “येस नीलाजी. यू हेल्प्ड मी सो मच कितने दिनसे दबी हुई दिलकी खराश आज बाहर निकल आयी। आय् कॅन बेअर विथ लाइफ नाऊ.” उभ्या आयुष्यातले सारे कल्लोळ त्याचे अश्रू घेऊन येत होते. अतीत आणि वर्तमान हे दोनच काळ त्याच्यासमोर दिसत होते. वाढत्या वयाला भविष्याचा विचार सोसत नव्हता. थिएटरमधल्या रितेपणात, अंधारात त्यानी मनातला अंधार विझवून टाकला होता. त्याचा हसरा चेहरा परत येऊ पाहत होता.

‘चलो रमाकांत थोडा खाना खा लो। समय बहोत हो चुका है।”

त्याला आम्ही थोडंसं जेवायला लावलं. रात्रीचे दोन वाजले होते. रमाकांत आपल्या नेहमीच्या वाटेने घरी निघाला होता.

ही आठवण आजही मला अस्वस्थ करते. संत कबीर म्हणतो, “नैहरसे जियरा फाट रे। उसका क्या घर बाट रे।” जन्मदात्यांनी नाकारलं, तर कुठे राहायचं, आपला रस्ता, आपलं स्वत्व कसं ओळखायचं, काय करायचं? रमाकांतने हे प्रश्न सोडवले होते. तो हुशार इंजीनियर होता. एक घर मोडलं, तरी दुसरं घर त्यानी उभं केलं होतं. त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे भारतीय संस्कृतीने  दिलेले मूळबंध त्यानी पूर्णत: जपले होते. रामायण, महाभारत त्याच्या ओठांवर खेळत होतं. गीतेचं सार जणू काही त्याला कळलेलं होतं. लोकसंगीत, सिनेसंगीत, रागदारीसंगीत त्याच रोमरंध्रात गुंफलेलं होतं. त्याच्याबरोबर हिंडत असताना गाडी चालवता चालवता तो अखंड बोलायचा, मध्येच रागदारी गायचा, एखादं सिनेसंगीत गुणगुणायचा, मला विचारायचा, “आगे क्या है?” “मुझे कहाँ मालूम?” मी हसत म्हणायचे. चकित व्हायचे. अखेरीस न राहवून मी विचारलं, “वर्षातून किती महिने म्हैसूरला तुझ्या शहरात काढतोस?” तो हसायला लागला आणि प्रांजळपणे आपल्या आयुष्याची कहाणी त्यानी सांगून टाकली. त्याच्या आनंदी हसण्याने अंत:करणातल्या सर्व जखमा झाकून टाकल्या होत्या. पण निमित्त मिळताच त्या भळभळून वाहू लागत होत्या.

माझी एक मैत्रीण युटा झिमरमन् हे दृश्य पाहत उभी होती. मला ती नेहमी म्हणायची, “नीला मला भारतात यायचंय. तुझ्याकडे गाणं शिकायचंय. योगाचार्य अय्यंगार गुरूजींना भेटायचंय. जमलं, तर त्यांच्याकडे शिकायचंय. 

हा प्रसंग पाहिल्यावर मात्र तिने मला सांगून टाकलं. “मी जर भारतात आले, तर रमाकांतचं इथे जे झालं, तेच माझं तिथे होईल. त्यापेक्षा मी इथेच राहीन.”

– नीला भागवत


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)

जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे./p>

लेख वाचा…


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (2)

एका रशियन लोककथेवर आधारलेलं हे बाहुल्यांचं नाटक  आहे./p>

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *