फॉन्ट साइज वाढवा

कळसूत्री बाहुल्यांच्या या रंगमंचाची सुरुवात कशी झाली? तिथे भारतीय संगीताचा प्रवेश कसा झाला? हेल्गाने असं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व कसं घडवलं? असे अनेक प्रश्न मनात होते. त्याची उत्तरं हळूहळू मिळत गेली.

स्टयुटगार्ट शहरात एक अनेकविश्वकलांना, अनेकविध सांस्कृतिक आविष्काराला सादर करणारी संस्था म्हणून थिएटर अ‍ॅम् फॅडेनला महत्त्व आहे. हेल्गाकडे एक उदार आणि सहिष्णू दृष्टिकोन असल्युळेच हे शक्य झालं असेल. हेल्गा ब्रेहम आणि कार्ल रोटेनबाकेर या जोडप्याने ही सुंदर सतरंजी पसरण्याआधी जीवनाचा, जगाचा काय अनुभव घेतला असेल? हा प्रश्न त्यांना भेटल्यापासून माझ्या मनात येत होता. ज्या संध्याकाळी ऑक्टोबर १९९७मध्ये १३/१४ तारखांना मी त्यांच्याकडे गेले, त्याच दिवशी मी त्यांना विचारलं, “तुमची मुलाखत घेऊ का मी? मला तुमची जागा अद्भुतच वाटते आहे.” त्या दोघांनी हसून अनुमती दिली. आणि मी वही आणि पेन हातात घेतलं. 

“कार्ल, तुझा चेहरा मला कॉम्रेड लेनिनच्या चेहर्‍याची आठवण करून देतोय.”

माझा अभिप्राय ऐकून कार्ल म्हणाला, “हो. मला म्हणतात तसं बरेच जण. मी ऑस्ट्रियाच्या कम्युनिस्ट पार्टीत बराच काळ काम करीत होतो. ते अर्थात कॉ. लेनिनच्या चेहर्‍याशी साम्य आहे म्हणून नाही.”

“अर्थात. तू तुझ्या अनुभवातून निर्णय घेतलास.”

कार्ल त्याची कहाणी सांगू लागला. फेब्रुवारी १९४४मध्ये जन्मलेला कार्ल इलेक्ट्रिकल टेक्निशियन होता. शिक्षण चालू असतानाच ऑस्ट्रियाच्या कम्युनिस्ट पार्टीत तरुणांच्या संघटनेत काम करत होता. १९६४च्या सुमाराला, केपीएयु म्हणजे कम्युनिस्ट पार्टी ऑफ् ऑस्ट्रिया, तरुणांना पार्टीच्या कामात शहभागी होण्यासाठी खूप उत्तेजन देत असे. परंतु त्यात सांस्कृतिक कार्यक्रम कमी असत. 

कार्ल कम्युनिस्ट पार्टीत १९६४ ते १९७३ या काळात होता. १९७२मध्ये कार्ल आणि हेल्गा  काही कामाच्या निमित्ताने भेटले. हेल्गाला घर बदलायचं होतं. कार्लने तिला मदत केली. एकमेकांची संगत त्यांना इतकी आवडली की त्यांनी पुष्कळ भटकंती करायचं ठरवलं. ऑस्ट्रियाहून निघून कार घेऊन ते अल्जीरियाला गेले, नंतर सहाराला गेले. जवळजवळ चार महिने ते भटकत होते. निसर्गाच्या विविधरम्य रूपाचा अनुभव घेत होते. संस्कृतीच्या निमगोर्‍या रंगांना न्याहाळत होते.  हरतर्‍हेची कलाकुसर पाहत होते. आणि मुख्य म्हणजे एकमेकांना समजून घेत होते. त्यांच्या जीवनसाथी म्हणून जगण्याला प्रारंभ झाला होता. 

१९७४मध्ये कार्ल आणि हेल्गा यांनी लग्न केलं. त्याआधी हेल्गाचं कला शिक्षण झालेलं होतं. १९३९मध्ये वॉल्सरोड या हॅम्बुर्ग आणि हॅनोव्हरच्या मध्ये असलेल्या गावी हेल्गाचा जन्म झाला. तिथे शालेय शिक्षण घेऊन मग हेल्गानी जिमनॅस्टिक्सची परीक्षा दिली. १९६० ते १९६४ या काळात ती शाळेत जिमॅस्टिक्स आणि नृत्य शिकवत असे. १९६४ ते १९७१ या काळात स्टयुटगार्ट जवळच्या ट्यूबिंगेन या गावी ती राहत होती. तिथून स्टेट अ‍ॅकॅडमी ऑफ आर्टमध्ये ती कला-शिक्षण घेण्यासाठी स्ट्युटगार्टला येत होती.

याच काळात पपेट्री शिकण्यासाठी ती प्रागला गेली होती. याच कलेत आपण काही करावं, असं तिला निश्चितणे वाटू लागलं. या आत्मविश्वासामुळे १९६९मध्ये तिने “योरिंद आणि योरिंदेल” हा पपेट शो तयार केला. आजतागायत हा पेपट शो तिच्या थिएटरमध्ये होत असतो, कारण लहान मुलं त्यावर खूश असतात.

हेल्गाकडे गेल्यासारखा तिचा एखादा शो मी नेहमीच पाहते. त्यातला माझा आवडता शो म्हणजे “स्टारी आईड शेफर्ड”. एका रशियन लोककथेवर आधारलेलं हे बाहुल्यांचं नाटक  आहे. बासरी वाजवणारा एक मेंढपाळ (भारतातल्या कृष्णासारखा) राजकन्येच्या प्रेमात पडतो. तीदेखील त्याच्या बासरीवर खूश असते. तो राजाकडे जातो. राजा सतत शिंकत असतो. राजा शिंकला की समोरच्याने ‘येस सर’ म्हणावं अशी त्याची अपेक्षा. बासरीवाला तसं म्हणत नाही. मग हांजी हांजी करणारा त्याचा मंत्री राजाला सांगतो, “त्याचा छळ करा.” बासरीवाल्यावर सोडलेल्या प्रत्येक जनावराला तो बासरी वाजवून जिंकून घेतो. विदूषक आणि एक चिमणी त्याला मदत करतात. त्याच्या बासरीचा प्रभाव पाहून अखेरीस राजा त्याच्याशी राजकन्येचं लग्न लावून देतो. आपल्याकडच्या सुखान्त कथांसारखीच ही कथा आहे. या नाटुकल्यामध्ये संगीताचा प्रभाव, प्राणी-पक्षी यांची मैत्री, सुष्ट आणि दुष्ट यांच्या संघर्षात सुष्टांचं विजयी होणं, या सर्व गोष्टी मुलांनाच काय मोठ्यांनाही आवडतात. हेल्गाचे शो पाहण्यासाठी आई-वडील मुला-बाळांना घेऊन येतात. तिच्या म्युझियममधले जरीचे, रेशमी कपडे थोडी फार उधारीची किंमत देऊन तेवढ्यापुरते घालतात. अतिवास्तव स्वप्नरंजनाचा आनंद लुटतात. केक-बिस्किटं घेतात. सर्वांना धमाल येते. 

एका बाजूला हे मनोरंजन आणि दुसर्‍या बाजूला भारतीय संगीतासाठी, कलाकारांसाठी एक सुनिश्चित बैठक, अशी दुहेरी मांडणी हेल्गाने केली आहे. १९७२मध्ये ‘थिएटर अ‍ॅम् फॅडेन’ (त्याला कळसूत्री बाहुल्याचां रंगमंच असं म्हणता येईल.) स्थापलं गेलं. यातल्या लाकडी बाहुल्या कार्ल बनवत असे. आणि कापडी बाहुल्या हेल्गा. १९७४मध्ये त्यांनी लग्न केलं. कॅथेरीना आणि फ्रॅन्सिस्का या त्यांच्या मुली. २००७मध्ये कार्लचं निधन झालं. तोपर्यंत म्हणजे ३५ वर्षं हेल्गा आणि कार्ल बरोबर काम करत होते. नंतर तिच्यारोबर बरेच जण अधूनमधून काम करतात. कधी तिची मुलगी फ्रॅन्सिस्का असते. फ्रॅन्सिस्काची मुलगी नोरा या वातावरणात इतकी रमते की, तिने हेल्गाला सांगून टाकलंय, “थोड्याच दिवसात मी तुझ्याबरोबर काम करणार आहे.” आता ती बारा वर्षांची आहे. तिचे आफ्रिकन वडील ‘बाकारी’ छान गातात. थोडी आईसारखी थोडी वडलांसारखी दिसणारी नोरा तिच्या आजीसारखी काम करायला उत्सुक आणि मोकळ्या स्वभावाची आहे. हेल्गाचा वारसा चालवणं तिला कठीण नाही. 

– नीला भागवत


या सदरातील लेख…

कळसूत्री बाहुल्यांच्या सान्निध्यात (१)

जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे./p>

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *