फॉन्ट साइज वाढवा

संध्याकाळी ७ वाजता स्ट्युटगार्ट स्टेशनवर गाडी थांबली. दोन हातात दोन बॅगा आणि काखोटीला तंबोरा घेऊन मी स्टेशनवर उतरले. सामान उतरवताना न विचारता, आपण होऊन एक दोघांनी मदत केली. मी ‘थँक्यू’ म्हटलेलं ऐकायची वाट न पाहता ते कुठे पसार झाले, कळलंही नाही. तेवढ्यात दुरून धावत हेल्गा आली. हातात तंबोरा आणि युरोपियनांच्या तुलनेत वाटणारा निमगोरा रंग यामुळे मला ओळखणं अगदीच सोपं होतं. तिच्या गाडीतून आम्ही घरी गेलो. जाताना तिथल्या आधुनिक इमारती नजरेत भरत होत्या. 

“हे सगळं युद्धानंरच्या काळात बांधलेलं ना?”

“काही जुन्या इमारती आहेत, जुनी चर्चेस् आहेत. पण ती हाताच्या बोटावर मोजण्याइतकी.”

“बापरे! केवढा संहार तुम्ही पाहिलाय्!”

“तू बघते आहेस, त्या सर्व इमारती चाळीसेक वर्षं जुन्या आहेत.”

“त्या मानाने त्या खूपच चांगल्या दिसतायत.”

मी मनात आठवत होते. भारतातल्या, मुंबईतल्या चाळिशी गाठलेल्या इमारती. तुलना करायला लागलं तर आपण घसरून पडतोय असं वाटायला लागलं. तेव्हा नकोच तसं करायला, प्रत्येक संदर्भ नव्यानंच पाहू या. मी ठरवून टाकलं.

गप्पा करत करत आम्ही हेल्गाच्या घरी पोहोचलो. बाहेर टेबल-खुर्च्या मांडलेल्या. अंगणात दोन मोठे आरसे. त्या शेजारी पपेट्सची चित्रं. बोगनवेल भिंतीवर चढलेली. लाकडी दरवाजा ढकलून आम्ही आत गेलो. तिथे उजव्या बाजूला टेबलावर अनेक कायर्क्रमांची पोस्टर्स. भोवती पपेट्स लावलेल्या. इथे दोन मोठी टेबलं. भोवती खुर्च्या. पपेट्स नसलेली भिंतीची एकही बाजू नाही. पुण्याच्या जुन्या वाड्यात असतात, तसे खांब. सामान टेबलाशेजारी ठेवून हेल्गा धावतच वरच्या मजल्यावर गेली.

“आपण चहा घेऊ या आधी. माझं किचन वर आहे. चहा, बिस्किटं घेऊन येते मी,” हेल्गा म्हणाली. तितक्यात समोरचा मोठा दरवाजा उघडून एक उंचापुरा गोरागोरा माणूस आला.

“हाय् नीला. मी कार्ल. हेल्गाचा नवरा. कसा झाला प्रवास? ठीक आहेस ना?”

“अगदी छान. बस ना इथे. तुझ्याच घरात मी तुझं स्वागत करते,” मी हसले. 

“तू इथे राहणार आहेस. तुझंच आहे की हे घर.”  

मला गंमत वाटत होती. भेटल्यापासून हेल्गा आणि कार्ल हे दोघंही माझे जुने मित्र असल्यासारखे वागत होते. मला छान वाटलं. तेवढ्यात हेल्गा चहाचा ट्रे घेऊन आली. “चला, आपण तिकडे म्यूझियममध्ये जाऊ या.” आम्ही तिघंही उठलो. शेजारच्या खोलीत शेकोटीची जागा होती. तिथे एक मोठा बंब होता. आपल्याकडे पूर्वी पाणी तापवायला असायचा तसा. तांब्याचा. अरेच्चा! गंमत आहे. थोडं पुढे गेलो, तर एका छोट्याश्या बोगद्यातून जावं लागलं. बाहेर आलो, तर ही एवढी मोठी खोली. तिला म्यूझियम म्हणायचं. कारण जगभरच्या पपेट्स तिथल्या भिंतींवर लावलेल्या होत्या. शिवाय रंगीबेरंगी गाउन्स. जरीचं काम केलेले, सॅटिनचे. ओहो. विलक्षणच आहे सगळं.

चहासाठी बसायला खुर्च्या होत्या. आणि ट्रे ठेवायला एक मोठा ओंडका. झाडाचा बुंधा असावा बहुधा. अद्भुतच आहे सगळं. 

हेल्गाकडे मी गेले ती शुब्रतो रॉय चौधरी या सतारवादकामुळे. मी मुळात निघाले होते पॅरीसला. स्ट्युटगार्टला मी आले ती ब्रसेल्सहून – बोल्जियमधलं एक सुंदर शहर. तिथे आले, ती हेगहून. १९९७ साली ५ ऑक्टोबरला मी मुंबईहून निघाले. देश सोडून जाण्याचा माझा पहिला अनुभव होता तो. एअरपोर्टच्या आत गेल्यानंतर चेक इन् करायच्या बॅगा स्क्रीन करायच्या, मग तिकिट काऊंटरला जायचं, बोर्डिंग पास घ्यायचा. मग सेक्युरिटी आणि नंतर इमिग्रेशन. हा क्रम मी लक्षात ठेवला होता. पण ती उंच भिंत, ती भव्य जागा, एस्कॅलेटर्स, धावपळ गडबड बघताना, मी वेड्यासारखी काचेमधून आपली माणसं दिसतायत का, ते शोधत होते. अरेच्चा! हा नंदू आणि तपन. काचेमधून मलाच शोधताहेत की! भरभर चालत मी त्यांच्यापर्यंत पोचले. डोळ्यातलं पाणी त्यांना दिसू नये, अशी खबरदारी घेताना मी जरा अधिकच रुंद जिवणी ठेवून हसत होते. आता पुढचे दोन महिने आण एकट्या असणार आहोत. हे अगदी पक्कं जाणवत होतं. चला निघू या. गेटला जाईपर्यंत काय गमती-जमती बघायच्याहेत, करायच्याहेत, कोण जाणे! आपण बावळ्यासारखी एखादी चूक बहुधा केलीच असेल. दोघांकडे पाहत हात हलवून मी मार्गी लागले. 

त्यानंतर मी कितीतरी वेळा परदेशवारी केली असेल. पण ताटातुटीची ही जाणीव दर वेळेस होते. मनाला टोचत राहते. आणि काही काळाने निघून जाते. विमानप्रवासाच्या गोंधळात ती हरवून जाते.

एकदा का युरोपमधली मित्र मंडळी भेटू लागली की अनुभवाचं नावीन्य झपाटून टाकतं. हेल्गाकडे मी गेले ती मजल दरमजल करीत. पण दोन दिवसाचा तो अनुभव कायम ताजातवाना राहिलेला आहे. 

याचं मुख्य कारण म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही सहप्रवास करणार्‍या मैत्रिणी म्हणूनच भेटत राहिलो. प्रत्येक युरोपीय शहरांच्या मैफलींच्या मालिकेत स्ट्युटगार्ट असायचंच. हेल्गाशी मैत्री होण्याचं मुख्य कारण म्हणजे तिचं भारतीय संगीतावरचं प्रेम. तिच्या ‘थिएटर अ‍ॅम फॅडेन’ या पपेट थिएटरमध्ये गेली चाळीसेक वर्षं (१९८१पासून) ती भारतीय संगीताचे कार्यक्रम करते आहे. त्यात गायन, वादन आणि नृत्य देखील असतं. नाहीतरी “गीतं वाद्यं तथा नृत्यं इति संगीतमुच्यते” असं म्हटलेलं आहे. (शारंग देव याने लिहिलेला ‘संगीत रत्नाकर’ हा ग्रंथ त्यातील प्रथम स्वरगताध्याय, २१वा श्लोक) हेल्गा ते प्रत्यक्षात उतरवते. या थिएटरमध्ये साधारणत: साठ रसिक बसू शकतात. तसं थिएटर लहान असलं, तरी कलाकाराशी नजर मिळवणं इथे श्रोत्यांना शक्य असतं. कलाकाराला पहिल्या रांगेतले श्रोते दिसतात. पुढचे अंधारात असतात. दिसतात, त्या श्रोत्यांबरोबर भारतीय शैलीत नजर मिळवणं कठीण असतं. कारण त्यांना राग-ताल यांचा तसा गंध नसतो. पण ऐकतात मात्र खूप लक्ष देऊन. कलाकार कुठले कपडे घालतात, कसे बसतात, एकमेकांकडे कसे पाहतात, हसतात का गंभीरच राहतात, श्रोत्यांना कुठली माहिती देतात, श्रोत्यांना विश्वासात कसे घेतात, गाताना, वाजवताना चेहर्‍यावरचे भाव काय असतात, हातवारे कसे करतात या सर्व गोष्टींची श्रोते नोंद घेत असतात. त्यांना गाण्यातले तपशील कळले नाहीत, तरी कला कोणत्या दर्जाची आहे, कलाकार किती अस्सल आहे, किती सर्जनशील आहे, याचा अंदाज येऊ शकतो. एकतर हेल्गाच्या थिएटरमध्ये भारतीय संगीत ऐकून त्यांचा कान तयार झालेला असतो. दुसरं म्हणजे पाश्चिमात्य संगीतातले अनेक दर्जे त्यांनी अनुभवलेले असतात, काही प्रमाणात शिकलेले असतात. चित्रं, शिल्पं, या दृश्यकलांच्या विश्वाशी त्यांची ओळख झालेली असते. चांगला सिनेमा, चांगलं वाङ्मय त्यांना परिचित असतं. अशा सुसंस्कृत श्रोत्यांसमोर आपली कला सादर करण्याचं भाग्य स्ट्युटगार्टमधल्या थिएटर अ‍ॅम फॅडेनमध्ये लाभतं. किंबहुना युरोपमध्ये अनेक शहरांमध्ये हे वातावरण अनुभवता येतं.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपमध्ये बहुतेक शहरांमध्ये तीन तासांची मैफल असते. मध्यंतरात समोसा, बटाटा वडा, खूपशी वेलची घातलेला मसाला चहा असं खायला-प्यायला  ठेवलेलं असतं. ते तिकिटाच्या पैशात येत नाही. विकत घ्यावं लागतं. पण श्रोते उत्साहाने ही खान-पान सेवा अनुभवतात. त्यानंतर मैफलीचा दुसरा भाग. रात्रीची मैफल १२ वाजेपर्यंत चालते. त्यानंतर कलाकारांचं जेवण, गप्पा, त्याबरोबर थोडीशी वाईन असा थाट असतो.

हेल्गाचं वैशिष्ट्य म्हणजे शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी ती मैफलीचं आयोजन करते. सकाळचे राग ऐकण्यासाठी. भारतीय संगीताची ओळख जशीजशी अधिकाधिक होऊ लागली, तशीतशी सकाळच्या रागांची भाववृत्ती, रंगरूप, वेगळं असतं, असं हेल्गाला जाणवू लागलं. तिथे राहणार्‍या कलाकारांच्या रियाजातून हे जाणवलं असेल, कदाचित त्यांच्यापैकी कुणी हे सुचवलं असेल. कदाचित थिएटर अ‍ॅम फॅडेनला नेहमी येणार्‍या भारतीय श्रोत्यांपैकी कुणी सकाळची मैफल करायची कल्पना सुचवली असेल. पण एक खरं, युरोपमध्ये सकाळच्या मैफलीचं आयोजन करणारी एकमेव संस्था हेल्गाचीच आहे.

– नीला भागवत

या मालिकेतील इतर लेख वाचण्यासाठी खाली क्लिक करा.
कळसूत्री बाहुल्यांच्या सानिध्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *