कोणत्याही विषयावरील पुस्तकांची निर्मिती करताना ती विचारपूर्वकच करावी. त्या प्रक्रियेसोबत ‘फ्लर्टिंग’ शक्यतो करू नये. मग ते पुस्तक कथा-कादंबरी प्रकारचे असो, चरित्रात्मक असो, माहितीवजा असो किंवा उपयुक्त प्रकारात मोडणारं असो… त्याच्या निर्मितीमागे विचार असावा तो वाचकाचा. लेखकाचा ‘लेखन-ऐवज’ त्या-त्या लेखन प्रकाराला योग्य अशा स्वरूपात सादर केल्यास वाचकांना ते लिखाण वाचणं सोयीचं जातं. विशेषतः पुस्तकात ‘वाचन- सुलभता’ आणणं ही जबाबदारी उपयुक्त पुस्तकांबाबत आणखीनच वाढते. जसं की आम्हाला ‘फ्लर्टिंग विथ स्टॉक्स अर्थात शेअर बाजार समजून घेताना’ या पुस्तकाबाबत जबाबदारीचे भान ठेवावं लागलं. या पुस्तकात शेअर बाजाराचं तंत्र- मंत्र समजावून देण्यासाठी लेखक अनिल लांबा यांनी वर्णनात्मक मजकूरासोबत अनेक प्रकारचे तक्ते, आलेख, आकडेमोड असलेली गणितं, केस स्टडीज, मान्यवर तज्ञांची वचनं यांचा पुस्तकभर वापर केला आहे. या सर्वांना योग्य अशी ट्रीटमेंट दिली नाही तर, वाचक पुस्तक पाहताच गोंधळून जाईल आणि वाचताना कंटाळून जाईल याचं भान या पुस्तकाची निर्मिती करताना डोक्यात ठेवून मी पुस्तकाचं, विविध प्रकारच्या मजकुराचं ‘ले-आउटिंग’ केलं. वाचकाला पुस्तक अभ्यासणं सोयीचे जाईल याची साधेपणाला राखूनच मी काळजी घेतली आणि त्या साधेपणाला थोडी ‘फ्लर्टिंग’ची जोड दिली ती संपूर्ण पुस्तकभर दुसऱ्या रंगाचा वापर करून. परंतु ते करताना डोक्यात होती ती वाचकांची सोय! हा प्रयोग यशस्वी झाला याची प्रचिती आली ती मंदीच्या काळातही वाचकांचा पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळाला.
आणि आता… अखिल भारतीय प्रकाशक संघाने या पुस्तकास ‘उपयुक्त’ विभागात प्रथम पुरस्कार जाहीर करून आमच्या विचारपूर्वक निर्मितीची दखल घेतली याचा विशेष आनंद झाला.
ललित-लेखन विभागात ‘गोथाण्यातल्या गोष्टी’ आणि उपयुक्त विभागात ‘फ्लर्टिंग विथ स्टॉक्स’ अशा आमच्या दोन पुस्तकांना प्रथम पुरस्कार मिळण्याचा ‘टीम रोहन’ला खरोखरीच मनापासून आनंद झाला आहे.
अखिल भारतीय प्रकाशक संघाचा ‘उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार’ हा उपक्रम खरोखरीच स्तुत्य आहे…संयोजकाचे मनःपूर्वक आभार…
प्रदीप चंपानेरकर
(प्रकाशक, रोहन प्रकाशन)
पुरस्कारांच्या निमित्ताने…(भाग-१ )
संपूर्ण भारतातून एकाच प्रकाशकाला दिला जाणारा ‘पब्लिशर ऑफ द इयर’ हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कारही २०१४ साली मिळाला आहे. तेव्हा आता आहे ते जोपासूया…