सकाळी जाग आली तेव्हा साडेसात वाजून गेले होते. उठल्या उठल्या मनात पहिला विचार आला, तो रात्रीच्या आवाजाचा. मनात एक विचित्र अशी अस्वस्थता भरून राहिली. जणूकाही तो आवाज माझ्या मनात रुतून बसला असावा.
मग तोंड धुताना जेव्हा मी शांतपणे विचार केला, तेव्हा मला अगदी नीट आठवलं की रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं. आणि त्या स्वप्नामुळेच मी आणखीन अस्वस्थ झालो होतो. त्या स्वप्नात मी एका अंधाऱ्या जागेत उभा होतो. सगळीकडे ओशट ओलावा होता आणि मांस जाळल्याचा करपट वास भरून राहिला होता. तोच एका अंधाऱ्या कोपऱ्यातून एक अर्धवट जळालेला कुत्रा माझ्यासमोर आला. त्याचा एक डोळा लोंबत होता आणि अंगावरचे सगळे केस जळून गेले होते. पोटातून अर्धवट बाहेर आलेलं मांस काळं जरबरीत झालं होतं. एक पुढचा आणि एक मागचा असे दोन पाय तुटले होते. तो खुरडत माझ्या पुढ्यात आला. मला खरंतर पळून जावंसं वाटत होतं, पण मला माझे पायच हलवता येत नव्हते. जणूकाही कोण्या अदृश्य हातांनी मला तिथे कोणीतरी बांधून ठेवलं होतं.
एकच कान असणाऱ्या त्या कुत्र्याने बोलायला सुरुवात केली, ‘माझं नाव अॅलेक्स. तू मला ओळखणार नाहीस. पण तुला रोज सकाळी पाहायचो. माझा केअरटेकर मला फिरायला घेऊन जायचा तेव्हा. आम्हा कुत्र्यांची मेमरी जबरदस्त असते बरं.’ तो हसला, तेव्हा त्याचे अर्धवट पडलेले दात दिसले. त्याच्या हिरड्या रक्तबंबाळ झाल्या होत्या आणि त्यातून मोठ्या पांढऱ्या आळ्या फिरत होत्या. आपण काहीतरी बोललं पाहिजे, असं मला वाटलं. पण माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. मग तोच म्हणाला, “मी तुझ्या स्वप्नात आलोय, मला तुला काहीतरी सांगायचंय. नाहीतर मी असाच अतृप्त राहीन.”
आता त्याला नीट पाहिल्यावर मला त्याची ओळख पटली होती. मी रोज सकाळी आमच्या सोसायटीच्या बागेत जॉगिंगला जायचो, तेव्हा हा अल्सेशियन जातीचा कुत्रा रस्त्यावर फिरवायला आणलेला असायचा. मला आठवलं, की एकदा माझी आणि या अॅलेक्सच्या केअरटेकरची बाचाबाचीही झाली होती. मी आमच्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडत होतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला अॅलेक्स तोंड उघडं ठेवून माझ्याकडे पाहत उभा होता. खरंतर तो उभा नव्हता. तर अर्धवट बसून शी करू पाहत होता. त्याच्या ढुंगणातून दोन काळी लेंडकं बाहेर पडतच होती तोच त्या केअरटेकरने त्याचा पट्टा जोरात हिसकावला आणि त्याला ‘जल्दी जल्दी करो’ असं म्हणत जोरात ओढलंच. तेव्हा माझ्या डोक्यात सणक गेली आणि मी त्या केअरटेकरला म्हणालो, “दादा, समजा तुम्हला जोरात संडासाची कळ आलीये, तेव्हाच तुम्हाला कोणी लाथ मारून उठवलं तर कसं वाटेल तुम्हाला?”
तो केअरटेकर थोडा बावचळत म्हणाला, “क्या? क्या बोल रहे है आप?”
मी म्हणालो, “अरे उस कुत्ते को हागने तो दो. आप तो उसे घसीटके लेके जा रहे हो.” तो सारवासारवी करत म्हणाला, “हां हां ठीके ठीके. आपको क्या उससे? कुत्ता तो है. और हमे उसकी देखभाल कैसी करनी ये मत सिखाईये आप.” त्याच्या आवाजात एक मगरुरी होती. मी म्हणालो, “चोरी तो चोरी उपरसे सिनाजोरी. कुत्ता है तो क्या हुआ, जिंदा प्राणी है. आपकी कम्प्लेंट करूंगा.” तसा तो निर्लज्जपणे हसला, म्हणाला, “ओ, भाईसाब, क्यू सुबह सुबह भेजा खराब कर रहे हो. ये कुत्ता हमारा है, हम देखेंगे उसे कैसे रखना है. जाईये आप. और किजिये कम्प्लेंट, जो उखडाना है उखाडिये. जाईये.” असं म्हणून तो अॅलेक्सला ओढत पुढे निघून गेला होता.
अॅलेक्स म्हणाला, “मला जाळून मारून टाकण्यात आलंय आणि मग नंतर त्या गुलमोहरांच्या माळरानावर पुरून टाकण्यात आलंय.” नंतर त्याने सांगितलं की, त्या रात्री बंगल्याची राखणदारी करायची त्याची पाळी होती. तो बंगल्याच्या व्हरांड्यात बसून डोकं टेकवून झोपला होता. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून तो सावध झाला आणि भुंकणार होता. तोच त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. त्याला भुंकताच येईना. मग त्याचे हातपाय बांधले गेले आणि उचलून गाडीच्या डिक्कीत फेकून देण्यात आलं.
मला काय बोलावं समजत नव्हतं. अॅलेक्सने पुढे सांगू लागला, ‘मी गांगरून गेलो होतो आणि कुई-कुई असा बारीक आवाज काढत होतो. पण त्या माणसाला माझी थोडीशीही दया आली नाही. गाडी सुरू झाली आणि दोनेक मिनिटांतच माळरानापाशी थांबली. तिथे नुकताच कोणीतरी कचरा जाळला होता. आगीचे लोटच्या लोट उसळले होते. मला ज्याची शंका आली तेच झालं! माझं मुटकुळं त्या लोटात फेकून देण्यात आलं. माझ्या अंगाची लाही लाही होत होती, केस जळत होते आणि मी विव्हळत त्या आगीमध्ये होरपळून निघत होतो. थोडा वेळ आग पेटत राहिली. अगदी थोडीशी अखेरची धुगधुगी माझ्यात राहिली होती. तेव्हाच कोणीतरी मला पुन्हा एकदा उचललं. मी डोळे करून पाहिलं, तेव्हा मला दिसलं की त्या माणसाने पायघोळ पोशाख घातला होता आणि डोकं हुडाने झाकलेलं होतं.
‘मग मला एका खड्ड्यात टाकण्यात आल्यावर तो माणूस खदाखदा हसायला लागला. ‘आमच्या गेटपाशी हागतोस… घे आता… घे आता. भोग शिक्षा.’ असं म्हणून त्याने मला त्याच्या हातात असलेल्या फावड्याने जोरजोरात फटके मारायला सुरुवात केली. त्या आवाजावरून आणि नंतर त्या हुडातून बाहेर आलेल्या केसांच्या बटांवरून मला समजलं की, ती बाई होती. आणि त्या अखेरच्या क्षणी तडाखे सहन करत सगळ्या वेदनांच्या पार जात असताना मला प्रश्न पडला, ‘मी या बाईचं काय एवढं वाकडं केलंय की तिने मला असं निर्दयपणे मारलं असावं?’’
- एक कुत्ते की मौत आणि इतर दोन कथा
- लेखक : प्रणव सखदेव
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल सप्टेंबर २०२०
हे ईबुक खरेदी करण्यासाठी…
युवा लेखक प्रणव सखदेव यांचा परिचय इथे जाणून घ्या…
मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत.