लॉकडाउन केलेली गोष्ट ‘अनलॉक’ करण्यासाठी चावी लागणारच. आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक कारणांसाठी, अनेक प्रकारची, अनेक आकारांची कुलुपं वापरावी लागतात. वापरली नाहीत तरी, आपल्या मानसिक समाधानासाठी तरी, त्यांची उपलब्धता आपण ठेवत असतो. या कुलुपांत घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावणाऱ्या मोठ्या आणि प्रगत कुलुपापासून प्रवासाला जाण्यासाठीच्या छोट्या एअरबॅगला लावण्याचं छोटं तकलादू कुलूप असू शकतं. या दोन टोकाच्या उदाहरणांदरम्यान अनेक आकारांच्या, अनेक प्रकारांच्या कुलुपांवर मदार ठेवून आपण आपल्या चीजवस्तूंची सुरक्षा जपत असतो. त्याचप्रमाणे आपली सुरक्षिततेची भावना जपत असतो. किंवा त्या कुलुपांकडून मनाला सुरक्षिततेची हमी मिळवून देत असतो. अनेक वेळा ही कुलुपं आणि त्याच्या चाव्या गोंधळही उडवून देतात. समोर ‘लॉक’ लावलेलं दिसतं, पण चावी सापडत नाही. मग चिडचिड होते. तर कधी समोर असंख्य चाव्या दिसत असतात. आता त्यांची लॉक्स नेमकी कोणती असा प्रश्न पडतो. चाव्या आणि कुलुपं यांच्या अशा जंजाळात अडकायचं नाही, म्हणून मी माझ्या चिजवस्तूंच्या सुरक्षेसाठी ‘लॉक अँड की’ ही संकल्पना फारशी वापरतच नाही. माझी भिस्त असते, ती माणसांवर… त्यांच्यावरच्या विश्वासावर…! परंतु सर्वसाधारणपणे माणसं कुलुप-चावी, ‘लॉक अँड की’ अशा धारणांवर सुरक्षेसाठी विसंबून असतात.
अगदी अलीकडपर्यंत ‘लॉकडाउन’ ही संज्ञा, किंवा हा शब्दप्रयोग उद्योगजगतापर्यंत सीमित होता. म्हणजे कामगारांविषयीचे प्रश्न निर्माण झाले की एखाद्या उद्योगाची टाळेबंदी जाहीर व्हायची. किंवा एखादा उद्योग डबघाईला आला की ही टाळेबंदी अर्थात लॉकडाउन जाहीर व्हायचा. मग आंदोलनं, मोर्चे, वाटाघाटी, चर्चा, मध्यस्ती अशा विविध मार्गांनी तोडगा निघाला तर ठीक… नाही तर कोर्टकचेरी आली… प्रकरणाचं आणखी चिघळणं आलं. अशा वेळी कोणतीही टाळेबंदी किंवा आता प्रत्येकाला माहीत झालेला शब्दप्रयोग ‘लॉकडाउन’ उघडला जाऊ शकतो असा विश्वास प्रत्येकाच्या मनात असायला हवा.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सरकारांनी विविध प्रकारचे लॉकडाउन जाहीर केले, ते अमलात आणले. जनसामान्यांनीही प्रतिसाद दिला. कारण शेवटी करोनापासूनच्या त्यांच्याच सुरक्षेचा प्रश्न होता. सरकारने जसजशा करोना मुकाबल्यासाठीच्या सोई-सुविधा निर्माण केल्या तसतसे लॉकडाउन शिथील करण्यात आले, उठवण्यात आले. आणि त्याच बरोबर एक गोष्ट स्पष्ट होत गेली, की करोना हा विषाणू लगेच अंतर्धान पावणार नाही, की उतरणीला लागणार नाही. किंवा त्याच्या हल्ल्याला नामोहरम करणारी लसही (व्हॅक्सिन) दृष्टिपथात नाही, की त्या विषाणूवर प्रतिहल्ला करणारी औषधं नजीकच्या काळात निर्माण होण्याची शक्यता नाही. एका बाजूला ही वस्तुस्थिती, तर दुसऱ्या बाजूला आपलं दैननंदिन जीवन सुरू ठेवणं, चरितार्थासाठी बाहेर पडणं अपरिहार्य आहे ही वस्तुस्थिती. सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली, लॉकडाउन उठवलं, तरी अशी वस्तुस्थिती स्वीकारून वास्तवाला सामोरं जाणं यासाठी मनं ‘अनलॉक’ करणं आलं. आणि मनं अनलॉक करण्यासाठी, योग्य अशा चावीची गरज आहे.
हीच नेमकी गरज काय आहे? अशा किती आणि कशा प्रकारच्या चाव्यांची गरज आहे, या विषयीचा खल गंभीरपणे ‘टीम-रोहन’मध्ये होता होता, त्या चर्चांतून एक विषय तावून-सुलाखून निघाला आणि ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा कथासंग्रह मार्गी लावला गेला. दुसरा विषय चर्चेत होता तो समस्यांना थेट भिडणारा. म्हणजेच आरोग्यविषयक आणि इतर दैनंदिन जीवनाविषयीच्या समस्यांबाबत जनसामान्यांना मार्गदर्शन करणारा. परंतु, कधी तज्ज्ञ लेखकांना गाठलं जाणार, कधी आराखडे तयार होणार, कधी ते लिहिणार, कधी त्यावर संपादकीय संस्कार करणार आणि कधी या पुस्तकांची निर्मिती होणार… हे सर्व होईपर्यंत करोना उतरणीला लागेल आणि या ‘चाव्यांची’ गरज भासणार नाही असं वाटून हा प्रकल्प स्थगित केला. मात्र नंतर दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या केसेस, त्याबरोबर वाढत जाणाऱ्या समस्या लक्षात घेतल्या आणि तज्ज्ञांशी विचार-विनिमय करून खात्री पटली की लोकांना पुढील मोठा काळ करोनासोबत जगावं लागणार आहे. अशा वेळी त्यांना बाहेर पडण्यासाठी आत्मविश्वास देणारी, नेमकी व विश्वासार्ह माहिती देणारी, योग्य मार्गदर्शन करणारी छोटेखानी पुस्तकं तयार करणं ही आज सामाजिक गरज आहे. त्यातून समाजहीतच साधलं जाणार आहे, हे लक्षात आलं. करोनाविषयक जितकी जागरुकता निर्माण होईल, तितका त्याचा प्रादुर्भाव मर्यादित राहील. जितकं नेमकं मार्गदर्शन मिळेल, तितकं जीवन सुसह्य होत जाईल. ‘टीम-रोहन’मधील चर्चांतून हे अंतिम निष्पन्न निघालं आणि या प्रकल्पाने पुन्हा उचल खाल्ली…
लॉकडाउनमध्ये सापडलेली मनं अनेक पातळींवर ‘अनलॉक’ करणं आवश्यक होतं. त्याप्रमाणे चार विषय ठरवण्यात आले…. चार छोटेखानी पुस्तकं ठरली, चार लेखक ठरले… म्हणजेच मनं उघडण्याच्या चार चाव्या निर्माण करायच्या… सेट ऑफ फोर कीज् अर्थात सेट ऑफ फोर बुक्स! या मालिकेचं नामकरण केलं गेलं ‘अनलॉक मालिका’.

Pradeep Champanerkar photo

पुढे सर्व टीम-रोहन कामाला लागली. अर्थात रोहन, प्रणव, अनुजा, नीता आणि मी स्वत:… विषय ठरवले, त्यानुसार लेखक ठरवले, पुस्तकांचे आराखडे ठरवले, लेखकांना संकल्पना सांगण्यात आल्या. मुख्य म्हणजे त्यांना या पुस्तकांची निकड व ‘अर्जन्सी’ पटवून देण्यात आली, आणि सर्वच लेखकांनी सहकार्य केलं. वास्तविक सहकार्य केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यांनी समाजाप्रति जाण ठेवली आणि कामाला प्राधान्य दिलं. अक्षरश: १५ ते २५ दिवसांत हस्तलिखितं येत गेली. म्हणूनच या अनलॉक मालिकेचे खरे मानकरी म्हणजे या पुस्तकांचे लेखक होय. डॉ. लिली जोशी(प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?); डॉ. धनंजय केळकर व डॉ. समीर जोग(‘करोना’सोबत जगताना…); डॉ. विजया फडणीस(‘करोना’काळातील मानसिक आरोग्य); रेणू दांडेकर(‘करोना’काळातील कल्पक पालकत्व) अशा चार तज्ज्ञ लेखकांनी चार विषयांवरची पुस्तकं लिहून दिली. ‘करोनासोबत जगताना…’ या पुस्तकांचे लेखक ‘कोवीड-वॉरीयर’ असल्याने, त्यांची व्यस्तता लक्षात घेऊन डॉ. अजेय हर्डीकर यांनी त्यांना लेखनास मदत करण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला. या सर्व लेखनाला पुस्तकरूप देण्यासाठी ‘टीम-रोहन’च्या संपादकांनी दिवस-रात्र काम करून पुस्तकं उभारली, ग्राफीक डिझाइनर प्राचीने मुखपृष्ठं साकारली… आणि चार पुस्तकांची ‘अनलॉक’ मालिका ‘रेकॉर्ड टाइम’मध्ये तयार झाली.
करोनाबाधित होण्याची शक्यता, बाधा झाल्यास कोणत्या दिव्याला तोंड द्यावं लागणार अशा विचारांनी व्यापलेली मनं… अशा धास्तावलेल्या मनांना शास्त्रीय ज्ञानावर आधारित नेमकी माहिती देऊन नेमकेपणाने मार्गदर्शन करून दिलासा देण्याचं काम या ‘अनलॉक’ मालिकेतील दोन पुस्तकं करणार आहेत. तर दोन पुस्तकं लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या मानसिक आणि मुलांच्या समस्यांवर मार्गदर्शन करणार आहेत, उपाय सांगणार आहेत. एकंदर सांगायचं तर ही ‘अनलॉक’ मालिका मनाचे दरवाजे खुले करायला मदत करून आत्मविश्वास प्रदान करणारी अर्थात, व्यापक समाजहीत साधणारी अशीच ठरणार आहेत… आणि आमचा उद्देशही तोच आहे…
…‘तीळा तीळा दार उघड…’ ‘खुल जा सिम सिम…’ या झाल्या अरबी सुरस कथा! अशा कोणत्या जादुई मंत्रांचे हे दिवस नव्हेत… हे दिवस आहेत खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे, शास्त्रीय आधार असलेल्या माहितीचे… कल्पक संकल्पनांचे… समर्पित प्रयत्नांचे. गुंतागुंतीची रचना असणाऱ्या कुलुपांना उघडण्यासाठी चाव्याही हव्यात प्रगत ज्ञानाच्या…

-प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०

संच खरेदी करण्यासाठी…

Unlock-Set

अनलॉक संच

करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या ४ पुस्तकांची अनलॉक मालिका…
दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी तज्ज्ञांची खास पुस्तकं…

१. ‘करोना’सोबत जगताना – डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग
२. प्रतिकारशक्ति कशी वाढवाल? – डॉ. लिली जोशी
३. ‘करोना’काळातील मानसिक आरोग्य – डॉ. विजया फडणीस
४. ‘करोना’काळातील कल्पक पालकत्व – रेणू दांडेकर

पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार…
मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया…

300.00Add to cart


Pradeep Champanerkar photo
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

डॉक्टरची पाटी, गूगल आणि वाचन-उद्देश (प्रदीप चंपानेरकर)

वाचनाने तुमचा दृष्टिकोन विस्फारायला हवा. विशेषत: सध्याच्या एकंदर सामाजिक वातावरणात याची नितांत आवश्यकता आहे.

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *