आरोग्याच्या काही तक्रारी असल्यास त्यांचं निवारण करण्यासाठी साहाजिकच डॉक्टरांकडे जाणं आलं. बहुतांश मध्यमवर्गीय जनता आजकाल त्या त्या विषयातल्या तज्ज्ञ किंवा स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाणंच पसंत करते. चांगली गोष्ट आहे ही… आपल्या आरोग्याबाबत, आजाराबाबत सावधता बाळगण्यासाठी ज्याचा-त्याचा एक विचार असणार. पण मग त्या तज्ज्ञ डॉक्टरवर, त्याच्या ज्ञानावर, त्याच्या अनुभवावर पूर्ण विश्वास तर ठेवायला हवा ना? हल्ली पेशंटपेक्षा डॉक्टरच धास्तावलेले असतात. त्याचं कारण असं की, पेशंट किंवा त्याचे नातेवाईक आपल्या आजाराच्या तक्रारी, लक्षणं सांगून केवळ थांबत नाहीत; अगदी अधिकारवाणीने ते लगेचच त्या तक्रारींविषयी स्वत:चं ज्ञान पाजळायला लागतात… इतकं की, त्यांचं ज्ञान ऐकून आणि आत्मविश्वास पाहून, त्या डॉक्टरमध्ये स्वत:च्या ज्ञानाविषयी, अभ्यासाविषयी न्यूनगंडच निर्माण व्हावा! या शक्यतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एका तज्ज्ञ डॉक्टरने त्याच्या क्लिनिकच्या प्रवेशद्वारापाशी पाटीच लावलेली मी पाहिली… ‘‘झ्थ्EAएE ख्EEझ् भ्ध्ळR एप्ध्Eर्ए ‘उध्ध्उथ्E ख्Nध्ेंथ्EDउE’ प्ERE’’ ही पाटी खूपच बोलकी आहे, पुष्कळ काही सांगून जाते. या डॉक्टरने केवळ स्वत:ला होणाऱ्या संभाव्य त्रासापासून केलेला हा बचाव नाही, तर एकंदर समाजाच्या सध्याच्या मानसिकतेबाबत केलेलं ही कमेंट आहे, भाष्य आहे असं मला वाटून गेलं.
या पाटीचा, या कमेंटचा संबंध मला थेट वाचनाशी लावायचा आहे. कसा ते नंतर ओघात येईलच. वाचनाविषयी बोलायचं प्रयोजन असं की, २३ एप्रिल… जगद्विख्यात नाटककार, साहित्यिक विल्यम शेक्सपिअरचा हा जन्मदिवस… त्याच्या सर्वव्यापी, कालातीत ठरलेल्या साहित्याला मानाचा मुजरा म्हणून हा दिवस ‘पुस्तक-दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. पुस्तकांचा प्रसार व्हावा, वाचनसंस्कृती रुजावी, टिकावी, वृद्धिंगत व्हावी असा दृष्टिकोन ठेवून उपक्रम राबवले जातात. अशा उपक्रमांची व्याप्ती आणि वारंवारता वाढायला हवी. कारण पुस्तकवाचनाची गोडी लागणं ही स्वत:च्या विविधांगी विकासासाठी आणि समाजस्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. आजच्या युगात ही गोडी लागणं कठीण होऊन बसलं आहे. आपलं लक्ष विचलित करणाऱ्या आणि आपल्याला सुलभीकरणाच्या प्रलोभनात टाकणाऱ्या गोष्टी डझनाने निर्माण झाल्या आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे मार्गही सोपे झाले आहेत.
परंतु, अशा वातावरणातही पुष्कळशी जनता अशी आहे की, ती भरपूर वाचन करते. त्यांच्या वाचनात विषयवैविध्यही असतं. त्यापैकी काही जणं प्रगल्भ होतात. वाचनातून त्यांच्या मनाची उत्तम मशागत होते. जीवनाच्या विविध अंगांशी ते परिचित होतात. त्यांचं ज्ञानभांडार वाढतं. त्या ज्ञानावर जर विचारांची प्रक्रिया झाली तर, त्यांचं एकंदर विचारविश्व विस्तारतं. परंतु मी अशीही माणसं पाहिली आहेत, जी एक सवय म्हणून वाचत राहतात. परंतु, ते वाचन आत कुठे शिरत नाही, भिडत नाही, त्यांना विचारप्रवृत्त करत नाही. त्यांचं वाचन आणि त्यांचं जीवन दोन समांतर रेषेत चालू असतं. अशी माणसं वाचनातून काय मिळवतात? स्वत:चं रंजन करून घेण्यासाठी आणि उपलब्ध अतिरिक्त वेळ घालवण्यासाठी वाचन ही निश्चितच एक उत्तम सवय आहे. घरी लटकी कौटुंबिक कटकट निर्माण होण्याव्यतिरिक्त या सवयीचे मोठे ‘साइड-इफेक्टस्’ नाहीत. पण असं वाटतं की, आपल्या वाचनाकडून आपण अधिक विधायक अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. दैनंदिन जीवनात किंवा बाहेरच्या जगाशी संवाद करताना, त्या जगाबाबत विचार करताना त्यात तुमच्या वाचनाचं प्रतिबिंब पडलं पाहिजे. वाचनाने तुमचा दृष्टिकोन विस्फारायला हवा. विशेषत: सध्याच्या एकंदर सामाजिक वातावरणात याची नितांत आवश्यकता आहे. एकंदर वादग्रस्त ठरू शकतील असे अनेक राजकीय मुद्दे पुढे येत आहेत. त्यामुळे समाज-स्वास्थ्य बिघडण्याचे अनेक प्रसंग निर्माण होत आहेत. कारण राजकारण आणि समाजकारण यांचा अर्थातच एकमेकांशी घनिष्ठ संबंध असतो. राजकारणी व्यक्ती कोणतीही भूमिका घेवोत, जनसामान्यांच्या भूमिका मात्र एकारलेल्या नसाव्यात. त्यात वस्तुनिष्ठतेला प्राधान्य असावं. मग तुम्ही कोणत्याही विचारसरणीचे पुरस्कर्ते असाल. कोणत्याही मुद्द्याबाबत तारतम्याची भूमिका घेण्याचा विचार समाजात रुजला पाहिजे. आजच्या वातावरणात अनेकजण एकांगी भूमिका घेताना दिसतात, पूर्वग्रहदूषित प्रतिक्रिया देताना दिसतात. मग मुद्दे, विषय कोणतेही असोत. यामुळे माणसा-माणसांतील संवाद थांबतो.
एकांगी, ऐकीव माहितीमुळे समाजमनं निश्चितच बिथरतात. लोकांची विचारशक्ती कुंठते. हा अनुभव अगदी वारंवार येतो. अगदी अलीकडच्या काळातील माझा अनुभव सांगतो. तिशी-चाळीशीतल्या ओळखीच्या तरुण-तरुणींसोबत विविध विषयांवर गप्पा, चर्चा चालू होत्या. गॅजेट्स, कार्स, बाईक्सपासून सुरुवात होऊन गप्पांची गाडी चित्रपटांवर गेली आणि सामाजिक घडामोडींवर येऊन स्थिर झाली. ही मंडळी चित्रपटांची चिकित्सा अगदी तारतम्याने, वस्तुनिष्ठपणे करत होती. काही नकारात्मक कथानक वाटणाऱ्या चित्रपटांविषयी, त्यातील व्यक्तिरेखांविषयी काहींची मनं संवेदनशील वाटली, तर काहींचे विचार प्रागतिकही वाटले. परंतु, सध्याच्या सामाजिक घडामोडींविषयी मुद्दे मांडताना मात्र ते आततायी, अपरिपक्व वाटत होते. आणि मुख्य म्हणजे आग्रही… राजकीय घटनांच्या उमटणाऱ्या सामाजिक पडसादांविषयी विचार करताना ते अनुदार वाटले, तर काही जण असंवेदनशील वाटले. मुख्य म्हणजे ते बहुतेक जण नजीकच्या भूतकाळाविषयीही अनभिज्ञ वाटले. साहजिक आहे, १९७५-८० नंतर ज्यांचा जन्म झाला असेल, किंवा तोपर्यंत जे सामाजिक जाणिवा विकसित होण्याच्या वयाचे झाले नसतील अशांचं अनेक विषयांसंदर्भात अनभिज्ञ असणं किंवा त्यांना त्या घटनांविषयी जुजबी माहिती असणं, अगदी स्वाभाविक आहे. परंतु, अशा एकांगी प्रतिक्रिया देण्यापूर्वी, आग्रही भूमिका मांडण्यापूर्वी काही घटनांची पूर्वपीठिका जाणून घ्यावी, वस्तुनिष्ठपणे केलेली मांडणी जाणून घ्यावी, आपल्याला मिळालेली माहिती तपासून घ्यावी, असा प्रयत्न करताना आज फारसं कुणी दिसून येत नाही. कुणी म्हणेल, अशी विश्वासार्ह माहिती मिळणं सोपं आहे का? स्रोत आहे का? वास्तविक ‘असा घडला भारत : १९४७-२०’ हा ग्रंथ या वयोगटासाठी व माहितीची नेमकी हीच पोकळी भरून काढण्यासाठी रोहन प्रकाशनाने परिश्रमपूर्वक प्रसिद्ध केला आहे. घटना-घडामोडींच्या माध्यमातून ६५ वर्षांची, स्वतंत्र भारताच्या विविधांगी उभारणीची गोष्ट अगदी वस्तुनिष्ठपणे सांगायची, अशी या ग्रंथाची संकल्पना आहे. त्याचा उद्देश एका गोष्टीच्या एक-दोन किंवा जितक्या बाजू असतील, तरुण पिढीला त्या सांगायच्या. नंतर ही संकल्पना जेव्हा प्रत्यक्षात आली तेव्हा जाणीव झाली, ही तर सर्व पिढ्यांना भान देणारी कृती आपल्याकडून घडून गेली आहे. माहिती मिळवणं आणि ज्ञान मिळवणं यात मूलभूत फरक आहे. या ग्रंथातील माहितीवर मी आधी म्हटल्याप्रमाणे थोडी आपल्यातील विचारशक्तीची प्रक्रिया झाली, त्या अनुषंगाने पुढे खोलात जाणारं वाचन झालं तर, तिचं रुपांतर ज्ञानात होईल आणि ज्ञानाचं रूपांतर तर्कशुद्ध विचार करण्याच्या प्रवृत्तीत होईल…
आज असंही दिसून येतं आहे की, काही जणांचं वाचन हे ‘गूगल-सीमित’ आहे. प्रत्येक मनात येणाऱ्या शंकेचं, हव्या असलेल्या माहितीचं निराकरण करून घेण्याचं उत्तर म्हणजे ‘गूगल’… तोच स्रोत सोपा, स्वस्त, सर्वव्यापी आणि विश्वसनीय… मनाची अशी एक धारणा करून घेतली की, मनंही सीमित राहणार आणि या सीमित माहितीवर, सीमित मनांनी आपण आपली मतं मांडायची, अगदी आत्मविश्वासाने! या ‘गूगल’ला सध्या जोड आहे ती ‘व्हॉट्सअॅप’ची. वास्तविक ‘गूगल’ असो की ‘व्हॉट्सअॅप’- ही माध्यमं अतिशय उपयुक्त आहेत. पण त्यांचा वापर कसा करता, कशासाठी करता आणि किती करता यावर ही माध्यमं उपद्रवी किंवा निरुपद्रवी, हे ठरू शकतं. व्हॉट्सअॅप हे ‘फॉरवर्ड्स’साठी फेमस आहे. या फॉरवर्ड्सच्या जीवावर अनेक जणं आपलं पांडित्य मिरवत असतात. त्यातूनच ‘व्हॉट्सअॅप’ला ‘युनिव्हर्सिटी’चं बिरुद लाभलं. म्हणूनच सुरुवातीला डॉक्टरांच्या ज्या पाटीचा मी उल्लेख केला, ती पाटी म्हणजे मला अशा लोकांच्या मानसिकतेवर केलेली मोठी कमेंट वाटते, भाष्य वाटते.
वाचनाच्या उद्देशांपैकी ‘सामाजिक जाणिवा जागृत होणं आणि समाजभान येणं’ या एका उद्देशाला मी या मनोगतात अधोरेखित केलं असलं, तरी आपण जे काही वाचतो; मग ते मनोरंजनासाठी असो, वैचारिक प्रगल्भतेसाठी असो, वा कोणती माहिती मिळवण्यासाठी केलेलं वाचन असो… वाचलेलं शक्य तेवढं आपण वाचक म्हणून ‘Aँएध्Rँ’ करणं मला महत्त्वाचं वाटतं. हे सारं सांगण्यासाठी हा सारा प्रपंच!
-प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२०
रोहन शिफारस
असा घडला भारत
गतकाळातील घटनांचा जास्तीत जास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा यत्न या ग्रंथात केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !
₹1,690.00Add to cart