२३ एप्रिल रोजी असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त ‘माझी निवड’ स्तंभात बहुविध वाचन करणारे सोलापूरस्थित वाचक व लेखक नीतीन वैद्य यांनी लेखन केलं आहे. वैद्य सातत्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या ललित तसंच ललितेतर ग्रंथांचं वाचन करत असतात.
गुणवत्ता यादी बंद झाली, प्रश्नपत्रिका वाचायला अधिकचा वेळ मिळू लागला, तोंडी परीक्षा आणि कलाक्रीडाकौशल्यांच्या कागदी चवडींमधून अतिरिक्त गुणांची खैरात होऊ लागली, हे एवढं सारं होऊनही गळेकापू स्पर्धेने ९० टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्यांनाही सैरभैर केलं आहे… या संदर्भात समुपदेशन करणाऱ्यांचे फोन या काळात सकाळी सातपासून वाजू लागतात…
‘कॉपी पकडण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकाचे सदस्य आहोत’ अशी बतावणी करत दोन डमी विद्यार्थ्यांनीच परीक्षाकेंद्रात थेट आत प्रवेश मिळवला…
राजकीय घटितांनी सर्वच माध्यमांचे अवकाश भरून गेलेले असतानाही लक्षात राहिलेल्या या अलीकडच्या बातम्या… परीक्षांच्या काळात दरवर्षी अशा बातम्या वाचताना मला रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ ही कादंबरी आठवते. मराठवाड्यात चौथी-सातवी स्कॉलरशीप, दहावी-बारावी बोर्ड परीक्षांतल्या सामुहिक कॉप्यांची चर्चा दशक-भरापूर्वी सर्वोच्च टीआरपी मिळवून होती. त्या काळातली, पण त्यापलीकडे काही आवाहन करू पाहणारी ही कथा. शासनाच्या त्याआधीच्या सर्वशिक्षण अभियानाच्या अंमलबजावणीतला फार्स गांभीर्याने तरी, धारदार उपरोधाच्या विनोदी सुरात मांडणारी ‘निशाणी डावा अंगठा’ ही उत्रादकर यांची पहिली कादंबरी त्यावर निघालेल्या सिनेमामुळे आपल्याला माहीत आहे, त्याचाच पुढचा टप्पा असावा अशी ही कादंबरी.
एका बाजूला गळेकापू स्पर्धेच्या दबावाने साधनशुचितेचा विवेक गमावलेले विद्यार्थी व पालक आणि दुसऱ्या बाजूला शाळा आणि क्लासचे दुकान चालू राहावं यासाठी शिक्षकांना दावणीला बांधण्यापासून कुठल्याही थराला जाणारे संस्थाचालक यांच्या अभद्र युतीतून तयार झालेला कॉपीचा व्हायरस संपूर्ण समाजालाच कसा पोखरून काढतो याचं भेदक तपशीलवार चित्रण करणारी ही कादंबरी शेवटी काही आशावादी सूर लावते, तरी अखेरीस तुमच्या-आमच्या नैतिक भूस्खलनाची कहाणी होते.
महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा. अचानक काही वर्षांत चौथी-सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकड्यांच्या घरात जाते. दहावी-बारावीचे, कसल्याच किमान सोई नसलेल्या शाळांचे निकाल अचंबित करण्याएवढे लागायला लागतात, तसे सपकाळ गुरुजी अस्वस्थ होतात. व्यवस्थेचाच भाग असल्याने या सगळ्यामागे असणाऱ्या कॉपी प्रकरणाची व्याप्ती खणून काढणं, ही त्यांना आपल्या अस्तित्वाचीच लढाई वाटते. शाळेत नवीनच लागलेला त्यांचा सहकारी शेषराव यात गुरुजींबरोबर आहे. कालातीत मूल्यांवर विश्वास असल्याने सपकाळ गुरुजींवर त्याची श्रद्धा असली तरी, बदलत्या काळातल्या व्यावहारिकतेचं त्याला भान आहे. त्यामुळे काहीसं लवचिक होण्यातली अपरिहार्यता त्याला माहीत आहे. आपली भूमिका न सोडणाऱ्या गुरुजींची त्याला काळजी वाटते. पण गुरुजींनी लढा अंगावर घेतल्यावर शेषराव त्यात सामील होतो. मग, वेगवेगळ्या केंद्रांवर होणाऱ्या कॉप्यांसाठीची शोधयात्रा सुरू होते. कॉप्यांचे वेगवेगळे प्रकार आपण दंतकथेसारखे ऐकतो, वृत्तपत्रांतून वाचतो, शाळांच्या भिंतींवर खिडकाबाहेरून पोपटांसारख्या लगडलेल्या कॉप्या पुरवणाऱ्यांचे फोटो आपण पाहतो, क्वचितच अनुभवतोही. पण इथले त्याचे विश्वरूपदर्शन एखाद्याने पीएचडीचा प्रबंध लिहावा इतके संदर्भसमृद्ध तपशिलांनी होते. हा महाराष्ट्रातला या प्रश्नासंबंधीचा ऐतिहासिक दस्ताऐवज ठरावा. (अर्थात तपशिलांच्या, किश्शांच्या मागे काहीसे वाहवत जाताना कादंबरीचा कथात्म-बाज कोसळतो हा भाग अलाहिदा. बऱ्याचदा अनुभवात आलेले, वा नसल्यास गरज म्हणून गोळा केलेले तपशील वा किस्से इतके रोचक असतात की, ते सगळे सांगून टाकण्याचा मोहही आवरत नसावा. असो.) शेवटी हाती लागतं ते मती गुंग करणारं आहे. गुणवत्तेचा एकमेव निकष परीक्षेतील मार्क्स ठरवल्यावर आणि त्या मार्कांचा प्रत्यक्षातील गुणवत्तेशी संबंध तपासणारी कसलीच यंत्रणा अस्तित्वात नसल्यावर हे असं होणं अपरिहार्य आहे, ही जाणीव हतबल करणारी आणि शोकात्म आहे.
सपकाळ सर शेवटी एकाकी, एकटे होतात. त्यांना वाटतं; आपली वाट घनदाट अरण्याची, घनघोर युद्धाची, निबीड काळोखाची, खडतर खस्तांची आहे. नीरव, निर्मनुष्य… आज तर किमान नैतिक टोचणी देणारे सगळेच प्रश्न ऑप्शनला टाकण्याच्या काळात सपकाळ सरांसारख्या सगळ्यांचंच एकटेपण अधिक गहिरे झालेय..
…दिवस बदलले, दहावी विशेषत: बारावीच्या मार्कांचं महत्त्व तिथून पुढच्या प्रत्येक मार्गासाठी स्वतंत्र प्रवेशपरीक्षा होत असल्याने त्याला पात्र ठरण्या-इतपतच राहिलंय. त्याहीआधी काही वर्षं गुणवत्ता यादीही रद्द झाल्याने त्याला असणारे तथाकथित ग्लॅमरही संपलं. नांदेड वगैरे ठिकाणच्या निकालांचाही फार ब्रभा झाल्याने भरारी पथकं वगैरे नेमून निकाल जमिनीवर आणले गेले. दुसऱ्या बाजूला शाळेकडून काही मार्क्स देण्याचा, वेगवेगळ्या कला, क्रीडा, एनसीसी वगैरे क्षेत्रांसाठी वाढीव गुण देण्याचा ‘मक्ता’ शाळांकडेच देण्यात आला. त्यातून किमान माक्र्सचा, पास होण्याचा प्रयत्न सुटलाय, पण म्हणून मूळ प्रश्न सुटलाय का? स्पर्धा अधिकाधिक गळेकापू होत चालली आहे. ‘एन्ट्रन्स एक्झाम’मधून थेट मेडिकल वगैरे ठिकाणी प्रवेशाचे ठेके घेतले जाताहेत, खेळ नव्या रूपात, हलक्या आवाजात पण अधिक व्यापक स्वरूपात सुरूच आहे… सपकाळ सरांचीच नव्हे, तर शेषरावसारख्यांचीही जात मात्र झपाट्याने नामशेष होत चालली आहे. यासाठी नव्हे की, तशी काही संवेदना जिवंत असणारी माणसं उरली नाहीत. यासाठी की, उर्वरितांना त्यांची गरजच वाटत नाहीये… अर्थात तपशील बदलले तरी प्रश्न तिथंच आहेत, अधिक भीषण झालेत. ही गोष्टही तपशिलांची नव्हेच, ती तुमच्या-आमच्यातल्या मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची आहे.
– नीतीन वैद्य
सर्व प्रश्न अनिवार्य / लेखक- रमेश इंगळे उत्रादकर / शब्द पब्लिकेशन
- मला आवडलेली इतर काही पुस्तकं
- बखर अंतकाळाची / लेखक- नंदा खरे / मनोविकास प्रकाशन.
- सुंभ आणि पीळ / लेखक- ल.सि.जाधव / साकेत प्रकाशन.
- रत्नांचं झाड / लेखक- पद्मजा फाटक / रोहन प्रकाशन.
- माझा धनगरवाडा / लेखक- धनंजय धुरगुडे / रोहन प्रकाशन.
- गावनवरी / लेखक- वेदिका कुमारस्वामी / पॉप्युलर प्रकाशन.
- काळेकरडे स्ट्रोक्स / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.
- भरून आलेले आभाळ / लेखक- द.भा.धामणस्कर / मौज प्रकाशन.
- सेपियन्स / मूळ लेखक- युवाल हरारी / अनु : वासंती फडके / डायमंड पब्लिकेशन्स.
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९