एखाद्या चांगल्या कामाला मिळालेले पुरस्कार अनेक अर्थाने मोलाचे असतात. विशेषत: जेव्हा पुस्तकाला पुरस्कार मिळतो त्यात लेखकाची लेखनप्रक्रिया जशी महत्त्वाची असते, तशीच प्रकाशकाची निर्मितिप्रक्रियाही महत्त्वाची असते. संपादकापासून आर्टिस्टपर्यंत आणि मुद्रितशोधनापासून छपाई-बांधणीपर्यंत एक मोठी टीम पुस्तकाला रूप आणि आकार देत असते. म्हणूनच लेखकाला किंवा पुस्तकाला मिळणाऱ्या पुरस्कारांत या टीमचाही हातभार असतो, असं आम्ही मानतो.
२०२१ सालची सुरुवात रोहन प्रकाशनासाठी आनंदाची वार्ता घेऊन आली. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे ‘रोहन प्रकाशन’ला चार पुरस्कार जाहीर झाले. पुस्तकाचं नाव व साहित्यप्रकार पुढीलप्रमाणे :
- वा ! म्हणताना… (उत्कृष्ट निर्मिती – ललितेतर / लेखक : डॉ. आशुतोष जावडेकर)
- वा ! म्हणताना… (मुखपृष्ठ, प्रौढ – ललितेतर / चित्रकार : अन्वर हुसेन )
- अंधाराचं गाव (मुखपृष्ठ, बाल / चित्रकार : राजेश भावसार)
- बबडू बँकेत (उत्कृष्ट निर्मिती / लेखक : विजय तांबे)
या पुरस्कारांपाठोपाठ ‘रोहन’ला आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाला तो ‘तू माझी चुटकी आहेस’ या पुस्तकासाठी लेखक फारूक काझी यांना. ‘चंद्रपूर, सूर्यांश साहित्य संस्थे’तर्फे हा पुरस्कार दिला जातो. लहान मुलांचं भावविश्व उलगडणाऱ्या या पुस्तकाची ही यथोचित दखल आहे.
वा! म्हणताना
‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’
– डॉ. आशुतोष जावडेकर
साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…
अंधाराचं गांव
ही गोष्ट जादूची.
जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि
सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.
अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!
राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!
उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.
आलं का यश त्यात तिला?
गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!
जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि
तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी…
बबडू बँकेत
मुलांसाठी बँक व्यवहारांची गोष्टीरूप ओळख
बँकेचे व्यवहार कसे चालतात?
बँकेत खाती किती प्रकारची असतात?
बचत खातं (Saving Account) कसं उघडायचं?
मुदत ठेव खातं (FD) म्हणजे काय ?
एटीएममधून पैसे कसे काढायचे?
डेबिट आणि क्रेडिट कार्ड यामध्ये काय फरक असतो?
चेक कसा लिहायचा? कसा भरायचा?
चेकवरच्या विविध आकड्यांचा अर्थ काय ?
NEFT, RTGS, IMPS यामार्फत पैसे कसे ट्रान्स्फर करायचे ?
मुलांच्या चौकस बुद्धीला बँक व्यवहारांबाबत
असे अनेक प्रश्न पडत असतात.
दीर्घ काळ बँकिंग श्रेत्रात कार्य केलेल्या
लेखक विजय तांबे यांनी या पुस्तकात
मुलांच्या या प्रश्नांना गोष्टीरूपात,
रंजक पद्धतीने उत्तरं दिली आहेत.
मुलांना बँक व्यवहारांबाबत सजग करणारं पुस्तक.
तू माझी चुटकी आहेस
या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !
आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.
गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात…