हातात हात घालून फिरणारे सोबती…प्रवास व वाचन

एप्रिल-मे महिने हे पर्यटनाचे आणि पर्यटन म्हटलं की, प्रवास आला. माझ्या मते, प्रवास आणि वाचन यांचं एकमेकांना पुरक असं नातं असतं. परंतु, पर्यटनासाठी होणाऱ्या प्रवासात वाचन होणं कठीण असतं. कारण बहुतेक वेळा तुमच्यासोबत कुटुंब असतं, मित्रपरिवार असतो. अशा वेळी एकलकोंड्यासारखं वाचन करत बसायचं हे ‘स्पॉइल स्पोर्ट’ असण्याचं लक्षण; आणि मुख्य म्हणजे पर्यटनाचा उद्देशच वेगळा असतो, त्यातले प्राधान्यक्रम वेगळे असतात, वेगळे अनुभव साठवून घ्यायचे असतात. परंतु, प्रवास काय पर्यटनाच्या निमित्तानेच होतो? तो दैनंदिन जीवनाचाही भाग असू शकतो… नव्हे, तसा तो असतोच.

पूर्वी मुंबईत वास्तव्य असताना रोजच लोकल ट्रेनचा प्रवास व्हायचा. ‘यातनामय ५०-६० मिनिटं’ असंही त्या प्रवासाला म्हणता येईल. परंतु ‘चला, थोडा वाचनाला वेळ मिळाला’ अशी मनाची धारणा करून घेऊन मी तो प्रवास सुसह्य करून घ्यायचो… एका वेगळ्या अर्थानेही ‘कॉन्सनट्रेशन कॅम्प’! ‘कॉन्सनट्रेशन’ अर्थात, एकचित्त-होण्याचा-गुण विकसित करण्यासाठी लोकल ट्रेन हे ‘उत्तम केंद्र’ होय !

काही वेळा मात्र, तुम्हांला एकट्याने लांब पल्ल्याचा प्रवास करण्याची संधी मिळते. हा प्रवास रेल्वे किंवा विमानाचा असला, तर तो वाचनाला पोषक प्रवास म्हणता येईल. रेल्वेतून किती वेळा तुम्ही ‘पळती झाडं’ पाहणार? तसंच विमानप्रवास छोटा असो की मोठा, तो कंटाळवाणा आणि वेगळ्या अर्थाने त्रासदायकच असतो. विमानतळावर अतिशय ‘डेड’ अशा वातावरणात तास-तास ताटकळत बसायचं आणि नंतर विमानात अत्यंत चिंचोळ्या जागेत तोकड्या सीटवर स्वत:ला कोंबून घ्यायचं. अशावेळी गप-गुमान वेळ घालवायला वाचनासारखा पर्याय नाही. तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत एकचित्त होण्याची संधीच जणू प्रवास देत असतं. प्रवासाचं व वाचनाचं असं हे नातं, आणि ते इथे उलगडून दाखवायला दोन-तीन निमित्तं आहेत.
पर्यटनाचा मोसम लक्षात घेऊन दोन नव्या पुस्तकांविषयी थोडं…
आमचे लेखक जयप्रकाश प्रधान यांनी तब्बल ७८ देशांची भटकंती केली आहे. ‘एन्ड ऑफ द वर्ल्ड’ हे त्यांचं दक्षिण-उत्तर टोकांवरील प्रदेशांच्या थरारक सफरींचं नवं पुस्तक याच महिन्यात प्रसिद्ध होईल. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयंती असतात. जयंती या, सर्व गोष्टींचा सारासार विचार करून अचूक नियोजन करण्याची व जय्यत तयारी करण्याची भूमिका निभावतात. तर, जयप्रकाश हे त्या ठिकाणांची बारकाईने माहिती काढण्याची आणि नियोजन प्रत्यक्ष कृतीत आणण्याची भूमिका वठवतात. या दोघांचा हा सर्व अनुभव पर्यटकांसाठी मोलाचा ठरू शकतो, हे जाणून रोहन चंपानेरकर यांनी त्यांना प्रवासाच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरू शकेल असं पुस्तक लिहिण्यास उद्युक्त केलं. तिघांनी मिळून पुस्तकाचा आराखडा तयार केला. मग ‘टीम रोहन’च्या संपादकीय विभागाचा सहभाग सुरू झाला. प्रवाशांच्या संभाव्य सर्व गरजांवर चर्चा होऊन हे पुस्तक साकार झालं. लेखकद्वयींच्या नावातली अद्याक्षरं लक्षात घेऊन पुस्तकाचं आम्ही नामकरण केलं ‘जेपीज् भटकंती टिप्स’! हे पुस्तक वाचून जगात कुठेही जा, तुमची सफर सुखकर आणि निर्विघ्न होईल, अशी ग्वाही ‘जेपीज्’ देतात.

Pradeep Champanerkar photo

प्रवास व वाचन यांचं नातं उलगडण्याचं दुसरं निमित्त म्हणजे २३ एप्रिल, अर्थात ‘जागतिक पुस्तक दिन’. २३ एप्रिल, विल्यम शेक्सपिअर यांचा जन्मदिवस. तेव्हां हा दिवस ‘पुस्तक दिन’ म्हणून साजरा करणं, हे अतिशय संयुक्तिक आहे. जागतिक रंगभूमीवर शेक्सपिअर यांचा अमीट ठसा आहे असंच म्हटलं पाहिजे. कारण साडेचारशे वर्षांनंतरही ते त्यांच्या लेखनाद्वारे, नाट्यकलाकृतींद्वारे जगभरातील साहित्यप्रेमींच्या मनांमध्ये जिवंत आहेत.
तीन-एक वर्षांपूर्वी मी युरोपला पर्यटक म्हणून गेलो असता ‘स्टॅटफर्ड अपन अ‍ॅव्हन’ (अर्थात अ‍ॅव्हन नदीवर वसलेलं स्टॅटफर्ड गाव) या शेक्सपिअरच्या जन्मस्थळाला आवर्जून भेट दिली. तेथे शेक्सपिअरच्या घराचं पुनर्निर्माण (restoration) केलं आहे. तिथे विल्यमने जन्म घेतलेली खोली, तेव्हाचं सामान, वस्तू असं सर्व पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे रोजच्या वापरातल्या त्या काळातल्या वस्तूंचंही संशोधन करून जतन केलं आहे. घराचा सर्व परिसर व एकंदर वातावरणनिर्मिती ही युरोपच्या एकंदर ‘जतन संस्कृती’ची परंपरा राखणारी आहे. काही नाटकवेडे तिथे स्वत:ची कलाही उत्स्फूर्तपणे सादर करत असतात. त्यासाठी ‘ओपन स्पेस’ ठेवली आहे.

शेक्सपिअर यांच्या जन्मस्थळाप्रमाणे मी लंडन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, थेम्स नदीच्या तीरावरील त्यांच्या ‘ग्लोब थिएटर’लाही भेट दिली. काही शतकांपूर्वी शेक्सपिअर यांचं हे ‘ग्लोब’ जळून भस्मसात झालं. परंतु, तेथील नागरिकांनी निधी जमवून हे थिएटर पूर्वी होतं तसंच उभारलं. अगदी अलीकडच्या काळात…१९९३ साली. ‘ग्लोब’ची तासाभराची टूर असते. १५-२० पौंड लागतात. पण तेव्हाचं नेपथ्य, ड्रेसेस इत्यादिंचं प्रदर्शन, संपूर्ण थिएटर, कलाकारांची ‘लाइव्ह प्रॅक्टिस’ असं सर्व पहायला, अनुभवायला मिळतं… आपल्याला आपण अगदी १६व्या शतकातच असल्याचा भास होतो… आणि टेक्नॉलॉजीने गारुड घातलेल्या २१व्या शतकाने का जन्म घेतला, असे काही अतिशयोक्तीपूर्ण विचार मनात येऊन जातात…!
…शेक्सपिअरच्या जन्मस्थळी एकमेव अर्धपुतळा आहे तो म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचा. त्याखाली कोरलेली अक्षरं आहेत…

RABINDRANATH TAGORE (1861-1941)
Painter, Poet, Playwright, Thinker, Teacher.
The Voice of India

माझ्या मते हा भारतीय साहित्याचा, कलेचा मोठा गौरव आहे. आपलं पुस्तक-प्रेम जागृत करण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आणखी कोणती सकारात्मक गोष्ट हवी?

– प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९


Harshad-Sahasrabudhe
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने लिहिलेला खास लेख

वाचनानंद (हर्षद सहस्रबुद्धे)

मग एके दिवशी अचानक असा एखादा टप्पा येतो, ज्यावर असं समजून चुकतं, की, आजवरच्या आपल्या वाचनाची दिशा ही योग्य होती; पण यात बरीचशी सुधारणा आवश्यक आहे.

लेख वाचा…


जयप्रकाश प्रधान लिखित प्रवासवर्णनं…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *