‘बाकड्यासमोर एक तरुण मुलगा बसला होता – जाडगेला, डोक्याचे संपूर्ण केस भादरलेले आणि अंगावर फाटक्या चिंध्या. मी त्याला बरेचदा पाहिलं होतं. तो वेडा होता बहुधा. लोक त्याला ‘गूंगा’ म्हणत. चहाच्या दुकानात येणारी गिऱ्हाइकं बरेचदा त्याची चेष्टा करत, टर उडवत, त्याच्या डोक्यावर टपली मारत. पण हे गमतीगमतीत बरं का. गूंगालाही त्याचं काही वाटत नसे. तो त्यांच्याकडे पाहून चित्रविचित्र हावभाव करे आणि मग त्यांच्या बोलण्यावर हसत असे. तो फक्त एकच शब्द सारखा म्हणत असे – ‘गूं’. आणि हे पाहून सगळ्या लोकांची हसून हसून पुरेवाट होई.’

हे रस्किन बाँड यांच्या कथेतलं साधंसं व्यक्तिदर्शन आहे. अशी अनेक माणसं त्यांच्या वाङ्मयात सतत भेटतात. ती अगदी ओळखीची वाटतात, तशी विलक्षण अनोखीही भासतात. कधी आपल्याचसारखी, कधी पूर्णतः वेगळी. स्वतः बाँड मूळचे ब्रिटिश वंशाचे होते, पण हिमालयाच्या परिसरातल्या सिमला, कुलू, मनाली या प्रदेशात ते लहानाचे मोठे झाले. तिथली खास भाषा, नमुनेदार माणसं, तिथला बर्फ, थंडी, नद्या, जंगल, वाघ, माकडं, कोल्हे, हे सर्व तर या माणसांच्या बरोबरीने येतंच. पण या लेखकाच्या साध्या-सरळ निवेदनात विलक्षण प्रगल्भता दडलेली आहे आणि या कथांना एक उच्च वाङ्मयीन दर्जा लाभलेला आहे, हे जाणत्या वाचकाला सहजपणे उमगतं.

उदाहरणार्थ, ‘सीता आणि नदी’ या दीर्घकथेत एका बेटावर अडकलेल्या कोवळ्या मुलीच्या नजरेतून पावसाळ्यातील पुराचं त्यांनी उभं केलेलं सांगोपांग चित्र अतिशय प्रत्ययकारी आहे. ‘पिंपळाच्या झाडाखाली बसून जांभई देऊ नकोस… तो तुझी पचनसंस्था बिघडवून टाकेल,’ असा सीताला मिळालेला सल्ला; हळूहळू नदीच्या आवाजात झालेला बदल; भिंतीच्या फटीत सीताने ठेवलेली चावी; नदीच्या पुरात बुडून वाहत चाललेला बैल… असे असंख्या तपशील वाचकाला इतके भिडतात, की जणू वाचकच प्रत्यक्ष प्रसंग पाहत आहे!

Ruskin_sanch

रस्किन बाँड यांचं सर्व लेखन म्हणजे जणू गद्यकाव्य आहे. ‘खिडकी म्हणजे पडदा आणि बाहेरचं जग म्हणजे सिनेमा’; अंधारात डासासोबत आलेला काजवा म्हणजे जणू त्याचा कंदील आहे; ‘फुलपाखरू होशील तेव्हा परत ये’ अशा शब्दांत छोट्या मुलाने सुरवंटाला दिलेला निरोप; ‘सफरचंदाचं आकर्षण वाटायला मेबल आजी म्हणजे काही ईव्ह नव्हती!’ अशी वरचेवर येणारी गंभीर आणि गंमतीदार वाक्यं या कथांना रम्य आणि अद्‍भुत बनवतात. त्यांत ‘माकडलीला’ आहेत, ‘कावळोबाचे कारनामे’ आहेत, ‘शहामृगाच्या तावडीत’ले विलक्षण अनुभव आहेत आणि ‘इंग्लंडमधले दिवस’ही आहेत. त्यांतून खुद्द रस्किन बाँडही अधूनमधून आपल्याला भेटतात. ‘मला लेखक व्हायचं होतं’ म्हणत सुरुवातीच्या काळातही आपली कागदावरची धडपड ते हलकेच वाचकापर्यंत पोचवतात.

पण फक्त एवढंच नव्हे. हे जरी किशोर वाङ्मय असलं तरी ते प्रौढ वाचकांनीही अवश्य वाचण्याजोगं आहे असं प्रकाशक आवर्जून सांगतात, आणि त्याचा प्रत्यय आपल्याला पानोपानी येतो. एका कावळ्याच्या आत्मकथेतलं मानवजातीविषयीचं त्याचं दुःख असं व्यक्त झालं आहे – ‘त्यांना वाटतं, मी म्हणजे एक जोकर आहे.’ दुसऱ्या कथेतली खडकावर अडकून पडलेल्या जोडप्याची प्रेतं म्हणजे अचानक सामोरं येणारं भेदक वास्तव आहे. आणखी एका ठिकाणी मारवाडी, पैसा आणि वाघ यांची झकास गोष्ट वाचायला मिळते, चौथ्या प्रसंगात चांगल्या माणसांच्या हातून चांगल्या माणसाचा खून घडतो! हे सर्व आपल्या आजूबाजूला वेग‍वेगळ्या रूपांत आपण नेहमीच पाहत असतो, असं जाणवत राहतं.

थोडक्यात सांगायचं झालं तर या कथा म्हणजे रंजन आणि प्रगल्भता यांचा दुर्मीळ‍ मिलाप होय. रस्किन बाँड यांच्या या कथा तुम्हाला कधी अचंबित करतात, तर कधी घाबरवून सोडतात… कधी खळखळून हसवतात, तर कधी डोळ्यांत अश्रू उभे करतात… कधी रम्य निसर्गाचा प्रत्यय देतात, तर कधी त्याच निसर्गाच्या रौद्र प्रकोपाचा अनुभव देतात… कधी प्रसंगांना सामोरं जाण्याची जिद्द निर्माण करतात, तर कधी अवखळ व्हायला प्रवृत्त करतात… कधी शब्दाने व्यक्त व्हायला भाग पाडतात, तर कधी विचारप्रवृत्त करून अंतर्मुख करतात…

या कथांच्या अनुवादिका रमा हर्डीकर-सखदेव आणि नीलिमा भावे, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी आणि रोहन प्रकाशनाची संपादकीय टीम, या सर्वांची मिळून या अभिजात वाङ्मयाला असं देखणं रूप दिलं आहे की ते प्रत्यक्षच पाहायला हवं. विशेष उल्लेख करायला हवा तो चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या जागोजागी असलेल्या बोलक्या चित्रांचा. लेखकाने चितारलेली दृश्यं त्यांनी तितक्याच कल्पकतेने चित्रामधून जिवंत केली आहेत. आशयसंपन्न सर्जनशील चित्रांचं उत्तम उदाहरण म्हणून ही पुस्तकं बघता येतील. घराच्या खिडकीतून स्वतःच्या वडिलांची अंत्ययात्रा बघणारा कोवळा मुलगा असो किंवा डरकाळी फोडत अंगावर धावून येणारा बोगद्यातला वाघ असो… ही सर्व चित्रं या कथांना एका वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात ही या ६ पुस्तकांच्या संचाची मोठी जमेची बाजू आहे. प्रत्येक पुस्तकाचं लोभस मुखपृष्ठ, आतली देखणी चित्रं, उत्तम छपाई आणि मोहोरेदार कागद, या सगळ्याचा मेळ इतका सुरेख सजला आहे की त्याने या मोलाच्या लेखनाचं अक्षरशः सोनं केलं आहे! शाळाशाळांमध्ये, ग्रंथालयांत आणि घरोघरी अवश्य जायला हवा, असा हा उत्तम संच आहे.

आजच्या युवा पिढीसमोर मार्गदर्शनपर, प्रेरणादायी आणि माहितीपर पुस्तकांचा भडिमार होतो आहे. मात्र एक संवेदनशील व्यक्तिमत्त्व होण्यासाठी आणि कल्पकतेची बीजं रोवण्यासाठी रस्किनसारख्या लेखकाच्या लेखनाची ओळख आजच्या तरुणांना करून देणं जास्त महत्त्वाचं आहे.

– सुनील कर्णिक

(सौजन्य : दै. महाराष्ट्र टाइम्स, २२ जानेवारी २०१७)


रस्किन बॉंड यांच्या निवडक कथांचा कलेक्टर एडिशन संच

रस्किन बाँड संच

भावस्पर्शी व रोमांचक कथांचा गुलदस्ता

सुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड
यांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात. त्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं, त्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या कथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !
रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!

1,050.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *