मला नाही वाटत, आज सत्तरी पार केलेले माझ्यासारखे जे मराठी वाचक आहेत, त्यांनी त्यांच्या किशोरवयात बाबूराव अर्नाळकर लिखित रहस्यकथा मिटक्या मारत वाचलेल्या नसतील! थोडं वय वाढलं, मग तरुणपणी बऱ्यापैकी इंग्रजी कळू लागलं तेव्हा, अर्नाळकरांच्या धनंजयची जागा हॉलीवूडच्या रगेल-रंगेल जेम्स बॉण्डने घेतली. तो जेम्स बॉण्ड जास्तीत जास्त वेळ रुपेरी पडद्यावर साकारणारा अभिनेता शॉन कॉनेरी अलीकडेच कालवश झाला तेव्हा त्यांच्यासोबत आपलं तारुण्यही सरलं, अशी हुरहुर लागून राहिली. नंतर नोकरी-संसाराच्या व्यापतापात आवडीचं वाचन करण्याऐवजी, कामाच्या गरजेनुसार तातडीचं वाचन करायची पाळी आली आणि वाचनातील उत्स्फूर्तता, उत्कटता हरपतच राहिली. बाबूराव अर्नाळकर गेले, तेव्हा त्यांच्या ‘धनंजय कथा’ वाचनालयातून आणून पुन्हा एकदा वाचाव्यात, अशी तीव्र सुरसुरी मनात आली होती; पण काहीतरी नवे कार्यालयीन काम उपटले आणि अर्नाळकर पुन्हा वाचणे राहूनच गेले.

त्यातल्यात्यात पत्रकारितेच्या घाईगर्दीच्या नोकरीतील साहित्य-संस्कृती वार्ताक्षेत्राच्या दायित्वामुळे, नंतरच्या पिढीतील गूढकथाकार रत्नाकर मतकरी बऱ्यापैकी वाचून झाले. पण १९७०-८०च्या दशकात आठशे-एक पुस्तके लिहिलेले बाबा कदम, सुभाष एम. शहा, अशोक साखळकर, गुरुनाथ नाईक, श्रीकांत सिनकर, दिवाकर नेमाडे प्रभृती रहस्य-गूढ प्रामुख्याने हाताळणारे लेखक प्रसंगपरत्वे वाचले गेले तेवढेच. झपाटल्यासारखे ते वाचावेत, असे वाटलेच नाही! कारण, एक तर केवळ मनोरंजन करणारे ते सवंग साहित्य (पल्प फिक्शन) आहे. सामाजिक जाणिवा प्रगल्भ करणारे, काहीतरी नवीन शिकवणारे, वेगळी माहिती देणारे, तेच खरे कसदार साहित्य, असे तोवर साहित्य-व्यवहारातून मनावर बिंबवले गेले होते.

टीव्हीचे आक्रमण

तशात नव्वदच्या दशकात घरोघरी टीव्ही घुसला आणि ग्रंथवाचन एकूणच घटले. गावोगावी छोटी-छोटी वाचनालये बंद पडत गेली. त्यामुळे त्या वाचनालयांतून छोट्या खोक्यांत आपली पुस्तके वाचकांना सवलतीने विक्रीला ठेवण्याचा हा रहस्यकथा लेखकांचा मार्ग खुंटला आणि त्यांच्या त्या लेखनाला घरघर लागली. आता तर आपण फेसबुक, व्हॉट्सअप, ट्वीटर, ओटीटीच्या जमान्यात पोहोचलो आहोत. वेळ कसा घालवायचा, हा प्रश्नच मुळी उरलेला नाही.

रहस्य जाणण्याची ओढ

पण कुठले ना कुठले भयप्रद रहस्य जाणून घेण्याची तीव्र ओढ प्रत्येक माणसात असतेच असते. वाचकांची ती नाडी नेमकी ठाऊक असलेल्या प्रतिभावंत लेखकाला रहस्य-कादंबरी-लेखन म्हणून खुणावतेच! ‘तंबी दुराई’ या टोपणनावाने एका मोठ्या मराठी दैनिकातून ‘दोन फुल एक हाफ’ आणि ‘दीड दमडी’ यांसारखे वाचकांसाठी संस्मरणीय ठरलेले, पुढे ग्रंथरूपाने संग्रहित झालेले लक्षणीय स्तंभलेखन करणाऱ्या, त्यानंतर ‘पावणेदोन पायाचा माणूस’ यासारख्या विचित्र नावाच्या कादंबरीचे, एक ई-बुक-कथासंग्रहाचे लेखन करणाऱ्या श्रीकांत बोजेवार या, पत्रकारितेत २८वर्षं उच्चपदस्थ राहिलेल्या साहित्यिकालाही या साहित्यप्रकाराने खुणावले नसते तरच नवल! बोजेवारांनी लिहिलेल्या ‘हरवलेलं दीड वर्ष’, ‘न्यूड पेंटिंग@१९’ आणि ‘अंगठी १८२०’ या प्रत्येकी जेमतेम सव्वाशे पानांच्या, पण प्रचंड उत्कंठावर्धक तीन रहस्य कादंबरिका पुण्याच्या ‘रोहन प्रकाशना’ने नुकत्याच प्रकाशित केल्या आहेत. एकांडी शिलेदारी करणारा गुप्तहेर अगस्ती हे प्रमुख पात्र असलेल्या या कादंबरिका आकाराने छोटेखानी असल्या, तरी त्यात इतके मोठे गुंतागुंतीचे रहस्य ओघवत्या चित्रदर्शी भाषेत ठासून भरलेले आहे की, नुसती चाळायला म्हणून तिन्हीपैकी कुठलीही एक कादंबरिका हाती घेतली, तरी ती संपूर्ण वाचून झाल्याशिवाय, वाचकाला खाली ठेवाविशीच वाटत नाही.

पटकथालेखनाचा अनुभव

सहसा पत्रकारांचे साहित्यलेखन म्हणजे घिसाडघाईत खरडलेला मजकूर अशी संभावना करण्याकडे समीक्षकांचा कल असतो. पण श्रीकांत बोजेवार या पत्रकाराला पटकथा-लेखनाचाही अनुभव असल्यामुळे त्यांनी या कादंबरिकांचे गुंतागुंतीचे प्लॉट्स अत्यंत विचारपूर्वक सफाईदारपणे गुंफल्याचे जाणवते. वाचकाने एकदा पुस्तक हाती घेतले की, लेखक मुळी त्याचे मनगट घट्ट पकडून त्याला आपल्या रहस्यकथेच्या चक्रव्यूहात असा काही गुरफटून टाकतो की, शेवट गाठेस्तोवर वाचकाला पुस्तक खाली ठेववतच नाही! पत्रकारितेतील व्यापक समाज-निरीक्षणातून भंगारवाल्याचे दुकान ते खंदक, कोठडी ते पंचतारांकित हॉटेलातील सुसज्ज कक्ष, अशा भिन्न भिन्न जागांचे, तिथे चालणाऱ्या विविध वैध-अवैध व्यवहारांचे बारीकसारीक तपशील देऊन, लेखक त्या रहस्यात वाचकाला अथपासून इतिपर्यंत आपल्यासोबत खेचूनच कसा नेतो, हे खरे तर प्रत्येक वाचकाने स्वत:च अनुभवायची बाब आहे. पण केवळ झलक दाखवण्यासाठी म्हणून या तिन्ही कादंबरिकांचे सार थोडक्यात इथे सांगावेसे वाटते.

Agasti-Set-Cover

हरवलेल्या दीड वर्षांचा शोध : सहसा गुप्तहेरांवर बहुधा एखादी हरवलेली मौलिक वस्तू, खजिना वगैरेचा शोध घेण्याची जबाबदारी येत असते; पण ‘हरवलेलं दीड वर्षं’मध्ये हंसा नावाची एक धनाढ्य उद्योगपती महिला, कौशिकी नावाची तिची जी तरुण मुलगी दीड वर्षं अचानक गायब होती, तिचं ते दीड वर्षं कुठे-कसं गेलं याचा शोध घेण्याची आगळी जबाबदारी अगस्तीवर सोपवते. कुशल बुद्धीचा अगस्ती ते गूढ कसे उलगडतो, ते वाचताना तो सारा तपास आपल्या मन:चक्षुसमोर उभा करताना वाचक विस्मयचकितच होतो.

न्यूड पेंटिंग@१९ : ही कथा निकिता शर्मा नावाच्या एका तरुणीच्या खुनापासून सुरू होते. त्याचा शोध अगस्तीला गडचिरोलीपासून चंडिगड शिमल्यापर्यंत घेऊन जातो. पण ज्या कौशल्याने अगस्ती ते रहस्य उलगडतो, ते पाहताना वाचकाची मती अक्षरश: गुंग होते.

अंगठी १८२० : ही तिसरी कादंबरिकाही असाच तगडा प्लॉट घेऊन आपल्या भेटीला येते. ती कथा घडते विद्यमान काळातच, पण अगस्तीला मात्र शोध घ्यायचा असतो तो १८२० साली खास बनवल्या गेलेल्या कोट्यवधी रुपये मूल्याच्या अंगठीचा! तो शोधही असाच वाचकाला आश्चर्यचकित करून जातो.

जेम्स बॉण्डचे प्रतिरूप

ज्येष्ठ कवी, अभिनेते किशोर कदम यांनी केलेले बोजेवारांच्या अगस्तीचे स्वागतपर समीक्षण मी मागे एका दैनिकात वाचले होते. किशोर बहुतेक करून मला समवयस्क असावेत. पण, तरीही बोजेवारांच्या या भन्नाट अगस्तीचे वर्णन करताना, जेम्स बॉण्ड या समांतर अजरामर व्यक्तिरेखेची आठवण किशोरना झाली नव्हती, याचे मला नवलच वाटले होते. किशोरनी म्हटले होते – “आजच्या काळातील पूर्ण पुरुष असलेल्या या अगस्तीच्या प्रेमात आपण पडल्याशिवाय राहत नाही. तो उंच, तगडा, रांगडा, टेक्नोसॅव्ही, चाणाक्ष बुद्धिमत्तेचा, शांत, सोशिक आणि मुख्य म्हणजे सडाफटिंग आहे. लग्नाच्या फंदात न पडलेला, पण वाटेत येईल ते ललनासौंदर्यसुख पुरेपूर उपभोगून मोकळा राहणारा. त्याच्या बिनधास्त स्वभावाला पूरक असलेली मिका नावाची एक मैत्रीण असलेला. वेळोवेळी विमानाने वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणारा, त्या निरनिराळ्या ठिकाणांची इत्थंभूत माहिती असलेला अगस्ती आपल्याला ओढ धरून जगण्याची जाणीव करून देतो. असं जगावं, असं थ्रील अनुभवावं, त्यातून सहीसलामत बाहेरही पडावं आणि जगाची पर्वा न करता, हवं तेव्हा हमखास झोपेच्या मिठीत शिरावं असा भन्नाट जगणारा अगस्ती बोजेवारांनी उभा केलाय…”
तरुण वाचकांना खिळवेलहे सारं वर्णन माझ्यातील चित्रपश्चिमाकाराला केवळ एकाच पुरुषोत्तमाची आठवण करून देतं -माय नेम इज बॉण्ड, जेम्स बॉण्ड अशी स्वत:च्या आगमनाची वर्दी देणाऱ्या बॉण्डची! बोजेवारांना अगस्ती कुठूनही स्फूरलेला असो. पण जेम्स बॉण्डसारखीच रगेल-रंगेल असलेली त्यांची ही अगस्ती व्यक्तिरेखा तरुण वाचकांनाही नक्कीच खिळवून ठेवू शकेल! आगळ्यावेगळ्या रहस्यकथा लेखनाची अलीकडच्या काळात विझून गेलेली भट्टी, या अगस्तीत्रयीतून छान चेतवणं बोजेवारांना उत्तमच जमलंय, हे समीक्षकांनाही मान्य करावेच लागेल.

हरिभाऊंना समर्पित

व्यक्तिश: मला स्वत:ला या कादंबरिकात्रयीची अर्पणपत्रिका खूप भावली. मराठी साहित्यात हेरकथांची सुरुवात १८९०-९२ साली ह. ना. आपटे यांच्या ‘चाणाक्षपणाचा कळस’ या दीर्घकथेपासून झाली असं मराठी विश्वकोश सांगतो. पुढे काय होणार? हा तीन अक्षरी प्रश्न वाचकांच्या मनात जन्माला येण्यातच हेरकथांचं-रहस्यकथांचं सार्थक असतं. त्याची सुरुवात मराठीत करून देणाऱ्या ‘चाणाक्षपणाचा कळस’ या १३० वर्षं जुन्या कथेस आजच्या काळातील ही हेरकथा लेखकाने समर्पित केली आहे.

या ओघात मला या पुस्तकसंचाच्या उत्तम संपादनाबद्दल ‘रोहन प्रकाशना’चे प्रणव सखदेव यांचेही खास अभिनंदन करावेसे वाटते. स्वत:ही एक उत्तम साहित्यिक असलेल्या तरुण प्रणवने या अगस्तीकथांचे संपादन, चंद्रमोहन कुलकर्णी यांची सुरेख रंगीत आकर्षक मुखपृष्ठे, नितळ स्वच्छ पांढरा कागद वापरून अत्यंत देखण्या रूपात केले आहे. मुख्य म्हणजे, शुद्धलेखनाकडे जागरूकपणे दिलेले लक्ष, संपूर्ण पुस्तकात क्वचितच एखाद दुसरी लेखनचूक सापडते. ग्रंथप्रेमी अगस्तीला श्रमपरिहारार्थ ‘रोहन प्रकाशना’चीच पुस्तकं वाचायला लावून आपल्या प्रकाशनाची जाहिरात करण्याची आयडियाची कल्पनाही भन्नाट वाटली. वाढदिवस-विवाहादी मंगलप्रसंगी भेटवस्तू म्हणून देण्यासाठी ‘अगस्ती इन अॅाक्शन’ हा सवलतीत असलेल्या तीन पुस्तकांचा संच उत्तमच ठरेल…

-नीला उपाध्ये

अगस्ती इन अॅक्शन (३ रहस्यकथांची ३ पुस्तकं)
(हरवलेलं दीड वर्ष, न्यूड पेंटिंग@१९, अंगठी १८२०)
लेखक : श्रीकांत बोजेवार

सौजन्य : ‘दै. तरुण भारत’, ‘आसमंत’ पुरवणी


अगस्तीचे कारनामे जाणून घ्या…

अगस्ती इन अॅक्शन संच

रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’

Agasti-Set-Cover

360.00Add to cart


kumar-ketkar
ज्येष्ठ पत्रकार, संपादक कुमार केतकर डिटेक्टिव्ह अगस्तीबद्दल म्हणतात….

बेमालूमपणे विणलेली त्रिसूत्री… सेक्स-व्हायलन्स-कॉन्स्पिरसी

बोजेवारांची विलक्षण विनोदशैली आणि पात्रांच्या (व वाचकांच्या) फिरक्या घेण्याची त्यांची अफलातून धाटणी अशा रीतीने येते की, गुन्हेगारीच्या काळ्या गुहेत शिरूनही आपल्याला हलके हसण्याचा मोह आवरत नाही.

वाचा


Kishor Kadam
प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम डिटेक्टिव्ह अगस्तीबद्दल म्हणतात….

रहस्यकथांचे दिवस आणि अगस्ती…

बोजेवारांची विलक्षण विनोदशैली आणि पात्रांच्या (व वाचकांच्या) फिरक्या घेण्याची त्यांची अफलातून धाटणी अशा रीतीने येते की, गुन्हेगारीच्या काळ्या गुहेत शिरूनही आपल्याला हलके हसण्याचा मोह आवरत नाही.

वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *