‘…जगजित मृदू स्वभावाचा होता. एका शब्दानेही कोणाला दुखवत नसे, मग कृतीने दुखवणं दूरच. पण तोच जगजित गुरूच्या भूमिकेत शिरला की अतिशय कठोर होऊन जाई. शिष्याला जराही दयामाया न दाखवता तालीम घेत असे. चित्राला संगीताचे धडे देतानाही तिच्या आवाजात हवी तशी परिपूर्णता येईपर्यंत जगजितने तिचे स्वरोच्चार, आवाजातील चढउतार आणि गायकीमधील लवचिकता या गोष्टींवर अथक मेहनत घेतली. चित्राचा आवाज आपल्या आवाजाला पूरक ठरेल याची संपूर्णत: खात्री पटेपर्यंत हे शिक्षण चालू होतं.

‘युगलगीत गाताना माझा स्वर चुकीचा लागल्यावर त्याच्या कपाळावर आठ्या पडत, तर कधी नापसंतीदर्शक आवाजाने ‘पुन्हा म्हण’ असं तो सुचवत राही. मीही त्याचं संपूर्ण समाधान होईपर्यंत गात असे. नेहमीच त्याच्या कडक शिस्तीचा अनुभव आला तरी जगजित मला खूप सांभाळून घ्यायचा हेही तितकंच खरं आहे.

– चित्रा सिंग

संगीत ध्वनिमुद्रित करून नंतर गायकाचं गाणं स्वरबद्ध करायचं हा प्रकार जगजितला अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे ध्वनिमुद्रणाच्या वेळी साथ देणारे वादकही प्रत्यक्ष हजर असत. एका वेळी एक किंवा दोन गाणी ध्वनिमुद्रित केली जात. सोबतीला वादकही असत.
१९७० सालापर्यंत जगजितला साथसंगत करणारे वादक ठरून गेले होते. पुढे जगजित मैफिलींच्या निमित्ताने प्रवास करायचा तेव्हाही हेच गिटार, सितार, पर्कशन वगैरे वाद्यं वाजवणारे वादक त्यांच्या सोबत असत. त्यांच्यापैकी अनेकजण अखेरपर्यंत त्याच्याबरोबर राहिले.
ध्वनिमुद्रणाच्या वेळी जराही चूक झाली तरी जगजितच्या लगेच ध्यानी येत असे. अनेक वाद्यमेळातूनही कोणत्या वाद्यामधून बेसूर उमटतो आहे हे जगजितच्या तीक्ष्ण कानांना अचूक समजायचं. त्या क्षणी ध्वनिमुद्रण थांबवून चूक सुधारल्यानंतरच पुढचं काम सुरू होत असे.
चित्राने गाताना जराही चूक केली तरी जगजित खपवून घेत नसे. ‘युगलगीत गाताना माझा स्वर चुकीचा लागल्यावर त्याच्या कपाळावर आठ्या पडत, तर कधी नापसंतीदर्शक आवाजाने ‘पुन्हा म्हण’ असं तो सुचवत राही. मीही त्याचं संपूर्ण समाधान होईपर्यंत गात असे. नेहमीच त्याच्या कडक शिस्तीचा अनुभव आला तरी जगजित मला खूप सांभाळून घ्यायचा हेही तितकंच खरं आहे. त्याला एकट्याने गायला जास्त आवडलं असतं असं मला वारंवार वाटत असे. माझ्या सोबत गायल्याने आपल्या गाण्यावरही मर्यादा येतात, तडजोडी कराव्या लागतात असं जगजित एकदा म्हणालाही होता. त्याचं म्हणणं चुकीचं नव्हतंच. माझा आवाज बारीक होता आणि काहीसा कर्कशदेखील, तर जगजितचा आवाज खर्ज, धीरगंभीर. त्याची संगीतसाधना अफाट होती. त्याउलट त्याने शिकवायला सुरुवात करेपर्यंत मी कोणाकडूनही संगीतशिक्षण घेतलं नव्हतं.

गाण्याचा विस्तार करणं, ते विविध प्रकारे सजवणं, त्या गाण्याला सर्वांगाने फुलवणं ही त्याची खासियत होती. माझ्यामध्ये हा गुण नव्हता. मी फारतर थोडेबहुत बदल करतही असे, पण त्याच्याप्रमाणे तीन मिनिटांच्या गाण्याला ४५ मिनिटं वेगवेगळ्या पैलूंनी गाणं मला जमत नसे.
माझ्यामधील या त्रुटीबरोबर जमवून घेणं–विशेषत: युगलगीत गाताना–त्याला त्रासदायक होत असे. मैफलींमध्ये गाताना तर त्याला अधिकच तडजोडी कराव्या लागत. श्रोत्यांची नस पकडणं त्याला फारच चांगलं अवगत होतं. प्रतिसादावरून त्यांच्या आवडीचा अंदाज येत असे आणि त्यानुसार तो आपलं गाणं फुलवायचा, नटवायचा. माझ्यासोबत गाताना मात्र त्याची पंचाईत व्हायची. गाताना कोणत्याही प्रकारची बंधनं त्याला नको असायची. ठराविक वेळात गाणं संपवणं त्याच्या स्वभावातच नव्हतं. ठराविक वेळामध्ये, ठराविक पद्धतीनेच गायचं हा नियम त्याला केवळ माझ्यामुळेच पाळावा लागायचा.
गंमत म्हणजे माझ्या मर्यादा माहीत असूनही माझी शैली आत्मसात करू पाहणाऱ्या गायकांना माझं गाणं लक्षपूर्वक ऐकायचा सल्ला तो देत असे. त्याच्या अपेक्षांनुसार गाण्याची कुवत माझ्यामध्ये आहे याविषयी त्याला खात्री होती.

जगजितप्रमाणेच चित्रपटात पार्श्वगायन करायची आपल्यालाही संधी मिळावी असं चित्राचं स्वप्न होतं. दुर्दैवाने तिचं स्वप्न साकार झालं नाही. ‘मी एकदा मुकेशबरोबर एका समारंभामध्ये गायले होते. किशोरकुमारने आफ्रिकेच्या टूरसाठी मला विचारणा केली, पण अत्यंत कमी मोबदला देऊ केल्याने मी नकार दिला. रवीसारख्या अनेक संगीतकारांना भेटले, पण माझी सामाजिक पार्श्वभूमी, पूर्वायुष्य यांमुळे सर्वांनाच माझ्याबरोबर काम करणं अवघड वाटायचं. मदन मोहनना माझा आवाज अतिशय आवडायचा. आमची चांगली मैत्रीही जमली, पण त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. जयदेव हेही माझे मित्र होते. माझ्याकडून गाऊन घ्यायची त्यांची इच्छाही होती, पण चित्रपटनिर्मात्यांच्या विरोधामुळे तेही जमलं नाही. संगीतकार रोशनना माझा आवाज पसंत होता. त्यांनी संगीत दिलेल्या ‘आखरी खत’ चित्रपटासाठी गायचं निश्चितही झालं होतं. पण रोशनच्या पत्नीच्या विनंतीवरून मी नकार दिला.’

Jagjit-Singh BC
अनफर्गेटेबल जगजित सिंग : मलपृष्ठ

जगजितने मात्र आपल्या पत्नीला कायम प्रोत्साहन दिलं. १९६९ आणि १९७३मध्ये त्यांनी चित्राच्या दोन ध्वनिमुद्रिका काढल्या. त्यामध्ये ती जगजितबरोबर आणि एकटीही गायली होती. दोघांची ‘सुपर सेव्हन’ रेकॉर्डही बाजारात आली. केवळ २०मिनिटं चालणारी ही ध्वनिमुद्रिका काही काळ लोकप्रिय झाली होती. ‘जबभी आती है तेरी याद, धुआँ उठा था दिवाने का’ अशासारखी गाणी त्यामध्ये होती.
एकट्या जगजितने गायलेल्या दोन ध्वनिमुद्रिकाही बाजारात आल्या होत्या. गजल फारशा लोकप्रिय नसूनही या ध्वनिमुद्रिकांचा खप चांगला झाला. काही मोजकेच संगीत-दिग्दर्शक गजल हा प्रकार हाताळायचे, असं असूनही जगजितच्या गजलना लोकांची पसंती मिळाली.
चित्रा-जगजितच्या विवाहानंतर एक वर्षाने, १९७१ साली विवेकचा जन्म झाला. बंगाली लोकांच्या प्रथेनुसार त्याला लगेचच टोपणनावही मिळालं–‘बाबू’. चित्रा आणि जगजितनेही टोपणनावं घेतली– ‘पपा’ आणि ‘ममा’. एकमेकांना ते दोघं पपा आणि ममा याच नावाने हाक मारू लागले. पैशांची चणचण अजूनही जाणवत होतीच. चित्राचा सारा वेळ बाळाला सांभाळण्यात आणि घरकामं करण्यात जायचा. बाळाच्या आगमनानंतर घर अधिकच छोटं वाटायला लागलं. या सर्व गोष्टींचा सर्वाधिक परिणाम मोनिकावर झाला. दाटीवाटीने राहणं तिला त्रासदायक व्हायचं. पण आई आणि सावत्र पिता यांचं प्रेम आणि लहान बाळाचं आकर्षण यांमुळे ती त्या लहान जागेतही आनंदाने राहायची. बाबू खूप गोड होता दिसायला. आई-बाबांचं देखणेपण त्याच्यातही उतरलं होतं. त्या दोघांचा तो जीव की प्राण होता यात नवल नाही. छोट्या बाबूच्या जन्मानंतर जगजितला आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. घर आणि छोटं बाळ सांभाळताना चित्राची खूप तारांबळ उडायची. तरीही ती खूश होती.

‘माझ्या आयुष्यात तीन अतिशय महत्त्वपूर्ण घटना घडल्या. त्यांतील पहिली घटना २० ऑगस्ट १९७१ला घडली. बाबूचा जन्म त्या दिवशी झाला.’ जगजितला तो दिवस लख्खपणे आठवतो. ‘ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी बाबूचा जन्म झाला. अपरिमित आनंदाचा क्षण होता तो. आमची आर्थिक स्थिती यथातथाच असूनही मी जगातील सर्वांत श्रीमंत माणूस आहे असं त्या क्षणी मला वाटत होतं.’…

  • अन्फर्गेटेबल जगजित सिंग
  • लेखिका : सत्या सरन
  • अनुवाद : उल्का राऊत

पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल मार्च २०२१


हे पुस्तक विकत घेण्यासाठी…

अन्फर्गेटेबल जगजित सिंग

जगजित म्हटलं की, कानात आवाज घुमतात गझलांचे…मनाचा ठाव घेणाऱ्या, मन शांत करून जाणाऱ्या आवाजातल्या अनेक गझला ! नेमक्या भावना व्यक्त करत, काही अनपेक्षित सुरावटी गात, कधी पाश्चात्त्य वाद्यांचा आधार घेत जगजितने गझल गायकीचा चेहरामोहराच बदलून टाकला. सत्या सरन यांनी लिहिलेल्या जगजितच्या या चरित्रात त्याचा विद्यार्थीदशेपासूनचा, स्ट्रगलर ते लोकप्रिय गायक असा प्रवास उल्का राऊत यांनी मराठीत रसाळपणे उलगडला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने जगजित मैफिलीचं वातावरण भारून टाकत असे. रसिकांच्या डोळ्यांतून अश्रुधारा बरसवणारा जगजित एखादा चुटकुला सांगून त्याच मैफलीत रसिकांना हसायलाही भाग पाडत असे. जगजितचे असे अनेक पैलू या पुस्तकात विविध प्रसंगांतून खुलून येतात. नियतीने जगजित-चित्राला अनेक बरे-वाईट रंग दाखवले. ते दोघं कधी या नियतीला गायनाचा, आध्यात्माचा आधार घेत धिरोदात्तपणे सामोरे गेले, तर कधी कोलमडून गेले. एक मित्र, मुलगा, वडील, गायक, चित्राचा साथी, नवगायकांसाठी मसीहा अशा अनेक भूमिकांमधून पुस्तकात भेटत जाणारा…अन्फर्गेटेबल जगजित सिंग.

Jagjit Singh Cover

270.00Add to cart


उल्का राऊत यांनी अनुवादित केलेली लक्षणीय पुस्तकं

मदुराई ते उझबेकिस्तान

१० ठिकाणांचे हटके अनुभवकथन


श्रीनाथ पेरूर
अनुवाद : उल्का राऊत


‘कन्डक्टेड टुर्स’मधून प्रवास करणं म्हणजे भोज्जास हात लावून येणं…असा एक सर्वसाधारण समज ! या पुस्तकाचा लेखक
श्रीनाथ पेरुर याने अशा प्रकारच्या टुर्सचं अंतरंग समजून घेण्यासाठी देश-विदेशातल्या विविध छटा असणाऱ्या १० ठिकाणांची भ्रमंती केली. वेगळा दृष्टीकोन ठेवल्यामुळे लेखक त्या भ्रमंतीत अनपेक्षितपणे रमला. त्याच भ्रमंतीचं नवी दृष्टी देणारं, हे खुसखुशीतपणे रंगवलेलं अनुभवकथन वाचायलाच हवं!
या भ्रमंतीतील काही ठिकाणं अगदी नेहमीचीच होती तर काही वेगळ्या वाटेवरची ! अशा या वैविध्यपूर्ण ठिकाणांमध्ये दक्षिण भारतातली मंदिरं, सात दिवसात आटोपलेली युरोप टूर, कबीर संगीत गाणाऱ्या कलाकारांसोबतची यात्रा, थरच्या वाळवंटातील उंटावरची थरारक राइड, हजारो भाविकांसोबत अनुभवलेली वारी, उझबेकिस्तानमधील सेक्स टुरिझमचा बाजार अशा हटके ठिकाणांचा समावेश आहे.
साहस, वासना, कुतूहल आणि अगदी ईश्वरभक्तीपर्यंतचा अनुभव कधी उपरोधिक, तर कधी खट्याळ शैलीत वाचायला मिळतो. लेखकाच्या निरिक्षणक्षमतेमुळे हे सगळे अनुभव आपल्यापर्यंत जिवंतपणे पोहोचतात.
‘कन्डक्टेड टुर्स’ची वेगळी अनुभूती देणारं, थोडं अंतर्मुख करणारं प्रवासवर्णन… अर्थात ‘मदुराई ते उझबेकिस्तान !’



240.00 Add to cart

आमचं बालपण


गौरी रामनारायण
अनुवाद : उल्का राऊत


बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’



175.00 Add to cart

MBA @ वय वर्ष 16

शाळा व कॉलेजच्या दिवसांपासूनच व्यवस्थापन व व्यवसायाचे बाळकडू


सुब्रोतो बागची
अनुवाद :उल्का राऊत


सकाळी उठल्यापासून रात्री निर्धास्तपणे झोपेपर्यंत आपण जे काही केलं त्यात किती उद्योग-व्यवसाय इनव्हॉल्व्हड् होते याची मनीषाला जराही कल्पना नव्हती. विविध व्यवसायांच्या कार्यक्षम अस्तित्त्वाविषयी तिला जराही देणं-घेणं नव्हतं आणि अचानक एक दिवस शाळेत एक अभिनव उपक्रम राबवला गेला…हा उपक्रम होता वेगवेगळे व्यवसाय कसे चालतात हे जाणून घेण्याचा व विविध उद्योजकांची माहिती गोळा करण्याविषयीचा!
या उपक्रमानंतर मनीषासारख्या ३१ मुला-मुलींचं जीवनच बदलून गेलं…अनेक उद्योजक या विद्यार्थ्यांचे हिरो बनले.
आजच्या या जनरेशनपुढे नोकरी-व्यवसायाचे अनेक पर्याय खुले आहेत. पण पौगंडावस्थेतल्या या मुलांना व्यवसायजगत् म्हणजे नक्की काय हे माहीत असतं का? आपलं करिअर ठरवताना युवकांना व्यावसायिक जगाबद्दल उत्सुकता वाटावी, त्यांचं कुतूहल जागं व्हावं यादृष्टीने सुब्रोतो बागची यांनी या पुस्तकाद्वारे हा एक आगळा प्रयोग केला आहे.
बोजड पुस्तकी ज्ञान देण्यापेक्षा मुलांना आवडेल, रुचेल अशा भाषेत उद्योगविश्वाची, प्रसिध्द उद्योजकांची व व्यवसायातील विविध संज्ञा-संकल्पनांची ओळख हसत्याखेळत्या वातावरणात करून देणारं पुस्तक…


125.00 Add to cart

गाइड


आर. के. नारायण
अनुवाद : उल्का राउत 


आर. के. नारायण हे जगभरात मान्यताप्राप्त असे इंग्रजी साहित्यिक.
त्यांच्या ‘द गाइड’ या इंग्रजी कादंबरीला १९६०मध्ये ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार प्राप्त झाला आणि एक श्रेष्ठ पौर्वात्य साहित्यकृती म्हणून ती जगभर बहुचर्चित ठरली. १९६५मध्ये याच कादंबरीवर आधारित विजय आनंद दिग्दर्शित ‘गाइड’ हा कलात्मक चित्रपट प्रदर्शित झाला आणि कादंबरीचा व्यापक आशय व त्यातील राजू गाइड, नृत्यांगना रोझी, तिचा पती मार्को आदी या मातीतल्या व्यक्तिरेखा सर्वतोमुखी झाल्या.
आज पाच दशकं उलटून गेली तरी अनेक प्रश्न चर्चेत राहिले.
एका सामान्य भोगवादी राजू गाइडचं आध्यात्मिक ‘स्वामी’मध्ये रूपांतर होऊ शकतं?
एका कलासक्त विवाहित स्त्रीने पतीला सोडून नृत्यकलेचा ध्यास घेणं, राजूसारख्या परपुरुषासोबत राहणं नैतिकतेच्या चौकटीत बसतं?
मूळ कथेत व चित्रपट कथेत काय फरक होता? तो योग्य होता का?
यांसारख्या अनेक प्रश्नांचा उलगडा ही कादंबरी वाचल्याशिवाय होणं अशक्यच.
सर्जनशीलतेचा ध्यास, ज्ञान-संशोधनाचा ध्यास, भोगवाद व अध्यात्म अशा अनेक गोष्टींचं एकात्म चिंतन करायला लावणार्‍या मूळ इंग्रजी कादंबरीचा उल्का राऊत यांनी सिध्द केलेला हा अनुवाद. कल्पनारम्यता आणि अध्यात्म यांचा अभूतपूर्व मेळ घालणारी, अत्यंत रोचक व तत्त्वज्ञानात्मक डूब असलेली ही कादंबरी मराठी वाचकांसाठी आजही एक आगळी आनंदपर्वणी ठरते- गाइड!


200.00 Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *