‘एशियाटिक’मधील दुर्मिळ हस्तलिखितांचं वैभव

‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त या अंकात आम्ही विविध विषयांच्या अभ्यासक व लेखिका डॉ. मीना वैशंपायन यांचा ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’मध्ये जतन केलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांवर लिहिलेला हा विस्तृत लेख प्रकाशित करत आहोत.
भाषा-अभ्यासक तसंच विचक्षण वाचक यांना हा लेख रोचक वाटेल आणि उपयुक्तही ठरेल!


लहानपणी, म्हणजे साधारण सहा दशकांपूर्वी असेल, वडिलांचं बोट धरून मुंबईच्या फोर्ट विभागातून हिंडणं हा मोठाच आनंद होता. मोकळे रस्ते आणि आपल्या वास्तुसौंदर्याने आपल्याकडे आकर्षून घेणाऱ्या, इतिहासाचे स्मरण करून देणाऱ्या पोर्तुगीज, ब्रिटिशकालीन दगडी इमारती. प्रत्येक इमारत आपला इतिहास मिरवत, काहीशी गूढ वलयात पण दिमाखात उभी आहे असं वाटे. त्या साऱ्यांमध्ये मुंबईच्या टोकाची, जिच्यापासून मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणांमधील अंतर मोजलं जातं ती ‘झीरो पॉइंट बॉम्बे’ची खूण समजली जाणारी हॉर्निमन सर्कलची बाग आपल्या या ऐतिहासिक महत्त्वाचं ओझं सांभाळत असलेली पाहिली होती. त्याचबरोबर लक्षात होती, त्या हॉर्निमन सर्कलच्या समोरची, टाउन हॉलची भव्य वास्तू. तिच्या लांबलचक, मोठ्या पायऱ्या पाहणारा माणूस जागीच खिळून उभा राहिला नाही, तरच नवल! त्या वेळी तिच्यावर असणारी ‘द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे, टाउन हॉलं’ ही अक्षरं फार ऐटबाज वाटली नसली, तरी त्या अक्षरांनी मनात अकारण एक दरारा निर्माण केला होता, हे पक्कं आठवतंय.

मात्र बरीच वर्षं एशियाटिक सोसायटी दूरस्थच वाटत होती. माझं वाचन वाढलं, पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला आणि दुर्गाबाईंच्या साहित्याचा अभ्यास करताना संदर्भ शोधण्यासाठी एशियाटिकमध्ये गेले. त्या वास्तूत शिरले आणि भारावूनच गेले. त्या वास्तूने माझ्यावर प्रथमदर्शनी जी जादू केली ती आज तीन दशकांनंतरही तशीच आहे. प्रगत संशोधन, संशोधनाधारित अभ्यासाचं महत्त्वाचं केंद्र असणारी ही संस्था व्यासंगी अभ्यासकांची, संशोधकांची मदतनीसच आहे. भारतरत्न म.म.पां.वा. काणेंसारखा धर्मशास्त्राचा ग्रंथकार असो, किंवा डॉ. भाऊ दाजी लाडांसारखा प्राच्यविद्याभ्यासक असो, अनेक भारतीय व परदेशी विद्वानांनी आपला व्यासंग, आपले संशोधनपर लेखन या वास्तूच्या साक्षीनेच केले आहे. येथील प्रचंड ग्रंथभांडार, दुर्मीळ हस्तलिखितं, ऐतिहासिक कागदपत्रं, नाणी यांचा अभ्यास करणे, हे संशोधकांना एक आवाहन व आव्हानही आहे.

एशियाटिकची स्थापना ब्रिटिशांनी इ.स.१८०४मध्ये केली. त्या वेळी प्राच्यविद्येचे महत्त्व युरोपियनांच्या लक्षात आले होते. संस्कृत हस्तलिखितांमध्ये केवढे ज्ञानभांडार आहे, याचीही त्यांना कल्पना आली होती. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी परिश्रमपूर्वक ठिकठिकाणी दौरे केले आणि संस्कृत पंडितांच्या ताब्यात असणारी हस्तलिखितं मिळवली. डॉ. भाऊ दाजी लाड (१८२४-१८७४) व भगवानलाल इंद्राजी (१८३९-१८८८) या दोन संशोधकांनी एशियाटिकबद्दलची आपली कृतज्ञता म्हणून व येथे येणाऱ्या संशोधकांना फायदा व्हावा म्हणून हस्तलिखितांचा व्यक्तिगत संग्रह आपल्या मृत्युपत्रांद्वारे एशियाटिकला भेट दिला. यामुळे अनेक मौल्यवान हस्तलिखितं सोसायटीच्या भांडारात आज जमा आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या आधी मिळवलेल्या या संग्रहात अगदी अलीकडे म्हणजे १९९५च्या सुमारास मोठी भर पडली ती मराठीतील सुप्रसिद्ध लेखक पु.ल. देशपांडे यांच्या हस्तलिखितांची. या सर्व हस्तलिखितांचं जतन व रक्षण करणे हे सोसायटीपुढचे मोठेच आव्हान असते. जैनधर्मीय, बौद्धधर्मीय, प्राकृत, पाली, मराठी, गुजराती भाषांमधील, व इंग्रजी, पर्शियन, उर्दू, अरेबिक, चिनी यांसारख्या परदेशी भाषांमधीलही हस्तलिखितं येथे आहेत. एकूण सुमारे ३००० हस्तलिखितांपैकी काही अतिशय दुर्मिळ आहेत.
आता गेली बाराहून अधिक वर्षं मी या संस्थेसाठी संशोधनात्मक काम करते आहे. तो माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. सात-आठ वर्षांपूर्वी येथील सर्व हस्तलिखितांची व मुद्रित पोथ्यांची एक बृहद्-सूची करण्याचं काम मी केलं. त्यामुळे या अफाट संग्रहाचा बारकाईने अभ्यास व निरीक्षण करण्याची संधी मिळाली. त्यासाठी दोन वर्षं सतत तो संग्रह पाहत होते, त्यासंबंधी वाचत होते. या हस्तलिखितांचे विषयवैविध्य आपणास चकित करते. भाषाशास्त्र, साहित्यसिद्धान्तविषयक, व्याकरण, विविध कोश, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धर्मशास्त्र, वेद-वेदांगे, वैद्यक, पुराणे, स्तोत्रे, स्थापत्य, आदि विषयांवरील ही हस्तलिखितं आहेत.

माझं वाचन वाढलं, पीएच.डी.चा अभ्यास सुरू झाला आणि दुर्गाबाईंच्या साहित्याचा अभ्यास करताना संदर्भ शोधण्यासाठी एशियाटिकमध्ये गेले. त्या वास्तूत शिरले आणि भारावूनच गेले. त्या वास्तूने माझ्यावर प्रथमदर्शनी जी जादू केली ती आज तीन दशकांनंतरही तशीच आहे. प्रगत संशोधन, संशोधनाधारित अभ्यासाचं महत्त्वाचं केंद्र असणारी ही संस्था व्यासंगी अभ्यासकांची, संशोधकांची मदतनीसच आहे.

हस्तलिखितांचं हे भांडार मी कामानिमित्त जेव्हा प्रथम उघडले तेव्हा माझे डोळे विस्फारलेच गेले. पोथ्या पाहिलेल्या होत्या; पण इतकी मोठमोठी, दीर्घ अशी काव्यं, धार्मिक तत्त्वज्ञानपर मोठे ग्रंथ पोथीरूपात पाहिले नव्हते. कॉलेजात संस्कृत हाच विषय असल्याने महाकाव्यं, ऋग्वेदातील काही मंडले, शांकरभाष्य, कालिदास, भवभूती आदींचे वाचन झाले होते; पण ते सारे ग्रंथ छापील रूपात समोर होते. इथे तेच ग्रंथ त्यांच्या मूळ रूपात, असंस्कारित, नैसर्गिक रूपात आहेत असं जाणवू लागलं, आणि त्याबद्दल अधिकच आपलेपण वाटू लागलं. जणू काही ते ऋषी सूक्तं म्हणताहेत की काय असाही भास झाला. त्यांचा तो वेगळा पुरातन गंध हवाहवासा वाटत गेला. आपण हे सारं सांभाळलं पाहिजे, त्यांचं जतन झालं पाहिजे अशी ओढ लागली. हे संचित खूप महत्त्वाचं आहे. आज तंत्रज्ञानाने केलेल्या किमयेमुळे अनेक गोष्टी शक्य झाल्या आहेत. पण इतिहासातील अज्ञात पाने उलगडताना, काही प्रश्नांची उत्तरे मिळवताना ही हस्तलिखितं आपल्यासमोर जणू आरसा धरतात. त्यांतील लेखनशैली, प्रत करणाऱ्याची लेखनपद्धती, ग्रंथाच्या शेवटी असणारी नाममुद्रा यातूनही अनेक बाबींवर प्रकाश पडतो. मनात येतं, एखाद्या ग्रंथावर भाष्य लिहिणारे लेखक त्या भाष्यांसाठीही किती वेगवेगळी नामे वापरतात. कुणाची किरणावली, तर कुणाची वृत्ती, कुणाची सुबोधिका, तर कुणाची दीपिका, कधी कल्पलता, कधी अर्थदीपिका, कधी मुग्धावबोधा! केवढं भाषावैभव, केवढी ज्ञानलालसा आणि ज्ञानासाठी श्रम करण्याची केवढी तळमळ!

हस्तलिखितं म्हणजे अप्रत्यक्षरीत्या भेटलेली माणसंच असतात. त्यांच्या लेखनपद्धतींवरून त्यांच्या स्वभावाचा अंदाज करता येतो. कुणाचे लिहिणे इतके देखणे की, एखादे चित्रच. पहिल्या पृष्ठापासून शेवटपर्यंत एकसारखे अक्षर. तर कुणी वेड्यावाकड्या ओळींवर कसेतरी भरकटत लिहिलेले. ते नीट लावून वाचणे हे कठीणच काम. फार पूर्वी, मुद्रणकला अवगत नसल्याने कोणतेही विचारधन मग ते तत्त्वज्ञानात्मक असो, वा एखादे महाकाव्य असो, हस्तलिखिताद्वारेच जतन केले जात असे. मुळात प्रत्यक्ष लेखक हा आधी लिहीत असे आणि नंतर त्या लेखनाची नक्कल-प्रत केली जात असे. अशा नकला करणं हे त्या वेळी लिहितावाचता येणाऱ्यांच्या उपजीविकेचं एक मोठंच साधन होतं. अनेक राजे-महाराजे, संस्थानिक, धनिक मंडळी आपल्या पदरी अशी माणसे ठेवून त्यांच्याकरवी नकला करवून घेत. त्यामुळे अक्षर चांगलं असणाऱ्या साक्षरांना काम मिळे. कधी-कधी लिहिणाऱ्याची कुवत बेताची असली की, कितीतरी गडबडी होत. शिवाय भौगोलिक स्थानानुसार लिपी वेगळ्या, उच्चार वेगळे, त्यांचाही परिणाम हस्तालखितांवर होई. शिवाय सारी निर्मिती मौखिक परंपरेतून आलेली असल्याने काही गाळसाळ होई. त्यामुळे एकाच कृतीच्या ठिकठिकाणच्या हस्तलिखितांमध्ये खूप फरक असतो. पृष्ठक्रमांक कसे घातले जातात, एका पृष्ठावर किती ओळी असाव्यात, लिहिण्यासाठी कोणते साधन वापरावे, कसे लिहावे हे तेव्हा महत्त्वाचे होते. काश्मीरमध्ये एका विशिष्ट झाडांच्या पानांचा रस शाईसारखा वापरला जाई, व त्यामुळे तेथील हस्तलिखितांवरील अक्षरे पुसली जात नसत, असे एका इंग्रजी संशोधकाने लिहून ठेवले आहे. यासाठी प्रत्येक हस्तलिखित पाहताना त्याच्या अंतरंगाप्रमाणे बहिरंगही समजावून घेत वाचावे लागते.
महत्त्वाच्या ग्रंथांच्या वेगवेगळ्या हस्तलिखितांवरून चिकित्सक आवृत्ती तयार केली जाते. १९व्या शतकात शंकर पांडुरंग पंडित या भाषाकोविदाने तुकारामांच्या गाथा संपादित करताना गावोगावची हस्तलिखिते मिळवून त्यातील भाषेतील साम्यभेद, अभंगांची संख्या यांची निश्चिती केली. आज तीच अधिकृत प्रत समजली जाते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत महाभारताच्या ७०० हस्तलिखितांचा अभ्यास करून आज उपलब्ध असणारी अधिकृत महाभारत प्रत तयार केली गेली, त्यासाठी कितीतरी संस्कृत तज्ज्ञ २० वर्षं झटत होते. आपले प्राचीन साहित्यधन जपून ठेवण्यासाठी पूर्वजांनी किती परिश्रम केले ते पाहता मन थक्क होते.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने या ‘मैफली’तील रसिकांसाठी वानगीदाखल काही हस्तलिखितांबद्दल लिहीत आहे.

Rare gem
  • प्रथम निर्देश करावा लागेल तो ‘अथर्ववेदाच्या पैप्पलादशाखीय संहिते’चा. अथर्ववेदसंहितेच्या शौनकीय व पैप्पलाद, अशा दोन शाखा आहेत. त्यांपैकी पैप्पलाद शाखेची संहिता कालौघात नष्ट झाली असा बरीच वर्षं समज होता. परंतु डॉ. रुडॉल्फ व्हॉन रॉथ(१८२१-१८९५) या जर्मन संशोधकाने इ.स.१८७५मध्ये एक हस्तलिखित मिळवले आणि प्रसिद्ध केले. या एका प्रतीआधीची आणखी एकच प्रत आजवर उपलब्ध झालेली आहे, व ती एशियाटिकच्या भांडारात आहे. ही प्रत रणवीरसिंग या जम्मू-काश्मीरच्या राजाच्या ग्रंथालयातील आहे. देवनागरी लिपीत, व काश्मिरी शैलीतील या हस्तलिखिताच्या लेखनासाठी बर्च झाडाच्या गुळगुळीत सालीचा उपयोग केलेला आहे. ती १८५०च्या सुमाराची असावी असा संशोधकांचा कयास आहे. त्यातील ७-८ पृष्ठे मिळालेली नसली तरी आज उपलब्ध असणारी ही दुर्मिळ प्रत पैप्पलाद शाखेची मौल्यवान प्रत मानली जाते.
    अथर्ववेदाविषयी प्राच्यविद्यासंशोधकांना नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. नाशिक इथे कलेक्टर असणारा ए.एम.टी.जॅक्सन (ज्याचा कान्हेरे याने खून केला) हा प्राच्यविद्या- अभ्यासक होता, व काही काळ एशियाटिकचा सचिवही होता. त्याने वरील दुर्मिळ प्रतीवरून एशियाटिकसाठी इ.स. १८९८मध्ये खास आणखी एक प्रत लिहवून घेतली. त्या प्रतीच्या शेवटी तशी नाममुद्रा (SEAL) आहे. परंतु त्यातील बरीच पृष्ठं गहाळ झालेली आहेत.
  • महाभारतातील १८ पर्वांपैकी ‘आरण्यक-पर्व’ या एका पर्वाचे देवनागरी लिपीतील हस्तलिखित फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे डॉ. भाऊ दाजी यांच्या संग्रहातील हस्तलिखित. इ.स.१५१६ साली उत्तर भारतातील योगिनीपूर या ठिकाणी सुलतान सिकंदर लोधी याच्या काळात ते लिहवून घेतले गेले. यातील बहुतेक सर्व पृष्ठे ही सचित्र आहेत. पृष्ठाच्या अर्ध्या भागात लिहिलेल्या मजकुरासंबंधीची रंगीत चित्रे उरलेल्या अर्ध्या भागात आहेत. आज पाचशे वर्षांनंतरही त्यातील रंग ताजे दिसतात.
    हस्तलिखितं वा पुस्तकं माणसांप्रमाणे आपआपले दैव घेऊन येतात असे म्हटले जाते. ते या हस्तलिखिताबाबतीत अगदीच खरे आहे. हस्तलिखितांचे तज्ज्ञ, संस्कृत पंडित प्रो. वेलणकर यांनी हे वैशिष्ट्य आपल्या बृहद्-सूचीत नोंदवले. पण त्या वेळी त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेले नव्हते. काही वर्षांनी एशियाटिकच्या तत्कालीन ग्रंथपालांच्या लक्षात ही बाब आली. त्यांनी ते संशोधक दुर्गाबाई भागवत यांना सांगितले, दाखवले. बाईंनी ते प्राचीन भारतीय चित्रकलेचे प्रसिद्ध अभ्यासक कार्ल खंडालवाला व प्राचीन कलेतिहासतज्ज्ञ डॉ. मोतीचंद्र यांना दाखवले. आणि मग इतिहासच घडला. भारतीय चित्रकलेतील लघुचित्रकलेच्या (Miniature Painting) इतिहासाचा व प्राचीनत्वाचा तो मोठा पुरावा होता. या दोघांनी त्यावर पुस्तक लिहिले, एशियाटिकने ते प्रसिद्ध केले, आणि हे हस्तलिखित एकदम ऐतिहासिक महत्त्वाचे ठरले.
  • पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी नेपाळपर्यंत प्रवास करत तेथून १९-२० हस्तलिखितं आणली. ती सर्व बौद्ध धर्मासंबंधीची आहेत. ही हस्तलिखितं पामवृक्षाच्या पानांवर लिहिलेली आहेत. यांपैकी ‘अष्टसाहस्रिका प्रज्ञापारमिता’ हे दुर्मिळ म्हणून त्याचे महत्त्व आहेच, पण यातील लेखन तिरक्या पद्धतीने केलेले असल्याने ते वैशिष्ट्यपूर्ण आहे, व सुलेखनपद्धतीचाही ते एक उत्कृष्ट नमुना आहे. संस्कृतमधील या हस्तलिखिताची रचना आगळीवेगळी आहे. यात; मधील सहा पृष्ठांवर मुकुटधारी बुद्ध व महायान पंथातील देवता यांची सुंदर, रंगीत लघुचित्रे आहेत. बाराव्या शतकातील या लघुचित्रांनी संशोधकांना मोहवून टाकले होते. त्यांचा उपयोग बौद्ध धर्माच्या अभ्यासाला मोठ्या प्रमाणावर झाला.
  • जैनधर्मीयांसाठी महत्त्वाची जी अनेक हस्तलिखितं आहेत, त्यांपैकी ‘शीलरथचित्र’ या केवळ दहा पृष्ठांच्या हस्तलिखितात १८ चित्रांतून जैन तत्त्वज्ञानातील ‘शील’ या संकल्पनेचे चित्रण केले आहे. विविध परिस्थितीत मानवाच्या मनाचा कल कसा असतो, त्याची मनोरचना कशी असते, हे रथाच्या प्रतीकाचा उपयोग करत सांगण्याचा प्रयत्न आहे. काहीसे गूढ वाटावे असे हे चित्र अतिशय बारकाव्याने काढलेले आहे.
  • वेदान्त संप्रदायाच्या तीन शाखांपैकी विशिष्टाद्वैतवादाचे प्रवर्तक रामानुजाचार्य यांची तत्त्वत्रयी महत्त्वाची मानली जाते. हस्तलिखित रूपात ती तत्त्वत्रयी आज फक्त एशियाटिकच्या संग्रहात आहे. हे हस्तलिखित छोटेसे केवळ १२ पृष्ठांचे असले तरी वेदान्त तत्त्वज्ञानाचा अर्क म्हणून व आज एकच प्रत उपलब्ध असल्याने दुर्मिळ ठरले आहे. तसेच पंडित भगवानलाल इंद्राजी यांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काशी इथे ते मिळवून, त्याची आपल्या हस्ताक्षरात प्रत केल्याने याचे मोल वाढले आहे.
  • इटालियन महाकवी अलिघरी दान्ते याचे प्रदीर्घ महाकाव्य ‘द डिव्हाइन कॉमेडी’चे हस्तलिखित म्हणजे एशियाटिकच्या हस्तलिखित संग्रहातील मानाचे पान आहे. संपूर्ण काव्य किमती चामड्याच्या बांधणीत बांधलेले आहे. त्याच्या प्रत्येक पानातील मजकुराच्या चारही बाजूंनी सोन्याच्या वर्खाची वेलबुट्टी आहे. माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन याच्या संग्रहातील ही प्रत त्याने एशियाटिकला मोठ्या प्रेमाने भेट दिलेली आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘डिव्हाइन कॉमेडी’ साऱ्या जगात नेटवर उपलब्ध होत असली तरी, अशी प्रत्यक्ष प्रत जगभरात हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढ्याच ठिकाणी आहे. ती प्रत एशियाटिकमध्ये आहे हे आपलं भाग्य. अनेक संग्राहक त्या प्रतीसाठी आपापले खिसे पूर्णपणे रिकामे करायला उत्सुक आहेत, कारण ती प्रत तेवढी देखणी आहेच. दृष्टान्तकथा वा रूपककथा रूपातील या दैवी किंवा स्वर्गीय सुखान्तिकेत मृत्यूनंतरच्या प्रवासातील तीन टप्पे वर्णन केले आहेत. आधी नरक, मग पापक्षालनाची जागा, व शेवटी स्वर्ग. जागतिक अभिजात वाङ्मयात या कृतीचा वरचा क्रमांक आहे.
  • अकबराच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक असा अबुल फैजी याने संपूर्ण महाभारत पर्शियन भाषेत लिहिले, त्याचीही प्रत एशियाटिकमध्ये आहे. अकबराच्या आज्ञेनुसार हे भाषांतराचे काम हाती घेतले गेले. त्यासाठी संस्कृत जाणणाऱ्या हिंदू लोकांची मदत घेऊन कच्चे भाषांतर केले जाई आणि शेवटी फैजी त्याला अभिजात पर्शियन भाषेचा साज चढवी. त्याने भास्कराचार्यांच्या ‘लीलावती’चे भाषांतरही केले होते. पर्शियनमधील महाभारताला ‘रज्मनामा’ (लढाईच्या गोष्टी) असे नाव आहे. गुणग्राहकता सर्व भेदांपलीकडे कशी असते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.
  • फिरदौसी या कवीच्या ‘शाहनामा’ काव्याची इ.स.१४९५मधील प्रत इथे आहे. ही प्रत संपूर्णपणे सचित्र आहे. ते काव्य पर्शियनमध्येच आहे. याशिवाय याच शाहनामाची इ.स.१८४३मधील एक हस्तलिखित प्रत आहे. ही प्रत मात्र सचित्र नाही. ‘शाहनामा’ म्हणजे राजांच्या गोष्टींबद्दलचे पुस्तक. इराणच्या राजांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी या महाकाव्यात सांगितल्या आहेत. खरं म्हणजे हे प्रदीर्घ काव्य इ.स. १०००च्या आसपासच लिहिले गेले होते. यात ५०,००० दिश्टी (दोन-दोन ओळींचे कडवे) आहेत. पुढे मौखिक परंपरेने ते चालत आले. पर्शियन भाषा व संस्कृती यांचा गौरव यात आहे.
  • थॉमस कार्लाईल (१७९५-१८८१) हा प्रसिद्ध स्कॉटिश इतिहासतज्ज्ञ, निबंधकार आणि लेखक. साहित्येतिहासावर त्याने काही व्याख्याने दिली होती, ज्यात वाङ्मयेतिहासाच्या व्याख्येपासून साहित्येतिहासाचा संपूर्ण अभ्यासक्रम कसा असावा याचे सविस्तर व मूलगामी मार्गदर्शन आहे. त्याच्या हस्ताक्षरातील हे हस्तलिखितं फारच विचारप्रवर्तक व मौल्यवान आहे.
  • ‘अवलोकितेश्वर स्तोत्र’, ‘कारण्डव्यूह’ इत्यादी बौद्ध धर्मासंबंधीची हस्तलिखितं सचित्र व पामवृक्षाच्या पानांवरील असल्याने त्यांचे मोल अधिक आहे.
  • जैन धर्मातील भद्रबाहुलिखित ‘कल्पसूत्र’ हा महत्त्वाचा ग्रंथ. त्याची १३-१४ वेगवेगळी हस्तलिखितं एशियाटिकच्या संग्रहात आहेत. त्यांपैकी दोन सचित्र आहेत. त्यातील चित्रं अतिशय अर्थपूर्ण व रंग अगदी ताजे वाटावेत असे आहेत. ही मूळ कृती प्राकृतात आहे; पण यावर केलेली भाष्ये, अथवा टीका (स्पष्टीकरणे या अर्थी) मात्र संस्कृतात आहेत.
  • गुजराती, हिंदी व मराठी भाषांमधीलही हस्तलिखितं एशियाटिकच्या संग्रहात आहेत.
  • हिंदीमधील हस्तलिखितांमध्ये वैद्यकशास्त्रावरील ३-४ कृतीत सैद पाहार नावाच्या लेखकाने वैद्यकशास्त्रावर लिहिलेले ‘रसरत्नाकर’ हे हस्तलिखित आहे. त्यात पारा कसा तयार करावा याची कृती आहे. सैद बहुधा हकीम असावा. रामकवीश्वर नावाच्या अकबराच्या दरबारातील कवीचे ‘रामविनोद’ नावाचे हस्तलिखित आहे. त्यात ‘विनोद’ नसून वैद्यकाबद्दलच माहिती आहे.
Meena-Vaishampayan

ही सारी हस्तलिखितं प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्यातील समृद्धीची व देखणेपणाची कल्पना येणे अवघड आहे. ग्रंथप्रेमींना त्याची निदान झलक द्यावी हा या लिखाणामागचा उद्देश.
हस्तलिखिताचे आधुनिक काळातले सर्वसंचारी रुप म्हणजे मुद्रित ग्रंथ. त्यांना हस्तलिखितासारखा मानवी स्पर्श नसला तरी ग्रंथप्रसारासाठी तेच रूप सोयीचं आहे. त्यामुळे साऱ्या ग्रंथोपजीवींना त्यांचा वाचनानंद मिळावा अशी इच्छा व्यक्त करावीशी वाटते. कारण ग्रंथ नाहीत तर काय उरेल? जॉर्ज मार्टीन म्हणतो, ‘‘या एका जन्मात मी हजारो जन्म जगलो, हजारांवर प्रेम केलं, दूरदूरचे प्रदेश पालथे घातले आणि काळाचा अंतही जाणला, कारण मी पुस्तकं वाचली.’’

-मीना वैशंपायन

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२०


तुम्हाला ही पुस्तकं वाचायला आवडतील…


Pradeep Champanerkar photo
वाचावंसं असं काही…

डॉक्टरची पाटी, गूगल आणि वाचन-उद्देश (जागतिक पुस्तक दिन विशेष लेख)

पुष्कळशी जनता अशी आहे की, ती भरपूर वाचन करते. त्यांच्या वाचनात विषयवैविध्यही असतं. त्यापैकी काही जणं प्रगल्भ होतात. वाचनातून त्यांच्या मनाची उत्तम मशागत होते. जीवनाच्या विविध अंगांशी ते परिचित होतात. त्यांचं ज्ञानभांडार वाढतं. त्या ज्ञानावर जर विचारांची प्रक्रिया झाली तर, त्यांचं एकंदर विचारविश्व विस्तारतं.

लेख वाचा…


Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *