योगसाधना : एक सर्वस्पर्शी साधना
भारतीय संस्कृतीत योगविद्येस महत्त्वाचे स्थान आहे. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक दर्शन आहे. योगशास्त्र हे अतिप्राचीन भारतीय शास्त्र असून, ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडून मानवजातीस मिळालेले वरदान आहे अशी श्रद्धा आहे. ‘महामुनी पतंजलीं’नी खिस्तपूर्व सुमारे दोनशे वर्षांपूर्वी योगसाधनेची मांडणी सूत्ररूपाने केली. त्याअगोदर योगविषयक माहिती अनेक वेदग्रंथांतून इतस्तत: विखुरलेली आढळते. पुढे मात्र याचा विस्तार वेगवेगळ्या योग-उपनिषदांतून, संहितेतून, तसेच ‘हठयोग-प्रदीपिका’, ‘घेरंडसंहिता’, ‘शिवसंहिता’ इत्यादी ग्रंथांतून झालेला दिसतो. तसेच योग विषयाचे स्वरूपही काळानुरूप बदललेले, परंतु तत्त्वत: बुद्धिनिष्ठ राहिलेले आढळते. मनुष्यामध्ये शारीरिक, मानसिक, नैतिक आणि आध्यात्मिक बदल घडवून त्याद्वारे केवळ त्याचीच नव्हे, तर समाजाची सांस्कृतिक पातळी उंचावण्याची क्षमता या शास्त्रात आहे.
मानवजातीस वरदान ठरणारे हे शास्त्र काळाच्या ओघात अस्तंगत झाल्याचा भास झाला तरी गेल्या अर्धशतकात सर्वसामान्यांत या शास्त्राविषयी कुतूहल व योगसाधनेबद्दल जिज्ञासा निर्माण झाल्याचे आढळते. योग तत्त्वज्ञानाचा प्रसार व योगाभ्यासाचे शिक्षण देण्याचे कार्य अनेक संस्थांनी व अनेक व्यक्तींनी अंगीकारल्याने ‘योगदीप’ पुन्हा एकदा प्रज्वलित झाल्याचे दिसते. मन, बुद्धी, अहंकार व चित्त यांचे लेणे ल्यालेल्या मानवाचे वैशिष्ट्य असे की, तो पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने बाह्य सृष्टीचे व घटनांचे अवलोकन करतो, त्यांचा उपयोग करून घेतो व ती आत्मसात करतो. त्यामुळे त्याच्यात विविध प्रकारच्या चांगल्या-वाईट वृत्ती निर्माण होतात. या वृत्तींच्या प्रभावाखाली माणूस अनेकदा आपल्या सत्-असत् जाणण्याच्या क्षमतेचा वापर न करता कृती करतो आणि त्यातूनच सुख-दु:खाची निर्मिती होते. अपप्रवृत्ती प्रभावी असल्याने बहुतेक वेळा ‘सुख थोडे, दु:ख फार’ अशीच स्थिती होते. भरीस भर म्हणून प्रत्येकाची शारीरिक व मानसिक अवस्था, कौटुंबिक व आर्थिक परिस्थिती, सामाजिक बदल अशा अनेक बाबी सुख-दु:खांचे प्रमाण अधिकाधिक वाढवत असतात.
औद्योगिक क्रांतीपूर्वीचा भारतीय समाज हा मुख्यत: शेतीप्रधान होता. वंशपरंपरागत उद्योग-व्यवसाय, एकत्र कुटुंबपद्धती, स्वयंपूर्ण खेडी व धर्माचा प्रभाव यांमुळे व्यापार-उदिमाचे प्रमाण कमी व पैशाचा वापर मर्यादित स्वरूपात होता. त्या वेळच्या व्यक्तिगत अडचणी, दु:खे व सामाजिक प्रश्न यांचे स्वरूप व प्रमाण भिन्न प्रकारचे होते. तुलनेने तीव्रता कमी होती. गेल्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे पूर्वीपेक्षा पैशाला महत्त्व आले. श्रेष्ठतेचे निकष बदलले. मूल्ये बदलली. अन्य संस्कृतींचा प्रभाव वाढत गेला. या साऱ्यातून माणसापुढील प्रश्न, अडचणी व दु:खे कमी न होता उलट वाढत गेली. अगदी अलीकडच्या काळातील आर्थिक उदारीकरण व भांडवलप्रधान अर्थव्यवस्था, तसेच स्पर्धा व वेग यांमुळे मानवापुढील अनेक प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले. रोजगार व बेकारी यांचे प्रश्न अधिकच वाढले. महाकाय शहरात अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा प्राप्त करणे दुरापास्त झाले. दुसरीकडे किमान गरजांची कक्षा अधिकाधिक रुंदावतच चालली. गरजदेखील अधाशी होत चालली. अतृप्तीला सीमारेषा राहिली नाही.
स्त्रियांचे भावनिक प्रश्न अधिकच जटिल झाले. गृहिणीस गृहकृत्य व अर्थार्जन अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागल्या. त्यातूनच नवे कौटुंबिक प्रश्न निर्माण झाले. स्त्रियांपुढील प्रश्नांनी वेगळे स्वरूप धारण केले. वृद्धांचे प्रश्न नव्याने पुढे येत आहेत. स्पर्धात्मक परीक्षेमुळे विद्यार्थी वर्ग वैतागत आहे. आधुनिक सुविधांनी जीवन सुकर केले, परंतु ‘जिणं’ दुष्कर केलं. घाई, गडबड, गोंधळ, वेग, ताणतणाव यांच्या धावपळीत काळजी, निराशा व उद्वेग यांनी वेढलेल्या माणसाला ह्रदरोग, मधुमेह, रक्तदाब यांनी त्रस्त केलं. कामाचा ठिकाणी सतत उभं राहून अथवा एका जागी खुर्चीत बसल्यामुळे शरीराच्या मोकळ्या हालचालींना बाधा येऊन मणक्यांचे आजार, संधिवात, कंपवात, अंगदुखी वाढली; तर बौद्धिक कामात सतत गुंतलेल्यांना डोकेदुखी, मानसिक विकार आदींची ‘देणगी’ मिळाली.
वेगवान जीवनशैलीमुळे ‘आज इथे तर उद्या तिथे’ अशा धावपळीत ‘शांतिरेव शांति:’ याचा अनुभव तरी केव्हा घेणार? तरीदेखील बुद्धिप्रधान मानव कधीच खचत नाही. तो संशोधनप्रिय आहे. नैराश्याच्या समुद्रातून तो आशेचे मोती वेचतो. त्याची आंतरिक ओढ अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची आहे. आपल्यापेक्षाही श्रेष्ठ असं परमतत्त्व या जगात आहे. या उच्च भावनेतून त्याने विविध तत्त्वविचार मांडले, शास्त्रविचार मांडले आणि जीवनातील अडचणी व दु:ख यांवर मात करण्यासाठी आणखी वेगळ्या पद्धतीची जीवनशैली आहे काय, याचा विचार करताना त्याला झाला ‘योगसाक्षात्कार!’
भारतीय योगदर्शन हे जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे एकमेव स्वयंपूर्ण असे शास्त्र आहे. ते ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांना योग्य वळण लावून, त्यांचा निग्रह करून, मानसिक संतुलन बिघडवणाऱ्या बाह्य विषयांपासून परावृत्त करून, अंतत: आत्मसाक्षात्कार कैवल्यप्राप्ती या अंतिम ध्येयाकडे पोचवणारे आहे. सर्वसामान्य लोकांना, तुम्हांआम्हांला आरोग्य, मन:शांती, व्यक्तिविकास, गुणविकास किंवा नैतिक, शारीरिक, मानसिक अशा सर्वांगीण उन्नतीसाठी व बौद्धिक विकासासाठी व जीवनातील दैनंदिन प्रश्नांना धैर्याने सामोरे जाण्यासाठी मनोबल देणारे आहे. तेव्हा सर्वसामान्यांची छोटी-मोठी ध्येये डोळ्यांसमोर ठेवून ‘योग’ अंगीकारल्यास तो कसा सर्वस्पर्शी आहे हे लक्षात येईल. पुढील लेखात योगाचा परिचय करून घेऊ.
- आरोग्य योग : आसन-प्राणायाम, धारणा-ध्यान
- लेखक : बी.के.एस. अय्यंगार
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून 2021