सगळ्या कार्पोरेट क्षेत्रात ‘आउट ऑफ द बॉक्स’ ही संकल्पना, ही फ्रेज फार लोकप्रिय आहे. प्रत्येक वरिष्ठ त्याच्या त्याच्या हाताखालच्यांना सतत हेच सांगत असतो, ‘‘थिंक आउट ऑफ द बॉक्स!’’ प्रत्यक्षात त्या वरिष्ठालाही काही माहिती नसतं की, म्हणजे नेमकं काय? कारण ज्यांना आपण ‘आउट ऑफ द बॉक्स’ कल्पना म्हणू शकतो, त्या शेकड्यानं किंवा डझनानं जन्माला येत नसतात. त्या परिस्थितीतून आणि क्वचित कधीतरी वीज चमकावी आणि लूप्त व्हावी तशा जन्माला येत असतात. गंमत म्हणजे, अशी एखादी कल्पना सुचली आणि ती अमलात आणली की मग वाटू लागतं, अरे! आपल्याला हे आधी का नाही सुचलं? गेले दोन महिने करोनासंसर्गाच्या भीतीच्या छायेत वावरताना जगणं जणू एका जागी थांबलेलं आहे. परंतु माणूस हा बुद्धीच्या वापरातूनच उत्क्रांत झालेला असल्याने कोणत्याही परिस्थितीत तो फार काळ ‘जैसे थे’ राहू शकत नाही. फरक एवढाच असू शकतो की, कुणाला परिस्थितीचं भान लवकर येतं, कुणाला उशिरा. मी स्वत: वृत्तपत्राच्या सतत २४ तास जागं राहण्याच्या व्यवसायात असल्याने आणि गेल्या दोन महिन्यांत एकही दिवस ‘आज काय करावं?’ असा प्रश्न न पडल्याने अशा प्रयत्नाकडे डोळसपणे पाहू शकतो. पुस्तकखरेदी, साहित्यविचार या गोष्टी प्राधान्य क्रमाच्या यादीत अखेरच्या क्रमांकावर असतानाच्या या काळात रोहन प्रकाशनाने नव्या तंत्रज्ञानाचा हात धरला. प्रकाशन संस्था, त्यांची पुस्तकं, लेखक चर्चेत राहतील हे पाहिलं आणि या उपक्रमाचं यश पाहून त्यांनाही हेच वाटलं असेल, अरे! आपल्याला हे आधी का नाही सुचलं? या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की, परिस्थितीच्या पोटातूनच काही गोष्टी जन्माला येत असतात, आधी त्या आसपास असूनही दिसत नाहीत.
मी ‘गपशप दिलसे’ बद्दल बोलतो आहे हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्या मूलभूत गरजा जर सोडल्या तर इतर सर्व गोष्टींचा अंगीकार आपण सोयीनं, सवयीनं अथवा स्वार्थानं करत असतो. केवळ ‘जगणं’ एवढाच हेतू असण्याच्या गेल्या दोन महिन्यांच्या काळात ललित साहित्य वाचनात आपला ना स्वार्थ आहे ना सोय, आहे ती केवळ सवय. सवय मोडूही शकते. करोनाच्या काळात आपलं विश्व चार भिंतींपुरतं मर्यादित झालं आणि हे किती दिवस चालणार याची काही कल्पनाही करता येईना, तेव्हा अनेकांना एक प्रश्न पडला- ‘जेव्हा केव्हा करोनाचा विळखा सुटेल, माणसं माणसाप्रमाणं जगू शकतील तेव्हा आपण आज ज्या स्थानी आहोत तिथे असू ना?’ या प्रश्नाच्या उत्तरात काहींनी, ‘तेव्हाचं तेव्हा बघून घेऊ’ असं म्हटलं असेल, काहींना कदाचित असा प्रश्नच अस्थानी वाटला असेल, काहींना हतबल झाल्यासारखं वाटलं असेल, तर काहींनी ‘पडलेल्या पाण्यात हात-पाय मारत राहिलं पाहिजे’ अशी खूणगाठ बांधून तसे प्रयत्न केले असतील. ‘गपशप दिलसे’ हा असाच एक यशस्वी प्रयत्न आहे. रोहनच्या इतर लेखकांप्रमाणेच मी स्वत:ही यात सहभागी झालो होतो, त्यामुळे या कार्यक्रमातून काय साध्य झालं याची लेखकीय बाजू मी अनुभवली आहे. रोहनचं फेसबुक पेज आधीही होतं, फेसबुक लाइव्ह ही संकल्पना ही गेली तीन-चार वर्षं चांगलीच रुळलेली आहे, परंतु तिचा असाही प्रभावी वापर करता येऊ शकतो हे कळायला ‘करोनाकाळ’ यावा लागला.
गेल्या वर्षी जयवंत दळवी पुरस्कार मिळालेल्या ‘दीड दमडी’ या पुस्तकाच्या दोन भागांबद्दल मी ‘गपशप दिलसे’मध्ये बोललो. पुस्तकाविषयी लेखकाशी चर्चा असाच सर्व कार्यक्रमांचा रोख होता. परंतु ‘दीड दमडी’तले बरेचसे लेख हे सादरीकरणाच्या शैलीत लिहिलेले आहेत. त्यामुळे गपशपमध्येही त्यातील दोन भागांचं वाचन करायचं ठरलं. ठाण्याला झालेल्या दळवी पुरस्कार समारंभात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम वाचन केलं होतं, त्यामुळे गपशपसाठीही त्यांनाच विनंती केली. मृणाल स्वत: या सदराच्या चाहत्या आहेत आणि त्यांनी वेळोवेळी मला आवर्जून दाद दिली आहे. त्या वाचतात तेव्हा मला अनेकदा प्रश्न पडतो, ‘हे आपणच लिहिलं का?’ ‘गपशप’मध्येही तेच झालं. ज्या मोकळेपणानं त्यांनी अभिवाचन केलं त्याच मोकळेपणी पुढील कार्यक्रमाची सूत्रं हाती घेत त्यांनी या फेसबुक लाइव्ह दरम्यान आलेले प्रश्न विचारून गपशप रंजक केली. हा लेख लिहिता लिहिता मी रोहनच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिलं तेव्हा आजवर दीड दमडीच्या गपशपचा व्हीडीओ ६७०० वाचकांनी पाहिल्याचं दिसलं. दोनेकशे वाचकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. (श्रीकांत बोजेवार यांच्याशी झालेल्या गप्पा इथे पाहता येतील.)
कोणत्याही सभागृहात असा कार्यक्रम केला तर तीन-चारशेहून अधिक वाचकांना सामावून घेणं कठीण आहे. दोनशे वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधणं तर अशक्यच आहे. ही या नव्या माध्यमाची ताकद आहे आणि काही महिन्यांनी स्थिती सामान्य झाल्यावरही गपशप सुरूच ठेवण्याची निकड त्यातून स्पष्ट होते. वाचक आपल्या घरी बसून आरामात पाहू-ऐकू शकतो. लेखक त्याच्या सोयीने संवाद साधू शकतो. कार्यक्रमाच्या असतात तशा औपचारिकता नाहीत, हार-तुरे नाहीत. थेट संवाद, थेट विषयाची सुरुवात. प्रकाशक केवळ त्याचे ‘व्हर्च्युअल व्यासपीठ’ उपलब्ध करून देतो. या गपशपला रोहनने एक कल्पक जोड दिली आहे. त्याची कॅचलाइन आहे, ‘ताज्या पुस्तकाविषयी दोन गोष्टी – थोडी चाय आणि मस्त गप्पा.’ या वाक्यात व्यवहार आहे, व्यवसाय आहे, सहज सलगी आहे आणि ‘थोडी चाय’चा गोडवाही आहे. गप्पा ऐकताना आपण ‘घरचा चहा’ म्हणजे आपल्याला हवा तसा चहा घेऊ शकतो.
सचिन कुंडलकर, हृषीकेश गुप्ते, प्रणव सखदेव, आशुतोष जावडेकर, मृदुला दाढे असे माझे आवडते लेखक-मित्र आणि रोहनच्या प्रभावळीतील इतरही लेखक आजवर या गप्पांमध्ये सहभागी झालेले आहेत. या गप्पांना समारंभाचा फील नसल्याने त्या अधिक मोकळेपणी होतात, सहज होतात. त्यात अभिनिवेश नसतो. प्रश्न विचारणारेही तेवढ्याच सहजतेनं सहभागी होतात. अनेकांना समारंभात प्रश्न विचारण्याचं धैर्य नसतं, त्यांच्यासाठी तर हे माध्यम फारच सोयीचं आहे. मृदुला दाढे यांचं ‘रहे ना रहे हम’ हे माझ्याही आवडीचं पुस्तक, कारण चित्रपटसंगीतानं मनाचा एक कोपरा व्यापलेला आहे. त्यातही गायिका, लेखिका आणि अचूक विश्लेषक असा सुखद योगायोग त्यांच्या ठायी झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या संगीतमय गप्पा ‘दिल से’ न होत्या तरच नवल. त्यांच्या व्हीडीओंना मिळालेले व्ह्यूज त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. सचिन कुंडलकर हा मित्र आणि आवडता दिग्दर्शक. त्याचा सिनेमा आवडला नाही हेही त्याला मी तेवढ्याच सहजतेनं सांगू शकतो (आणि तो ऐकूनही घेतो), तो गप्पांमध्ये नेहमीच सहज आणि ठाम असतो. त्याची मते अनेकदा टोकाची असतात, रूढ समजांना धक्का देण्याची त्याला उपजत खोड आहे. परंतु ‘कोबाल्ट ब्ल्यू’सारखी कादंबरी वाचताना वाटून जातं, ‘आपण याला मित्र म्हणू शकतो हे केवढं भाग्य!’ त्याच्या दिलसे गप्पाही आनंद देऊन गेल्या. त्याची प्रत्यक्ष भेट शक्य नसताना ती इथे तरी झाली. हृषीकेश गुप्तेची ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ ही कथा वाचल्यापासूनच मी त्याचा चाहता झालो होतो. तो कल्पनांशी खेळणारा लेखक आहे आणि शहर-गाव अशा दोन्ही सामाजिक मानसिकतांची नाडी त्याला सापडलेली आहे. त्याच्या लेखनाला ‘रस्टिक’ म्हणतात तसा एक फील आहे, जो फार दुर्मीळ आहे. त्यातूनच साहित्याला दीर्घकालीनत्व मिळतं. प्रणवच्या संवेदना अधिक शहरी आहेत. सॉफिस्टिकेटेड जगण्यातल्या फटी त्याला नेमक्या आणि नीट दिसतात. भौतिक प्रगतीमधली अधोगती तो नेमकी शोधून काढतो. विषयांचा चौफेर संचार ही आशुतोष जावडेकरची ताकद आहे. संगीताचे मर्म, तारुण्याची ऊर्मी, वाचनाच्या आस्वादनातील गमती आणि देशी रसिकतेला विदेशी परिमाणे लावून जोखण्याची त्याच्याकडे असलेली ताकद या त्याच्या लेखनाला वयाचा स्पर्श कधी होत नाही. असे वेगवेगळ्या प्रकृतीचे मित्र-लेखक लॉकडाउनच्या या काळात घरबसल्या भेटले, बोलले.
यांच्याशिवायही रोहनचे इतर महत्त्वाचे लेखकही ‘गपशप’मध्ये येऊन गेले आणि या सातत्यातूनच हे नवे व्यासपीठ ठळकपणे लक्षात आले. रोहनला वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या एका नव्या दरवाजाची किल्ली यातून मिळालेली आहे. परंतु या दरवाजाचे महाद्वार व्हायचे असेल तर या सगळ्या खटाटोपातून प्रत्यक्ष विक्री किती होते, या प्रश्नाचे उत्तर कालांतराने शोधावे लागेल. सध्या ते शोधण्याची गरज नाही, कारण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, ‘करोनाचा विळखा सुटेल तेव्हा आपण आज ज्या स्थानी आहोत तिथे असू ना?’ या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची ही प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमात पुस्तकांची थेट विक्री होते, तशी या प्रकारच्या कार्यक्रमातून मागणीची नोंदणी झाली तर असे प्रयत्न अधिक सुफळ संपूर्ण होतील. आज लोकांकडे जेवढा वेळ, रिकामपण आहे तेवढे करोनापश्चात नसेल; तेव्हा अर्थातच कार्यक्रमांची संख्या कमी होईल. पण ती झाली पुढची गोष्ट. तूर्तास हे ‘दिलसे’ अगदी ‘मन’से झाले!
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जून २०२०
अपडेट्ससाठी ‘रोहन’चं फेसबुक पेज फॉलो करा : https://www.facebook.com/RohanPrakashan/