प्रणव सखदेव हे नव्या पिढीतील कथाकार आणि कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. वेगळ्या वाटा आणि वळणांची कथा त्यांनी लिहिली. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित आहे. ‘निळ्या दाताची दंतकथा’ व ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. विशेषत: तरुणाईच्या दृष्टीने जग न्याहाळण्याची त्यांची म्हणून एक पद्धत आहे. कमी व्यक्तींच्या सहसंबंधातून नागर संवेदनेचा समाजावकाश आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ते उभा करत आहेत. उत्तर आधुनिकतावादातून आलेली काही सूत्रं; प्रणव सखदेव यांच्या साहित्यामधून व्यक्त झाली आहेत. अलीकडेच त्यांची रोहन प्रकाशनाने ‘९६ मेट्रोमॉल’ नावाची लघुकादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरीच्या मनोगतात आणि मलपृष्ठावर तिचा ‘अद्भुतिका’ म्हणून उल्लेख केला आहे. ही कादंबरी ‘अ‍ॅलिसच्या वंडरलँड’ला अर्पण केली आहे. ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’चे भाषांतर करताना या कादंबरीचं कथाबीज सुचल्याचं प्रणव सखदेव यांनी म्हटलं आहे. ‘९६ मेट्रोमॉल’ या कादंबरीतही त्यांनी असाच एक अभिनव कल्पिताचा खेळ रचला आहे. अद्भुत अनिर्बंध कल्पनाशीलतेचा वेगळा आविष्कार या कादंबरीत आहे. वर्तमान हा नव्या काळाच्या तसेच भविष्याच्या पृष्ठभूमीचे बहुमितीय दर्शन ‘९६ मेट्रोमॉल’ या कादंबरीत आहे. कादंबरीच्या आरंभी एका पृष्ठाचा मजकूर छापला आहे, तसंच निवेदकाच्या पत्नीला अ‍ॅमेझॉन डॉट कॉमवरून आलेल्या कातडी बॅगेत कोंबलेल्या कागदातून कादंबरीचं स्क्रिप्ट सापडतं अशी क्लृप्ती योजिली आहे.

कथनात विविध प्रकारचे खेळ आहेत. अ‍ॅनिमेशनसदृश कथनतंत्र आहे. आभासी तंत्रज्ञानाचा अवकाश आहे. मानवी जगण्याचं आणि त्याच्या वस्तू नातेसंबंधाचं विविध खेळांमध्ये रूपांतर झाले आहे.

जुन्या काळी वामन मल्हार जोशी यांच्या ‘आश्रमहरिणी’ या कादंबरीची आठवण व्हावी अशी ही क्लृप्ती आहे. त्या कादंबरीतही जुनीपुराणी एक पोथी सापडल्याचा उल्लेख आहे आणि त्यानंतर कथनसूत्र सुरू होतं. अशीच ही क्लृप्ती आहे. वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने खूप काही साध्य केलं. वरकरणी सुखकारक आणि भौतिकतेच्या पल्याडामधून मानवी संबंधाचं वेगळं जग निर्माण होत आहे. या नव्या घडण अवकाशाचे कल्पचित्र या कादंबरीत आहे. ‘बाजारकेंद्री’ जगाची घडण आणि त्याचा वर्तनव्यवहार, नवी चिन्हसृष्टी आणि अनिर्बंध कल्पनाशीलतेचा कादंबरीत वापर केला आहे. आजच्या आणि उद्याच्या भांडवली बाजारभूमीतून निर्माण झालेल्या निरंकुश सत्तेची अवकाशभूमी या कादंबरीची पृष्ठभूमी आहे. आणि त्यातून त्याविषयीचे कल व्यक्त झाले आहेत. अर्थात, हा अवकाश व्यक्तिदर्शनातून न्याहाळला आहे.

मयंक या तरुणाच्या रात्रीच्या स्वप्नावस्थेतून निर्माण झालेली कथनसृष्टी कादंबरीत आहे. मयंकच्या स्वप्नात वास्तव आणि अवास्तव कल्पनाशीलतेच्या संबंधातून कथन आकाराला आलं आहे. मानवी जीवनाचा कायाकल्पातून घडणाऱ्या भविष्यसमाजाचं चित्र आणि त्याच्या शक्यतांचा पट कादंबरीत आहे. मयंकच्या स्वप्नातील कल्पनाशीलतेचे धागेदोरे वर्तमानात आहेत. या संदर्भात विविध प्रकारचे ‘खेळ’ या कादंबरीत रचले आहेत. मानवाची विविध रूपातील अवस्थांतरणं तसंच वस्तूंच्या कायांतरणाचे चित्र कादंबरीत आहे. माणसांचं लघुतम अवयवांमध्ये रूपांतर होणं. मयंकचे अतिशय लहानरूपात काही इंचात रूपांतरण होतं. या पहिल्या स्वप्न खेळावस्थेमध्ये भांडवली समाज रचनेचे संदर्भ आहेत. मुख्यत्वे नवे जग हे बाजाराचे जग आहेत. मार्केटचा हव्यास, वस्तूंची अपरिमित निर्मिती आणि कंझ्यूमर सोसायटीला आलेले महत्त्व ही त्याची पृष्ठभूमी आहे. महाकाय वस्तूंचं मानवी जगावर प्रचंड वेगाने आक्रमण आहे. त्यामुळे मोबाईल ड्यूडवर अवलंबून असणाऱ्या आणि त्याच्या आहारी अलगद गेलेल्या समाजाचं चित्र कादंबरीत आहे. विक्रीमूल्यास अपरिहार्य महत्त्व असणाऱ्या समाजातील जुनं आणि नवं यांच्यातील ताणदेखील त्यामधून आविष्कृत झाले आहेत. नव्या काळाने मानवी सुखाची कल्पना बदलवून टाकली आहे. फ्रीजसारख्या वस्तू कृतीखेळातून कादंबरी कथनाला वेगळं परिमाण प्राप्त झालं आहे. ‘वस्तूशिवाय आहे तरी कोण आपल्याला या जगात’ या विचाराचं सूचन कादंबरीत आहे. मानवी देहाचं वस्तूंमध्ये रूपांतर झालं आहे. या वस्तू मानवी जगावर आक्रमण करत असून त्यामुळे मानवी जगण्याचा पैस अधिकाधिक संकोचत आहे. चंदेरी द्रव धारण केल्यामुळे मानवी देहाचे अवाढव्य आकारात रूपांतर होतं. केवळ आणि केवळ ‘एन्जॉय करा’ अशा एका भांडवली तंत्रज्ञानाच्या आभासी जगातील उत्सवी ‘एन्जॉयी’ आणि प्रदर्शनी समाजाचं चित्र कादंबरीत मांडलं गेलं आहे.

कथनात विविध प्रकारचे खेळ आहेत. अ‍ॅनिमेशनसदृश कथनतंत्र आहे. आभासी तंत्रज्ञानाचा अवकाश आहे. मानवी जगण्याचं आणि त्याच्या वस्तू नातेसंबंधाचं विविध खेळांमध्ये रूपांतर झाले आहे.
पोकेमॉन गोष्ट, पब्जी, कँडीक्रश खेळात माणूस विसावला आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या खेळात सहभागी होणं ‘हीच ज्ञानप्राप्ती आहे’ हा नव्या जगाचा मंत्र या कल्पकथनात आहे. वस्तू, पदार्थ आणि माणूस यांच्यातील एकमेकांच्या मिसळणीच्या कथा आहेत. या सर्वांना केवळ आणि केवळ सादर करण्याची, प्रेझेंट करण्याची भूमिका दिलेली आहे. या नव्या आभासी जगाने आणि खेळाने माणसाला एक प्रकारची ग्लानी आणि सुखकारकता आली आहे आणि त्याचं आकर्षण नव्या समाजाला आहे. या खेळाचं रूपांतर भयकारी नाट्यात होतं. वस्तूंच्या मायावी अवकाशाची माणसावर मगरमिठी आहे. आणि तो अलगद एन्जॉयी मोहामुळे या सत्ताकक्षेत विराम पावतो. एकसूत्री आज्ञेवर चालणाऱ्या या जगामध्ये त्याचे ‘स्वातंत्र्य’ हिरावलं जातं. किंबहुना माणसाचा सहजधर्मच या नव्या काळाने हिरावून घेतला आहे. आणि या ‘एन्जॉय’ खेळात सहभागी होणं याशिवाय त्याच्यासमोर पर्याय उभा राहत नाही. किंचितही त्याला विरोध दर्शवला व अलग राहिला तरी तुम्ही या सत्ताशिक्षेस पात्र व्हावं लागतं. या कल्पित खेळात मयंकची कोर्टात रवानगी होते. जिथे न्यायाचं, लोकशाहीचं, समतेचं, मानवी स्वातंत्र्याचे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतात. साऱ्या ‘वस्तूंचे चेहरे खुनशी’ असल्याचा त्याला भास होतो. ‘तिच्या’ सत्तेखाली त्याला काहीच करता येत नाही निमूट सहभागाशिवाय. ‘तिच्या’ अवयवाला नखं आणि शरीराला काटे फुटू लागतात.

Randhir Shinde

आणि ‘तिच्या’ देहाचं श्वापदात रूपांतर झाल्याचं चित्र कादंबरीत आहे. त्याच्या ‘शिक्षासोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट’ केलं जातं. ती त्याचा ‘मेंदू चटाचटा खाते’. या दु:स्वप्नातून मयंक जागा होतो वर्तमानात येतो आणि घरातून थेट बाहेर पडतो तो अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलामध्ये पसार होतो.
प्रणव सखदेव यांनी या लघुकादंबरीत तरुणांच्या जगातून एका कल्पित स्वप्नसृष्टीतून भविष्यकाळाचा कानोसा घेतला आहे. या स्वप्नसृष्टीत मानवी जीवनाला वेढून असणाऱ्या वस्तुकरणाचा विळखा आणि तिच्या एकछत्री सत्तेच्या हुकुमी अवकाशातून निर्माण झालेल्या कालावकाशाचे चित्र आहे. माणूस आता त्याच्या प्रवासवाटचालीत नव्या तंत्रज्ञानप्रणित वस्तूंच्या जगामध्ये शिफ्ट झाला आहे. बाजार आणि उपभोगवादी रचनेची व्याप्ती, पसारा यांनी मानवी जगाचा झालेला संकोच आणि वस्तूकरणाचे अपरिमित महत्त्व याचा पट कादंबरीत आहे. वस्तुमय झालेल्या काळांतरांची आणि युगांतरणाची गोष्ट कादंबरीमधून मांडली आहे. साऱ्या सृष्टीचे रूपांतर झालं आहे. त्याचा एक कानोसा तरुणांच्या जगामधून घेतला आहे. ‘युजरभाऊ’, ‘मीडियाराणी’, ‘मोबाईलड्यूड’ अशा वस्तूंशी जुळलेल्या आणि जडलेल्या नात्यांचं चित्र कादंबरीमध्ये आहे. तरुणांची नव्या काळाची बेधडक भाषा, फँटसी, वास्तवाची विपरीत पुनर्रचनेची नवी चिन्हसृष्टी कादंबरीत आहे. आजच्या आणि उद्याच्या वस्तुमय मानवसमाजाचं चित्र कादंबरीत मांडलं आहे ते महत्त्वाचं ठरतं.

-रणधीर शिंदे

(maharashtralok.com संकेतस्थळावरून साभार)

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


युवा लेखक प्रणव सखदेव यांचं कथा-साहित्य

96 मेट्रोमॉल


प्रणव सखदेव


काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach



170.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा


प्रणव सखदेव


माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’


225.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

प्रणव सखदेव


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *