‘जेपीज् भटकंती टिप्स’ पुस्तकातील निवडक भाग

हल्ली बहुतेक देशांच्या व्हिसासाठी अर्ज करतानाच ‘ओव्हरसीज् मेडिक्लेम इन्शुरन्स’ची कागदपत्रंही जोडावी लागतात. परदेशात वैद्यकीय सेवा खूप महाग असते. त्यामुळे आपल्या मुक्कामाच्या संपूर्ण कालावधीचा वैद्यकीय विमा काढून घ्यावा. त्यात थोडीही काटकसर करण्याचा प्रयत्न होऊ नये. त्यामुळे काय परिस्थिती ओढवते हे पुढील उदाहरणांवरूनच अधिक स्पष्ट होईल –

१) आमच्या सोसायटीतील एक गृहस्थ अमेरिकेत मुलाकडे तीन महिन्यांसाठी गेले होते. मेडिक्लेम पॉलिसीची माहिती विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले आणि माझ्याच ट्रॅव्हल एजंटकडून त्यांनी पॉलिसी काढली. तीन महिन्यांच्या अखेरीस एका शुक्रवारी त्यांची ही पॉलिसी संपत होती. खरं म्हणजे त्याच आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारी त्यांचं परतीचं तिकीट होतं. पण त्यांच्याच परिचयाचे एक गृहस्थ, अमेरिकेतून पुढच्याच आठवड्याच्या मंगळवारी पुण्याला येणार होते. त्यांची सोबत होईल या हेतूने मुलाने तिकीट बदलून पुढच्या मंगळवारचं काढलं. गेल्या तीन महिन्यांत विचारच करावा लागला नाही, त्यामुळे मेडिक्लेमची पॉलिसी या आठवड्यात संपत आहे, हे कोणाच्या ध्यानातसुद्धा आलं नाही. पण दुर्दैवाने त्याच आठवड्यात शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ‘मेडिक्लेम आहे ना..?’ हॉस्पिटलचा पहिला प्रश्न. बॅगमधली पॉलिसी काढली, तर ती शुक्रवारीच संपली होती. मुलाच्या पायाखालची जमीनच हादरली. कारण त्याला तेथील वैद्यकीय खर्चाची चांगलीच कल्पना होती. अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये वैद्यकीय उपचार लगेच सुरू होतात. हॉस्पिटलमध्ये ते गृहस्थ दोन आठवडे अॅडमिट होते… बिल काही हजार डॉलर्स झालं. मुलाला आठ वर्षांत बचत केलेली सर्व रक्कम हॉस्पिटलच्या बिलापोटी द्यावी लागली.

२) मेडिक्लेम पॉलिसी असली तर किती सुकर होतं, याचं एक उदाहरण. जयंतीची मैत्रीण इंग्लंडला मुलीकडे गेली होती. व्यवस्थित कालावधीचा मेडिक्लेम इन्शुरन्स होता. फिरत असताना तिला बऱ्यापैकी मोठा अपघात झाला. ताबडतोब इस्पितळात दाखल करण्यात आलं. संबंधित इन्शुरन्स कंपनीला फोन व मेल करून कळवण्यात आलं. शस्त्रक्रिया करावी लागली आणि इन्शुरन्स कंपनीकडून त्वरित पावलं उचलण्यात आली. शस्त्रक्रिया, किमती औषधं यांचा एक पैशाचाही खर्च स्वत:च्या खिशातून करावा लागला नाही. याशिवाय हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम ट्रीटमेंट मिळाली.
तात्पर्य : ही दोन्ही उदाहरणं नीट समजून घ्या. आपल्या संपूर्ण वास्तव्याच्या तारखा (जाण्याची व येण्याची तारीख पकडून) नीट तपासून पॉलिसी घ्या. वास्तव्य लांबलं, तर पॉलिसीची तारीख वाढवून घ्यायला विसरू नये. पॉलिसीवर आपलं नाव, पासपोर्ट नंबर, जन्मतारीख बरोबर आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. तसंच गरज लागली तर पॉलिसी कंपनीला कुठे व कसं कळवावं याचीही माहिती हवी. काही वेळेस किरकोळ आजारांसाठी आपल्याला खर्च करावा लागतो. ते पैसे तेव्हा आपल्याला द्यावे लागतात. पण त्या वैद्यकीय उपचारांसंबंधीची सर्व कागदपत्रं हॉस्पिटल, डॉक्टर यांच्याकडून न विसरता घ्यावीत. भारतात परत आल्यानंतर सादर केल्यावर ते पैसे पॉलिसीधारकाला परत मिळतात. तसंच विमान-जहाजाच्या प्रवासात सामान उशिरा आलं, हरवलं, विमान चुकलं, हॉटेल बुकिंग करूनही जागा मिळाली नाही, तर त्याचाही काही मोबदला या इन्शुरन्समधून नंतर मिळतो पण त्याचे जास्तीतजास्त पुरावे द्यावे लागतात. तेही न विसरता घ्यावेत. आपण ज्याच्याकडून पॉलिसी घेतली, त्याची मदतही उपयोगी पडते. हल्ली अनेक कंपन्यांच्या ओव्हरसीज् पॉलिसीज् उपलब्ध आहेत. सरकारी तसंच खाजगी कंपन्यांचाही त्यात समावेश आहे. एखाद्या कंपनीचा केवळ हप्ता कमी आहे म्हणून ती कंपनी पसंत करू नये. त्यांची सर्व्हिस कशी आहे, क्लेम क्लियर होण्याचा अनुभव कसा आहे हे लक्षात घेऊन व त्याची माहिती काढून त्या कंपनीची पॉलिसी घ्यावी.

परदेश किंवा कोणत्याही सहलीला निघताना, त्याचं सर्व नियोजन काटेकोरपणे व्हायला हवं. व्यवस्थित आखणी करून सहलीला गेलात तर सहलीचा आनंद द्विगुणित होण्यास मदतच होते.

पर्यटनाची आखणी

एखाद्या सहलीला जायचं पक्क झालं की, त्याची आखणी महत्त्वाची असते. सध्या सहलींच्या नियोजनाचा ट्रेंडही बदलत चालला आहे. काही मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबीय एकत्र येतात आणि आपला ग्रुप तयार करतात, आपल्या आवडी-निवडी, भेट द्यायच्या देशांची नावं निश्चित करतात आणि ट्रॅव्हल एजंटकडून आपली सहल पाहिजे तशी आखून घेतात किंवा इंटरनेटवरून माहिती मिळवून स्वत:ची स्वत: बुकिंग्ज करणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. मला व जयंतीला ऑफबिट भटकंतीची कमालीची आवड. त्यामुळेच आम्ही एव्हढे देश पाहू शकलो. ‘तुम्ही अगदी आगळ्या-वेगळ्या पर्यटनाची आखणी कशी करता’, हा भेटणाऱ्या ९० टक्के पर्यटनप्रेमींचा प्रश्न असतो. त्यामुळेच प्रामुख्याने आमच्या भटकतींच्या उदाहरणांची माहिती देत, पर्यटनाची आखणी कशी करावी याबाबतचा तपशील मी या प्रकरणात देणार आहे आणि तो वाचकांना अधिक आवडेल अशी खात्री वाटते.
भारतातून अमेरिकेत मुला-मुलींकडे, नातेवाइकांकडे जाणाऱ्यांची संख्या प्रचंड असते. अमेरिकेत दोन-तीन महिन्यांचा मुक्काम चार-पाच वेळा केलेल्यांनीही फारशी अमेरिका बघितलेली नसते. मुलं, नातेवाईक जेव्हढे दाखवतील किंवा भारतातील ट्रॅव्हल कंपनी जिथे नेईल, तीच अमेरिका बघण्यावर त्यांना समाधान मानावं लागतं. पण आम्ही ज्या प्रकारे अमेरिका बघितली, तो अनुभव पर्यटकप्रेमींना अत्यंत उपयुक्त ठरू शकेल. याप्रकारे सहलींची आखणी केलीत तर अमेरिकेचा ग्रामीण भाग, नॅशनल पार्क्स, स्टेट पार्क्स, नॅशनल मॉन्युमेंट्स तुम्ही वेळ देऊन पाहू शकाल. त्याचा तपशील मुद्दाम थोड्या विस्ताराने देत आहे.

लुसिला व वॉर्नर या अमेरिकन दांपत्याची भेट एका सहलीत सोऴा-सतरा वर्षांपूर्वी झाली होती. त्यांच्याशी आमची चांगली गट्टी जमली. नंतर संपर्क राहिला नव्हता. पण काही वर्षांपूर्वी एका सफरीत आम्ही पुन्हा एकत्र आलो. ‘जग छोटं आहे’ यावर एकमत झालं. त्या वेळी, अमेरिकेचा ग्रामीण भाग बघण्याची इच्छा आम्ही व्यक्त केली. लुसिलाला भटकण्याचं प्रचंड वेड. त्या वेळी ती ७५ वर्षांची होती. लुसिलाने एक कल्पना सुचवली. ‘तुम्ही दोघंहीजण आत्तापर्यंत पाच-सहा वेळा अमेरिकेत आला आहात हे खरं, पण ते सहलींच्या निमित्ताने. आम्ही अमेरिकन अमेरिकेत जशी भटकंती करतो, तशी करायला तुम्हाला आवडेल का? या फिरण्यातून अमेरिकेची जास्तीत जास्त कंट्रीसाईड, तसंच बरंच काही तुम्ही पाहू शकाल. मात्र त्यासाठी निदान महिना-सव्वा महिन्याचा वेळ तुम्हाला काढावा लागेल.’

आंधळा मागतो एक डोळा, आणि देव देतो दोन अशीच आमची अवस्था झाली. आमचा होकार मिळताच, आम्ही आत्तापर्यंत अमेरिकेत काय पाहिलेलं नाही व काय पाहू इच्छितो याची संपूर्ण माहिती लुसिलाने जयंतीकडून घेतली. लुसिलाच्या ‘होंडा सिव्हीक’ गाडीतून आम्ही फिरणार होतो. शहात्तर वर्षांचा वॉर्नर व पंचाहत्तर वर्षांची लुसिला, आलटून-पालटून गाडीचं सारथ्य करणार होते…

  • जेपीज् भटकंती टिप्स
  • लेखक : जयप्रकाश प्रधान

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

जेपीज् भटकंती टिप्स

सुनियोजित व सुखकर भटकंतीसाठी अनुभवाचे बोल

प्रवासाचं वेड कुणाचं आयुष्य कसं बदलून टाकू शकतं याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर जेपीज्अर्थात जयप्रकाश व जयंती प्रधान दाम्पत्याचं! १९९८मध्ये या दाम्पत्याने युरोपची पहिली सहल केली आणि त्यानंतर झपाटल्यासारखे ते एका मागोमाग एक देश पालथे घालू लागले. आजपर्यंत त्यांनी तब्बल ७८ देशांची सैर केली आहे. या ऑफबीट भटकंतीमधून ‘जेपीज्‘कडे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव जमा झाले. या अनुभवांमधूनच पर्यटनाबद्दलची एक व्यापक दृष्टी निर्माण झाली. सहल प्लॅन करताना कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या गोष्टी टाळाव्यात हे त्यांना उत्तमरीत्या समजून आलं. त्यातूनच नियोजनाच्या उपयुक्त टिप्सचं हे पुस्तक साकार झालं आहे. या टिप्समुळे सहल आनंददायी आणि निर्विघ्न होईल. एक सुजाण पर्यटक म्हणून आपला दृष्टीकोन विकसित होईल. तसंच परदेशात आपण कोणत्या गोष्टी कराव्यात, कोणत्या टाळाव्यात याबाबत केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण आपल्या देशाची प्रतिमाही चांगली ठेऊ शकतो.

Bhatakanti Tips cover

200.00Add to cart


Jayprakash-Pradhan Photo
विख्यात लेखक व पर्यटक जयप्रकाश प्रधान यांचा परिचय

पृथ्वीवरील सात खंडांवर प्रधान पती-पत्नीचे पाय लागले आहेत. अंटार्क्टिका खंडावर मनुष्यवस्ती नाही. राहिलेल्या सहा खंडांमधील एकूण देशांची संख्या २१०च्या घरात जाते. त्यांपैकी ७८ देश त्यांनी आतापर्यंत पाहिले आहेत.

वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *