READING TIME – 8 MINS
सिनेमासाठी होणारी प्रसिद्धी काहीवेळेस कशी त्रासदायक ठरते याबाबतचा एका अभिनेत्यासोबत घडलेला हा एक मनोरंजक किस्सा! ‘लक्ष्य में दिखेगा बिहार का लाल!’ अशी ‘लक्ष्य’ सिनेमाची एक बातमी बिहारच्या हिंदुस्थान वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली.
वर्तमानपत्रात या बातमीसोबत त्या ‘लाल’ चा अर्थात त्या अभिनेत्याचा फोटो देखील छापण्यात आला होता. ‘लक्ष्य’ प्रदर्शित झाल्यावर त्या बातमीतील अभिनेता जेव्हा आपल्या बायकोसोबत सिनेमागृहात तो सिनेमा बघायला आला, तेव्हा मोठ्या पडद्यावर तो कोणालाच दिसला नाही. त्याला नंतर कळलं, की सिनेमाचं एडिटिंग करतांना त्याचं पात्र चक्क वगळण्यात आलं आहे. सिनेमातून आपलं पात्र वगळलं यापेक्षा वर्तमानपत्रातल्या त्या बातमीने खरं म्हणजे त्या अभिनेत्याला जास्त त्रास झाला होता. त्या अभिनेत्याचं नाव होतं पंकज त्रिपाठी!
१९९९साली कारगिल युद्ध झालं. भारतीय सैन्याला आधार देण्यासाठी कित्येक भारतीय प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवत होते. कारगिलच्या अशाच एका भेटी दरम्यान जावेद अख्तर भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. या भेटीतूनच त्यांच्या मनांत ‘लक्ष्य’ ची बीजे रोवली गेली. काही वर्षांनी सिनेमाची कथा पटकथा तयार होत ती तरुण दिग्दर्शक फरहान अख्तरच्या हातात आली. “दिल चाहता है” या आपल्या पहिल्याच चित्रपटातून फरहानने बॉलीवूडमध्ये दमदार पाऊल टाकलं होतं. निर्मितीचे सगळे सोपस्कार पार पाडत २००४ साली फरहान आणि त्याचा मित्र रितेश यांनी आपला दुसरा सिनेमा ‘लक्ष्य’ प्रदर्शित केला.
‘लक्ष्य’ हा रूढार्थाने युद्धपट नाही. त्याला कारगिल युद्धाची पार्श्वभूमी आहे. दिल्लीत राहणाऱ्या सुखवस्तू घरातील करण शेरगील (ह्रितिक रोशन) ची मुख्यत्वे ही कथा आहे. सामान्य लोकांना जगण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो याबाबत करणला कल्पना नाहीये. करणला रोमिला (प्रीती झिंटा) नावाची गर्लफ्रेंड आहे.
करणचे वडील संजीव शेरगील (बोमन इराणी) हे एक self made व्यक्ती आहेत. फाळणीनंतर त्यांच्या कुटुंबाच्या झालेल्या आर्थिक फरफटीतून सावरत ते आज यशस्वी उद्योजक आहे. करण आणि त्याचे वडील यांच्यातला संवाद मर्यादीत स्वरूपाचा आहे. दोघे बाप-बेटे एकमेकांशी एक अंतर राखून आहेत. करणची आई (अंजुला बेदी) हाच त्यांच्यातला मुख्य दुवा आहे.
एक दिवस कॉलेजमध्ये आपले काही मित्र भारतीय सैन्य दलात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचं करणला कळतं. ‘मिलिटरी युनिफॉर्म मध्ये मुलं किती क्युट, हँडसम दिसतात’ यासारख्या चर्चेतून करणसुद्धा कुठलाही विचार न करता, आपल्या घरी कोणाला न कळवता अर्ज करून टाकतो. करण IMA अर्थात Indian Military Academy ची परीक्षा उत्तीर्ण होतो. इकडे त्याच्या घरी मात्र करणचे संतापलेले वडील कोणाला विचारून हा निर्णय घेतला याबाबत त्याला जाब विचारतात. दोघांच्या नात्यात काही प्रमाणात कडवटपणा येतो.
करण IMA मध्ये ट्रेनिंगसाठी दाखल होतो. आयुष्यात कुठल्याही प्रकारचे कष्ट न घेतलेल्या करणला IMA मधली शिस्त, त्यांचे खडतर प्रशिक्षण झेपनासे होते. एक दिवस कॅम्प मधून करण चक्क पळून आपल्या घरी येतो. आई-वडिलांना भेटल्यावर जेव्हा तो खोलीतून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्या बाबांचा त्याच्या आईशी संवाद त्याच्या कानावर पडतो.
‘बघ सांगितलं नव्हतं एक दिवस हा निघून येईल म्हणून?’. वडिलांचे हे वाक्य करणच्या मनावर ओरखडा उमटवतं. नंतर रोमिलाला भेटून तिला झालेला सगळा प्रकार कळल्यावर ती देखील ‘तू स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम राहू शकला नाहीस’ असं म्हणत करणची निर्भत्सना करते. आपले कुटुंबीय, प्रेयसी यांच्या भेटीनंतर दुखावलेला करण पुन्हा अकॅडमीमध्ये परत येतो आणि आपलं प्रशिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करतो. बेस्ट कॅडेटच्या पुरस्काराने करणला सन्मानित करण्यात येतं, पण तरीही त्याच्या दीक्षांत समारंभात त्याचे वडील येत नाहीत.
निष्काळजी, बेफिकीर असा करण शेरगील आता भारतीय सैन्यातील पंजाब रेजिमेंट मध्ये लेफ्टनंट करण शेरगील झालेला असतो. सैन्यात रुजू झाल्यावर काही दिवसांनी करण रजेवर आपल्या घरी, दिल्लीत परत येतो, पण एक दिवस अचानक करणला पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश मिळतात. पाकिस्तानी सैन्याने कारगिल भागांत घुसखोरी केलेली असते. पाकिस्तान सोबत उघड युद्धाची सुरुवात होते. कामावर रुजू झाल्यावर करणला कॅप्टन पदावर बढती मिळते. आता करणचं एकच लक्ष्य असतं – Point 5179 या भारतीय ठाण्याला पाकिस्तानच्या तावडीतून मुक्त करणं.
द्रास, कारगिलच्या अत्यंत प्रतिकूल अवस्थेत भारतीय सैन्याची खडतर परीक्षा सुरु होते. कुठली गोळी कुठून वेध घेईल याची शाश्वती नसतांना, हाडं गोठवणाऱ्या थंडीत देशासाठी लढणं कुठल्याही सैनिकाची सर्वोच्च इच्छा असते. कालपर्यंत ज्या सहकाऱ्यांसोबत थट्टा-मस्करी केली, एकत्र जेवलो त्यातलेच काही करणचे सहकारी दुसऱ्या दिवशी युद्धात वीरगतीला प्राप्त होतात. आपलं आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची करणला जाणीव होते.
त्याच अवस्थेत एक दिवस करण आपल्या घरी फोन लावतो. वडिलांशी फोनवर बोलतांना करण आपल्या वडिलांना तुम्ही मला सगळं काही दिलं. तुमच्या मेहनतीची, त्यागाची मला कदर नाहीये असं समजू नका आणि हे सांगायलाच मी तुम्हाला हा फोन तुम्हाला केल्याचं सांगतो. आयुष्यात करणला पहिल्यांदा इतकं भावनिक झाल्याचं बघून करणचे बाबा देखील विरघळतात. माझे businessman मित्र फक्त युद्धावर बोलतात, पण त्यांचा कोणाचाच मुलगा प्रत्यक्ष युद्धभूमीवर नाहीये. तू प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहेस आणि त्याचा मला अभिमान आहे असं त्याला सांगतात. केवळ काही मिनिटांच्याच या फोनच्या संभाषणातून खुंटलेल्या बाप-बेट्याच्या संवादाला आता नवीन आश्वासक पालवी फुटते.
करणचा बाप हा जीवनात यशस्वी होणाच्या काही ठाम कल्पना आहेत असं मानणारा एक माणूस आहे. आपल्या मुलाने देखील हाच मार्ग स्वीकारावा असं त्याला वाटत असतं. संवादाअभावी त्यांच्या नात्यात एक प्रकारचा तणाव आहे. तरीही ज्या तडफेने आपला मुलगा आपलं कर्तव्य निभावत आहे याचं त्याला मनापासून खूप कौतुक आहे, त्याच्याबद्दल काळजीसुद्धा आहे.
भारतीय सिनेमांत बऱ्याचदा वडील-मुलाच्या नात्यावर सहसा तितकंसं बोललं जात नाही. लेकाच्या संदर्भात सतत विचार करणारा बाप हा अदृश्य असतो,अबोल असतो. भारतीय सिनेमांत शक्यतो हिरो किंवा मुलगा हा नेहमी आपल्या आईच्या जास्त जवळ असतो. बाप-लेक हे नातं शक्यतो स्पर्धेचं,तणावाचंच असतं. त्यांच्यात प्रेम, जिव्हाळा नसतो असं नाही,पण ते साधारपणे अव्यक्त रूपातच राहतं. आपल्या भावनेचे प्रकटीकरण करायला पिता सहसा तयार नसतो. ह्रितिक आणि बोमनचे अभिनय,त्यांचे संवाद या प्रसंगाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातात.
या प्रसंगाची अजून एक विशेष आठवण आहे आणि ती म्हणजे करण आणि त्याचे वडील यांचे फोनवरील हे संभाषण सिनेमांत दिसतं तसं एकत्र चित्रित झालेलं नाहीये. काही कारणास्तव या प्रसंगासाठी ह्रितिकचे एकट्याचे संवाद आधीच रेकॉर्ड झालेले होते. आता बोमनवर तोच प्रसंग चित्रित करण्याची वेळ आली.
फोनवर ह्रितिक बोलतोय असं समजून बोमनला आता स्वतःचे संवाद म्हणायचे होते. सेटवर ह्रितिक नसल्याने, फोनवर ह्रितिकचे संवाद म्हणायचं काम सहाय्य्क निर्देशकाकडे देण्यात आलं, पण शूटिंगला सुरुवात झाल्यावर तो सहाय्य्क निर्देशक अत्यंत कृत्रिमपणे, यांत्रिकपणे ह्रतिकचे संवाद म्हणू लागला. प्रसंग इतका भावस्पर्शी आणि सहायक निर्देशकाचे ते अत्यंत रुक्ष आवाजातील संवादाने बोमनला मात्र चेहऱ्यावर आवश्यक ते भाव देणं कठीण होऊन बसलं. “डायलॉग बोलते वक्त थोडा तो इमोशन डाल यार”, बोमन वैतागून त्या सहाय्यक निर्देशकावर ओरडला, पण तरीही परिणाम शून्यच.
काही वेळ गेला. जेवणासाठी सुट्टी घेण्यात आली. जेवण झाल्यावर लगेचच सेटवर हजर राहण्याचे बोमनला सांगण्यात आले. या जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत मात्र नकुल कामटे, जो या सिनेमाचा साऊंड टेक्निशियन होता, त्याने बोमनचा लँडलाईन फोन आतून उघडला, त्यातल्या काही वायरी या दुसऱ्या खोलीत जाणाऱ्या फोनच्या वायरींना जोडल्या. बोमन परत आल्यावर त्या प्रसंगांचं पुन्हा चित्रीकरण सुरु झालं. बोमनच्या landline फोनची रिंग वाजली.
बोमनने फोन उचलून हॅलो म्हटल्यावर पलीकडून फोनमध्ये आलेल्या आवाजाने बोमन आश्चर्यचकित झाला. तो आवाज चक्क ह्रितिकचा होता. नकुल कामटेने ह्रितिकचे रेकॉर्ड केलेलेच संवाद बोमनला फोनवरून, हॉटेलच्या दुसऱ्या खोलीतून ऐकवण्याची किमया साधली होती. ह्रितिकच्या आवाजातील संवाद ऐकून बोमनने तितक्याच उत्कटपणे आपले संवाद म्हटले आणि त्या प्रसंगाला हवा असलेला एक खास भावनिक टच मिळून दिला.
सिनेमा बघतांना तांत्रिकदृष्ट्या साधारण वाटणारे प्रसंग प्रत्यक्षात मात्र किती सफाईने घेतले जातात त्याचं हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे अदृश्य हात प्रेक्षकांच्या समोर मात्र कधीच येत नाही. आपलं काम झाल्यावर ते अचानक अदृश्य देखील होतात.
‘लक्ष्य’ मध्ये बरीच आकर्षणं होती. सिनेमाचे लेखक ‘अनुभवी’ जावेद अख्तर बऱ्याच मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा कथालेखनाकडे वळले होते. नावाजलेला जर्मन सिनेमॅटोग्राफर ख्रिस्तोफर पोपने आपल्या कँमेराद्वारे लडाख भागातील नयनरम्य कॅनव्हास खूपच सुंदर पद्धतीने चित्रित केला होता. सिनेमाच्या शेवटचा क्रेन शॉट हा १८००० फूट इतक्या उंचीवर चित्रित केला गेला. अभिनय, संगीत या सगळ्यांबाबत ‘लक्ष्य’ सरस होता.
इतकं सगळं असूनही ‘लक्ष्य’ प्रदर्शित झाल्यावर त्याचं स्वागत काहीसं थंडच झालं. प्रत्येकाने आपापल्या परीने त्याची कारणं दिली. उदाहरणार्थ, कुठल्याही युद्धपटात असलेले “भारतमाता कीजय किंवा जो बोले सो निहाल..” असले संवाद त्यात नव्हते. बहुतांश युद्धाचे प्रसंग रात्री चित्रित केले गेले (कारगिल युद्ध रात्रीच घडलं होतं) जे मोठ्या पडद्यावर बघतांना त्याची दृश्यमानता कमी झाली. अजून एक मुद्दा होता सिनेमाच्या लांबीचा, पण इतकं सगळं असूनही दिग्दर्शक फरहान अख्तर मात्र आपल्या निर्मितीमागे ठामपणे उभा राहिला. त्यामुळेच की काय ‘लक्ष्य मध्ये काय बदल करायला आवडतील?’ असा प्रश्न फरहानला विचारल्यावर तो मिश्कीलपणे म्हणाला – ‘कदाचित प्रेक्षक!’
– उन्मेष खानवाले.
– उन्मेष खानवाले.
—