फॉन्ट साइज वाढवा

जेव्हा तुझा नवरा तुला धरेल

तेव्हा तुझ्या छातीने त्याला हलकेच ढकल

जर त्याने तुझ्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न केला,

तर त्याच्या ओठांवर हळुवारपणे तुझे ओठ टेकव

जेव्हा तो तुझ्यावर स्वार होईल, तेव्हा तू खालून त्याला हलकेच साथ दे

प्रणय करताना जर तो थकला, तर प्रणयाची सूत्र तू हाती घे.

लगेच तू त्याच्यावर स्वार हो…

तो एक चांगला रसिक आणि समर्पित होणारा प्रेमी आहे…

त्याच्याशी कुशलतेने प्रणय कर आणि त्यालाही करायला दे…

असं म्हणत राधेने ईलाला कृष्णाकडे ढकललं. नंतर कृष्णाजवळ जाऊन ती मंदस्वरात त्याला म्हणाली-

तिची छाती अगदीच कोवळी आहे, माझ्यासारखी भरलेली नाही

तेव्हा जोराने दाबू नकोस

तिचे ओठ एखाद्या मृदू पर्णासारखे आहेत, माझ्यासारखे कडक नाहीत

तेव्हा त्यांचा जोराने चावा घेऊ नकोस

माझ्या मांड्या तुझ्याशी कुस्ती खेळायला आता सरावल्यात

पण तिच्या मांड्या अजून केळीच्या कोवळ्या गाभ्यासारख्या आहेत.

ती माझ्यासारखी घट्टमुट्ट नाही, तिचं शरीर अगदी नाजूक आहे

ती तुझ्या बरोबरीची नाही, प्रणयक्रीडेत अजून नवीन आहे.

तिच्याशी कसं वागायचं, हे मी तुला सांगायला हवं का?

मला माहीत आहे, प्रत्येक स्त्रीसाठी तू नेहमीच चांगला प्रियकर राहिला आहेस

तेव्हा तिच्या ओठांवर तुझ्या जिभेचं टोक फिरव, ते पिळू नकोस.

तिच्या गालांचा हलकेच मुका घे, ते ओरबाडू नकोस

तिच्या स्तनाग्रांवर हळूवार बोट फिरव, ती चुरडू नकोस.

अगदी हळुवारपणे प्रणय कर, धसमुसळेपणाने नको…

… कुठल्याही शृंगारकाव्यात खपून जातील अशाच या काव्यपंक्ती आहेत. प्रणयक्रीडेतील भावना जरा अधिकच मोकळेपणी मांडल्यात. पण कुणाही स्त्री-पुरुषांच्या त्या सवयीच्या आहेत. फक्त खाजगी शृंगारिक भाव थोडा थेट, आक्रमकपणे आणि उघडपणे मांडलाय एवढंच! परंतु भारतीय महाकाव्यांमध्ये अशा वर्णनांची कमतरता नाही. किंबहुना अभिजात वाङ्मयात शृंगाररसाला कायमच वरचं स्थान मिळालेलं आहे. शेवटी शृंगार ही सर्वाधिक महत्त्वाची नैसर्गिक भावना आहे. तसंच शृंगारिक काव्याची निर्मिती करण्यात पुरुषवर्गच आघाडीवर असल्यामुळे त्यानं हातचं न राखता स्त्री-पुरुष संबंधांचं रसभरीत वर्णन आपल्या काव्यातून केलं आहे. त्यातही स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचं. ओठांपासून मांड्यांपर्यंत आणि स्तनांपासून नितंबांपर्यंत. मग तो कालिदास असो किंवा भर्तृहरी किंवा मोरोपंत-रघुनाथपंडित… अर्थात वाचकांनीही ती काव्यं मग्न होऊन वाचलेली आहेत. वाचकही अर्थात पुरुषच… पूर्वीच्या काळी! तेव्हा वरील शृंगारिक काव्यपंक्तीही त्यांनी चवीनेच वाचल्या असतील, यात शंका नाही. चवीचवीनेच ते वर्णन वाचलं असेल आणि वाचताना कृष्णाच्या, राधा व ईलेबरोबरच्या कामलीलाही नजरेसमोर आणल्या असतील…!

…अन् तरीही वरील काव्य वाचल्यावर १९व्या शतकात तत्कालीन समाजातील संस्कृतिरक्षकांनी हैराण होऊन ‘अब्राह्मण्यम्… शांतंपापं’ अशी बोंब ठोकलीच! हे काय लिहून ठेवलंय, अशी एकच हाकाटी मारली… कारण ‘राधिका सांत्वनमु’ नावाचं हे शृंगारकाव्य कुणा पुरुषाने लिहिलेलं नव्हतं. ते लिहिलं होतं, एका स्त्रीने- मुद्दुपलनीने. तंजावरचे इतिहासप्रसिद्ध कलारसिक राजे प्रतापसिंह (राज्यकाळ – १७३०-१७६३) यांच्या दरबारातील देवदासी आणि त्यांची भोगदासीही असलेली – मुद्दुपलनी!

मुद्दुपलनी (१७३९–१७९०) बोलूनचालून एक स्त्री. एका स्त्रीने शृंगारकाव्य लिहावं, त्यातही ते थेट इतकं उघडवाघडं लिहावं आणि एवढंच नाही, तर तिने स्त्रीने कामक्रीडेत कसा पुढाकार घ्यावा, हे सांगावं… हा त्यांच्या मते घोर अपराधच! कारण स्त्री कशी शालिन हवी. पडदानशीन हवी. कितीही उत्तेजित झाली, तरी तिने आपल्या कामभावना दडपूनच टाकल्या पाहिजेत. त्यांत पुरुषाला वरचढ तर तिने ठरताच कामा नये…

पण पुरुषसत्ताक पद्धतीने लादलेला हा सामाजिक विधिनिषेध मुद्दुपलनीने मुळीच मानला नाही. परंपरेने सांगितलेली राधा-कृष्णाची गोष्ट न सांगता तिने नवीच गोष्ट सांगितली रचून. राधेला कृष्णाची ज्येष्ठ पत्नी दाखवून, तिने ईला नावाचं एक नवीनच पात्र त्याच्या आयुष्यात आणलं. ही ईला, राधा-कृष्णाच्या परिचयातलीच. राधा-कृष्णाचा कामलीलांनी युक्त संसार सुरू असताना, ईला लहानगी होती. तीही सतत त्यांच्या बरोबरच असायची. अगदी अंगणापासून शयनगृहापर्यंत. तिच्या वाढत्या वयातल्या भावना राधेने त्या काळात समजून घेतल्या आणि त्या भावनांना पोषक खतपाणीही घातलं. परंतु तेव्हा राधेला कुठे ठाऊक होतं, की ही ईलाच येईल आपल्या आणि कृष्णाच्या मध्ये…? पण ती आलीच त्या दोघांच्या मध्ये तेव्हा, अतिशय सुकुमार असलेल्या आणि कामलीलांपासून अनभिज्ञ असलेल्या ईलेला, त्याबाबतीत तयार करण्याची जबाबदारीही राधेवरच पडली. राधेनेही ती कौशल्याने पार पाडली.

…ही राधा म्हणजे मुद्दुच तर होती. प्रतापसिंहांकडून दुखावली गेलेली.

तत्कालीन प्रसिद्ध देवदासी आणि तंजावरच्या दरबारात वीणावादक असलेल्या तंजनायकीची मुद्दुपलनी ही नात. अगदी लहान वयातच मुद्दुने वादन-नर्तनात नाव कमावलेलं होतं. एवढंच नाही तर लेखनातही ती हुशार होती. किंबहुना ती विद्वानच होती. देवदासी असली, तरी तिचं संस्कृत, तमिळ आणि तेलुगु या तीनही भाषांवर प्रभुत्व होतं. त्यामुळेच तिने ऐन तरुणपणी जयदेवाच्या ‘गीत गोविंदम्’ या काव्याचा तेलुगुत केलेला अनुवाद तेव्हा गाजला होता. तसंच प्रसिद्ध तमिळ स्त्रीसंत आंदाळ हिच्या ‘तिरुप्पावै’ या भक्तिरचनाही तिने लोकांसमोर आणल्या. या भक्तिरचना तेलुगुत अनुवादित करताना मुद्दुपलनीने ‘सप्तपदम’ म्हणजे सात ओळींच्या रचना केल्या, ज्या अतिशय लोकप्रिय झाल्या. मुद्दुच्या या कलानिपुणतेची आणि विद्वत्तेची ही ख्याती तंजावरच्या प्रतापसिंह महाराजांच्या कानावर गेली. स्वतः प्रतापसिंह मराठी, तमिळ, तेलुगु आणि संस्कृत भाषेचे जाणकार होते. त्यांनी स्वतः ‘कृष्णमंजिरी’, ‘उमासंहिता’, ‘पारिजात’ यांसारखी मराठी नाटकं लिहिली होती. खरंतर ते ज्या काळात तंजावरच्या गादीवर आले, तो काळ अतिशय धामधुमीचा होता. तंजावरात भोसल्यांची सत्ता स्थिर होऊन बराच काळ उलटून गेला होता. तरीही तंजावरवर कब्जा मिळवण्यासाठी अर्काटच्या नवाबाबरोबरच फ्रेंच आणि इंग्रजही टपून बसले होते. या साऱ्यांशी सावधपणे सामना करत, प्रतापसिंहांनी आपलं राज्य टिकवून ठेवलं. सततची युद्ध, दंगली आणि कारस्थानांच्या मालिकांमध्येही त्यांनी ‘कलांचे चाहते’ ही तंजावरच्या राजांची ख्याती टिकवून ठेवली. त्यामुळेच अंदाधुंदीच्या वातावरणातही त्यांनी विविध कलांना कायम प्रोत्साहनच दिलं. साहजिकच देवदासी असलेल्या मुदुदपलनीची लोकप्रियता कानावर पडताच, त्यांनी तिला राजदरबारात नर्तन-गायन करण्यासाठी आमंत्रित केलं… आणि पहिल्याच फटक्यात त्यांचा तिच्यावर जीव जडला. देवदासी असलेली मुद्दुपलनी लगेच प्रतापसिंहांची भोगदासी झाली. पण केवळ भोगदासी हे तिचं तंजावर दरबारातलं स्थान नव्हतं. तंजावरच्या दरबारात तिची गणना तिथल्या विद्वत्तजनांत होत होती. विद्वान पुरुषांच्या बरोबरीने राजदरबारात बसणारी ती एक विद्वान स्त्री होती.

राजाश्रय मिळाल्यावर मुद्दुपलनीला आर्थिक स्थैर्य लाभलंच. त्याशिवाय तिला आपल्या कलागुणांचाही अधिक विकास करता आला. परंतु कालांतराने प्रतापसिंहांचं मुद्दुकडे काहीसं दुर्लक्ष होऊ लागलं. राजे असल्यामुळे त्यांना स्त्रियांची तशी कमी नव्हतीच. परंतु त्या सगळ्या जणींपेक्षा मुद्दुपलनी वेगळी होती. ती निव्वळ देखणी किंवा कुशल नर्तिका नव्हती. ती विद्वान होती आणि त्याबद्दल तिला सार्थ अभिमान होती. त्यामुळेच प्रतापसिंहाने आपल्याला अव्हेरणं तिच्या मनाला लागलं आणि तिने आपण स्वतः, प्रतापसिंह व त्यांच्या आयुष्यात आलेली आणखी कुणी… असा कल्पनाबंध रचून, त्यावर ‘राधिका सांत्वनमु’ हे ४ भागांचं आणि ५८४ पदं असलेलं प्रतीकात्मक तेलुगु शृंगारकाव्य लिहिलं. वाचणाऱ्यांना ती खरोखरच राधा, कृष्ण आणि ईलेची गोष्ट वाटली. पण जे मुद्दु आणि प्रतापसिंहाना ओळखत होते, त्यांना मात्र खरं काय ते ठाऊक होतं. महत्त्वाचं म्हणजे ‘राधिका सांत्वनमु’चा शेवट सुखांत होता. कृष्ण पुन्हा राधेकडे परततो आणि तिची माफी मागतो, म्हणजेच तिचं सांत्वन करतो, असं त्यात दाखवण्यात आलं आहे. मुद्दुच्या आयुष्यातील प्रत्यक्षातल्या प्रेमत्रिकोणाचा शेवट काय झाला, ते मात्र ठाऊक नाही. खरं तर प्रतापसिंहांचं मुद्दुपलनीवर निरतिशय प्रेम होतं आणि ते कायमच राहिलं. मात्र ती काही त्यांची एकमेव ‘मर्जी’ नव्हती. त्यामुळे कदाचित नंतरच्या काळात तिच्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं असावं. त्यांच्याकडे शृंगारासाठी इतरही अनेक पर्याय उपलब्ध होते. मात्र भोगदासी-भोगपत्नी किंवा ‘मर्जी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रियांकडे शृंगाराचा दुसरा कोणताच मार्ग नसायचा. कारण एकदा का एकाचा आश्रय स्वीकारला की तो मरेपर्यंत किंवा तो जोवर कायमचं दूर लोटत नाही, तोवर या स्त्रिया कधीही दुसरेपणा स्वीकारत नाहीत. साहजिकच मग या स्त्रियांची लैंगिक कुचंबणा होते…

…परंतु मुद्दुपलनी स्वतःच्या क्षमतेचा आणि ज्ञानाचा आवाका नीट ठाऊक असलेली स्त्री होती. तसंच लैंगिक भावना फक्त पुरुषालाच असतात असं नाही, तर स्त्रीलाही असतात; फक्त त्या दाबून ठेवाव्या लागतात, हे ती चांगलंच जाणून होती. म्हणूनच तिने एकप्रकारे ‘राधिका सांत्वनमु’ या काव्याच्या आधारे स्त्रीच्या लैंगिक भावनांना उघडउघड आवाज दिला. स्त्रीलाही लैंगिक भावना असतात, हे तिने दणक्यात सांगितलं. मुख्य म्हणजे हे करताना, आपण काय करतोय याचं तिला नेमकं भान होतं. आपण तंजावरच्या राजदरबारातल्या कुठल्याही विद्वानापेक्षा कमी नाही, याची तिला जाण होती. आणि ती स्वतःला त्यांच्या बरोबरीचीच मानायची. तिच्या या निर्भर आणि ठाम भूमिकेमुळे, तसंच ती राजाची भोगपत्नी असल्यामुळे तिच्या हयातीत कुणी थेट या काव्याच्या विरोधात बोललं नाही. किंबहुना वरवर कौतुकही केलं. परंतु या काव्याचा फार गाजावाजा होणार नाही, याची मात्र पक्की तजवीज करण्यात आली. इतकी की लवकरच हे काव्य काळाच्या उदरात गडप झालं. त्याचं अस्तित्वच पुसून टाकण्यात आलं. कारण ते एका स्त्रीने लिहिलं होतं.

मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ काव्य तिच्या हयातीतच नजरअंदाज व्हायला लागलं होतं. हा पुरुषसत्ताक समाज आपलं काव्य सहजासहजी स्वीकारणार नाही, हे खरंतर मुद्दुपलनीलाही ठाऊक होतंच. म्हणून तिने आपल्या काव्यात काही गमतीजमतीही केल्या होत्या. काही ठिकाणी तिने थेट चित्रण करण्याऐवजी व्यासाचा मुलगा महर्षी शुक आणि विद्वान राजा जनक यांच्या संवादरूपात काही कविता सादर केल्या. जेणेकरून कुणीही आपल्या काव्यावर अश्लीलतेचा आरोप करू नये. यावरून मुद्दुपलनी तत्कालीन समाजाला आणि धार्मिक-सांस्कृतिक सत्ता ज्यांच्या हाती होती, त्यांना व्यवस्थित ओळखून होती, हे सिद्ध होतं. म्हणजे लेखक म्हणून असलेला आपला आत्मसन्मान जपण्याचा तिने हिरिरीने प्रयत्न केला. दुर्दैवानं तिच्या प्रयत्नांना यश आलं नाही. तिच्या हयातीतच तिचं काव्य विस्मृतीत जाऊ लागलं. तिच्या पश्चात तर, कुणी त्याची आठवण काढण्याचं काहीच कारण नव्हतं. तंजावरच्या राजदरबारात एवढं मानाचं स्थान लाभलेली विद्वान. पण तिला परंपरेनं हरवलं. सनातनी वृत्तीच्या समाजाने तिचा काव्यग्रंथ स्वीकारला नाही. जणू लेखक म्हणून तिची कर्तबगारीच मिटवण्यात आली… नाकारण्यात आली!

…पण काळ सूड उगवतो. मुद्दुपलनीच्या मृत्यूनंतर तब्बल शंभर वर्षांनी तिकडे म्हैसूर प्रांती नागरत्नम्माचा जन्म झाला. नागरत्नम्माही परंपरेने मुद्दुपलनीसारखीच देवदासी आणि तरीही विद्वान स्त्री. तिच्या वाचनात मुद्दुपलनीचं अर्धवट स्वरूपात छापलेलं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आलं. त्या काव्यातील भाषेच्या आणि लयीच्या प्रेमात पडून नागरत्नम्माने ते पूर्ण काव्य शोधून काढलं आणि पुस्तकरूपात छापलं. मुद्दुपलनी आणि नागरत्नम्माच्या दुर्दैवाने २०व्या शतकाच्या पूर्वार्धातही या काव्यावर तत्कालीन संस्कृतिरक्षकांनी अश्लीलतेचा ठपका ठेवला, परिणामी ब्रिटिशांनी या पुस्तकावर बंदी आणली. मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच तमिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मुद्दुपलनीच्या ‘राधिका सांत्वनमु’वरची बंदी उठवली आणि ‘तेलुगु साहित्यातील मौक्तिकमणी’ अशा या काव्याची प्रशंसा केली. त्यानंतर ‘राधिका सांत्वनमु’ पुन्हा पुस्तक रूपाने छापण्यात आलं आणि आता तर त्याला तेलुगु साहित्यात मानाचं स्थान आहे.

किंबहुना एकूणच भारतीय शृंगार साहित्यात मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आगळवेगळं आहे, कारण ते पुरुषाऐवजी एका स्त्रीने लिहिलेलं आहे. मुद्दुपलनीआधी एखाद्या स्त्रीने लिहिलेलं शृंगारसाहित्य साप़डत नाही. त्यामुळे ‘राधिका सांत्वनमु’ हे भारतीय साहित्याच्या इतिहासातील, स्त्रीने लिहिलेलं पहिलं शृंगारकाव्य म्हणावं लागेल. त्यातही मुद्दुपलनीने त्यात स्त्रीने शृंगारात पुरुषावर चढाई कशी करावी, हे सांगितल्यामुळे या शृंगारकाव्याला एक वेगळाच महत्त्वाचा आयाम प्राप्त झाला आहे आणि त्यासाठी मुद्दुपलनीला साष्टांग दंडवत!

  • मुकुंद कुळे
RohanSahityaMaifaljpg-1-1
Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…


जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…


गौरीअम्मा : कलेची गंगोत्री

तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…  

लेख वाचा…


विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत!

मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.  

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *