फॉन्ट साइज वाढवा

कुठलीही गोष्ट जेवढी सहज आणि स्वाभाविक, तेवढी ती अधिक गोड आणि आकर्षक असते. २०व्या शतकाच्या पूर्वार्धातील प्रसिद्ध नृत्यांगना मईलापूर गौरीअम्माचे आपल्या शिष्यांना नृत्य शिकवतानाचे फोटो पाहताना हे फार प्रकर्षाने जाणवतं. त्यांच्या बसण्याच्या, उभ्या राहण्याच्या, हस्तमुद्रा करतानाच्या, चेहऱ्यावरील अभिनयाच्या लकबी एवढ्या सरळ-साध्या नि अकृत्रिम आहेत, की त्या नर्तन करतायत असं वाटतच नाही. वाटणार तरी कसं म्हणा, नृत्य हीच त्यांची अंतर्बाह्य ओळख होती. त्यांचं जगणं, त्यांचा ध्यास आणि त्यांचा श्वास नृत्यच तर होतं. शेवटी नृत्य म्हणजे तरी काय? तर शरीराच्या मोहक हालचालींचा गुंफलेला लयबद्ध आकृतिबंध! हा शारीरिक आकृतिबंध जेवढा प्राकृतिक, तेवढा तो अधिक देखणा. शेवटी शरीर आधी आणि शास्त्र नंतर. नृत्य कितीही शास्त्रात बांधलं, तरी ते शरीराच्या पलीकडे जात नाही. शरीर हेच नृत्याचं मूळ माध्यम. तेव्हा हे शरीर जेवढ बोलेल, तेवढं नृत्य बोलकं. मईलापूर गौरीअम्माचं नृत्य या अर्थाने बोलकं होतं. म्हणूनच विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भरतनाट्यम नृत्यांगना म्हणून नावारूपाला आलेल्या भल्याभल्या नर्तकींची मूळ गंगोत्री गौरीअम्माच तर होत्या. कोण नव्हतं या नर्तकींमध्ये? ज्यांनी मूळ मद्रास इलाख्यातील देवदासी परंपरेतील दासीआटम (देवदासींचा नृत्यखेळ), भरतनाट्यम म्हणून पांढरपेशांच्या रंगमंचावर आणलं, त्या रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी आपल्या नृत्याची सुरुवात गौरीअम्मा यांच्याकडेच तर केली. त्याशिवाय कलानिधी नारायण, यामिनी कृष्णमूर्ती, पद्मा सुब्रमण्यम, वैजयंतीमाला, हेमामालिनी अशा कैक जणींनी गौरीअम्माच्या प्रेमळ आणि लोभस मार्गदर्शनाखाली नृत्याचे धडे गिरवले. पण यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे- टी. बालसरस्वती, जिने भरतनाट्यमची (खरंतर दासीआटमची) पताका अखिल जगतात फडकावली! गौरीअम्माचा चेहऱ्यावरील भावकामाचा (शास्त्रीय नृत्याच्या भाषेत अभिनय) वारसा काही प्रमाणात उचलला तो टी. बालसरस्वती यांनीच. अन् तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती… दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध ठिकाण असलेल्या मईलापूरच्या कपालीश्वर मंदिरातील एक प्रसिद्ध देवदासी!

गौरीअम्माकडे नृत्याची कला या देवदासी परंपरेतूनच आली होती. तिची आई दोराईकन्नम्मा सुद्धा कपालीश्वर मंदिरातील एक नावाजलेली देवदासी होती. मात्र ती केवळ देवदासी नव्हती, तर ती नावाजलेली नृत्यांगनादेखील होती. सौंदर्य आणि नृत्याचा अनोखा मेळ तिच्या व्यक्तिमत्त्वात होता, असं म्हणतात. मात्र दोराईकन्नम्मा फक्त देवासाठीच नृत्य करायची आणि ते देखील सदासर्वकाळ नाही, तर देवाच्या विशिष्ट सण-उत्सवाप्रसंगीच. विशेषतः ब्रह्मोत्सवाच्या उत्सवाच्या वेळी कपालीश्वराची जी मिरवणूक निघायची, तेव्हा दोराईकन्नम्मा अगदी मनमुक्तपणे नाचायची आणि त्यावेळचं तिचं नृत्य बघण्यासाठी प्रचंड गर्दी व्हायची. दोराईकन्नम्माचं ते नाचणं म्हणजे कपालीश्वराशी एकरूप होणंच असायचं म्हणे! साहजिकच आईच्या या तालमीतच गौरीअम्माचं दासीआटमचं म्हणजे देवदासी करीत असलेल्या नृत्याचं प्राथमिक शिक्षण झालं. मात्र लेकीला नृत्यकलेत सर्वगुण संपन्न करायचं, तर तिला अधिक नेमकी आणि सर्वंकष तालीम मिळायला हवी, यासाठी तेव्हाचे प्रसिद्ध नृत्यगुरू नल्लुर मुनुस्वामी यांची नेमणूक केली.

गुरू नल्लुर मुनुस्वामी यांच्याकडे गौरीअम्मा नृत्यातल्या सगळ्या लकबी शिकली, मात्र तिची खासियत असलेल्या अभिनयाचे धडे तिने आपल्या आईकडेच गिरवले. पदम आणि जावळी (भरतनाट्यम नृत्याच्या सादरीकरणातील दोन प्रकार) करताना त्यातील आशयबरहुकूम भावकाम, म्हणजेच अभिनय करताना गौरीअम्माची समाधी लागत असे. गौरीअम्मा गात असलेल्या गाण्यातील शब्दांतून प्रतीत होणारा आशय आणि तिच्या चेहऱ्यावरील अभिनय यात विसंगती शोधणं जाणकारांनाही कठीण होत असे. इतकं तंतोतत भावदर्शन गौरीअम्मा आपल्या चेहऱ्यावरील अभिनयातून घडवत असे. संपूर्ण अंगभर नेसलेली साडी, जिच्यातून पायाचं नखही कुणाच्या दृष्टीस पडणार नाही. फक्त चेहरा आणि हात, तेवढेच काय ते भावाभिव्यक्तीसाठी मोकळे. पण आपल्याला बसण्यासाठी मिळालेल्या तेवढ्याशा अवकाशात गौरीअम्मा नृत्याभिनयाच्या ब्रह्मांडाचं दर्शन घडवायच्या.

देवदासी परंपरेतील हा नृत्याभिनय ही एक खास वेगळीच बाब होती आणि आहे. देवदासी परंपरेचं कुणीही शहाणा वा विवेकी व्यक्ती कधीच समर्थन करणार नाही. मात्र या परंपरेनं संगीत-नृत्यादी कलांची जी सेवा केली, ती कुणीही विसरू शकणार नाही. किंबहुना या कला ही त्यांचीच जन्मजात मिरासदारी आहे. त्यामुळेच तर पुढच्या काळात जेव्हा या कला पांढरपेशांच्या हातात आल्या, तेव्हा त्या कलांचा आत्माच हरवला. कारण या स्थित्यंतराच्या टप्प्यावर रसिकता संपुष्टात येते आणि विद्वत्ता पणाला लागते. म्हणून तर ज्या रुक्मिणीदेवींनी पारंपरिक दासीआटमला शास्त्रशुद्ध ब्राह्मणी रूप दिलं, त्याच एके ठिकाणी म्हणतात- ‘गौरीअम्माकडून अनेकांनी त्यांच्या-त्यांच्या क्षमतेनुसार एका टप्प्यापर्यंत बरंच काही घेतलं आणि आत्मसात केलं. पण तरीही गौरीअम्माकडे असं काहीतरी होतं, जे कुणीच आत्मसात करू शकलं नाही. ते काय? तर नृत्य करताना तिच्या शरीराची असलेली ठेवण, तिचा पवित्रा, आपल्या लयबद्ध हालचालींचा तिने राखलेला आब व डौल आणि सरतेशेवटी गौरीअम्माची भावप्रदर्शकता… ही तिच्या नृत्याची काही खास वैशिष्ट्य होती, जी कुणीच आत्मसात करू शकलं नाही. कदाचित ती एखाद्याकडे वंशपरंपरेनेच येत असतील…’

…आणि गौरीअम्माची वंशपरंपरा देवदासींची होती. ज्यांच्याकडे कला होती, पण लोक त्या कलेकडे दूषित नजरेने पाहत होते. गौरीअम्माचं दुर्दैव म्हणजे तिचा ऐन बहराचा काळ देवदासी म्हणूनच व्यतीत झाला. आपल्या आईप्रमाणेच तीदेखील कपालीश्वर मंदिरातील मानाचं स्थान असलेली देवदासी होती आणि देवाच्या मनोरंजनासाठी नृत्य करणं हाच तिचा धर्म होता. या नृत्यात ती अगदी परिपूर्ण होती. मात्र १९व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धात तथाकथित संस्कृतिरक्षकांनी संपूर्ण देशभऱ सुरू केलेल्या नृत्यविरोधी चळवळीची झळ गौरीअम्मालाही बसली. तिला मंदिराबाहेर आपल्या नृत्याचा आविष्कार कधीच घडवता आला नाही. परिणामी ऐन तारुण्यात तिला एक कलावंत म्हणून समाजमान्यता मिळाली नाही. उलट तत्कालीन समाजसुधारक असलेल्या मुथ्थुलक्ष्मी रेड्डी यांच्या देवदासी प्रथेविरोधातील आंदोलनामुळे गौरीअम्माला कपालीश्वर मंदिर प्रशासनाने दिलेलं घर सोडावं लागलं आणि त्या उघड्यावर आल्या. पण गौरीअम्माची कपालीश्वरावर एवढी निष्ठा होती की, त्यांनी भाड्याचं घरही असं शोधलं, ज्याची खिडकी त्या कपालीश्वराच्या दिशेने उघडेल.

कपालीश्वर मंदिराच्या बाहेर पडायला लागणं हा श्रद्धेच्या दृष्टीने गौरीअम्मावर झालेला एक मोठा आघात होता, पण त्याची सकारात्मक बाजू अशी होती की, गौरीअम्माकडे आता उदरनिर्वाहासाठी इतरांना नृत्य शिकवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. गौरीअम्माचं तारुण्य कपालीश्वर मंदिरातच व्यतीत झालं, म्हणून तर १९३२मध्ये मद्रास संगीत अकादमीमध्ये तिने पहिला जाहीर कार्यक्रम केला तेव्हा ती तब्बल ४० वर्षांची होती. त्या काळात ई. कृष्ण अय्यर नावाचे प्रसिद्ध वकील देवदासींच्या पारंपरिक नृत्याला कला म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या प्रयत्नात होते. त्यासाठी ते स्वतः नृत्य शिकलेही होते. देवदासींचं नृत्य म्हणजे निव्वळ बाजारूपणा नव्हे, ती एक कला आहे, असं अय्यर यांचं म्हणणं होतं आणि त्यासाठी त्यांची एकप्रकारे एकाकी झुंज सुरू होती. कारण एकीकडे इंग्रजी शिकून बाहेर पडलेल्या नवशिक्षित पिढीने देवदासींच्या कलेला नावं ठेवायला सुरुवात केली होती,

तर दुसरीकडे मुथ्थुलक्ष्मींसारख्या समाजसुधारक देवदासी प्रथा बंद पाडायला (अर्थात चांगल्याच हेतूने) निघाल्या होत्या. त्यामुळे देवदासींची एक समृद्ध आणि संपन्न कला लयाला जाईल, अशी भीती ई. कृष्ण अय्यर यांना वाटत होती आणि म्हणून ते देवदासींचं नृत्य ही कला असल्याचं ठासून सांगत होते. त्यांच्या या कामी कळतनकळत त्यांना मोलाची मदत झाली ती गौरीअम्माची. कारण गौरीअम्मा परंपरेतील म्हणून जे काही सादर करत होती, तो एकप्रकारे कलेचा शास्त्रशुद्ध आविष्कारच होता… आणि त्यात शास्त्र दिसत असल्यामुळेच रुक्मिणीदेवी नावाची एक ब्राह्मणकन्या त्यांच्याकडे देवदासीआटमचं प्रशिक्षण घ्यायला जायला लागली. किंबहुना तत्कालीन अनेक विद्वानांनी रुक्मिणीदेवी यांना गौरीअम्माचंच नाव सुचवलं होतं. विशेष म्हणजे नंतरच्या काळात रुक्मिणीदेवींनी जेव्हा स्वतःची नृत्यशाळा सुरू केली, तेव्हा तिथे गौरीअम्माला गुरू म्हणून मानाने निमंत्रित केलं. गौरीअम्माचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३२ला झाला. तर शेवटचा जाहीर कार्यक्रम १९३५ साली राष्ट्रीय काँग्रेसच्या रौप्यमहोत्सवी अधिवेशनात झाला. त्यानंतर गौरीअम्माने कुठे जाहीर कार्यक्रम केल्याची नोंद नाही. किंबहुना आयुष्याच्या उत्तरार्धात नामवंत गुरू म्हणूनच तिला अधिक प्रतिष्ठा मिळालेली दिसते.

आयुष्याच्या अगदी शेवटी तर तिला पूर्णपणे अंधत्व आलं होतं, तरीही तिने आपलं पारंपरिक देवदासीनृत्य करणं आणि शिकवणं थांबवलं नव्हतं. कारण नृत्य हाच तिचा प्राण होता. नृत्य थांबलं असतं, तर ती केव्हाच गतप्राण झाली असती. किंबहुना तिच्या आयुष्यात नृत्य होतं म्हणूनच ती जिवंत होती, अन्यथा तिचं कौटुंबिक आयुष्य़ म्हणजे दुःखाची महागाथाच होतं. कोणत्याही प्रकारचं संपन्न सांसारिक आयुष्य तिच्या वाट्याला आलं नाही. मुलं झाली, तीही सामान्य निघाली. किंबहुना गौरीअम्माने नृत्याच्या शिकवण्या करून पैसे कमवायचे आणि तिच्या मुलांनी ते दारूवर उधळायचे, हे नित्याचंच झालं होतं. त्यामुळे अधिकाधिक काळ ती शिकवण्यांच्या निमित्ताने घराबाहेरच राह्यची. नृत्य-अभिनय शिकवायला लागली की तिला आपल्या साऱ्या लौकिक आयुष्याचा सहजीच विसर पडायचा… मग ती मनाने केव्हाच कपालीश्वराच्या गाभाऱ्यात पोचायची आणि बघताबघता गायला लागून त्यावर सुरेख अभिनय सुरू करायची…

शेवटी शेवटी तर ती म्हणायची, डोळे गेलेत बरं झालं… आता कपालीश्वराकडे डोळे उघडून बघायला नको, तो तर मला माझ्या अंतःचक्षूंनीच दिसतो आहे!

– मुकुंद कुळे

RohanSahityaMaifaljpg-1-1
Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…
देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *