ढाई अक्षर प्रेम के…

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ कथासंग्रहातल्या संपादकाच्या मनोगतातील निवडक भाग


गेल्या अनेक वर्षांमध्ये जगभरात छोटी-मोठी युद्धं, अतिरेकी हल्ले, खून-मारामाऱ्या, आर्थिक मंद्या, चित्र-विचित्र प्रकारचे अनेक आजार, कुपोषण, भूकंप, महापूर…. अशा, रोजचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना घडतच होत्या…तरी त्यातून मार्ग काढत आपण उद्याचा दिवस उगवण्याची वाट पाहत होतो आणि पुढे जात होतो. पण या वर्षाच्या सुरुवातीपासून जगभरात अचानक अशा काही घटना घडू लागल्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठ्ठी उलथापालथ झाली…‘करोना’चा इवलासा व्हायरस वाट मिळेल तिथून आपल्या आयुष्यात, शरीरात घुसू लागला. ज्या आजारावर काही इलाजच माहीत नाही त्याच्याशी लढावं कसं? या प्रश्नासकट अंधारातली लढाई सुरू झाली. मोठमोठ्या राष्ट्रांसह गरिबातले गरीब देश भरडून निघाले. सुखवस्तू, सधन वर्ग आपापल्या गुबगुबीत घरात लॅपटॉपसमोर बसून कामाचे तास भरत पहिल्यांदाच मिळालेल्या इतक्या साऱ्या वेळेचा सदुपयोग कसा करावा या विवंचनेत होता; तर गरीब, हातावर पोट असणारा वर्ग सरकारच्या मदतीकडे, लॉकडाउन कधी संपतो याकडे डोळे लावून बसला होता.

या सगळ्याच धामधुमीत खरंतर रोजचं आयुष्य कुठेतरी थांबून गेलंय असं वाटू लागलं. नैराश्याचे लोटच्या लोट भोवतालच्या हवेत जाणवत होते. मित्र-मैत्रिणीसोबत सुस्कारे टाकूनच्या गप्पा तर चालूच होत्या. बारामती भागात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे परेश, त्याची पत्नी समु, संतोष शेंडकर या मित्रांच्या संपर्कात होते. ‘करोना’मुळे बिकट परिस्थिती ओढवलेल्या अनेक मजुरांसाठी, कामगारांसाठी त्यांची टीम मदत गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम धडाडीने करत होती. एकदा बोलत असताना परेश म्हणाला, “या सर्व अनुभवांमध्ये खूप वेगवेगळे चेहरे दिसत राहतात मजुरांचे. पण, माझ्या गावाकडची, नेरच्या दिशेने पायपीट करत जाणारी ‘ती’ सारखी हाक घालते. तिची गावाकडे जायची ओढ, घराकडे लागलेले डोळे जाम अस्वस्थ करतात. तिची गोष्ट लिहावी वाटते जेणेकरून तिच्यासारखे असंख्य स्थलांतरित लोक आज काय अनुभवताहेत हे तुझ्यासारख्या शहरी लोकांना समजेल.” बोलता बोलता पुस्तक डोळ्यांसमोर आकार घेऊ लागलं. याच धर्तीवर अजून काही कथा घेतल्या तर? करोनाच्या या बंद बंद दिवसांमध्ये माणसाला जिवंत ठेवणारा असा कोणता धागा असू शकतो? प्रेम, माया, ओढ, मैत्री?…. ज्याला हा वायरस काहीच ताप देऊ शकत नाही. हा धागाच बिना मास्क, बिना सॅनिटायझर तुमच्या आत ऑक्सिजन बनून राहतो. हे प्रेम मग ते कोणत्याही नात्यातलं, जाणिवेतलं असू शकतं… लव्ह इन द टाइम ऑफ करोना !! बेस्ट, शीर्षकसुद्धा क्लिक झालं.

‘करोना’च्या या अवघड काळात मानसिक स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरभरून पुस्तकं येताहेत. ‘काळजी घ्या’, ‘घरात राहा’ सांगणारे अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस मेंदूचा ताबा घेताहेत. पण मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी!

मग काय, ‘टीम रोहन’ला ही कल्पना ऐकवली. मार्क्वेझच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ या क्लासिक इतकीच ती सुपरहिट होईल याची सर्वांना खात्री वाटली. हळूहळू लेखकांच्या नावाचा शोध, त्यांच्याशी गप्पा-चर्चा, शब्दसंख्येची घासाघीस, ‘प्लीज कथा वेळेत द्या’च्या आणाभाका…. सगळीच लगीनघाई जोरात सुरू झाली. आम्ही ज्या ज्या लेखकांशी बोललो त्या सर्वांनीच कल्पना उचलून धरली. त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं – कदाचित त्यांनाही यावर लिहून मोकळं व्हायचं होतं. खरंतर अजून खूप लेखक डोक्यात होते, पण वेळेची मर्यादा आणि पानसंख्येचं गणित यांमुळे आम्ही जास्त पुढे गेलो नाही.

दिलेल्या मुदतीत धडाधड कथा यायला लागल्या. पहिल्यांदाच असं घडलं असेल की, लेखकांच्या विशेष मागे न लागताच कथा येऊन हजर!! अपेक्षा केल्याप्रमाणे सर्व कथांचे बाज, शैली अतिशय रंगबेरंगी निघाली. कथा मेलवर दिसली की आम्ही ‘टीम रोहन’ मंडळी अक्षरश: उतावीळासारखी वाचून घेत असू आणि कधी एकदा फोनवर त्याविषयी बोलतो, असं आम्हा सगळ्यांना होत असे. प्रदीपसर सर्व लेखकांसोबत संपर्कात होते. खास त्यांच्या शैलीतून संवाद साधत, कधी कथेतले बदल तर कधी कथेतल्या आवडलेल्या जागांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, कथा वेळेत येण्याच्या मोहिमेत मुख्य शिलेदाराचं काम चोख बजावत होते. ‘या वेळेस नाही जमणार सर कथा’ असं वारंवार म्हटल्यानंतर हृषीकेश पाळंदेचा सरांना मेसेज – ‘सर, अभिनंदन! मी कोवीड पॉझिटिव्ह झालो अखेर’ त्या अभिनंदनातून आम्हाला काय समजायचं ते समजलंच!! हुरहुर वाटली ती फक्त हृषीकेश गुप्तेच्या कथेची. त्याची कथा या संग्रहात असावीच असं वाटत होतं; पण काही कारणांनी तो कथा देऊ शकला नाही.

Anuja Jagtap

नीरजा, मनस्विनी, गणेश मतकरी यांसारखे आजचे लिहिते आणि लोकप्रिय लेखक या निमित्ताने रोहनशी जोडले गेले. श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, प्रणव सखदेव, हृषीकेश पाळंदे, परेश ज.म. यांसारखे आमचे हक्काचे लेखक एका विनंतीवर कथा द्यायला तयार झाले. या प्रत्येकाच्या कथेत ‘लव्ह’ हा अँगल किती भन्नाट आणि अर्थपूर्ण आलाय हे तुम्ही प्रत्यक्ष कथा वाचाल तेव्हा जाणवेलच. ओढूनताणून ‘करोना’ची पार्श्वभूमी आणून त्यात प्रेमाचा खून कुणीही नशिबाने केला नाही, त्यामुळे या सगळ्याच कथा खोलवर स्पर्शून जातात.

इतर सर्व पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही उत्तम टीमवर्कचं फलित आहे. माझ्यासोबत नीता आणि प्रणवनी काही कथांचं संपादन केलं आहे. प्राचीनी तिचा नेहमीचा आर्टिस्टीक टच पुस्तकाला दिला आहे. मुग्धा दांडेकर आणि प्रभा वझे यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. रोहनच्या छायाचित्रांचा वापर करून राजू देशपांडेंनी पुस्तकाचं दिलखेच मुखपृष्ठ तयार केलं आहे.
‘करोना’च्या या अवघड काळात मानसिक स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरभरून पुस्तकं येताहेत. ‘काळजी घ्या’, ‘घरात राहा’ सांगणारे अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस मेंदूचा ताबा घेताहेत. पण मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी! प्रेमाचा विषय निघालाय आणि कबीराची आठवण नाही असं कसं? तर मनोगताचा समारोप कबीराच्या या दोह्याने –
पोथी पढ पढ जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय ।

-अनुजा जगताप

  • लव्ह इन द टाइम ऑफ करोना
  • ८ लिहिते लेखक… : नीरजा, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, प्रवीण धोपट, प्रणव सखदेव,
    मनस्विनी लता रवींद्र, परेश जयश्री मनोहर, हृषीकेश पाळंदे

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०


रोहन शिफारस

लव्ह इन द टाइम ऑफ करोना

कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या

एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?

LITOC-cover

250.00Add to Cart


Anuja Jagtap
संपादक उवाच’ या लेखमालेतील अनुजा जगताप यांचा लेख

मला ‘जिवंत’ ठेवणारी वास्तवातली पुस्तकं

‘समाजरंग’ची पुस्तकं करताना काही विशेष बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मराठी साहित्यात गेली ५० वर्षं शोषित, वंचित समूहांचं दर्जेदार आणि संघर्ष उलगडून दाखवणारं लिखाण प्रकाशित झालं आहे. हे सर्व साहित्य वाचताना या समूहांच्या सामाजिक पार्श्वभूमीचं भान असणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आस आणि समज असणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे वेगवेगळे गट आणि प्रवाह, त्यांच्यातलं राजकारण हे अगदी खोलवर नाही, पण काठाकाठाने माहीत असणं गरजेचं वाटतं.

लेख वाचा…


लक्षणीय कथा-कादंबऱ्या

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *