शिक्षणाने आणि व्यवसायाने केमिकल इंजिनिअर असलेले हृषीकेश गुप्ते हे मराठी साहित्यातले आजचे आघाडीचे तरुण सर्जनशील लेखक आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे या गावी त्यांच्या जन्म झाला आणि शिक्षणही तिथेच झाले. 2000 सालापासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि 2008 सालापासून त्यांचं लेखन विविध नियकालिकांमधून प्रसिद्ध झालं. मनातली भीतीची आदिम भावना, माणसाच्या लैंगिक प्रेरणा, त्याच्या भावभावनांची उलघाल ही त्यांच्या लेखनाची मुख्य आशयसूत्रं होतं. गूढ-अद्भुतता, चित्रमय, प्रासादिक व ओघवती भाषा या लेखनवैशिष्ट्यांमुळे त्यांचं लेखन खिळवून ठेवतं.
'दंशकाल’, 'चौरंग' या कादंबऱ्या, 'काळजुगारी’, 'हाकामारी' या लघुकादंबऱ्या आणि 'अंधारवारी’, ‘दैत्यालय’, 'घनगर्द’, 'परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष' हे कथासंग्रह अशी त्यांची एकूण साहित्यसंपदा प्रकाशित आहे. विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांनी 'दिल, दिमाग और बत्ती’ या चित्रपटाचं आणि 'हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ या स्वलिखित कथेवर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.
हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.
ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.
त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी
मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.
हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.
तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.
महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.
म्हणूनच त्याच्या कथांमध्ये
एक चैतन्य सळसळताना जाणवतं.
‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून
हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.
ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे
भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.
मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.
त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.
पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.
याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.
– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)
Reviews
There are no reviews yet.