‘आयुष्यात काय करायचं आहे’ हे माहीत असण्यापेक्षा, ‘काय करायचं नाही’ हे कळत जाणं फार महत्त्वाचं असतं; निदान मला तरी तसं वाटतं. आजवर बरेचदा, मला ‘आपल्याला काय करायचं नाहीये’ हे कळल्याने माझ्या पुढ्यात असलेलं धुकं थोडं वितळून समोरची वाट शोधायला मदत झाली आहे. माझ्या आयुष्यात अशा वेळा अनेकदा आल्या आहेत, पण त्यांतल्या दोन मला महत्त्वाच्या वाटतात.
पहिली वेळ होती अकरावीनंतर. दहावीत चांगले गुण मिळाल्याने प्रवाहपतिताप्रमाणे मी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला. अकरावीचं वर्ष सरून आता बारावीसाठी प्रवेश घ्यायची वेळ येऊन ठेपलेली. मला अगदी सुस्पष्ट समजून चुकलेलं की, आपल्या मनाचा खराखुरा कल आहे तो साहित्य, भाषा यांकडे. आपण त्याच विषयांत पुढचं शिक्षण घेतलं पाहिजे. त्या वेळी ते शिक्षण घेऊन करिअर म्हणून पुढे काय करायचं, याबद्दल अगदीच जुजबी माहिती मला होती, पण तरी मी माझ्या आतल्या आवाजाला जागून कला शाखेत प्रवेश घेतला. मराठी विषय घेऊन पदवी संपादित केली आणि त्यानंतर पत्रकारितेची पदविका घेण्यासाठी प्रवेश घेतला.पत्रकारितेचा अभ्यास सुरू असतानाच मी ‘लोकसत्ता’मध्ये सहा महिने ‘ट्रेनी’ म्हणून काम केलं. नंतर ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये ‘उपसंपादक’ म्हणून रुजू झालो. पत्रकारितेतले माझे सुरुवातीचे दिवस फार छान गेले. हे क्षेत्रच जलद गतीने, डेडलाइन्सच्या तालावर नाचणारं. त्यामुळे या गतीने येणारी झिंग मी सुरुवातीला पुरेपूर अनुभवली. पण पुन्हा त्या ‘नेति नेति’ म्हणणाऱ्या वेळेने माझ्या पाठीवर हलकेच थाप घातली. ही ती दुसरी वेळ! आजूबाजूची हवा धुकट होऊन समोरची वाट दिसेनाशी करणारी… आणि मग समजलं की, मला उपसंपादक म्हणून काम करायचं नाहीये. मी यात करिअर नाही करू शकत. यातून मला हवा तो सर्जनशीलतेचा आनंद इथे मिळत नाहीये. माझ्याकडे असलेल्या भाषिक कौशल्यांना, साहित्यिक-भाषिक समजेला, धारणांना धार काढायचं काम इथे होत नाहीये. मी जिथे आहे, तिथेच राहतो आहे. कारण पत्रकारितेतल्या सर्जनशीलतेला काही मर्यादा असतात. कितीही नाही म्हटलं तरी ते काम रिपिटेटिव्ह असतं. आणि तेव्हा मला समजून चुकलं की, उपसंपादक म्हणून मी जे काही शिकलो आहे, त्यात आता इथून पुढे फार काही वाढ होऊ शकत नाही. उलट, सॅच्युरेशनच जास्त येत जाणार. आणि म्हणून एके दिवशी मी नोकरी सोडून पुस्तक-संपादन क्षेत्रात काहीतरी करायचं हे ठरवलं.
अर्थातच, हा निर्णय घेण्याआधी मी पत्रकारिता करत असतानाच काही पुस्तकांची कामं करून पाहिली होती आणि आपल्याला हे काम जमेल, यात मजा आहे, असा थोडाफार आत्मविश्वासही मला मिळू लागला होता.

एका संहितेवर काम करून झाल्यावर, पुढच्या संहितेला सामोरं जाताना संपादकाला आधीची संहिता विसरून पुढे जावं लागतं. कारण प्रत्येक संहिता, ती निर्माण करणारा लेखक, त्याने निर्माण केलेलं विश्व, त्याचे अनुभव, त्याने दिलेली माहिती, त्या माहितीचं केलेलं विश्लेषण आणि त्यासाठी वापरलेली भाषा आदी बाबी, प्रत्येक पुस्तकागणिक बदलत जातात.

करिअर म्हणून पुस्तक-संपादनाचं क्षेत्र निवडल्यानंतर, मी काही बाबी स्वत:ला स्पष्ट केल्या होत्या. माझ्या आजूबाजूचे बहुतेक मित्र आयटीत होते किंवा इंजिनिअर झाले होते. काही परदेशात म्हणजे अमेरिकेत गेले होते ! किंवा कोणत्यातरी कॉर्पोरेटमध्ये काम करत होते. आपण काही अशा चकाचक कंपन्यांमध्ये नसू हे मला माहीत होतं. दुसरं म्हणजे कितीही, काही झालं तरी आयटी-एमबीएवाल्यांना जेवढे पैसे मिळतात, तेवढे आपल्याला मिळणार नाहीत हेही मला माहीत होतं; आणि ते मी स्वीकारलंदेखील. किंबहुना, खूप पैसा मिळवणं किंवा कॉर्पोरेट्समध्ये काम करत वरच्या पायऱ्या चढत जाणं अशा आकांक्षा मला कधीच नव्हत्या, तो माझा पिंडच नव्हता. आपण करू त्या कामात आपल्याला आनंद मिळायला हवा आणि जगण्यापुरते पैसे मिळायला हवेत हे माझं अगदी पहिल्यापासून – विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यापासूनचं प्रथम प्राधान्य होतं आणि आहे. आणि आज या क्षेत्रातला मी सर्वांत ‘तरुण संपादक’ आहे याचा मला अभिमानही वाटतो !

1990-Cover
जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारा ललितलेख संग्रह

पुस्तक-संपादक या पदासाठी ९ वर्षांचा अनुभव हा काही तसा फार मोठा नसतो. पण तरी या कारकीर्दीकडे मागे वळून पाहताना मी पुस्तक-संपादक का झालो आणि पुढेही मला हेच काम का करायचं आहे, या प्रश्नांचा वेध घेताना काही गोष्टी उमजतात, त्या अशा – लेखकाने लिहिलेल्या संहितेचं पुस्तकात रूपांतर होताना अनेक क्रिया-प्रक्रिया घडतात. त्यात संपादनाची प्रक्रिया अत्यावश्यक असते. खरंतर ती मूलभूत अशी प्रक्रिया असते. तिच्याशिवाय पुस्तक निर्माण होऊ शकतच नाही. आणि त्यामुळेच प्रत्येक पुस्तक लिहिताना जसा लेखकाचा नवा जन्म होत असतो; किंवा तो आपली कात टाकत असतो, अगदी तसंच त्या पुस्तकावर काम करणाऱ्या संपादकाच्या बाबतही घडत असतं. संपादकालाही त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक संहितेकडे नव्याने पाहावं लागतं, आधीची पाटी कोरी करून ! एका संहितेवर काम करून झाल्यावर, पुढच्या संहितेला सामोरं जाताना संपादकाला आधीची संहिता विसरून पुढे जावं लागतं. कारण प्रत्येक संहिता, ती निर्माण करणारा लेखक, त्याने निर्माण केलेलं विश्व, त्याचे अनुभव, त्याने दिलेली माहिती, त्या माहितीचं केलेलं विश्लेषण आणि त्यासाठी वापरलेली भाषा आदी बाबी, प्रत्येक पुस्तकागणिक बदलत जातात. मी संपादित केलेल्या दोन पुस्तकांचं इथे उदाहरण द्यावंसं वाटतं – पहिलं, सचिन कुंडलकर लिखित ‘नाइन्टीन नाइन्टी’ आणि दुसरं, धनंजय धुरगुडे लिखित ‘माझा धनगरवाडा’. दोन्ही पुस्तकं अनुभवपर असली, तरी त्यांचे लेखक, त्यांची शैली, आशय-विषय विभिन्न आहेत.
‘नाइन्टीन नाइन्टी’मध्ये मुळात आम्ही लेख निवडतानाच हे लेख आपण ‘पुस्तकासाठी’ निवडत आहोत हे डोळ्यासमोर ठेवलं. नंतर सचिनने लेखांचं पुनर्लेखन केलं. काही लेख एकमेकांना जोडून घेऊन नवे लेख तयार केले. काही लेख आजच्या परिप्रेक्ष्यात नव्याने लिहिले अथवा अपडेट केले. १९९० नावाचा, ज्याला पुस्तकातला बीजलेख म्हणता येईल, असा दीर्घ लेख सचिनने या पुस्तकासाठी लिहिला. थोडक्यात, त्यावर बरंच काम झालं.
‘माझा धनगरवाडा’ हे पुस्तक एका वंचित समाजघटकातून संघर्ष करत शिक्षक झालेल्या तरुणाचं आत्मकथन. नाइन्टीन नाइन्टीतल्या लेखांना घाट होता, लेखकाची स्वत:शी शैली होती आणि त्याला काय सांगायचं आहे हे त्याला पक्कं माहीत होतं, अगदी त्याच्यातल्या अंतर्विरोधांसकट तो आपल्या लेखांमधून वाचकांसमोर आपलं मन मोकळं करत होता. पण धनगरवाडाची संहिता मात्र तशी नव्हती. लेखकाने त्याला जे जे सांगायचं होतं, ते आपल्या खास अशा धनगरी बोलीभाषेत, गोष्टीवेल्हाळ शैलीत सांगितलं होतं. त्यात धनगरी जीवनपद्धतीचं साद्यंत वर्णन होतं. त्यांच्या चालीरीती होत्या, गोष्टी होत्या, खडतर भटकं जगणं होतं आणि या जगण्यावर मात करून शिक्षण घेऊन स्थिरस्थावर होण्याची जिद्द होती! त्यामुळे ‘नाइन्टीन नाइन्टी’ या पुस्तकाकडे संपादक म्हणून मी जसं पाहिलं, तसंच मी ‘धनगरवाडा’कडे पाहू शकलो नाही आणि याउलटही. म्हणूनच मला संपादन करणं हे काम चॅलेंजिंग आणि तितकंच एक्सायटिंग वाटतं. म्हणजे कॉर्पोरेट भाषेत सांगायचं तर प्रत्येक पुस्तक हा एक नवा, माझ्या क्षमतांना आव्हानं देणारा आणि माझ्याकडे असलेल्या क्षमतांपेक्षा अधिकची मागणी करणारा ‘प्रोजेक्ट’ असतो.
संपादक असण्यातली मला सर्वांत आवडणारी बाब म्हणजे संपादकाला आपलं अज्ञान लपवून ठेवून चालत नाही. आणि तसं त्याने केलं तर त्याची गोची होऊ शकते. त्याला त्याचा इगो कुरवाळत बसण्याची मुभा नसते. ‘मला हे माहीत नाही’ असं स्पष्टपणे कबूल करून टाकावं लागतं, जे मला फार आवडतं. (ही बाब आजच्या काळात फारच दुर्मीळ झाली आहे!) नुकतंच मी वीरेंद्र ताटके लिखित ‘माझं कुटुंब, माझी गुंतवणूक’ या पुस्तकाचं संपादन केलं. पुस्तक ललितेतर, त्यातही उपयुक्त प्रकारात मोडणारं. पण ताटके यांनी इतक्या सहजसोप्या भाषेत, रंजक पद्धतीने आर्थिक नियोजन कसं करायला हवं हे मार्मिकरीत्या सांगितलं आहे की, या पुस्तकाचं काम करताना मला अर्धवट माहीत असलेल्या कितीतरी बाबी समजल्या. शिवाय अजिबात माहीत नसलेल्या बाबीही नीट समजून घ्याव्या लागल्या. कारण मला वाचकाला त्या बाबी नीट समजतील का नाही, त्यांच्यापर्यंत पोचतील का नाही हे तपासून पाहायचं होतं. तसं होत नसेल, तर ते कशा प्रकारे मांडलं तर अधिक प्रभावीरीत्या समजेल, यावर विचार करायचा होता.
बऱ्याच जणांचा असा समज आहे की, ‘संपादन करणं’ म्हणजे लेखकाने लिहिलेल्या मजकुरातल्या शुद्धलेखनाच्या, फारतर वाक्यरचनेच्या चुका लाल पेनाने दुरुस्त करणं आणि एखादा शब्द असाच कसा बरोबर आहे याबद्दल लेखक वा भाषांतरकाराशी वाद घालणं ! अर्थात, ‘मजकूर संपादन आणि मुद्रितशोधन’ ही पुस्तकनिर्मिती प्रक्रियेतली महत्त्वाची अंगं आहेत; पण या काहीशा तांत्रिक कामाशिवाय आणखीही कितीतरी कामं संपादक करत असतो. म्हणजे असं समजा की, एका टोकावर लेखक आहे आणि दुसऱ्या टोकावर वाचक. आणि या दोघांच्या मधोमध, त्यांना जोडणाऱ्या पुलावर संपादक उभा असतो. दोघांपासून तितकंच समसमान अंतर राखून. त्याला लेखकाचंही समजून घ्यायचं असतं, आणि त्याच वेळी त्याला दुसऱ्या टोकाला उभ्या असणाऱ्या वाचकाकडेही नीट लक्ष द्यायचं असतं. एकाच वेळी त्याला दोन भूमिकांमध्ये – लेखकाच्या आणि वाचकाच्या – शिरून संहिता वाचायची असते. आणि ही तारेवरची मोठी कसरत असते. कारण संहिता वाचत असताना मला आपल्या आतला चिकित्सक, तटस्थ संपादकही जागा ठेवायचा असतो.
मार्केटिंग किंवा सेल्स विभागातल्या लोकांशी प्रत्यक्ष डील करणाऱ्या माणसांबद्दल मला कायमच कुतूहल आणि कौतुक वाटत आलंय. कारण एकाच आयुष्यात त्यांना हजारो मानवी स्वभाव, वृत्ती-प्रवृत्ती पाहायला, अनुभवायला मिळतात. जगताना हे अनुभव फार समृद्ध करणारे असतात जगरहाटीचं विविधांगी दर्शन घडवत असतात. आताशा मला असं वाटू लागलं आहे की, मी जे संपादनाचं काम करतो, त्यात माझ्या पुढ्यात आलेल्या संहिताही अशाच असतात – निरनिराळ्या माणसांसारख्या ! अनेक वृत्ती-प्रवृत्ती, पात्रं, उदाहरणं, मानवी भावभावना, तसंच नवी-जुनी, अपडेटेड अशी कितीतरी माहिती आपल्या पोटात घेऊन बसलेल्या, आनंद-सुख-दु:खं ल्यालेल्या.

Pranav Sakhadeo Photo

हल्ली माझ्याकडे जेव्हा एखादी संहिता येते, तेव्हा काम सुरू करण्याआधी मी थोडा वेळ तिच्याकडे नुसता पाहत बसतो. कसं असेल हे नवं जग? काय काय निर्माण केलं असेल या जगात लेखकाने? असे कितीतरी प्रश्न मनात फेर धरतात. आणि अचानक मला जाणवतं की, संहिता उष्ण आहे, ती अजिबातच निर्जीव नाही, ती जिवंत आहे माणसासारखी ! ती परीकथेतल्या राक्षसासारखी आहे, ज्यात लेखकाने आपला जीव दडवून ठेवलेला आहे. त्यातले शब्द आपली वाट पाहत आहेत. त्यातले शब्द आपला माग काढत आपल्यापर्यंत आले आहेत किंवा आपण त्यांचा माग काढत त्यांच्यापर्यंत आलो आहोत.

आम्ही एकमेकांना पूर्णत: अनोळखी असलो, तरी आम्हाला एकमेकांशी मैत्री करून गप्पांना सुरुवात करायची आहे, संवादाचा पूल बांधायचा आहे. म्हटलं तर हे काम अत्यंत अवघड असतं, म्हटलं तर अगदी सोपं ! काहींशी मैत्री चटकन होते, संवाद जुळून येतो. काहींच्या बाबत मात्र जरा वेळ लागतो. वाट पाहावी लागते. भाषेचा, जीवनजाणिवांचा, समजेचा कस लागतो. आणि असा कस लागणं मला आवडतं. त्यातच आपल्या वाढीची मेख दडलेली असते. मला माझी वाढ होत राहणं आवडतं.

-प्रणव सखदेव

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल जानेवारी २०२०

Neeta Kulkarni
संपादक उवाच’ या लेखमालेतील नीता कुलकर्णी यांचा लेख

अनुवादाचं संपादन करताना…

मूळ लेखक कोण आहे, त्याचा विषय कसा आहे, सर्वसामान्यपणे तो बोलतो-लिहितो ती शैली कशी आहे, यावर अनुवादाच्या अनेक गोष्टी ठरत असतात. उदा. विचारवंत व्यक्ती, पत्रकार, चित्रपट-समीक्षक, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, आहारतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक, इतिहासतज्ज्ञ, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धती वेगळी असते आणि त्याची अभिव्यक्तीही वेगळी असते. अनुवाद करताना या प्रत्येकाचं खास वेगळेपण जपलं गेलंय की नाही, त्याची शैली अनुवादात उतरलीय की नाही, हे तपासणं माझ्या मते फार महत्त्वाचं असतं.

लेख वाचा…


Anuja Jagtap
संपादक उवाच’ या लेखमालेतील अनुजा जगताप यांचा लेख

मला ‘जिवंत’ ठेवणारी वास्तवातली पुस्तकं

‘समाजरंग’ची पुस्तकं करताना काही विशेष बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मराठी साहित्यात गेली ५० वर्षं शोषित, वंचित समूहांचं दर्जेदार आणि संघर्ष उलगडून दाखवणारं लिखाण प्रकाशित झालं आहे. हे सर्व साहित्य वाचताना या समूहांच्या सामाजिक पार्श्वभूमीचं भान असणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आस आणि समज असणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे वेगवेगळे गट आणि प्रवाह, त्यांच्यातलं राजकारण हे अगदी खोलवर नाही, पण काठाकाठाने माहीत असणं गरजेचं वाटतं.

लेख वाचा…



प्रणव सखदेव यांचं कथा-साहित्य

96 मेट्रोमॉल


[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach



170.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

निळ्या दाताची दंतकथा आणि इतर कथा


प्रणव सखदेव


माझ्या बापाने तोंड उघडलं
काही क्षण गेले असतील नसतील .
मग पहिल्यांदा त्या पत्रकाराला माझं –
या निळ्याभोर दंतराजाचं दर्शन झालं.
माझा बाप विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर देत होता.
पण पत्रकारांचं सगळं लक्ष केंद्रित झालं होतं,
ते माझ्यावर – शहाणपणाच्या निळ्याभोर दंतराजावर!
माझा बाप बोलणं थांबत म्हणाला, काय झालं?
पत्रकार म्हणाला, ”तुम्हाला एक दात आहे, निळाभोर!”

बापाच्या मनात तो आवाज घुमला – ‘दंतरुपी शहाणपणा!’
तो उठणार, तोच धपकन खाली पडला आणि मेला!
आणि माझी रवानगी झाली त्या पत्रकाराच्या हिरडीत!

मानवाची फरफट आता सुरु होणार होती.
कारण माझी हि कहाणी कुणालाच ठाऊक नव्हती.
खरंतर शहाणपणाचाच शाप झाला होता!’


225.00 Add to cart

नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

[taxonomy_list name=”product_author” include=”421″]


खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्‍या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्‍या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!


250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *