‘बदल’, ‘परिवर्तन’ हे जीवनाचे अविभाज्य घटक होत. आपलं जे काही आयुर्मान असतं, त्या दरम्यान आपल्याला अनेक बदलांना सामोरं जावं लागतं. आता याला ‘सामोरं जावं लागतं’ असं म्हणावं, की ‘या बदलांचे आपण साक्षीदार असतो’ असं म्हणावं हा ज्याच्या-त्याच्या आलेल्या अनुभवांचा प्रश्न आहे; आणि काही प्रमाणात ज्याच्या-त्याच्या सभोवताली बघण्याच्या दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. खरं म्हटलं तर दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियांचा हा संमिश्र पटच असतो. दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटणं अगदी स्वाभाविक आहे. कारण काही जणांवर या बदलांचे थेट परिणाम होतात. त्यांना या बदलांमुळे आधीची वहिवाट सोडून नव्या वाटेचा शोध घ्यावा लागतो. म्हणजेच बदलांना थेट सामोरं जावं लागतं, तर काहींना तसं थेट भिडावं लागत नाही. त्या बदलाची झळ त्यांना थेटपणे सोसावी लागत नाही. मग अशा बदलाचे आपण साक्षीदार ठरतो. मात्र, असे बदल आपल्या सभोवतालावर परिणाम करतच असतात. त्यामुळे अप्रत्यक्षपणे आपल्यावर परिणाम होत असतात आणि कालांतराने ते आपल्यापर्यंत येऊन पोचतातही. त्याचप्रमाणे कधी होणाऱ्या या बदलांमुळे झळ पोचते, तर कधी आपण त्यांचे लाभार्थी ठरतो. ‘झळ पोचणं’ आणि ‘लाभार्थी होणं’ यांचं प्रमाण प्रत्येकासाठी कमी-अधिक असतं; आणि या प्रमाणानुसार सर्वसामान्यपणे प्रतिक्रिया बनते. तेव्हा, बदल चांगला का वाईट हे अतिशय व्यक्तिगत आणि सापेक्ष आहे. त्रयस्थ भूमिकेतून या बदलांकडे क्वचितच कधी बघितलं जातं.
‘बदलांचा वेग’ हा घटकही महत्त्वाचा आहे. पूर्वी होणारे बदल, निश्चितच धीम्या गतीने होत. उदाहरणार्थ, दूरदर्शनला दिल्लीहून मुंबईला पोचायला वीस वर्षं लागली. तर कृष्णधवल टीव्ही रंगीत दिसण्यासाठी पुढील दहा वर्षांचा काळ जायला लागला. पुन्हा अशी स्थित्यंतरं अभिजनांपासून बहुजनांपर्यंत पोचण्यासाठी आणखी पाच-दहा वर्षं जात. परंतु आताचे बदल हे शीघ्रगतीचे आहेत. पूर्वी असं म्हणत की, आपण अमेरिका-युरोपच्या २५-३० वर्षं मागे असतो. म्हणजेच एखादी टेक्नॉलॉजी, वैज्ञानिक प्रगती किंवा विकास अमेरिकेत राबवल्यानंतर २५-३० वर्षांनी तो जीर्णावस्थेत भारतात उपलब्ध होत असे. मात्र आता हे चित्र बदललं आहे. विशेषत: इंटरनेट, डिजिटल क्रांती अमेरिकेत आणि भारतात, तसंच अभिजनांपासून बहुजनांपर्यंत जवळपास एकाच वेळी पोचली, असं व्यापकदृष्ट्या म्हणता येईल. हे लक्षण चांगलं का वाईट हे प्रत्येकासाठी परिस्थितीसापेक्ष आहे.
इंटरनेटचा प्रभाव सर्वदूर पसरलेला दिसतो. मोठी शहरं, छोटी शहरं, निम-शहरं, ग्रामीण भाग, सर्वत्र इंटरनेटचा प्रभाव आहे. त्यामुळे दळणवळण अनेक बाबतीत एका ‘क्लिकवर’ उपलब्ध झालं. एक स्मार्टफोन अनेक उपकरणांची कामं करता झाला आणि त्यामुळे अनेक सोयी-सुविधा सहजी आवाक्यात आल्या. परंतु हीच नेमकी कारणं अनेकांना अडचणीही निर्माण करती झाली आहेत. अनेक क्षेत्रांना सध्यातरी या ‘क्रांतीची’ झळ पोचते आहे आणि अशाचपैकी एक क्षेत्र म्हणजे ‘पुस्तकं’.
तसंही कोणत्याही कालखंडात महाराष्ट्रात पुस्तकं प्रचंड प्रमाणात मागणीत होती असं नव्हे. परंतु मध्यंतरीचा पंचवीस एक वर्षांचा कालखंड पुस्तकांसाठी उत्साहवर्धक असा होता. त्या कालखंडात माहितीयुगाचा उदय मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे जिज्ञासा, कुतूहलापोटी माहितीपूर्ण पुस्तकांना मागणी आली. आणि त्यामुळे नवनवी माहिती, नवनव्या स्वरूपात पुस्तकांच्या माध्यमातून प्रसारित होऊ लागली. लिखाणात, प्रकाशनात नवनवे प्रयोग होऊ लागले. त्यामुळे सर्जनशील लेखनाच्या पुस्तकांना या पुस्तकांची जोड मिळत गेली आणि वाचनसंस्कृती, पुस्तकसंस्कृती याविषयी जागरूकता निर्माण होत गेली, त्याचा प्रसार होऊ लागला. पुस्तक-व्यवहार वाढीला लागला. मात्र, गेली तीन-चार वर्षं पुस्तकाविषयीच्या उत्साहाला काही प्रमाणात ओहोटी लागलेली दिसते. त्याला वर उल्लेखलेले ‘बदल’ कारणीभूत आहेत. आणि त्याचबरोबर सर्वत्र पसरललं आर्थिक मंदीचं सावटही काही प्रमाणात कारणीभूत असावं.
बदलाच्या या वावटळीने ‘टीम रोहन’ धास्तावली गेली नाही. परंतु वेळीच सावध निश्चितच झाली. रोहन प्रकाशनाच्या धोरणांतही बदलाचे काही वारे भरण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यातून सर्जनशील साहित्य प्रकाशित करण्यासाठी ‘रोहन मोहर’ ही मुद्रा निर्माण झाली.
टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल ही पडदासंस्कृती (स्क्रीन कल्चर) कितीही फोफावली तरी छापील पुस्तकांचं मोल वेगळं आहे, हे जाणून असणारी जनता काही कमी नाही. ही जनता सर्जनशील लिखाणाकडे अधिक प्रमाणात वळते आहे. त्यात सर्जनशील लेखनाचे नवनवे बंधही आकार घेत आहेत. ग्रामीण साहित्यही वेगळ्या स्वरूपात प्रसृत होत आहे. सर्जनशील लेखन जुन्या झुली उतरवून खांद्यावर नव्या झुली वागवत आहे. तेव्हा हा काळ नवनिर्मितीला पोषक असा ठरू शकतो.
मात्र, हेही खरं आहे की, वाचनाच्या सवयींमध्ये सध्याच्या जीवनशैलीने फरक केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि तत्सम माध्यमांवर बरंच लिखाण होत आहे. त्यासोबत अनेक ‘फॉरवर्ड्स’ येऊन पडतच असतात. त्यावर नुसती नजर टाकण्यातही अनेकांचा बराच वेळ खर्ची पडत असतो. परंतु या सर्वांचं अजीर्ण होऊन आता अशा माध्यमांचा कंटाळा येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचबरोबर हेही खरं आहे की, ‘स्क्रीन कल्चर’मुळे दीर्घ वाचनाची सवय खुंटत चालली आहे. एका बाजूला छापील पुस्तक वाचनाचं समाधान मिळायला हवं असं वाटणं, तर दुसऱ्या बाजूला ती वाचण्यासाठी दिवसभरात एकचित्तता मिळणं दुरापास्त होणं. एका बाजूला जीवनाचे विविध कंगोरे उलगडून दाखवणारे, आजच्या जीवनाचा आरसा सर्जनशीलतेने दाखवणारे कथा-कादंबरी-ललित असे लेखनबंध साद घालत असतात, तर दुसरीकडे त्यांची पृष्ठसंख्या एकाग्रतेची भीती दाखवत असते. एका बाजूला आर्थिक मंदीचं सर्वत्र पसरलेलं सावट, तर दुसरीकडे पुस्तकांच्या चढत्या किमती… अशा विविध प्रकारच्या कात्रींमध्ये सर्वसामान्य वाचनप्रेमी, पुस्तकप्रेमी सापडले आहेत, असं एकंदर सध्याचं चित्र आहे.
गेल्या ३७ वर्षांच्या आपल्या कारकीर्दीत ‘रोहन प्रकाशन’ नेहमीच प्रयोगशील राहिलं आहे. अधिकाधिक वाचकांना विविध प्रयोगांद्वारे पुस्तकाकडे आकृष्ट करणं, हे ‘रोहन’चं सुरुवातीपासूनच सूत्र आहे. त्याच सूत्रानुसार आम्ही लघुकादंबऱ्या, दीर्घकथा, ललितबंधाचे प्रयोगशील लेखन, अशा वाङ्मयप्रकारांकडे पुढील काळात लक्ष केंद्रित करणार आहोत. आजचा काळ हा चांगला ‘कंटेन्ट’ ‘कॉम्पॅक्ट’ स्वरूपात देण्याचा आहे ही भूमिका यामागे आहे. किमतीही कमी राहतील आणि लेखनही वाचनाच्या दृष्टीने आवाक्यातलं असेल अशा पुस्तकांच्या मालिका पुढील काळात प्रसिद्ध करत राहायचं, अशी आमची योजना आहे. आजचे बरेच तरुण, तसंच कर्मचारी वर्ग यांचा बराचसा वेळ प्रवासात जातो. ते प्रवासात ही पुस्तकं सहज नेऊ-वाचू शकतील. त्या दृष्टीने नेहमीपेक्षा जरा लहान आकारांची, शंभर-सव्वाशे पानांची पुस्तकं उत्तम निर्मितीमूल्यांसह शंभर-सव्वाशे रुपयांत द्यायची आहेत. याच प्रयत्नांतून ‘रोहन-मोहर’ मुद्रेअंतर्गत आम्ही पहिल्या तीन पुस्तकांची मालिका नुकतीच प्रकाशित केली आहे. आजचे नावाजलेले प्रतिभासंपन्न लेखक हृषीकेश गुप्ते लिखित ‘काळजुगारी’ व ‘हाकामारी’ या दोन लघुकादंबऱ्या आणि ‘परफेक्टची बाई, फोल्डिंगचा पुरुष’ हा दीर्घकथा संग्रह, अशी तीन पुस्तकांची ही मालिका होय. पुन्हा ही तीन पुस्तकं छानशा वेष्टनात ‘संग्रहिका’ स्वरूपात एकत्रितही उपलब्ध केली आहेत.
यात वाचन-सुविधा, व्यस्त जीवनात मिळणारी ‘लिमिटेड’ एकाग्रता आणि पैशाचं पाकीट अशा सर्वच पैलूंचा विचार आहे. मालिकेच्या या संकल्पनेचा ‘टीम रोहन’ गेले वर्षभर पाठपुरावा करत होती. आज ही मालिका आणि ‘संग्रहिका’ या संकल्पनेचं पहिलं पुष्प ‘हृषीकेश गुप्ते संग्रहिका’ या स्वरूपात उमललं आहे. यापुढेही अशा काही मालिका, काही संग्रहिका प्रकाशित करून वाचकांना ‘आजच्या युगातील वाचनानंद’ देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत…
…‘बदल’ होत राहतात. त्याविरोधात सतत नक्राश्रू काढत राहण्यापेक्षा त्यातून सन्मान्य मार्ग काढत राहणं हे महत्त्वाचं… बदलांच्या उदरातच नवकल्पना दडलेल्या असतात. त्यांच्या शोधात राहा… काळाची हीच मागणी असते.
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२०
हृषीकेश गुप्ते संग्रहिका
३ पुस्तकांत… २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा
स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर
घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात
मोलाची भर घालणारी लघुकादंबरी… काळजुगारी
पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून
स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या
दोन अनोख्या दीर्घ कथा…परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष
गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे
अस्तर ल्यालेली, अंताला सर्वकालिक सामाजिक आशयाच्या
वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी…हाकामारी
₹360.00Read more