मला ‘जिवंत’ ठेवणारी वास्तवातली पुस्तकं…

बघता बघता ‘रोहन’मध्ये आठ वर्षं पूर्ण झाली. ऑफिसच्या आजूबाजूची बरीचशी लोकं आता परिचयाची झालीत, नजरेखालून ढीगभर पुस्तकं घालून डोळ्यांवर चष्मा चढलाय, काम करताना एकावर एक अनेक चहाचे कप रिचवून अ‍ॅसिडिटीसुद्धा मागे लागलीये. थोडक्यात काय, ‘संपादक’ म्हणून चांगलाच गुटगुटीत अनुभव पाठीशी जमा झालाय.

माझी वाचनाची आवड आणि वाचकाला उत्तमोत्तम वाचायला मिळत राहावं; अशी प्रामाणिक इच्छा, निव्वळ या दोनच निकषांवर कदाचित प्रदीपसरांनी मला ‘रोहन’मध्ये संधी दिली असावी. कारण माझा या क्षेत्रात अशा कामाचा अनुभव नव्हता. पण अंत:प्रेरणेतून घेतलेले निर्णय अनेकदा चांगले रिझल्ट्स देतात! ‘रोहन’मध्ये सुरुवातीला विविध विषयांवरील पुस्तकं माझ्याकडे संपादनासाठी आली. एका टप्प्यावर रोहननी विशिष्ट विषयांवरील पुस्तकं विशिष्ट मुद्रेअंतर्गत प्रकाशित करावीत अशी कल्पना पुढे आणली. त्यावर आमच्या टीम-मिटिंगमध्ये चर्चांच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर ‘व्यक्तिरंग’, ‘मोहर’, ‘किशोरवाचन’ आणि ‘समाजरंग’ या रोहन-मुद्रा अस्तित्वात आल्या. पैकी बहुतांशी ‘समाजरंग’ पुस्तकांच्या संपादनाची जबाबदारी माझ्याकडे येत गेली. गेल्या दोन वर्षांत यात सात-एक पुस्तकं या मुद्रेअंतर्गत प्रकाशित झाली आहेत.
प्रदीप सर प्रत्येक संपादकाच्या कौशल्याप्रमाणे कोणतं पुस्तक कुणाकडे द्यायचं याचा विचार करतात. तरीही मला इथे आवर्जून सांगावसं वाटतं की, आमच्या प्रकाशनात संपादनासाठी पुस्तकनिवडीचं स्वातंत्र्य इतकं फॅंटॅंस्टिक आहे की, तुम्ही तुम्हाला कोणतं पुस्तक संपादित करायचं आहे हे मुद्देवार सांगून, समजावून, चर्चा करून ठरवू शकता. मात्र माझं गणित, विज्ञान यांसारखे विषय ‘दांडगे’ असल्यामुळे कोणती पुस्तकं माझ्याकडे द्यायची नाहीत हे मात्र नक्की असतं !

‘समाजरंगा’ची पुस्तकं मला संपादनासाठी मिळण्यात माझी पूर्वपुण्याई महत्त्वाची असावी. माझे आई-बाबा ‘खंदे कार्यकर्ते’ या कुळातले. बाबा हाडाचा कार्यकर्ता आणि उत्तम लेखक. पर्यावरणाच्या क्षेत्रात तळमळीने काम करणारा. तर आई गेली अनेक वर्षं स्त्रियांच्या प्रश्नावर काम करते आहे. ती उत्तम लेखिका, संपादिका आहे. या पार्श्वभूमीमुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मी लहानपणापासून बघत आले आहे. काही काळ ‘नर्मदा बचाओ आंदोलना’त सक्रीय असल्याने थोडा वैयक्तिक अनुभवही गाठीशी होता. याशिवाय रचनात्मक आणि संघर्षात्मक पातळ्यांवर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच लिखाणही वाचनात होतंच.
कोणत्याही पुस्तकाचं संपादन करताना काही विशिष्ट कौशल्यं आत्मसात करावी लागतात. लेखकाकडून हस्तलिखित आल्यानंतर ते ‘पुस्तक’ म्हणून प्रकाशित होईपर्यंतची पूर्ण प्रक्रिया सांभाळायची असते. ‘समाजरंग’ची पुस्तकं करताना काही विशेष बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मराठी साहित्यात गेली ५० वर्षं शोषित, वंचित समूहांचं दर्जेदार आणि संघर्ष उलगडून दाखवणारं लिखाण प्रकाशित झालं आहे. हे सर्व साहित्य वाचताना या समूहांच्या सामाजिक पार्श्वभूमीचं भान असणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आस आणि समज असणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे वेगवेगळे गट आणि प्रवाह, त्यांच्यातलं राजकारण हे अगदी खोलवर नाही, पण काठाकाठाने माहीत असणं गरजेचं वाटतं. सामाजिक प्रश्नांवर तळमळीने आणि झोकून देऊन काम करणाऱ्या लोकांबरोबरच या प्रश्नाचा स्वार्थासाठी वापर करून घेणारे संधीसाधू आणि उथळ, वरवरचे प्रवाह माहीत करून घेणं गरजेचं वाटतं.
बऱ्याचदा असंही होतं की, सामाजिक प्रश्न किंवा समस्या म्हणून एखादं लिखाण खूपच महत्त्वाचं असतं, पण त्याच्या लिखाणाचा दर्जा अगदीच सुमार असतो. म्हणजेच त्या साहित्यातलं साहित्यमूल्यही काय दर्जाचं आहे हेही बघावं लागतंच. बऱ्याचदा एखाद्या लेखकाला स्वत: जगलेल्या आयुष्यातून एखादा सामाजिक प्रश्न पुढे यावा असं वाटल्याने तो लिहितो. पण त्या प्रश्नावर आधीच खूप लिखाण झालेलं असल्यास त्याच्या लिखाणातून येणारा तोच प्रश्न पुन्हा प्रकाशित करावा का, हा प्रश्न त्रास देतो. अनेकदा लेखकाने भारंभार लिहून दिलेलं असतं. त्यातून सकस आणि नेमकं असं लिखाण संपादित केल्यानंतर हातात काहीच विशेष असं गवसत नाही, तेव्हाही त्रास होतो. कारण त्या लेखकाने जे अनुभवलेलं असतं किंवा तो जे बोलण्यातून सांगत असतो ते इतकं ताकदीचं असतं, पण लिखाणात उतरताना मात्र अगदीच सपाट होऊन गेलेलं असत. अशाच वेळेला ‘संपादक’ म्हणून माझा कस लागतो. त्याच्याशी बोलताना, अनुभव ऐकताना महत्त्वाचे प्रसंग जे त्यांनाही उमगलेले नसतात ते वाचकाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील म्हणून लिहून घेणं गरजेचं असतं. समाजावरचा संताप, राग लेखकाच्या वैयक्तिक अनुभवातून अगदी समजण्याजोगा असला, तरी तो वाचकापर्यंत किती वेळा, किती भडकपणे मांडावा हादेखील विचार करावा लागतो.

संपादन करत असताना मला जाणवणारा मोठा त्रास म्हणजे माझ्यातला हळवेपणा किंवा विश्राम गुप्तेंच्या भाषेत सांगायचं तर, मनातली व्याकुळता. पुस्तकाकडे अलिप्तपणे बघणं अपेक्षित असलं तरी बरेचदा मी त्यात नको इतकी गुंतून जाते. हा अनुभव अगदी ‘ऊन’, ‘ढग’, ‘झुरांगिंलग’ अशा कादंबरी प्रकारापासून ते ‘धनगरवाडा’, ‘विंचवाचं तेल’ अशा अनुभवकथनांपर्यंतचा आहे. डोळ्यात पेटती ठिणगी असलेली सुनीता भोसले जेव्हा तिचे अनुभव सांगत होती तेव्हा मनाला बजावलं होतं, साक्षेपी संपादन करायचं असेल तर किमान चार-पाच वेळा हस्तलिखित वाचून डोळ्यांतल्या अश्रूंचा आणि दाटलेल्या भावनांचा निचरा करून घेणं गरजेचं आहे. प्रशांत रूपवतेंनी शब्दरुप केलेली सुनीताची जिंदगानी पेलणं अजिबातच सोपं काम नव्हतं. त्या पुस्तकाचं काम करत असताना मनात आलेलं नैराश्य, पडलेले असंख्य प्रश्न जवळच्या मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून, बोलून मगच मला पुस्तकाबाहेर पडणं जमू शकलं.
बिहारमध्ये आरोग्यप्रश्नावर काम करणाऱ्या ‘हां, ये मुमकिन है’ या तरु जिंदलच्या आणि ‘लढा टाकलेल्या स्त्रियांचा’ या पुस्तकाचा अनुभव तर खूपच सकारात्मक होता. ‘स्त्री प्रश्नां’वर काम करणाऱ्यांपैकी अत्यंत अनुभवी आणि धडाक्याच्या अशा निशाताई शिवूरकर. त्यांचं लिखाणही त्यांच्यासारखंच उत्स्फूर्त आणि चोख. पुस्तक करत असताना कोणते बदल करावेत किंवा काही मुद्दे नव्याने लिहून द्यावेत यासाठीही निशाताई एकदम तयार! पेशानी डॉक्टर असलेल्या तरुच्या कामामधली धडाडी आणि त्याचवेळी लिखाणात असलेली शिस्त, संपादक म्हणून मला सुखावून गेली होती.
‘समाजरंग’ सोबतच ‘रोहन-व्यक्तिरंग’ ही मुद्राही एका बाजूला बहरत होती. धुरगुडेंचं ‘माझा धनगरवाडा’ आणि ल.सि.जाधवांचं ‘होरपळ’ आणि ‘सूळकाटा’ ही आत्मकथनं दोन्ही मुद्रेत येतील अशीच आहेत. पैकी ‘माझा धनगरवाडा’ हे पुस्तक करताना रानोमाळ भटकत शिक्षणाच्या आसेने कष्टाचं जीवन जगणारा ‘धनू’ जेव्हा लेखक ‘धुरगुडे’ म्हणून प्रत्यक्ष भेटला, तेव्हा मनात दाटलेला गहिवर अजूनही ताजा आहे. धनगर समाजातले अनेक शब्द मला आणि या पुस्तकाचा सहसंपादक प्रणवला अनोळखी होते, त्यांच्या चाली-रीती आणि रूढी-परंपरा तर अचंबित करणाऱ्या होत्या. ‘धनगरी’ जीवनशैलीच्या छटा दाखवणारं, वाचकांपुढे एक वेगळं आयुष्य उभं करणारं सातशे पानांचं बाड संक्षिप्त करून परिणामकारकरीत्या कसं दाखवता येईल हे मोठं आव्हान आम्हाला पेलायचं होतं. धुरगुडेंच्या सहकार्याने आम्ही दोघांनी ते खूपच छान पेललं, असं आज वाटतं.
डॉ. मीनाक्षी भोसले यांच्या ‘जपूयात निरागस बालपण’ या पुस्तकाचा अनुभवही खूपच शिकवणारा. मुलांच्या लैंगिक शोषणावरचा प्रश्न मांडणारं हे पुस्तक. मीनाक्षीने दिलेल्या त्यातल्या केसेस आणि अनुभव अंगावर शहारा आणणारे होते. माझा मुलगा दहा वर्षांचा असल्याने पुस्तकातील अनुभव अधिकच अस्वस्थ करून गेले. संपादक म्हणून तटस्थपणे करावी लागणारी तारेवरची कसरत इथेही करावी लागलीच. हे पुस्तक करतानाचा अनुभव जितका ताकद देणारा होता तितकाच ते प्रकाशित झाल्यानंतरचा अनुभव विदारक ! इतक्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पालक जाणून-बुजून दुर्लक्ष, टाळाटाळ का करत असावेत हा तो प्रश्न. तरुण पालकांना पुस्तक आवर्जून दाखवावं तर ते घेण्याचं टाळून गोष्टींचीच पुस्तकं घे, सुविचारांची पुस्तकं घे ही वास्तवतेपासून बाजूला होण्याची वृत्ती समजण्याच्या पलीकडची आणि तापदायक होती.

Anuja Jagtap

ऊसतोडणी कामगारांच्या शिक्षणाच्या प्रश्नावरचं पुस्तक ‘शिक्षणकोंडी’. बारामतीजवळच्या साखर कारखान्याच्या तळांवर काम करणारी संतोष, समू, परेश ही खूप जवळची अशी मित्रमंडळी. त्यांचं काम मी प्रत्यक्षात बघून आले होते. त्यांच्या कामातली तळमळ, ऊर्जा मनाला भिडणारी होती. तळावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे हे जिवंत अनुभव संपादित करताना माझ्या आजूबाजूचा काहीसा यांत्रिक आणि साचेबद्ध आयुष्यात अडकलेला मध्यमवर्ग मला दिसत होता. त्यांच्यापर्यंत हे बोलके अनुभव मला पोचवायचे होते. वाचकाला या पुस्तकापर्यंत नेईल असा आकर्षक ब्लर्ब (मलपृष्ठावरील मजकूर) लिहायचा होता, पण तोही कोणतातरी सामाजिक कार्याचा डोस देतोय असा आव न आणता ! मला वाचकांच्या संवेदनशील मनाला साद घालायची होती. केवळ त्यांना पुस्तकातून सामाजिक वास्तव दाखवावं, त्यांना भान यावं, एवढाच हेतू नव्हता !
आज या सगळ्या पुस्तकांकडे बघताना मला खूप भारी वाटतं. अशा वेगळ्या वाटेवरची पुस्तकं काढणाऱ्या आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या प्रदीपसरांचं प्रकाशक म्हणूनही कौतुक वाटतं. ‘मी खरोखरच जिवंत आहे का?’ हे तपासायला लावणारी समाजरंगाची पुस्तकं वाचकाबरोबर मलाही माझ्या घडण्याकरता महत्त्वाची वाटतात.

– अनुजा जगताप

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२०


Neeta Kulkarni
संपादक उवाच’ या लेखमालेतील नीता कुलकर्णी यांचा लेख

अनुवादाचं संपादन करताना…

मूळ लेखक कोण आहे, त्याचा विषय कसा आहे, सर्वसामान्यपणे तो बोलतो-लिहितो ती शैली कशी आहे, यावर अनुवादाच्या अनेक गोष्टी ठरत असतात. उदा. विचारवंत व्यक्ती, पत्रकार, चित्रपट-समीक्षक, प्रशासकीय अधिकारी, राष्ट्राध्यक्ष, आहारतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक, इतिहासतज्ज्ञ, वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची पद्धती वेगळी असते आणि त्याची अभिव्यक्तीही वेगळी असते. अनुवाद करताना या प्रत्येकाचं खास वेगळेपण जपलं गेलंय की नाही, त्याची शैली अनुवादात उतरलीय की नाही, हे तपासणं माझ्या मते फार महत्त्वाचं असतं.

लेख वाचा…


Pranav Sakhadeo Photo
संपादक उवाच’ या लेखमालेतील प्रणव सखदेव यांचा लेख

स्वतःचा कस लावण्याचं काम

हल्ली माझ्याकडे जेव्हा एखादी संहिता येते, तेव्हा काम सुरू करण्याआधी मी थोडा वेळ तिच्याकडे नुसता पाहत बसतो. कसं असेल हे नवं जग? काय काय निर्माण केलं असेल या जगात लेखकाने? असे कितीतरी प्रश्न मनात फेर धरतात. आणि अचानक मला जाणवतं की, संहिता उष्ण आहे, ती अजिबातच निर्जीव नाही, ती जिवंत आहे माणसासारखी ! ती परीकथेतल्या राक्षसासारखी आहे, ज्यात लेखकाने आपला जीव दडवून ठेवलेला आहे. त्यातले शब्द आपली वाट पाहत आहेत. त्यातले शब्द आपला माग काढत आपल्यापर्यंत आले आहेत किंवा आपण त्यांचा माग काढत त्यांच्यापर्यंत आलो आहोत..

लेख वाचा…


अनुजा जगताप संपादित पुस्तक

LITOC-cover

लव्ह इन द टाइम ऑफ करोना


एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill!
या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?

250.00Add to Cart

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *