कल्पी

नव्या आणि रंगीबेरंगी साड्या घातलेल्या महिलांची गडबड चालू होती. दुपारची वेळ झाल्यानं देवाला नैवेद्य ठेवण्यासाठी त्यांची पळापळ चालू होती. लाल-पिवळ्या-केशरी-आंबा-मोरपंखी-हिरव्या अशा कितीतरी रंगाच्या पैठणी नेसलेल्या सौभाग्यवती नटून थटून मंदिरात नैवेद्य ठेवायला निघालेल्या. घोळक्या घोळक्यानं निघालेल्या त्या बायांकडं पाहताच कल्पीला फुग्यावाल्याची आठवण झाली. यात्रेत येणाऱ्या फुगेवाल्याकडंही अशाच रंगीबेरंगी फुग्यांचा घोळका असतो. स्वत:शीच हसत त्यांच्याकडं पाहत कल्पी निघाली. तोच त्या घोळक्यातल्या एका बाईच्या पायाला ठेच लागली आणि ती कलंडली. तसं तिच्या हातातले ताट तिरपं झालं आणि ताटातला नैवेद्य खाली पडला. तळहातावर मावतील एवढ्याच्या त्या चपात्यांच्या नैवेद्यांमध्ये भात, कुरडई, भाजी, श्रीखंड, दही, साखर असं काय काय भरलेलं. एका क्षणात ताटातले आठ-दहा नैवेद्य खाली पडले तशी कल्पीची नजर त्या नैवेद्यांवर गेली. क्षणाचाही विचार न करता कल्पी त्या नैवेद्यांकडं धावण्याच्या स्थितीत उभी राहिली. तशी शेजारची दोन कुत्रीही त्या नैवेद्यांकडं जाण्यासाठी अस्वस्थ हालचाल करू लागली. पण, तिथं बायांचा गराडा होता. बाकी बाया त्या तोल गेलेल्या बाईला सावरत होत्या. कुणी हसत होत्या, तर कुणी तळतळ करत होत्या. कल्पी आणि शेजारी उभ्या असलेल्या दोन कुत्र्यांची मात्र अस्वस्थ हालचाल चालू. बायांचा गराडा आहे तोपर्यंतच ते नैवेद्य उचलायला हवेत हे कल्पीला समजत होतं. कारण तिथून बाया गेल्या तर कुत्र्यांसमोर आपला निभाव लागणार नाही. अर्थात, कुत्र्यांचीही बहुतेक तशीच अवस्था होती. दोन्ही कुत्री राहून राहून कल्पीकडं पाहत होती. का कुणास ठाऊक, पण ही दोन्ही कुत्री आज आपल्याला प्रतिस्पर्धी समजत आहेत हे कल्पीला जाणवत होतं. बायांचा गराडा हटण्यापूर्वी कल्पीनं नैवेद्य उचलता कामा नये असं कुत्र्यांना वाटत असावं असा विचारही कल्पीच्या मनात येऊन गेला. कल्पी नैवेद्य उचलण्यासाठी जशी पुढं गेली तोच एक भारदस्त बाई कल्पीवर खेकसली, ‘ये भवाने, जरा दम नाय का तुला? हो लांब. वहिनींचा पाय किती मुरगळलाय तुला कळत काय नाय? व्ह लांब…’

बायांची बडबड ऐकत कल्पी हळुवार नैवेद्याच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करू लागली. तोच त्या गराड्यातली एक बाई बोलली, ‘आवं जाऊ द्या, घिऊ द्या त्या पोरीला तरी. तसाबी आता मातीत पडलेला नैवेद्य कुठं देवाला ठेवता? देवाला कुठं असा मातीत पडलेला नैवेद्य चालत असतोय व्हय तवा? दुसरा आणा घरातून. तो घिव द्या तिला.’

‘हो ना आवो ताई, हिच्याकडं बघण्याच्या नादातच ठेच लागली बघा मला. कुठून अवदसा सुचली आणि ह्या हाडळीकडं बघितलं काय माहीत?’
निरागस चेहऱ्यानं दोन्ही कुत्री त्या घोळक्यांकडं पाहत होती. तशीच निरागसता कल्पीच्याही डोळ्यात होती. फक्त तिच्या डोळ्यात थोडी भिती आणि किंचितसा रागही होता. तरीही कल्पीच्या चेहऱ्यावर लाचारी आली, आणि बायांची बडबड ऐकत कल्पी हळुवार नैवेद्याच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करू लागली. तोच त्या गराड्यातली एक बाई बोलली, ‘आवं जाऊ द्या, घिऊ द्या त्या पोरीला तरी. तसाबी आता मातीत पडलेला नैवेद्य कुठं देवाला ठेवता? देवाला कुठं असा मातीत पडलेला नैवेद्य चालत असतोय व्हय तवा? दुसरा आणा घरातून. तो घिव द्या तिला.’ हे वाक्य कल्पीच्या कानावर पडलं तसा तिला थोडा धीर आला आणि सगळी इच्छाशक्ती एकवटत तिनं हळुवार गुडघा खाली टेकवत त्या घोळक्यातून नैवेद्य गोळा करायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळीकडं झुळझुळणाऱ्या साड्यांचे रंग होते. त्यातून येणारा मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. आपण मोगऱ्याच्या बागेत आहोत आणि आपल्या आसपास मोठमोठे रंगीबेरंगी फुगे आहेत असं काहीतरी तिच्या मनात येणार, तोच तिला समोरची दोन्ही कुत्री दिसली आणि ती भानावर आली. पहिले दोन-तीन नैवेद्य तिनं हळूच उचलले; पण कुणी काही बोलत नसल्याचा अंदाज येताच बाकीचे सगळे नैवेद्य तिनं वेगानं उचलले. नैवेद्य उचलताना ती कुत्र्यांकडं पाहत होती. कुत्र्याकडं पाहत तिच्या चेहऱ्यावर विजयीभाव उमटले होते. चेहऱ्यावर हसूही उमललं होतं. का कुणास ठाऊक पण तिला कुत्र्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरलीये असं वाटू लागलं.
आत्ता जर माझ्याकडं एखादा काळ्या रंगाचा पेन असता तर मी कुत्र्याच्या डोळ्याभोवती काळं वर्तूळ काढलं असतं. कुत्र्याचं काळं नाक लाल रंगाने रंगवलं असतं. गालावर मोठ्ठा टिपका दिला असता. नाहीतर काळ्या रंगानं कुत्र्याला चष्मा तरी काढला असता. त्यांची मिशी पांढरी शुभ्र केली असती. असं काय काय कल्पीच्या मनात येऊ लागलं होतं. तिला कुत्र्यांच हसू येत होतं. कुत्र्यांसोबत असलेली भूकेची स्पर्धा आपण जिंकलो याचा तिला आनंद होत होता. कल्पी मातीतून उभी राहिली आणि क्षणात तिथून वेगानं पसार झाली. एकदा का भांड्यामध्ये अन्न पडलं की तिथून वेगानं चालत व्हायचं असतं हे तिला आजवरच्या अनुभवानं चांगलं जमलं होतं. त्यानुसार पटापट पावलं टाकत ती पुढच्या गल्लीमध्ये दाखल झाली. तिनं वळूनही पाहिलं नाही. बाया काय म्हणत होत्या, की कुत्रं आपल्याकडं रागानं पाहत होतं, याचा विचारही तिला शिवायला आला नाही.
दुसऱ्या गल्लीत आली तशी तिला त्या दोन्ही कुत्र्यांच हसू यायला लागलं. आपण त्यांचा खाऊ पळवून आणला म्हणून ते दोघही मातीत लोळत तर नसतील ना, नाहीतरी एकमेकांशीच भांडत बसले नसतील ना, असं तिच्या मनात आलं तसं तिला खदखदून हसू आलं. चालत चालत ती एका पाराखाली आली आणि तिथल्या दगडावर बसली. भांड्यातले नैवेद्य काढत तिनं भाताला चिकटून आलेली दगडमाती झटकून काढली. चपातीवरचं श्रीखंड जिभेनं चाटून घेतलं. पांढरंशुभ्र श्रीखंड चाटल्यावर आपली जीभही पांढरी झाली असेल का, असा काहीतरी विचार तिच्या मनात आला तशी ती तिथं उभ्या असलेल्या एका कारपाशी गेली आणि आ वासून कारच्या काचेमध्ये पाहू लागली. जिभेवर श्रीखंडाचा ठिपका होता. मिटक्या मारत तिनं तो ठिपका गिळून घेतला. पटापट सगळ्या नैवेद्यांवरचा पांढरा ठिपका काचेत पाहत तिनं चाटून घेतला आणि गाडीवरच्या काचेवरून बोटं फिरवू लागली. काचेवर धूळ होती. आपली बोटं काचेवर उमटताहेत हे पाहताच तिला कोण आनंद झाला. क्षणाचाही विचार न करता ती काचेवरून बोटं फिरवू लागली. एक काच संपली तोच ती दुसऱ्या काचेकडं सरसावली आणि कावळ्याचं चित्र काढू लागली. चित्रकलेची भुकेली कल्पी धुळीवर तुटून पडली. एवढ्याशा त्या काचेवर काय काढू आणि कसं काढू तिला सुचेना. तिनं हातातलं भांड खाली ठेवलं आणि मन लावून ती कावळा, मंदिर, नदी असं काहीही चित्र काढू लागली. ती कारच्या मागं आली आणि मागची मोठ्ठी काच पाहून तिचा आनंद गगनात मावेना. संपूर्ण काच धुळीनं माखलेली होती. कल्पीनं त्या काचेवर अलगद बोट ठेवलं आणि वरच्या बाजूला डोंगराचं चित्र काढलं. डोंगरातून उतरत येणारी नदी. त्या नदीभोवतीचं कुरणं, खडक, शेजारचं मंदिर, घरं, रस्ते, गाडी, असं काय काय काढण्यात ती मग्न होऊन गेली. एखादं चित्र बोटानं, एखादं मनगटानं, एखादं पंजाच्या ठशानं तर एखादं गाडीवर पडलेल्या लिंबाच्या काडीनं ती रेखाटू लागली. किती वाजलेत, गाडी कुणाची आहे, आपण कुठे आहोत, कशासाठी इथं आलोत यातल्या कोणत्याही प्रश्नाचे तिला भान राहिलं नव्हतं. डोंगरामागून उगवलेला सूर्य कोणत्या दिशेला आहे, मग रानात नांगरणी करणाऱ्या बैलाची सावली कोणत्या दिशेला पडायला हवी. डोंगराचा उतार कसा आहे, मग पाणी कोणत्या दिशेला वहायला पाहिजे, असा बारीकसारीक विचार करत ती चित्र काढण्यात मश्गुल झाली. जणू तिची चित्रकलेची समाधीच लागली. तोच एका म्हातारीचा आवाज तिच्या कानावर पडला.
‘आगं आगं पोरी, तुझ्या भांड्यात तोंड घातलं बघ, तोंड घातलं बघ’ पाठीमागं असलेल्या माळवादी घराच्या दरवाजातून बाहेर येत असलेली म्हतारी पोटतिडकीनं ओरडत काठी दाखवत होती. तशी त्या म्हतारीकडं पाहत कल्पीनं खाली ठेवलेल्या आपल्या भांड्याकडं पाहिलं. समोरचं दृष्य पाहताच मात्र तिचा थरकाप उडाला. दोन डुकरांनी तिच्या भांड्यात तोंड घालून नैवेद्य संपवत आणला होता. सर्रकन तिच्या अंगावर काटा उमटला. तोंडात नको त्या शिव्या येऊ लागल्या. कमालीच्या क्रोधानं कल्पीनं खाली वाकत मोठमोठी दगडी उचलली आणि ‘छो छो’ असं म्हणत ती डुकराच्या दिशेनं दगडी भिरकावू लागली. पण, मगाशी ती कुत्री भुकेली होती आणि त्यांच्या वाट्याचा घास कल्पीने पळवून आणला होता. तशीच आता ही डुकरंही भुकेली होती.
कल्पीनं दगडं मारला तसं एक डुक्कर पळालं. दुसऱ्यानं मात्र ते भांड तोंडात पकडलं आणि ते खिंडारीच्या दिशेनं धावू लागलं. डुक्कर जीवाच्या आकांतान पळू लागलं. ते पाहून गडबडलेली कल्पी तशी त्याच्या मागं धावत निघाली. कल्पीच्या अंगाचा थरकाप उडाला होता. नैवेद्य तर गेला होताच; पण भांडही जाणार याची कल्पीला भीती वाटू लागली. काळीज लपालप बरगडीवर आपटू लागलं. तिचा आवाज चिरका झाला. डोळ्यात वेदना होती. आवाजात भीती होती. मनात दु:ख होतं आणि काळजात हतबलता.

  • कल्पी आणि इतर २ कथा
  • लेखक : नितीन थोरात

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


हे ईबुक खरेदी करण्यासाठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *