‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : २
लहानपणीचा किंवा तरुणपणीचा जरा अलीकडचा काळ हा अनेक गोष्टींचं अप्रूप वाटण्याचा किंवा क्वचित प्रसंगी अवाक होण्याचा काळ. आणि ऐवढं निश्चित की, आयुष्यातला तो एक चांगला काळ असतो. अनेक गोष्टी ग्रहण करून घेण्याचा तो काळ… नंतर जरा चार बुकं शिकल्यावर, पाच-पंचवीस अनुभव पाठीशी बांधल्यावर आणि त्या बळावर स्वत:चं व्यक्तिमत्त्व प्राप्त झाल्यावर (म्हणजे स्वत:चा स्वत:विषयी झालेला समज किंवा गैरसमज म्हणा) कशाविषयी अप्रूप वाटण्याचे, कोणत्या गोष्टीने अवाक होण्याचे विषय आकुंचन पावतात किंवा संपतात.
लहानपणी मुंबईच्या हँगिंग गार्डनमधील ‘म्हातारीचा बूट’ या बुटाच्या मोठ्या प्रतिकृतीचं केवढं ते आकर्षण होतं… नंतर थोडं मोठं झाल्यावर आकाशात झेप घेतलेल्या विमानांपेक्षा, प्रत्यक्ष विमान, विमानतळ पाहायला मिळावं यासाठी जीव आसुसला राहायचा. मग आम्ही मित्र सांताक्रूज विमानतळावर गेलो, पंचवीस पैशांची एन्ट्री तिकिटं काढली आणि मनसोक्तपणे विमानतळ पाहिलं, विमानं पाहिली आणि धन्य पावलो. म्हातारीच्या बुटाचं जेवढं अप्रूप वाटलं, तेवढं अप्रूप इटलीतील ‘पिसा’चा कलता मनोरा किंवा पॅरिसचा आयफेल टॉवर पाहूनही वाटलं नाही. जेवढं समाधान विमानतळ, तेथली उभी विमानं पाहून वाटून गेलं, तेवढं समाधान प्रत्यक्ष विमानप्रवास करून मिळालं नसावं. तीच गोष्ट पुस्तकांची… लहानपणी पुस्तकांची रंगीत कव्हर्स, कॉलेजच्या दिवसांतील जाडजूड पुस्तकं, त्यावरचं गोल्ड एम्बॉसिंग हे सर्व कुतुहलाचे विषय असायचे… आणि त्या पुस्तकांचे निर्माते कोण असतील, कसे असतील यांविषयी मनात कुतूहल असायचं.
पुढे मग पुस्तकांच्या प्रत्यक्ष निर्मात्यांकडे, अर्थात प्रकाशकांच्या कार्यालयात जायचे प्रसंग आले. वडील शैक्षणिक पुस्तकं लिहीत. त्यांची हस्तलिखितं, जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्स या माझ्या कॉलेजच्या वाटेवर असलेल्या, त्यांच्या प्रकाशकांकडे देण्याचं काम मी अनेक वेळा करत असे. ते हस्तलिखित देण्याचं काम मिनिटभराचं. पण त्या प्रकाशकाच्या कार्यालयात रेंगाळत मी थोडा वेळ काढत असे. कधी त्या प्रकाशकाला भेटत असे. चार-आठ पानांचं पत्रक छापून घेताना तोंडाला फेस येतो, हे मी जाणून होतो; मग शेकडो पानांची, शेकडो पुस्तकं हजारांच्या प्रतींत काढणाऱ्या व्यक्तींना भेटण्यात, त्यांच्याशी बोलण्यात अप्रूप वाटायचं. आणि पुढे आपणही असेच कधी पुस्तकांचे निर्माते होऊ असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं.
वडील अशा मोठ्या शैक्षणिक पुस्तकांच्या प्रकाशकांसाठी लिहीत गेले. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची विक्रीही चांगली होत असे. वडिलांचा आत्मविश्वास दुणावू लागला आणि त्यांना वाटायला लागलं की, आपली पुस्तकं आपणच प्रकाशित करावीत. तोपर्यंत मी जे.जे.मधून शिक्षण घेऊन स्वत:चा प्रिंटिंग प्रेस सुरू केला होता. त्यात स्थिरस्थावरही झालो होतो. वडिलांच्या कल्पनेला मी विरोध केला. त्यांना म्हटलं की, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या संस्था प्रचंड मोठ्या आहेत. आपण त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. त्यांना पटायचं, तरीही त्यांच्या मनातली ऊर्मी अधून-मधून उफाळून यायचीच. मी विचार केला, वडील आर्ट्समधले ग्रॅज्युएट, स्वत:चा पुस्तकाचा व्यासंग, रुईया महाविद्यालयात शिक्षण, काही साहित्यिकांशी उत्तम मैत्री, जोडीला माझी कला क्षेत्र व छपाई तंत्रज्ञान ही पार्श्वभूमी… या पार्श्वभूमीवर आपल्याला शिक्षणेतर विषयांवरची पुस्तकं प्रकाशित करता येतील. वडिलांपुढे मी हा प्रस्ताव मांडला. त्यांना ही कल्पना फारच पसंत पडली. एका बाजूला त्यांचं लेखन इतर प्रकाशकांकडून प्रसिद्ध होत राहील आणि माझाही मुख्य व्यवसाय चालूच राहील. जोडीला काही साहित्यिक तर काही साहित्येतर पुस्तकं अधून-मधून प्रकाशित करत राहू. घरामध्ये माझा मुलगा ‘रोहन’ याचा जन्म होऊन वर्ष झालं होतं. वडील म्हणाले, प्रकाशनाचं नाव ‘रोहन प्रकाशन’… अशा प्रकारे ‘रोहन प्रकाशन’चा जन्म १९८२ साली एक जोड व्यवसाय, एक साइड अॅक्टिव्हिटी, एक हौस म्हणून झाला. वडिलांनी पुस्तकांचे विषय आणि लेखक शोधण्याच्या कामाला जुंपून घेतलं. तर, मी निर्मितीची विविध अंगं आणि व्यवसायनिगडित बाजू सांभाळू लागलो.
पहिलं पुस्तक ‘जगावेगळी माणसं’ हे अनुभवपर लेखनाचं आणि बाळ सामंत, रमेश मंत्री लिखित-संपादित पुस्तक प्रसिद्ध करून ‘रोहन प्रकाशन’ पदार्पणातच लक्षवेधी ठरेल अशी आम्ही काळजी घेतली होती. पुढे मात्र विषय ठरवताना ‘विक्रीक्षमता’ हा आमच्यासाठी लक्षणीय ‘गुण’ होता. कारण नाही म्हटलं तरी ऋण काढून हौसेने सुरू केलेला हा उपक्रम होता. (येथवरच्या प्रवासाला तरी मी व्यवसाय म्हणत नाही). विविध विषयांचा विचार करताना हे जाणवत होतं की, जनसामान्यांच्या जीवनशैलीत बदल घडू मागतो आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून पस्तीस वर्षं लोटली आहेत आणि एक विकसनशील देश म्हणून भारत वेगाने प्रगती साधतो आहे. लघु-मध्यम-मोठे सर्व प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन दिलं जात आहे. शिक्षणाला महत्त्व प्राप्त होत आहे. त्या आघाडीवर बदल घडत आहेत. तेव्हा सायन्स, टेक्नॉलॉजी, कॉमर्स या शिक्षण शाखांकडे जनतेचा ओढा वाढता होता. मुलींच्या जडण-घडणीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात होतं. त्यांनाही ध्येयवादी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जात होतं. या सर्वांचा दृष्य परिणाम जाणवत होता. मध्यमवर्गाची आर्थिक परिस्थितीही सुधारत होती. आशा-आकांक्षा वाढत होत्या. कनिष्ठ मध्यमवर्गातही याविषयीच्या जाणिवा झिरपत होत्या.
या सर्वाचा पुसटसा अंदाज घेऊन आम्ही काही विषय निवडले. त्या त्या विषयांतल्या तज्ज्ञ लेखकांना लिहायला उद्युक्त केलं. त्यांनीही योग्य ती साथ दिली. त्यातून पुढील काही वर्षांत अनेक पुस्तकं निर्माण झाली. त्यांपैकी काही पुस्तकं म्हणजे– ‘फ्रीज, ओव्हन, मिक्सर– त्रिविध पाककृती’, ‘चिंगलान- चायनीज कुकरी.’ पाककृती पुस्तकांची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला नवी उपकरणं घरा-घरांत येत होती, नव्या चवींची गोडी लागत होती. त्यांना अनुसरून ही पुस्तकं आम्ही तयार करून घेत होतो. ‘हम दो, हमारे दो’ या सरकारी योजनेमुळे कुटुंबं चौकोनी होऊ लागली. त्या दोन मुला-मुलींच्या शिक्षणाला, व्यक्तिमत्त्व-विकासाला महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यासाठी मार्गदर्शक अशा ‘पालकांशी हितगुज’, ‘मुलींचा विकास व पालक’, ‘सभेत कसे बोलावे?’ अशा काही पुस्तकांचे आराखडे तयार करून, ती लिहून घेतली गेली. या सर्व पुस्तकांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेला. ही पुस्तकं ‘ट्रेंड सेटिंग’ ठरली. पुस्तकव्यवहाराशी निगडित कोणतीही पार्श्वभूमी नसलेलं ‘रोहन प्रकाशन’ अल्पावधीतच नावारूपाला आलं. नावारूपाला येण्याबरोबरच आर्थिक स्थैर्यही लाभत गेलं आणि या दोन्हींच्या बळावर आमच्या मनाचा जो प्रागतिक विचारांकडे कल होता, त्याला प्रकाशनात जागा देण्याचं ठरवलं. त्यांतूनच दया पवारांच्या ‘बलुतं’ या पुस्तकावरील प्रतिक्रिया, कैफियतीचं ‘बलुतं : एक वादळ’, विद्या बाळ यांच्या स्त्रीवादी चळवळी संदर्भातल्या लेखांचं ‘संवाद’, थोर समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे यांचं डॉ. त्र्यं.कृ. टोपे लिखित चरित्र अशी सामाजिक बांधिलकीच्या अंगाने जाणारी पुस्तकं प्रकाशित केली. त्याचप्रमाणे वैचारिकता आणि लोकप्रियता यांचा मध्यबिंदू साधणारी माधव गडकरी लिखित ‘गाजलेले अग्रलेख’आणि ‘चिरंतनाचे प्रवासी’ ही दोन पुस्तकंही २२ नोव्हेंबर १९९२ रोजी प्रसिद्ध झाली. या दोन पुस्तकांच्या प्रकाशनांनी ‘रोहन प्रकाशन’ची दशकपूर्ती झाली होती. इथवरच्या प्रवासात रोहन प्रकाशनाची पाळंमुळं चांगली रुजू लागली होती आणि उत्तम उपयुक्त पुस्तकांसोबतच साहित्यातले विविध प्रकार हाताळण्यासाठी आता ग्राऊंड तयार झालं होतं आणि आत्मविश्वासही प्राप्त होत होता…
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल मार्च २०२१
रोहन शिफारस
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व
भारतात होऊन गेलेल्या अनेक सुधारकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे! रानडे यांचं कार्य आर्थिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत असल्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. सर्वांगीण व सर्वंकष समाजसुधारणेचं स्वप्न रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातच पाहिलं होतं. न्या. रानडे हे प्राचार्य डॉ. त्र्यं. कृ. टोपे यांचे दैवत होते. या पुस्तकात टोपे यांनी रानडेंचं बालपण, शिक्षण, कौटुंबिक जीवन व कार्य-कर्तृत्व एवढाच जमा-खर्च न देता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत अतिशय समग्रपणे त्यांचं व्यक्तिमत्त्व रेखाटलं आहे. रानडे यांच्यावरील वैचारिक प्रभाव, त्यांची स्वभाववैशिष्टयं, त्यांनी केलेल्या समाजसुधारणा, त्यावेळचं समाजजीवन, कोणत्याही कार्यामागची त्यांची मनोभूमिका, न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द आणि त्यांच्यावर झालेली समकालीनांची टीका असं व्यापक चित्रण टोपे यांनी या पुस्तकात अभ्यासपूर्णरीत्या केलं आहे. न्या. रानडे यांच्यासारख्या समाजसुधारकांचं कार्य-कर्तृत्व व आदर्श तरुणांसमोर येणं आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. टोपे यांनी लिहिलेलं हे चरित्र मोलाची कामगिरी बजावतं.
₹399.00Add to cart
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…
प्रगत पुस्तक संस्कृतीचा मनोज्ञ मागोवा (वर्षा गजेंद्रगडकर)
अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे.