‘रोहन प्रकाशन’चा बदलयुक्त प्रवास : १

वैयक्तिक बाबतीत असेल किंवा व्यवसाय-निगडित बाब असेल, आपण भूतकाळात डोकावतोच… कधी कुतूहलापोटी, तर कधी आवश्यकतेपोटी. गतकाळातील घटना बऱ्यापैकी आठवत असतात. त्यांचे साधारण ठोकताळे असतात, पण तपशिलांसाठी संबंधितांना विचारतो, आधीच्या पिढीला विचारतो. बहुतांश वेळी जवळपासचे अंदाजच वर्तवले जातात. मात्र, नेमकी माहिती मिळत नाही, नेमकी नावं कळत नाहीत, नेमक्या तारखाच नव्हे, तर कधी नेमकं सालही हाती लागत नाही. अर्थात, एखादी विलक्षण स्मरणशक्ती असलेली व्यक्ती त्या घटनेशी संबंधित असली तर आणि ती व्यक्ती संपर्कात आली तर कधीकाळी नेमकी माहिती मिळतेही…! पण पळापळ काही चुकत नाही. असं का घडतं? तर, डॉक्युमेंटेशनची… दस्तऐवजीकरणाची आपल्या ‘डीएनए’मध्ये असलेली वानवा. आपल्या जीवनशैलीत या डॉक्युमेंटेशनला कितपत स्थान असतं? प्राधान्य असणं वगैरे तर अलहिदा. आपल्या अर्थकारणाच्या विचारात ‘डॉक्युमेंटेशन’साठी काही तरतूद असते का? थोडंफार महत्त्व वाटत असल्यास किंवा थोडी तरतूद असल्यास दस्तऐवजीrकरणासाठी जी शिस्त लागते, जी तत्परता लागते ती आपल्या अंगी असते का?

५ फेब्रुवारी हा रोहन प्रकाशनाचा वर्धापन दिन आहे, तेव्हा या निमित्ताने रोहन प्रकाशनाच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगावा असं ठरलं. त्यात स्थापनेपासून घडलेले बदल, बदललेले दृष्टिकोन, धुंडाळलेल्या दिशा अशा काही गोष्टींचा तपशिलात न जाता थोडा मागोवा घ्यावा, जेणेकरून गेल्या तीन-चार दशकांतले समाजात होत असलेले बदल हे प्रकाशन व्यवसायावर परावर्तित होतात का याची कल्पना यावी.

मी जे काही थोडंफार पर्यटन केलं आहे, त्यात प्रकर्षाने मला जाणवलं आहे की, पाश्चात्त्य देशांत, युरोप-अमेरिकेत जतन करणं, डॉक्युमेंटेशन करणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. किंबहुना त्यांच्या विस्मयजनक प्रगतीत त्यांच्या अंगी भिनलेल्या या गुणाचा मोठा वाटा आहे. परंतु या गुणाची प्रचीती यायला त्या देशात कशाला जायला हवं? अमेरिका, इंग्लंड येथील पुस्तकं पाहिली, वाचली तरी ही गोष्ट लक्षात येईल. एखाद्या कलाकृतीच्या निर्मितीचं पुस्तक असो, वा एखाद्या घटनेविषयीचं पुस्तक असो, त्यात अनेक बारीक-सारीक तपशील असलेले जाणवेल. त्या तपशिलांतून त्या निर्मितीची, त्या घटनेमागची पार्श्वभूमी लक्षात येईल. त्या दरम्यानचे अनेक टप्पे लक्षात येतील. थोडक्यात सांगायचं झालं तर, त्या घटनेचे, त्या निर्मितीचे अनेक पैलू समजतील. वाचकाची त्यातून काही कुतूहलं शमतात, तर काही नवी कुतूहलं निर्माण होऊ शकतात. त्या काळात शिरून वाचक फेरफटका मारू शकतो, त्याचप्रमाणे त्या घटनेकडे, त्या निर्मितीकडे पाहण्याची त्याला वेगळी दृष्टी मिळू शकते.

ज्या प्रकाशन व्यवसायात मी गेली अडतीस वर्षं कार्यरत आहे, त्याचंच उदाहरण घेतलं तर लक्षात येतं की, या व्यवसायात सतत काही नवं घडत असतं. एका पुस्तकनिर्मितीला अनेक कंगोरे असतात, तिचे अनेक टप्पे असतात. अगदी संकल्पना सुचण्यापासून ती प्रत्यक्ष पुस्तकरूपात साकार होईपर्यंत… त्यात लेखकाचा शोध घेणं आलं, लेखकाशी चर्चा होणं आलं, लेखन-संपादन आलं, लेखनावरचं संस्करण आलं आणि त्यानंतरचे प्रत्यक्ष निर्मितीचे अनेक टप्पे आले. प्रकाशन समारंभ, त्याविषयीच्या बातम्या, छायाचित्रं, परीक्षणं, त्या लिखाणाविषयीचे वाद-विवाद असे अनेक पैलू त्या पुस्तकनिर्मितीला असतात. यांपैकी अनेक गोष्टी भविष्यातील घडामोडींसंदर्भात प्रसंगोचित ठरू शकतात. म्हणूनच लेखक-प्रकाशकाने या सर्व गोष्टींच्या तपशीलवार व पद्धतशीर नोंदी ठेवल्या तर, पंधरा-वीस-पंचवीस वर्षांनी तो एक मौल्यवान ऐवज ठरू शकतो.

हे सर्व इथे लिहिण्यामागचं कारण कोणतं असा प्रश्न वाचकांना पडू शकतो. या महिन्याच्या संपादकीय मनोगताचा विषय कोणता असावा, याविषयी संपादकीय ‘टीम’मध्ये चर्चा होत असताना, ५ फेब्रुवारी हा रोहन प्रकाशनाचा वर्धापन दिन आहे, तेव्हा या निमित्ताने रोहन प्रकाशनाच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगावा असं ठरलं. त्यात स्थापनेपासून घडलेले बदल, बदललेले दृष्टिकोन, धुंडाळलेल्या दिशा अशा काही गोष्टींचा तपशिलात न जाता थोडा मागोवा घ्यावा, जेणेकरून गेल्या तीन-चार दशकांतले समाजात होत असलेले बदल हे प्रकाशन व्यवसायावर परावर्तित होतात का याची कल्पना यावी. पुस्तकांचे विषय आणि प्रवर्तकांचा दृष्टीकोन व कल यांचा परस्परसंबंध कसा असू शकतो, याची ही या निमित्ताने पुसटशी कल्पना यावी.
या सर्वाचा आढावा घ्यायचा म्हटला, तर इथे ‘डॉक्युमेंटेशन’चा प्रश्न उद्भवतो. माझ्याकडे गेल्या अडतीस वर्षांतल्या कार्यक्रमांच्या छायाचित्रांचे ढीग आहेत, वर्तमानपत्रं, नियतकालिकं यांतील कात्रणं आहेत, लेखक-संपादकांसोबतचा पत्रव्यवहार आहे. पण हे सर्व पद्धतशीरपणे संजोगलं गेलं आहे का? त्यातल्या किती गोष्टी गहाळ आहेत किंवा कुठे ठेवल्या आहेत याचा अंदाज नाही. पद्धतशीर नोंदी नाहीत. तेव्हा विसंबून राहावं लागतं ते आपल्या स्मरणशक्तीवर. ती माझ्याकडे बऱ्यापैकी आहे, असं मी समजतो. किंवा एखाद्या लक्षात राहणाऱ्या घडामोडीशी, हव्या त्या घटनेचा संबंध लावून काही तपशिलांचा मी आत्मविश्वासाने माग घेऊ शकतो.

Pradeep Champanerkar photo

आता या ‘रोहन’च्या वर्धापन दिनाचंच उदाहरण घ्या. ही तारीख कुठून आली? रोहन प्रकाशनची स्थापना समारंभपूर्वक झाली नव्हती. १९८२च्या ऑगस्टमध्ये अनौपचारिकरीत्या कामाला सुरुवात झाली असावी. नोव्हेंबरमध्ये बँकेत खातं उघडलं गेलं. पहिलं पुस्तक प्रकाशित होणार होतं ‘जगावेगळी माणसं’. पुस्तकाचे लेखक-संपादक होते सुप्रसिद्ध साहित्यिकद्वयी बाळ सामंत व रमेश मंत्री. ही द्वयी तेव्हा ‘अपर्णा’ नावाचा दिवाळी अंक काढत असे. तर त्यांपैकी काही दिवाळी अंकांतील काही लेखांचं संकलन म्हणजेच ‘रोहन’चं पहिलं पुस्तक. राजकारण, समाजकारण, चित्रपट, क्रीडा, नाट्य इ. क्षेत्रांतील नामवंतांच्या आयुष्यांतील काही महत्त्वपूर्ण घटनांच्या अनुषंगाने घेतलेल्या मुलाखतींतून हे लेख संपादकद्वयीने साकार केले होते. अनेक लेखांतून निवड करायची होती. माझे वडील (स्व.) मनोहर चंपानेरकर आणि बाळ सामंत यांनी मिळून या लेखांची निवड केली, पुस्तकाचं नामकरण केलं ‘जगावेगळी माणसं’. मुखपृष्ठ सोपवलं सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट यांच्यावर. मला आठवण आहे, हे मुखपृष्ठ (म्हणजे केवळ मुखपृष्ठच… मलपृष्ठाचा त्यात तेव्हा समावेश असायचाच असं नव्हे) पुण्याहून मुंबईला आमच्या हाती लागलं, ते २८ डिसेंबर १९८२ रोजी. ही नेमकी तारीख लक्षात राहण्याचं कारणही, त्या दिवशी असलेल्या एका समारंभाचं. त्या समारंभातच सुभाषने पाठवलेलं कव्हर डिझाइन हाती पडलं होतं. आतल्या मजकुराची छपाई पुण्यात, तर मुखपृष्ठ-छपाई मुंबईत… छपाईच्या उत्कृष्ट दर्जाकरता. बाइंडिंग पुण्यात. असे अनेक सोपस्कार पार पाडत, पुस्तक तयार होत असल्याचं कळलं. मी मुंबईहून पुण्याला ४ फेब्रुवारी रोजी आलो. पहिल्या नमुनाप्रती पाहिल्या. काही सुधारणा सुचवून बाइंडरला ‘गो-अहेड’ दिला. ५ फेब्रुवारी १९८३ रोजी पुस्तकाच्या पहिल्या प्रती हाती पडल्या. हे सर्व नेमकेपणे लक्षात राहण्याचं कारण, त्या दरम्यान माझ्या मित्राचं पुण्यात असलेलं लग्न. अलीकडेच म्हणजे ५-७ वर्षांपूर्वी साहित्य क्षेत्राला वाहिलेलं एक कॅलेंडर निघणार होतं. कॅलेंडरच्या प्रकाशकांनी ‘रोहन प्रकाशन’चा वर्धापन दिन विचारला… मी बेधडकपणे सांगितला…

‘५ फेब्रुवारी १९८३’! पहिलं पुस्तक हाती लागलं, तो माझ्या आठवणीतला दिवस…वडलांनी प्रकाशनसंस्थेचं स्वप्न पाहिलं… मी त्याला पूर्णत्वाने साथ दिली. पहिलं पुस्तक हाती लागलं… स्वप्नपूर्ती झाल्याचा तो दिवस अर्थातच सोनीयाचा… मग तोच ‘वर्धापन दिन’ का नाही मानायचा? तेव्हा दस्ताऐवजीकरणाची अशी एक ‘जगावेगळी’ पद्धत…! (क्रमश:)
…पुढील काही मनोगतांत रोहन प्रकाशनाची जन्मकथा, पहिल्या अपत्याची (पुस्तकाची) जन्मकथा, पुढील प्रवास, बदलांचे टप्पे, बदलांमागचे विचार असं बरंच काही…पण संक्षिप्तात आणि व्यापकदृष्ट्या काही सांगू शकेल असंच काही सांगण्याचा प्रयत्न असेल.

– प्रदीप चंपानेरकर

पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल फेब्रुवारी २०२१


रोहन क्लासिक्स’पैकी एक पुस्तक

आमचं बालपण

बालपणीच्या नीलरंगी विश्वामध्ये पुन्हा एकदा रमून गेलेल्या आर.के.लक्ष्मण यांना भुताच्या गोष्टी सांगून त्यांची भंबेरी उडवणारा माळीबुवा आठवतोय. तर एम.एस.सुब्बलक्ष्मींच्या आठवणींना चिंच, मिरच्या आणि मीठ कुटून त्याच्या छोटयाछोटया गोळ्यांना काडया खुपसून बनवलेल्या कँडीची आंबटगोड चव आहे. या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत. केलुचरण महापात्रांनी नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली तीच मुळी मुलीच्या वेषामध्ये, तर हुसेननी आपली चित्रकारी प्रथम आजमावली ती सिनेमाच्या पोस्टरवर! तेंडुलकरांचे शिक्षकच वर्गात आपण पाहिलेल्या चित्रपटांच्या गोष्टी रंगवून सांगत, अमजद अली खान सरोदवर चित्रपटगीतं वाजवून आपल्या वर्गमित्रांना खूष करत. या विख्यात कलाकारांच्या बालपणीची वर्णनं वाचून तुमच्या देखील मनात विचार आल्याशिवाय राहणार नाही, ‘‘अरे, मीही ह्या सर्वांपेक्षा फारसा वेगळा नाही. कदाचित मलादेखील जमेल की…’’

Amach Balpan

175.00Add to cart


Pradeep Champanerkar photo
रोहन प्रकाशनचा बदलयुक्त प्रवास : २

आत्मविश्वास प्रदान करणारी दशकपूर्ती (प्रदीप चंपानेरकर)

कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी… अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी’ दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास…

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *