पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारी माणसं फक्त मनोरंजनासाठी पुस्तकं वाचत नाहीत. पुस्तक हे त्यांच्यासाठी माहिती किंवा ज्ञान देणारं निव्वळ एक साधनही नसतं. पुस्तकं हा त्यांचा ध्यास असतो. एखाद्या पिशाच्चाने झपाटून टाकावं, तसं त्यांचं सगळं जगणंच वेढून राहिलेलं असतं पुस्तकांनी. अशा व्यक्तींना अनेकदा ‘परग्रहावरचे प्रवासी’ ठरवून आपण मोकळे होतो. घर-दार, गाड्या-घोड्या, नोकरी-व्यवसाय अशा भौतिक गोष्टींपलीकडे जाऊन पुस्तकांच्या विश्वात रमणारी माणसं सर्वसामान्य माणसांसाठी ‘नॉर्मल’ नसतातच. याचं कारण, पुस्तकसंस्कृती आपल्याकडे चांगली विकसित झालेली नाही. समाजाच्या तळागाळापर्यंत जिथे साक्षरता आणि शिक्षणही अजून पोचलेलं नाही, तिथे पुस्तकसंस्कृती रुजण्याचं तुमच्या-माझ्यासारख्या अनेकांचं स्वप्न पूर्ण व्हायला अजून पुष्कळ वाट पाहावी लागणार आहे. पण तोवर पाश्चात्त्य जगातल्या, विशेषत: युरोपातल्या, पुस्तकांच्या समृद्ध जगाची, तिथे घट्ट रुजलेल्या ग्रंथसंस्कृतीची रोचक, रसाळ आणि अभ्यासपूर्ण सफर घडवून आणणारं नीतीन रिंढे यांचं ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक या स्वप्नाचा उजळ चेहरा दाखवत पुस्तकवेड्या प्रत्येकाला विलक्षण आनंद देणारं आहे.

‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकाचं सूत्र आहे, ‘पुस्तक’ या विषयावरची पाश्चात्त्य भाषेतली पुस्तकं. अनेक पाश्चात्त्य लेखकांची, ग्रंथवेड्या संग्राहकांची, प्रकाशकांची, ग्रंथविक्रेत्यांची, मुखपृष्ठकारांची, ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अगदी पुस्तकचोरांचीही पुस्तकांविषयीची अफाट असोशी स्पष्ट करणारं हे पुस्तक आहे. ‘वाचकांची एक प्रजाती’ अशीही ज्याची एक व्याख्या केली जाते, त्या लेखकाच्या प्रातिभ व्यवहाराचे बारकावे, त्याची सर्जनप्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या पुस्तकापासून पुस्तकांच्या समासात नोंदी करण्याच्या सवयीविषयीचं आणि त्या नोंदींचं महत्त्व सांगणाऱ्या पुस्तकापर्यंत, ग्रंथविश्वाचे असंख्य पैलू नीतीन रिंढे यांनी वाचकांसमोर आणले आहेत.

पुस्तकं ठेवण्याच्या कपाटांचा इतिहास सांगणाऱ्या हेन्री पेत्रोस्की यांच्या ‘द बुक ऑन द बुक शेल्फ’ या पुस्तकाविषयी ‘लीळा पुस्तकां’च्यामध्ये जसं एक प्रकरण आहे, तसं पुस्तकांच्या मुखपृष्ठाविषयीच्या ‘द कव्हर्स’ या अ‍ॅलन पॉवर्स यांच्या पुस्तकाविषयीही रिंढे यांनी सविस्तर लिहिलं आहे.

लेखन, छपाई, विक्री यापलीकडे पुस्तकांचं जग किती बाजूंनी आणि किती सूक्ष्म पदर पसरत विस्तारत राहतं, याची कल्पना एरवी सहज आपल्या मनात येत नाही, पण पुस्तकं ठेवण्याच्या कपाटांचा इतिहास सांगणाऱ्या हेन्री पेत्रोस्की यांच्या ‘द बुक ऑन द बुक शेल्फ’ या पुस्तकाविषयी ‘लीळा पुस्तकां’च्यामध्ये जसं एक प्रकरण आहे, तसं पुस्तकांच्या मुखपृष्ठाविषयीच्या ‘द कव्हर्स’ या अ‍ॅलन पॉवर्स यांच्या पुस्तकाविषयीही रिंढे यांनी सविस्तर लिहिलं आहे. अर्थात, पुस्तकविश्वात दुर्लक्षित राहाणाऱ्या पुस्तकाच्या फडताळांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या पुस्तकांविषयी लिहिताना हस्तलिखितांच्या भारतीय आणि पाश्चात्त्य देशांमधल्या इतिहासातले सामायिक धागे आणि हा इतिहास शोधण्याच्या दोन्हीकडच्या दृष्टीतले बदलही रिंढे यांनी आवर्जून नोंदवले आहेत. भारतीय समाजाला पाश्चात्त्यांच्या नव्या बौद्धिक मानदंडांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या ‘निबंधमाला’मध्ये ज्या सॅम्युएल जॉन्सनविषयी लेखमाला लिहिली होती, त्या जॉन्सनने पाऊण दशकाहून अधिक काळ खपून तयार केलेल्या शब्दकोशाची जन्मकथा सांगणाऱ्या ‘डिफायनिंग द वल्र्ड’ या पुस्तकाविषयीचं प्रकरण आणि साहजिकच त्यातला श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी एक तप श्रम करून सिद्ध केलेल्या ज्ञानकोशाच्या निर्मितीचा समांतर उल्लेख वाचताना आपलं करंटेपण अधिक जाणवतं, सलत राहतं.
वॉल्टर बेंजामिन, ऑस्कर वाइल्ड, उंबर्तो इको या प्रख्यात लेखकांचं पुस्तकांपासून सुरू होणारं आणि पुस्तकांपाशीच संपणारं कार्य आणि चरित्र मांडणाऱ्या पुस्तकांचा; रिंढे यांनी घेतलेला परामर्श पाश्चात्त्य जगातली समकालीन सामाजिक–सांस्कृतिक स्थिती फार ठळकपणाने अधोरेखित करणारा आहे. याखेरीज पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिल्या गेलेल्या रहस्यकथा, पुस्तकामुळे झालेला खुनाचा उलगडा मांडणारी गूढ कादंबरी, पुस्तकांच्या अर्पणपत्रिका, कादंबरीचं मुख्य पात्र बनलेला वाचक, हिटलरचं पुस्तकप्रेम आणि त्याने केलेली पुस्तकांची होळी अशा पुस्तकांशी निगडित अनेक विषयांवरची पुस्तकं ‘लीळा पुस्तकांच्या’मधून आपल्याला भेटतात आणि आपल्या दृष्टीत सहज न सामावणारं एक फार फार विशाल आणि वेधक विश्व आपल्यासमोर उभं करतात.
पुस्तकप्रेमापायी प्राध्यापकी सोडून दुर्मीळ पुस्तकांचा विक्रेता बनलेला रिक गेकोस्की, मार्सेल प्रूस्त या लेखकांमुळे झपाटून गेलेला फ्रान्समधल्या एका मोठ्या अत्तरउत्पादक कंपनीचा मालक झाक ग्युरीन, ‘लायब्ररी अ‍ॅट नाइट’मध्ये ग्रंथालयांचा इतिहास सांगणारा अल्बेर्तो मॅनग्वेल, पुस्तकं नाहीशी होण्याचे विविध मार्ग आणि त्याविषयीचं दु:ख सांगणारा स्टुअर्ट केली, पुस्तकांच्या वेडापायी भिकारी अवस्थेत गेलेला, एकेकाळचा धनाढ्य पुस्तकवेडा थॉमस फिलिप यांच्या विलक्षण वाटाव्यात अशा कथा ‘लीळा पुस्तकांच्या’ या पुस्तकात सामावलेल्या आहेत.
पुस्तकाच्या प्रारंभीच्या प्रकरणात रिंढे यांनी महाराष्ट्राच्या पुस्तकसंस्कृतीवर एक दृष्टीक्षेप टाकला आहे. विकसित जगातला ग्रंथांकडे, ग्रंथांच्या इतिहासाकडे, ग्रंथनिर्मितीकडे, लेखकाच्या सर्जनशील निर्मितिप्रक्रियेकडे, वाचकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय, विशेषत: महाराष्ट्रीय समाजाची या संदर्भातली एकंदर लघुदृष्टी विशद करणाऱ्या आणि या क्षेत्रात महत्त्वाचं काम करणाऱ्या मोजक्या मराठी माणसांचं मोठेपण विशद करणाऱ्या पहिल्याच प्रकरणामुळे या पुस्तकाला पूर्णता आली आहे.

हे पुस्तक एकदा वाचून ठेवून देण्याजोगं नाही. पुस्तकवेड्या, पुस्तकप्रेमी माणसांना अधिक झपाटून टाकण्याची ताकद तर त्यात आहेच, पण फार वाचन न करणारी माणसंही हे पुस्तक वाचून खरोखरच अद्भुत असलेल्या पुस्तकविश्वात खेचली जाऊ शकतील. या पुस्तकाचं आणखी एक श्रेय आहे. ‘पुस्तकाचं स्वरूप बदलेल, छापलेल्या पुस्तकाच्या जागी ई-पुस्तक येईल, पण वाचन करणे ही गोष्ट कायम राहील. जोवर माणसाला नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची, अनुभवण्याची तहान आहे, तोवर पुस्तकाला मरण नाही,’ हा विश्वास प्रसिद्ध इटालियन लेखक उंबर्तो इको यांच्या शब्दांद्वारे या पुस्तकाने जागवला आहे. म्हणूनच सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात अ-क्षरविश्वाला क्षराचं नख लागेल की काय, अशी भीती निर्माण झालेली असताना, या पुस्तकाची सोबत नक्कीच आश्वस्त करणारी आहे.

-वर्षा गजेंद्रगडकर

लीळा पुस्तकांच्या / लेखक- नीतीन रिंढे/लोकवाङ्मय प्रकाशन गृह

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • इति-आदि / लेखक- डॉ. अरुण टिकेकर / रोहन प्रकाशन.
    • पासोडी / लेखक- नीतीन रिंढे / पपायरस प्रकाशन.
    • रहें ना रहें हम / लेखक- मृदुला दाढे-जोशी / रोहन प्रकाशन.
    • घंटेवरले फुलपाखरू / लेखक- विजय पाडळकर / अभिजित प्रकाशन.
    • माझा धनगरवाडा / लेखक- धनंजय धुरगुडे / रोहन प्रकाशन.
    • माझं नाव भैरप्पा / लेखक- एस. एल. भैरप्पा, अनुवाद : उमा कुलकर्णी / राजहंस प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल डिसेंबर २०२०


रोहन शिफारस

बुक्स ऑन बुक्स’ प्रकारातील ‘क्लासिक’ पुस्तक

अक्षरनिष्ठांची मांदियाळी

ग्रंथलेखन आणि पत्रकारिता यांचा वारसा लाभलेल्या तिसर्‍या पिढीचं प्रतिनिधित्व करणारे अरुण टिकेकर प्राध्यापक, वाङ्मयतज्ज्ञ, संदर्भ-विभाग प्रमुख, संशोधन-किभाग प्रमुख, साहाय्यक संपादक अशा पदांवर अनुभव घेत सप्टेंबर १९९१ मध्ये दैनिक ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. दशकाहून अधिक वर्षं त्या पदांकर ते कार्यरत राहिले. इंग्रजी वाङ्मयशाखेचे विद्यार्थी असलेल्या टिकेकरांनी बहुशाखीय अभ्यासाचा तसंच संशोधनाचा पाठपुरावा केला. वाङ्मयेतिहासाबरोबर स्थानीय इतिहास, सामाजिक व सांस्कृतिक इतिहास या इतिहासलेखनाच्या नवप्रवाहांत रुची निर्माण झाल्यानं त्यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासलेखनास उपयुक्त ठरतील अशा इंग्रजी आणि मराठी अशा ग्रंथांचा शोध घेतला. त्यातून झालेल्या वाचन-बोधातून त्यांचे ग्रंथ-जीवन साकारले.

 aksharnishthanchi mandiyali

190.00Add to cart


 Nitin-Rindhe

वाचावेसे असे

लेखक, समीक्षक व विचक्षण वाचक नीतीन रिंढे यांचा लेख

गेल्या वीस वर्षांतली मला आवडलेली कथा : छटाकभर रात्र, तुकडा तुकडा चंद्र
(लेखक : जयंत पवार)

‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ ही कथा गेल्या वीस वर्षांतली सर्वोत्कृष्ट कथा वाटते, असं मी म्हटलं तर त्या बाबतीतही हे काही प्रमाणात खरं असेल. पण या निवडीमागे असणारी कारणं केवळ व्यक्तिगत नाहीत…

लेख वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *