पैसा, संपत्ती, सत्ता या बळावर आपण सुखं, सोयी, चैन, माणसं काहीही विकत घेऊ शकतो, आपला अहंकार सुखावून घेऊ शकतो, असा एक विश्वास बाळगून असतात काही जण. तर काहींना आपली बुद्धिमत्ता, शिक्षण, प्रतिभा, अंगी असलेलं कला-कौशल्य या बळावर समोरच्याला कस्पटासमान वागणूक देण्याचा हक्कच जणू प्राप्त झाल्यासारखं वाटतं. काहींना तर मेहनत घेण्याची, कष्ट उपसण्याची तयारी, चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम करून स्वत:चं कर्तृत्व सिद्ध करण्याचा निर्धार, असे अंगी बाणवलेले गुण आत्मपौढीने मिरवावेसे वाटतात. दैवं, नशीब अशा गोष्टींना त्यांच्या विचारात थारा नसतो.
‘बी.आर.फिल्म्स’ ही एकेकाळची नावाजलेली चित्रपटनिर्माती संस्था. प्रामुख्याने ‘करमणूकप्रधान चित्रपट’ अशा वर्गवारीत असणारे त्यांचे चित्रपट. परंतु या चित्रपटांच्या कथांना बहुतांश वेळा जोड असायची ती काही तत्कालीन सामाजिक समस्यांची. कधी त्यांनी व्यवस्थेतील विसंगती दाखवल्या, तर कधी काही सिद्धान्त मांडले. असाच एक सिद्धान्त त्यांनी १९६५ साली प्रर्दिशत झालेल्या त्यांच्या ‘वक्त’ या मल्टीस्टारर चित्रपटातून मांडला होता.
‘वक्त’मधील बलराज सहानी यांनी साकारलेली व्यक्तिरेखा – लाला केदारनाथ. कष्ट, सचोटी, चिकाटी आणि दृढनिश्चय या गुणांच्या बळावर ‘एक मजूर ते एक यशस्वी व्यावसायिक’ असा त्याचा प्रवास झालेला असतो. विस्तारित दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी तो स्वत:वर पुष्कळच खूश असतो. आपली सुशील, सुस्वरूप पत्नी, तीन गुणी मुलं यांच्यासाठी तो मोठी स्वप्नं पाहत असतो. समारंभातील एक पाहुणा प्रख्यात ज्योतिषी असतो. त्याला जरा मनाविरुद्धच हात दाखवताना लाला म्हणतो, “माझा कष्ट, स्वकर्तृत्व, सचोटी अशा गोष्टींवरच विश्वास आहे. आज माझ्याकडे नाव आहे, कीर्ती आहे, पैसा आहे.” इ.इ. त्यावर ज्योतिष पंडित त्याला म्हणतो, “खरं आहे तुझं, पण अनेक गोष्टी अशा असतात ज्या आपल्या हाती नसतात.” मग तो ज्योतिषी बाजूला असलेला चहाचा भरलेला कप हाती घेऊन म्हणतो, “हा कप आता माझ्या हाती आहे, पण मी तो ओठाला लावेपर्यंत काही क्षणांत, काहीही घडू शकतं.” आणि योगायोगाने त्याच रात्री त्या गावात मोठा भूकंप होतो. केदारनाथ, त्याची पत्नी, मुलं सर्वांची एकमेकांपासून ताटातूट होते. होत्याचं नव्हतं होतं.
व्यक्तिश: माझाही भविष्य पाहणं, नशीब, दैव या गोष्टींवर जराही विश्वास नाही. परंतु आपल्या भोवती कित्येक प्रकारच्या बाह्यशक्ती कार्यरत असतात. इतर व्यक्ती, समाज किंवा देश यांच्या कृतींवर आपलं नियंत्रण नसतं. या बाह्य घटकांचा सुकाणू आपल्या हाती नसतो. आपण मेहनतीने, कौशल्याने, बुद्धिमत्तेने घडवलेली एखादी गोष्ट असते. आणि त्या कामाशी दूरान्वयानेही संबंध नसलेली एखादी घटना घडते आणि क्षणार्धात किंवा कालांतराने आपलं काम धुळीस मिळू शकतं. ‘वक्त’ या चित्रपटातील पंडित चहाच्या कपाचं उदाहरण देऊन हीच वास्तवता केदारनाथच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो भीषण भूकंपही मानवसमाजाला त्याच्या मर्यादांचं भान देऊन जातो.
आज ५५ वर्षांनंतर ‘वक्त’सारखा व्यावसायिक चित्रपट आठवायचं आणि त्याचा दाखला देण्याचं निमित्त वाचकांनी ओळखलंच असेल… हो, अर्थात ‘करोना’! या करोनाचा सर्वत्र संचार आहे. केवळ आपले व्यक्तिगत किंवा आपल्या शहराचे, आपल्या देशाचेच नव्हेत, तर पूर्ण पृथ्वीतलावरचे व्यवहार या संचारामुळे थांबल्यागत आहेत. एखाद्या प्रतिभावान कथा-कांदबरीकाराला किंवा कल्पनांचे इमले रचणाऱ्या कवीलाही आजच्या परिस्थितीचा आवाका कवेत घेता आला नसता, किंवा त्यांच्या कल्पनाविलासात तो रंगवता आला नसता. परंतु ही सत्य परिस्थिती आज जग अनुभवते आहे. पृथ्वीवरचं हे ‘स्थगन’ काही आठवड्यांत घडून आलं. सतत कार्यरत राहू मागणाऱ्या, सतत भरारी घेऊ मागणाऱ्या अखिल मानवसमाजाला आणि त्यांनीच निर्माण केलेल्या अफाट यंत्रसामग्रीला अनिश्चित काळासाठी थांबायला लागलं आहे. घड्याळाची भुणभुण मागे लावून घेणाऱ्या आणि दिवस, आठवडे, महिने यांचं कॅलेंडर वर्षभर डोळ्यांसमोरून हलू न देणाऱ्या मानवाला, तसंच याच मानवजातीकडून मोबदल्याची वसुली करून घेण्यासाठी मिनिटा-मिनिटांचं गणित डोक्यात ठेवणाऱ्या मॅनेजमेंटगुरूंना एका सूक्ष्म विषाणूने पूर्णपणे जखडून ठेवलं आहे.
माझ्या शालेय जीवनात ‘स्टॅच्यू’ असा एक खेळ होता. ‘मूव्ह’ अशी सुटका करणारी ऑर्डर समोरच्याकडून येईपर्यंत हालचाल केलीत, तर काहीतरी शिक्षा! ‘करोना’ सर्व जगाकडून जणू हाच खेळ खेळवून घेतो आहे.
देशोदेशीची मायबाप सरकारं ‘स्टॅच्यू’चे निर्देश देत आहेत. हललात तर, करोनाबाधित होण्याच्या शिक्षेची टांगती तलवार! परंतु आताच्या या खेळाची पुढची बाजूही वाईट आहे. तुम्हाला मिळालेली शिक्षा तुमच्यापर्यंत सिमित राहत नाही. ती तुमच्या संपर्कात येणाऱ्यालाही मिळते. यावरून कोणती बाह्य घटना-घडामोड तुमच्या आयुष्यावर केवढा मोठा प्रभाव करू शकते, हे लक्षात यावं.
माझ्यामते या घटनेने संपूर्ण मानवजातीचं गर्वहरण झालं आहे, असं म्हटलं तर, ते अतिशयोक्तपूर्ण होणार नाही. हुशार-निर्बुद्ध, श्रीमंत-गरीब, सवर्ण-मागास, पुण्यवान-पापी, बुद्धिजीवी-कष्टकरी, सत्ताधारी-जनसामान्य अशी कोणतीच भेदाभेद हा विषाणू करत नाही. विकसित राष्ट्राच्या पंतप्रधानांपासून ते गरीब देशातल्या अगदी सर्वसामान्याला या धोकादायक विषाणूने बाधित केलं आहे. संपूर्ण लॉकडाऊन परिस्थिती, सर्वच नागरिकांना अर्थातच गैरसोयीची आहे. परंतु, अशा उपाययोजना करणं व्यापक जनहितासाठी अपरिहार्यही असतं. लॉकडाऊनचे दुष्परिणाम मात्र समाजातील सर्वांना सारख्या प्रमाणात भोगावे लागले आहेत असं नाही. उच्चवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि मध्यमवर्ग हे दुष्परिणाम झेलण्यासाठी, बसलेले धक्के शोषून घेण्यासाठी अधिक सक्षम आहेत. ज्यांच्याकडे स्वत:चा निवारा आहे, साधनसामग्री आहे, सोयी आहेत, पत आहे, प्रतिष्ठा आहे; कमी-जास्त प्रमाणात का असेना, परंतु कनिष्ठ वर्गाच्या तुलनेत किमान आर्थिक सुबत्ता आहे; त्यांना हे दिवस निभावून नेणं थोडंफार तरी शक्य आहे. परंतु हातावर पोट असणाऱ्यांच काय? नेहमीच हलाखीची परिस्थिती असणाऱ्यांच काय? रोजंदारीवर मजुरी करणाऱ्यांचं काय? शेतमजुरांचं काय? जे आपलं मूळ राज्य, गाव सोडून पोटापाण्यासाठी शहरात आले आहेत त्याचं काय? ‘ना घरके ना घाटके’ अशीच त्या सर्वाची परिस्थिती झाली असणार. उपाशी पोटी शेकडो किलोमीटर उन्हातान्हात पायपीट करून गावाकडे परतणाऱ्यांची किंवा हायवेवर ताटकळत बसणाऱ्यांची संख्या हजारात नव्हे, तर काही लाखांत असेल. तसेच ग्रामीण भागातील मर्यादित सोयी, उपलब्धता यांचाही शहरवासीयांना अंदाज येईल का? हे सर्व प्रश्न मनाला सुन्न करणारे आहेत.
आजच्या ‘क्वारंटाइन’, ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या दिवसांत शहरी मानसिकतेतील विसंगतीही समोर आल्या. समाजाच्या खालच्या थरातील जनतेच्या वरील समस्यांबाबत त्यांना विशेष आस्था आहे असं दिसून आलं नाही. माणसं अधिकाधिक स्वकेंद्रीत होत चालली आहेत असंच वाटतं. एरव्ही दैनंदिन जीवनात किंवा एखाद्या आपत्तीप्रसंगी हाताखालच्या सेवकवर्गावर, मदतीच्या हातांवर अवलंबून असलेला उच्च किंवा मध्यमवर्ग आज हे सेवक हात जोडून सेवेस जरी हजर झाले, तरी त्यांना लांबूनच परतवलं जात आहे. मात्र एकंदर सांगायचं, तर मानवजातीला स्व-कर्तृत्वाचा, स्वत:च्या बुद्धीचा, आर्थिक ताकदीचा जो अहंकार चढला आहे, त्याच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची जी विजिगीषू वृत्ती भिनते आहे, तिला निश्चितपणे या करोनाच्या भीतीग्रस्त वातावरणाने ठेच पोचली आहे. आज जगभराची केवळ विमानसेवाच जमिनीवर विसावली आहे असे नव्हे, तर माणसांच्या स्वप्नांची उड्डाणंही जमिनीवर आणली गेली आहेत. भौतिक सुखांचा जल्लोष कुठेतरी अडखळला आहे. भविष्यात तो आणखी अडखळणार आहे.
या परिास्थितीचे अशा प्रकारचे दूरगामी परिणाम जगभरच्या समाजजीवनावर होतील. गेली काही दशकं ‘ग्लोबलायजेशन’चा पुरस्कार करणाऱ्या, ‘उदोउदो’ करणाऱ्या अर्थतज्ज्ञांना, लॉबीजना, देशांना पुढील काळात कदाचित या धोरणांचा फेरविचार करावा लागेल किंवा कदाचित तात्पुरत्या अर्थकारणाला महत्त्व दिलं जाईल, न की मानवजातीच्या दूरगामी अस्तित्वाला. कारण मनुष्यस्वभाव हा सहजासहजी हार मानणारा नसतो. खरं सांगायचं तर, सद्य परिस्थितीत काहीच वर्तवता येत नाही. पुढचा बराचसा काळ हा करोनाग्रस्त काळ असणार आहे. एवढं मात्र निश्चितपणे सांगता येईल की, या घटनेचे मानवी जीवनावर दूरगामी परिणाम होणार आहेत.
हे सर्व विचार झाले व्यापक स्तरावर, ज्याचे नियंत्रण पुन्हा आपल्याकडे नाहीच. परंतु व्यक्तिगत स्तरावर म्हटलं तरी, लॉकडाऊन परिस्थितीचा संधी म्हणूनही वापर केला असेल. किंवा एक अपरिहार्यता म्हणूनही यावेळेचा वेगळा वापर तसा केला गेला असेल. काहींनी स्वत:मध्ये काही विकास घडवून आणण्याचा प्रयत्न केला असेल, काहींनी आपल्या जीवनविषयक दृष्टिकोनावर फेरविचार करण्यासाठी या वेळेचा सदुपयोग केला असेल, काहींनी मनात असलेल्या एखाद्या विषयावर अभ्यास सुरू केला असेल, तर काहींनी दैनंदिन जीवनावर चिंतन-मनन करणं सुरू केलं असेल… आणि हो, हे करण्यासाठी किंवा न करण्यासाठीही अनेकांना वाचन करावं लागलं असेल, अनेकांना आपली वाचनाची हौस भागवता आली असेल, ‘भविष्यात कधीतरी वाचू’ असं म्हणून आणून ठेवलेली काही पुस्तकं यावेळेत वाचता आली असतील, किंवा आवडत्या, जुन्या पुस्तकांत रममाण होता आलं असेल. काहींना पुन्हा पुस्तकांशी नातं जोडण्याची संधी वाटली असेल, तर काहींनी वाचनाची नव्याने गोडी लावून घेतली असेल…
लॉकडाऊनच्या परिणामांच्या नकारात्मक बाजू पुष्कळ असल्या, तरी तेव्हाच्या ‘स्टॅच्यू’मय परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर जाण्यास मुभा दिली जात होती आणि अर्थात वाचन करण्यासही तशी मुभाच असणार आहे…
‘स्टॅच्यू’मय परिस्थितीची ही आहे सकारात्मक बाजू!
(२० एप्रिल २०२०)
२९ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन उठवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
– प्रदीप चंपानेरकर
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२०
रोहन शिफारस
लव्ह इन द टाइम ऑफ करोना
प्रेमाचा अंकुर सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?
आठ लेखक… आठ कथा…
₹250.00Add to Cart