मराठीत एखाद्या चित्रकाराची चित्रनिर्मितीची प्रक्रिया, त्या चित्रकाराचे चित्रांविषयीचे विचार, कलानिर्मितीमागच्या प्रेरणा, त्यांचं पृथक्करण यांचा उलगडा करून दाखवलेलं लेखन क्वचितच वाचायला मिळतं. परंतु काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालेल्या प्रभाकर बरवे यांच्यावरील ‘चित्र-वस्तुविचार’ या पुस्तकामुळे थोडीफार कसर भरून निघाली आहे.

भारतीय चित्रकलेत प्रभाकर बरवे हे महत्त्वाचे चित्रकार मानले जातात. मी आर्टस्कूल मध्ये शिकत असल्यापासून त्यांची चित्रं पाहिली होती आणि ती आवडूही लागली होती. तेव्हा त्यांची चित्रं फार कळत नसली, तरी ती खिळवून ठेवायची, त्यांत काहीतरी गूढ जाणवत राहायचं. नंतर त्यांचं ‘कोरा कॅनव्हास’ हे पुस्तक वाचलं. त्यात चित्रांमधल्या मूलभूत गोष्टींची चर्चा व त्याबद्दलचं चिंतन बरवेंनी मांडलं आहे. आणि आता आलेलं ‘चित्र-वस्तुविचार’ हे पुस्तकही असंच महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे.
पुस्तकाचा आकार मोठा आहे हे विशेष. कारण ज्याप्रमाणे बरवेंच्या चित्रात अवकाशाला महत्त्व असतं, तसंच ते या पुस्तकात देण्यात आल्याचं जाणवतं. त्यामुळे पुस्तक हाताळताना, त्यातली चित्रं पाहताना सुखद अनुभव मिळतो. पुस्तकाचे एकूण पाच भाग करण्यात आले आहेत. पहिल्या भागात पुस्तकाचा परिचय, बरवेंबद्दलची वैयक्तिक माहिती देऊन पुस्तक प्रकाशित करण्यामागचा हेतू यांबद्दल ऊहापोह करण्यात आला आहे. पुस्तकाला प्रख्यात कवी, समीक्षक व लेखक वसंत आबाजी डहाके यांची विस्तृत प्रस्तावना आहे. त्यात डहाकेंनी बरवेंच्या आधीच्या पिढीतले चित्रकार, त्यांचे समकालीन चित्रकार व त्यांची चित्रं आणि बरवेंची चित्रं यांवर सखोल भाष्य केलं आहे. तसंच बरवेंच्या चित्रातील ‘आकार’ या घटकाची सविस्तर चर्चा केली आहे. ते म्हणतात, ‘या आकारांमुळे बरवेंची चित्रं त्यांच्या पूर्वसूरींपेक्षा आणि समकालीनांपेक्षा वेगळी ठरतात. त्यांच्या चित्रकृतींना स्वतःचं असं व्यक्तिमत्त्व आहे.’ याशिवाय डहाके यांनी प्रस्तावनेत बरवेंचे लेख, त्यांच्या वहीतील नोंदी, त्यातल्या कविता यांविषयीदेखील लिहिलं आहे, जे महत्त्वाचं आहे.
दुसरा भाग आहे तो बरवेंनी लिहिलेल्या सहा लेखांचा. ‘कला क्षेत्रातील आत्मवंचना’ या लेखात बरवे भारतीय समाजात असलेल्या चित्रकलेबद्दलच्या अनास्थेविषयी लिहितात. ते मराठी समाजाविषयी महत्त्वाचं निरीक्षण मांडताना म्हणतात, ‘‘मर्यादित, स्थानिक ज्ञानकक्षेच्या तुलनेत आज जगात सर्वत्र चित्रकला तथाकथित आधुनिकतेचा उंबरठा ओलांडून पलीकडे गेली आहे, प्रगत होत आहे याचे भान मराठी मनाला अजिबात नाही, असे खेदाने म्हणावे लागते.’’ पुढे ते लिहितात, ‘‘स्थानिक लोकप्रियतेच्या एकमेव निकषावर आधारलेली आपली कलामूल्यं जगाच्या संदर्भात मागे पडत आज निव्वळ हास्यास्पद ठरली आहेत. ठरत आहेत.’’
‘नवचित्रकला आणि सामाजिक बांधिलकी’ या लेखात ते विशुद्ध चित्रकलेची बाजू घेताना दिसतात. ‘‘सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ राहून जर चित्र काढण्याचा प्रयत्न केला, तर अशी चित्रे ढोबळ, प्रचारकी थाटाची होतील,’’ असं मत ते मांडतात. ‘करमरकर, पॉल क्ली आणि निळा ढग’ या लेखात बरवेंनी स्वत:विषयी काही गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांना शिल्पकार करमरकर यांनी आर्ट स्कूलमध्ये जायला मदत केली होती आणि त्यांनी बरवेंना ‘‘रिअलिझमवर भर दे’ असा सल्लाही दिला होता. परंतु ‘मिनिएचर पेंटिंग्ज’चा अभ्यास करत बरवेंनी स्वत:चा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे प्रयोग करणं ही आपली सहजप्रवृत्ती होती, असं बरवे या लेखात म्हणतात. यात त्यांनी कला कशाला म्हणायचं, या मूलभूत प्रश्नाचा ऊहापोह केला आहे. ‘चित्र’ हा या भागातला सगळ्यात महत्त्वाचा लेख आहे. त्यात चित्रकलेसंबंधीच्या अत्यंत मूलभूत गोष्टींचा विचार बरवेंनी मांडलेला आहे. चित्रकाराला चित्र काढावंसं का वाटतं, याबद्दल बरवे म्हणतात, ‘‘चित्राचा मूलभूत पाया म्हणजे दृश्य-अदृश्याचा खेळ. चित्रात व्यक्त होणारा आशयाचा मागोवा.’’
पुढचा भाग आहे तो बरवेंनी इतरांना लिहिलेल्या पत्रांचा. या पत्रांमधूनही मुखत्वेकरून चित्रांबद्दलचे विचार व चिंतनच प्रतीत होतं. ही पत्रं वाचताना अशा प्रकारचा संवाद सद्यकालात लुप्त झाला असल्याचं प्रकर्षाने जाणवतं. ही जुनी अंतर्देशीय किंवा पोस्टकार्डावर लिहिलेली पत्रं स्कॅन करून जशीच्या तशी प्रकाशित केली आहेत.

चवथ्या भागात बरवेंची काही चित्रं प्रकाशित करण्यात आलेली आहेत. त्यासोबतच त्यांच्या डायरीमधली त्या त्या चित्रांशी संबंधित कच्ची रेखाटणं, त्यासंबंधीच्या नोंदी, चित्रामागच्या कल्पना आदीदेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे चित्रकाराच्या चित्रनिर्मितीच्या प्रवासाचे विविध टप्पे आपल्याला जाणवतात. एके ठिकाणी बरवे नोंदवतात, ‘‘विचारातून कल्पना आणि त्या कल्पनेमध्ये पुष्कळ स्थित्यंतरं घडत घडत प्रतिमा आकार घेते.’’ चित्रावकाशात दिसणाऱ्या अंतिम प्रतिमेमागे असणाऱ्या या गोष्टी मला तितक्याच महत्त्वाच्या वाटतात.
माझ्या दृष्टीने पुस्तकातला पुढचा भाग महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बरवेंच्या डायरीतली जशीच्या तशी स्कॅन करून प्रकाशित केलेली पानं. या पानांमुळे, त्यातल्या हस्ताक्षरामुळे, पानापानांवर रेखाटलेल्या चित्रांमुळे मी थेट बरवेंशी ‘कनेक्ट’ झालो. एखाद्या पानावर ते ‘दृश्य-तत्त्व’ गवसण्याच्या शक्यतेबद्दल लिहितात, त्यासाठी काय केलं पाहिजे याचं प्रतिपादन करतात; तर दुसरीकडे ते ‘माझ्या चित्रातले मला उमजलेले दोष’ यासंबंधी पाच मुद्दे लिहून जातात. या भागात मला बरवेंमधल्या चित्रकाराबरोबरच जगाकडे सूक्ष्मपणे पाहणारा कवीदेखील सापडला. एकुणातच हे संपूर्ण पुस्तक बरवेंसारख्या एका महत्त्वाच्या चित्रकाराच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्याच्या कलेचा, त्यामागील विचारांचा सखोल वेध घेतं. अशी पुस्तके मराठीत अधिकाधिक प्रकाशित व्हावीत ही आशा!

-अन्वर हुसेन

चित्र-वस्तुविचार / लेखक- प्रभाकर बरवे – बोधना आर्ट्स अँड रिसर्च फाउंडेशन / पॉप्युलर प्रकाशन प्रा. लि., मुंबई.

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • माणदेश : दरसाल दुष्काळ / लेखक- आनंद विंगकर / लोकवाङ्मय प्रकाशनगृह.
    • काळेकरडे स्ट्रोक्स / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.
    • दोन शतकांच्या सांध्यावरच्या नोंदी / लेखक- बालाजी सुतार / शब्द पब्लिकेशन.
    • लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र / लेखक- सईद मिर्झा – अनुवाद : मिलिंद चंपानेरकर / रोहन प्रकाशन.
    • स्टुडिओ / लेखक- सुभाष अवचट / पॉप्युलर प्रकाशन.
    • मेरे प्रिय / लेखक- सैयद हैदर रजा और कृष्ण खन्ना / राजकमल प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०२०


रोहन शिफारस

शृंगार नायिका

प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांची चित्रं…

प्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते. त्यापैकी कामशास्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्या शृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.

Shringar_Nayika

लक्षणीय पुस्तकं

वा! म्हणताना

डॉ. आशुतोष जावडेकर


‘‘अनेकदा जे समीक्षकीय लेखन समोर येतं ते तांत्रिक, कोरडं आणि संज्ञांच्या जंजाळात अडकलेलं असं असतं. शास्त्रीय लेखन हे नेहमीच तांत्रिक असतं. ते ती विद्याशाखा सोडून पटकन सगळ्यांना कळेल किंवा कळावं अशी अपेक्षाही काहीशी अवास्तव असते. भाषाशास्त्रीय समीक्षा ही तशी असते. त्यात काही मुळात चूक आहे असं नाही. चुकतं हे की, अशी समीक्षा लिहिणं आणि वाचणं हे अभ्यासाचं सोडून साहित्य-व्यासंग मिरवण्याचं ठिकाण बनतं. मग उगाच अस्तित्ववाद वगैरे शब्द गप्पांमध्ये घुसले-घुसवले जातात. त्या शब्दांचा किंवा संकल्पनांचा काही दोष नसतो. ते शब्द आढ्यतेने वापरणाऱ्या लेखकांमुळे सर्वसामान्य वाचकांपासून अपरिचित राहतात. प्रत्येक भाषेत मोजके पण चांगले, उमदे समीक्षक असतात ज्यांची भाषा संज्ञायुक्त असली तरी शब्दबंबाळ नसते. ती वाचकाला परकं करत नाही, खुजं ठरवत नाही… `वा!’ म्हणताना हे पुस्तक या धारेवर तर आहेच, पण त्यापुढे जाऊन मी म्हणेन की, माहितीच्या विस्फोटाच्या काळात मला वाचक हा नुसता पॅसिव्ह भागीदार नव्हे, तर सह-सर्जकही वाटतो. समीक्षालेखन करताना तुम्ही वाचक हे मित्र-सुहृद बनून माझ्या डोळ्यांपुढे येत असता…’

– डॉ. आशुतोष जावडेकर

साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘वा!’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह `वा!’ म्हणताना…


250.00 Add to cart

इति आदि

दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास


अरुण टिकेकर


‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.

दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….

या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”



500.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

लोकशाहीवादी अम्मीस…दीर्घपत्र


सईद मिर्झा
अनुवाद: मिलिंद चंपानेरकर 


‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?’ या व आपल्या अन्य चित्रपटांद्वारे चित्रपट-दिग्दर्शक सईद मिर्झा यांनी समांतर चित्रपट चळवळीवर आपला आगळा ठसा उमटवला. या माध्यमात रचनेचे, कथनपद्धतीचे आगळे प्रयोग साध्य केले. ‘अम्मी: लेटर टू ए डेमॉक्रेटिक मदर’ या आपल्या पहिल्याच इंग्रजी साहित्यकृतीद्वारे त्यांनी रुपबंधाच्या दृष्टीने आगळा प्रयोग साधण्याचा प्रयत्न केला आहे. दीर्घपत्राचा रूपबंध घेऊन त्या अंतर्गतच कादंबरी, परिकथा, आत्मकथन, समाजचित्र रेखाटन, राजकीय वाद-संवाद, संस्कृती विचार, प्रवासवर्णन, चित्रपट-संहिता अशा अनेकविध रूपबंधांचं त्यांनी सर्जनशीलतेने संमिश्रण साधलं आहे. ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’ म्हणजे अर्थातच या इंग्रजी साहित्यकृतीचा मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद. स्वातंत्र्यानंतर विविध धर्मियांनी धर्मनिरपेक्ष लोकशाहीची संकल्पना स्वीकारून स्वदेशाशी कसं मनोभावे नातं जोडलं, यावर मिर्झा साध्यासाध्या घटनांद्वारे प्रकाश टाकतात. विस्मृतीत गेलेल्या वा दडपल्या गेलेल्या सांस्कृतिक ‘अवशेषां’चा सूक्ष्मतेने मागोवा घेता घेता ते समकालीन घटनांचीही चर्चा साधतात. काळ आणि अवकाशाच्या संदर्भात सतत मागेपुढे नेत ते वाचकाला आगळं भान देऊ पाहतात. भारतासह अन्य अनेक देशातील जनसामान्यांच्या मनातील हुंकार ऐकवू पाहणार्‍या या पुस्तकात केवळ सहज ‘स्मित-हास्या’द्वारे परस्पर संवाद साधणारे जनसामान्य जागोजागी आढळतात; त्याद्वारे या साहित्यकृतीला ‘गुढानुभूती’चं आगळंच परिमाण लाभतं! व्यापक जनजीवनाच्या अनेक पैलूंच्या दर्शनाद्वारे वाचकाला अलगद हिंदोळे देत आगळा मानसिक प्रवास घडवणारी ही एक आगळीच साहित्यकृती ठरते— ‘लोकशाहीवादी अम्मीस… दीर्घपत्र’


Original price was: ₹320.00.Current price is: ₹270.00. Read more

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *