अभ्यासू पत्रकार दीप्ती राऊत लिखित, रोहन प्रकाशन प्रकाशित ‘कोरडी शेतं…ओले डोळे’ हे पुस्तक डोळ्यात अंजन घालणारं आहे. या पुस्तकाला शेती व पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे. ती वाचल्यावर आपल्याला विषयाचं गांभीर्य लक्षात येतं. प्रस्तावनेत त्यांनी म्हटलं आहे – ‘१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप आणि सक्तमजुरी भोगावी लागत आहे, असे दृश्य हजारो घरांतून दिसत आहे. राऊत यांनी अशा अनेक होरपळलेल्या घरांची व्यथा जवळून पाहिली. या महिलांचं अंतरंग जाणून घेतलं आणि त्यातून हा प्रस्तुत दस्तऐवज वाचकांच्या हाती दिला आहे.’
याबाबत राऊत लिहितात – ‘सार्वजनिक चर्चेच्या पटलावर आणि कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या विधवा फक्त दोनदाच दिसतात. पतीच्या आत्महत्येच्या दिवशी प्रकाशित होणाऱ्या बातम्यांमधून आणि त्यानंतर मदतीचा धनादेश स्वीकारताना. या दोन चित्रांपलीकडे त्यांच्या जगण्यातले संघर्ष, त्यांचं लढणं, सहन करणं आणि सामना करणं आजही अंधारात आहे… शेतकरी आत्महत्येनंतर त्या विधवेचे पहिले दहा दिवस सांत्वनाचे आणि नंतर पूर्ण उपेक्षेत जातात.’
विधवा महिलांची काय अवस्था होते, कशा पद्धतीने जग त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं आणि ती महिला मात्र आपल्या अकाली (अनेकदा वयाच्या २५ वर्षांच्याही आधी, पदरात एकदोन लहान मुलं असताना) आलेल्या वैधव्याशी सामना करताना, त्या संकटांना कशी तोंड देण्याचा प्रयत्न करते, त्याच्या विदारक कथा या पुस्तकात वाचायला मिळतात. या धडपडीमध्ये यशस्वी झालेल्या महिला फार थोड्या. बऱ्याच जणी आज स्वत:ची जमीन सोडून इतरांच्या शेतावर मजुरी करताना दिसतात. घरातील जमीन बहुतेककरून सासऱ्याच्या नावावर असते, सासरे नसले तर नवऱ्याच्या नावावर असते, पण शेती कशी करायची इथपासून ते इतर गोष्टी म्हणजे नवऱ्याने किती कर्ज घेतलं आहे, ते किती फेडलं आहे, आपलं नाव सातबारावर आहे की नाही, आपल्या शेतीतला आपला हिस्सा काय, नवरा नसताना आपण शेती कशी करायची, त्यासाठी अर्थसाहाय्य कुठून घ्यायचं, त्यासाठी ग्रामपंचायतीपासून ते वरपर्यंत कितीही फेऱ्या मारल्या तरी मदत न करणाऱ्या प्रशासनाला कसं तोंड द्यायचं, असे अनेक प्रश्न या महिलेसमोर असतात आणि त्या महिलेच्या बाजूने कोणीच नसतं. या पुस्तकात फार अपवादाने अशी उदाहरणं आहेत की, त्या महिलेला माहेरची अथवा सासरची भक्कम साथ मिळाली. पतिनिधनानंतर जमिनीचा वाटा मागितला तर सासरे, दीर टोचून बोलायला लागतात आणि आता तुला कशाला हवी शेती, आमच्या नावावर करून टाक, आम्ही बघतो आणि तू आमच्याबरोबर राहा असं ऐकण्याचा प्रसंग अनेक महिलांवर येतो. अनेक जणी ते ऐकतात. पण या परिस्थितीतही केवळ हिंमत, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर काहींनी या संकटांना शिंगावर घेतलं आहे. फाशीचा दोर किंवा कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावण्यापेक्षा मुलाबाळांच्या भवितव्याचा विचार करून त्या जगत आहेत, असं दीप्ती राऊत पुस्तकात म्हणतात.
हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहतं की, या महिलांची शासकीय पातळीवर वारंवार अडचण येते, मग सरकार कोणाचेही असो. अशी अनेक उदाहरणं यात आहेत, ज्यात घरकुलासाठी अर्ज केला आहे, परंतु अकरा-बारा वर्षं होऊनही त्या अर्जावर निर्णय घेतलेला नाही. पती गेल्यानंतर खंबीरपणे उभं राहायचा निर्णय घेतला तर अनेक संकटांना सामना करावा लागतो. घरातील स्वत:चं, मुलांचं अथवा वयस्कर माणसं असल्यास त्यांचं आजारपण हा एक मोठा प्रश्न असतो. त्यासाठी पैसा कुठून आणायचा? मग जे आहेत ते पैसे मुलांवर अथवा वयस्कर लोकांवर खर्च होतात, आणि त्या महिलेला स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला मुभाच मिळत नाही. अन्य महिलांप्रमाणेच या महिलांमध्येही अनेक आजार अंगावर काढण्याचे किंवा घरगुती उपाय करण्याचे प्रकार दिसून येतात. परंतु अन्य महिलांच्या तुलनेत यांच्यावरील शारीरिक आणि मानसिक ताण, भावनिक उलथापालथ गुंतागुंतीची असल्याने त्यांचे त्यांच्या आरोग्यावरही तेवढेच गंभीर आणि दूरगामी परिणाम झालेले दिसतात.

१९९५ पासून आजपर्यंत महाराष्ट्रातील सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि त्याची शिक्षा म्हणून त्यांच्या विधवांना जणू घरगुती जन्मठेप आणि सक्तमजुरी भोगावी लागत आहे, असे दृश्य हजारो घरांतून दिसत आहे. राऊत यांनी अशा अनेक होरपळलेल्या घरांची व्यथा जवळून पाहिली. या महिलांचं अंतरंग जाणून घेतलं आणि त्यातून हा प्रस्तुत दस्तऐवज वाचकांच्या हाती दिला आहे.

– अतुल देऊळगावकर

शासकीय यंत्रणा याबाबत कशी काम करते ते राऊत यांनी एके ठिकाणी नमूद केलं आहे. त्या म्हणतात, ‘प्रशासकीय यंत्रणा या महिलांपर्यंत पोचत नसेल तर त्यांना जाब विचारण्याची, या महिला आणि प्रशासन यांच्यात दुवा बनण्याची, त्यांचे प्रश्न मांडण्यापासून ते सोडवण्याची प्राथमिक जबाबदारी बनते ती लोकप्रतिनिधींची. मात्र आत्महत्या झाल्यानंतर तातडीने सदर कुटुंबास भेट देऊन त्यांचे सांत्वन करणं, त्यांना पक्षाकडून किंवा स्वत:हून मदतीचा धनादेश देणं, त्याचा फोटो छापून आणणं यापलीकडे स्थानिक लोकप्रतिनिधी तिला कायमस्वरूपी स्वत:च्या पायावर उभं राहता येईल यासाठी मदत करत नाहीत. तिच्या गरजांनुसार रोजगार, शेती आणि पूरक व्यवसायाच्या योजना तिच्यापर्यंत पोचवण्यात लोकप्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, परंतु ग्रामपंचायत ते लोकसभा या सर्व स्तरांतील एकही लोकप्रतिनिधी या पातळीवर या महिलांना आधार देत नाहीत. एकंदरीत रोजच्या जगण्याचा प्रश्न, शेतीचे संकट, शारीरिक आजार, मानसिक वैफल्य, एकाकीपणा, कौटुंबिक कलह, दारिद्र्य आणि हतबलता, नैर्सिगक संकट आणि सामाजिक कलंक या एकापेक्षा अधिक प्रश्नांचा सामना एकाच वेळी करावा लागल्याने सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर ताण असह्य होऊन या शेतकरी महिलांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्याच्या भीषण वाटेवर आपला समाज येऊन ठेपला आहे.’
पुस्तकामध्ये सरकारची बाजू आली नसली, तरी शासकीय पातळीवर या महिलांकडे किती दुर्लक्ष होतं त्याचा तपशील आहे. सरकारी योजना असल्या तरी त्या महिलांपर्यंत पोचवल्या जात नाही आणि पोचवल्या गेल्या तरी तलाठ्यापासून वरपर्यंत या महिलांकडून पैसे कसे उकळले जातात याचाही तपशील काही उदाहरणांमध्ये आढळतो. एकंदरीत बघता या महिलांना आज कोणी वाली नाही असं म्हणावं लागेल. नाही म्हणायला काही स्वयंसेवी संस्था या महिलांना पुढे मदत करायला पुढे आल्या आहेत, परंतु एकूण प्रश्न लक्षात घेता हा तिढा सहजासहजी सुटणारा नाही. हा गंभीर आणि महत्त्वाचा विषय पुस्तकरूपाने लोकांसमोर आणल्याबद्दल दीप्ती राऊत व रोहन प्रकाशन यांचे आभार!

-अशोक पानवलकर

‘कोरडी शेतं…ओले डोळे’/ लेखक- दीप्ती राऊत / रोहन प्रकाशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • हमरस्ता नाकारताना / लेखक- सरिता आवाड / राजहंस प्रकाशन.
    • काळेकरडे स्ट्रोक्स / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.
    • कादंबरी : समग्र जयंत नारळीकर / राजहंस प्रकाशन.
    • नाइन्टीन नाइन्टी / लेखक- सचिन कुंडलकर / रोहन प्रकाशन
    • अणुविश्वातील ध्रुव डॉ. अनिल काकोडकर / लेखक- नीरज पंडित / रोहन प्रकाशन.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल मे २०२०


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

Koradi-Sheta-Cover

कोरडी शेतं… ओले डोळे

सामान्य जनता विचारही करू शकणार नाही अशी ही रोजची लढाई रोजच हरणाऱ्या शेकडो शेतकरी विधवांची होरपळ दाखवणारं आणि दु:खाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्यांची उदाहरणं जगासमोर आणणारं पुस्तक…!

160.00Add to cart


आवर्जून वाचावं असं…

अणुविश्वातील ध्रुव : डॉ. अनिल काकोडकर


[taxonomy_list name=”product_author” include=”583″]


अणुविश्वात डॉ. अनिल काकोडकर यांचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं, ते त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे. `ध्रुव’सारखी अणुभट्टी कार्यान्वित करणं असो, किंवा पोखरण अणुचाचण्या असोत – डॉ. काकोडकरांनी अशा कितीतरी महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये बहुमूल्य कामगिरी बजावली. एवढंच नव्हे, तर भारत-अमेरिका यांच्यातल्या अणुकराराच्या मसुद्यात देशहिताच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करून घेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

अणुऊर्जेबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन या विषयावरही त्यांनी सखोल चिंतन केलं. त्यातूनच भारताला तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात भरारी घ्यायची असेल, तर शिक्षण-व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे हे त्यांनी ओळखलं. त्यानुसार त्यांच्या संकल्पनेतून `सिलेज’, `शिक्षण पंढरी’ यांसारखे अनेक उपक्रम राबवले गेले. तसंच एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘व्हिजन २०२०’नंतर भारताच्या भविष्यकाळातल्या गरजा व विकास विशद करणारं `व्हिजन २०३५’ डॉक्यूमेंटही त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने तयार केलं. सध्या त्यानुसार अनेक उपक्रम व प्रकल्प राबवले जात आहेत.
अणुविश्वाबरोबरच तंत्रज्ञान-संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रांत `ध्रुव’पद प्राप्त करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीची व कार्याची ओळख करून देणारं हे चरित्र!


160.00 Add to cart
Featured

नाइन्टीन नाइन्टी


सचिन कुंडलकर


आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक

सचिन कुंडलकर…

या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा

एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !



340.00 Add to cart

माझा धनगरवाडा


धनंजय धुरगुडे


शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं!
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!


500.00 Add to cart
Featured

काळेकरडे स्ट्रोक्स


प्रणव सखदेव


उदास पोकळी… की पोकळीतच उदासी राहते भरून?
समीरच्या आयुष्यात ही पोकळी आहे. का आहे ही पोकळी?
का वागतोय तो असा? ‘इन्फेक्टेड पेनड्राइव्हमधल्या व्हायरस’सारखा कधी झपाटला जातोय…
कधी ‘पाय सोडूनी जळात बसलेल्या औदुंबरासारखा’ गुढाकडे ओढला जातोय…
कधी मनामध्ये विचारांचा कोलाहल घेऊन
कवितांमधून व्यक्त होत जातोय…

आयुष्याचा ठाव घेतलेल्या सानिका, सलोनी आणि चैतन्यच्या मैत्रीमुळे
कॉलेजातले दिवस सोनेरी होऊ पाहतात. पण अचानक काळे ढग
दाटून येतात आणि पुन्हा एकदा करडीकाळी पोकळी तयार होते.
या काळ्या पोकळीत त्यांचे त्यांचे ते ढगांसारखे विरून जातात.
मग पुन्हा उरते फक्त पोकळी. उदास…अटळ!
खाता-पिता-झोपता-उठता-भोगता ही उदासी समीरचा
पिच्छा करत राहते. त्याला छळते, त्रास देते आणि जगवतेही!

कॉलेजमधल्या शुभ्र आठवणींच्या कॅनवासवरचे…
समीरच्या अंतरंगातले… असे हे भन्नाट बोल्ड
काळेकरडे स्ट्रोक्स !



250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *