रावण आडनावाच्या पांडवपुत्राच्या नावाची जन्मकथा

ते सेमिनार दोन दिवसांचं होतं आणि मला खरंतर ‘मल्हारी पांडव रावण’ वगळता नेहमीच्या यशस्वी अदाकारांमध्ये काडीचाही रस नव्हता. पण त्या बाबतीत मी असं ठरवलं होतं की, पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत ‘मल्हारी पांडव रावण’चा वावर फक्त निरखायचा आणि संध्याकाळच्या गप्पांमध्ये आपणहूनच जाऊन ओळख करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मात्र आणखी जवळीक साधता येते का, ते पाहायचं. सुदैवाने त्यांची निबंधवाचनाची वेळ ही पहिल्या दिवशीच्या दुपारच्या सत्रामध्ये होती. त्यामुळे चर्चक म्हणून अधिकृतपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या नजरेत शिरायची सोय आपोआपच झालेली होती.
दिवसभराच्या चर्चासत्रांनंतर संध्याकाळी आमची गाठभेट झाली. म्हणजे खरंतर मीच त्यांच्या जवळ जाऊन जरा खेळीमेळीत बोलायला सुरुवात केली. नमस्कार-चमत्कार, जुजबी ओळखपाळख झाल्यानंतर मी म्हटलं, ‘‘तुम्ही नावापासून वेगळे वाटता हो.’’ तर ह्यावर गडगडाटी हसत ते गृहस्थ म्हणाले, ‘‘ते नावापासून वेगळेपण नाही आहे खरंतर, थेट जन्मापासूनच आहे आणि ते सांगायचं तर खूप मोठं गुंतागुंतीचं प्रकरण आहे आणि ऐकीव आहे. पुन्हा मला ती माहिती पाच-सात जणांकडून तुटक-तुटक कळलेली आहे. त्यामुळे मी ती सहसा कुणाला सांगायच्या फंदात पडत नाही. कारण त्यात काही कच्चे दुवे आहेत, वेगवेगळे पाठभेद आहेत. त्यामुळे त्यातलं काय खरं, काय खोटं हे ती मंडळीच जाणोत.’’ असं म्हणत ‘मल्हारी पांडव रावण’ ह्यांनी मला ज्या तुटकतुटक गोष्टी सांगितल्या त्या तुटपुंज्या ‘डेटा’मध्ये मला कथाबीज दिसलं आणि त्यातून जन्माला आली ही कथा. अर्थातच थोडंफार तिखटमीठ लावलेली!
तर ही गोष्ट आहे एका तांड्याची. मुळात खरंतर एका चौकडीची. आणि ह्या चौकडीची सुरुवात तशी ठरवूनबिरवून नव्हे, तर अगदी कुणाच्याही ध्यानीमनी नसताना सहज झाली होती. तो प्रसंग होता दामूशेठ नावाच्या एका धनिकाच्या वाढदिवसाचा. व्यक्तिश: दामूशेठला वाढदिवस वगैरे प्रकारात फारसा रस नसायचा, पण त्यांची पत्नी मीरावहिनी आणि घरची मंडळी ह्यांच्या आग्रहामुळे त्यांचा वाढदिवस साग्रसंगीत साजरा व्हायचा. म्हणजे औक्षण ते तेव्हा नुकतं कुठे सुरू झालेलं केक कापणं वगैरे. दामूशेठचा ह्यामध्ये कोंडमारा होत असे. पण ऐपतदार पुरुषांच्या अर्धांगिनींना, त्यांना मिळालेल्या विवाहदत्त वैभवाचा उपभोग घेताना त्यासाठी उतराई राहण्याचे असे प्रसंग साजरे करायचं औचित्य अनिवार्यच असतं. तशा मीरावहिनीदेखील श्रीमंत घराण्यातल्याच होत्या. पण दामूशेठच्या तुलनेत त्या कमीच होत्या. दामूशेठ आणि त्यांच्या भावांना जी वडिलोपार्जित जमीन मिळाली होती, तिचा लाभ घेऊन त्यांनी बिल्डरचा व्यवसाय सुरू करून गडगंज कमाई केली होती. जमीनजुमला तसा कोणत्याही काळात फळफळतोच म्हणा. खुद्द दामूशेठ काही तितकेसे कर्तबगार नव्हते, पण त्यांचा एक सख्खा लहान भाऊ व दोन मोठे चुलत भाऊ ह्यांनी व्यवसाय अत्यंत हुशारीने आणि मेहेनतीने वाढवला होता. प्रत्येकाच्या पंधरा-वीस पिढ्या आरामात जगू शकल्या असत्या एवढी गडगंज संपत्ती त्यांनी कमावली होती.
दामूशेठचा जीव मात्र ह्या धंद्याच्या वातावरणात फारसा रमत नसे. त्यांचा पिंडच वेगळा होता. म्हणजे असं की, मुळात जमीन हे निसर्गधन आहे आणि त्यामुळे ती काही कुणाला खरेदी-विक्रीसारखी रोखठोक किंमत चुकवून मिळालेली नसते, तर आपल्या कोणत्यातरी खापर-बिपर पूर्वजांनी काहीतरी दादागिरी-कारस्थानं करून ती बळकावलेली असते, असं काहीबाही त्यांना सुचायचं आणि सलायचं. त्यात त्यांचं लहानपण तसं चारचौघांसारखंच गेलं होतं, कारण एक तर त्यांच्या जुन्या पिढीला त्या जमिनीतून धड शेती देखील करता येत नव्हती, की ती शेतजमीन विना-शेतकी म्हणजे ‘एनए’ करायचा फंडा तेव्हा एवढा रुळलेला… बोकाळलेला नव्हता आणि आज जशा असंख्य, खरंतर अनंत वाटाव्यात अशा चैनी तेव्हा उपलब्धच नव्हत्या, तर त्यामुळे त्यांचं बालपण हे साध्यासुध्या घरातल्या मुलांसारखंच गेलं होतं. लोकांशी तालेवार वागायचं आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना हिणकस वागवून आपलं सांपत्तिक स्थान दाखवून द्याचयं एवढेच श्रीमंती चोचले तेव्हा शक्य होते. पण दामूशेठ त्याला अपवाद होते. ते सगळ्यांशी मिळूनमिसळून वागायचे.
गडगंज पैसे मिळायला लागल्यावरदेखील त्यांची वृत्ती-राहणी ही तशीच राहिली आणि ऊठबस देखील पूर्वीसारख्याच सामान्य लोकांच्यात राहिली. धनिक-वणिक बाळांच्या सहवासात त्यांना करमत नसे. किंबहुना त्यांना त्याचा काहीसा उबगच होता. त्यांचं वागणं इतकं आदबशीर होतं की, ते लक्ष्मीपुत्र आहेत हे कुणालाही कधीही जाणवायचं नाही. ते संपत्तीच्या विश्वस्तासारखे राहायचे. खरंतर काळाच्या ओघात त्यांच्या नावाला चिकटलेली ‘शेठ’ ही उपाधीदेखील त्यांना झिडकारून टाकावीशी वाटायची. तर त्यामुळे घरी साजऱ्या केल्या जाणाऱ्या वाढदिवसाचा उतारा म्हणून म्हणा किंवा उट्टं काढायला म्हणून ते त्यांचा वाढदिवस त्यांच्या साध्या मित्रमंडळींबरोबर एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन साजरा करत. त्यांच्या मित्रमंडळात दोघे जण हे नोकरदार होते, तर त्यांच्या ज्या बारा-पंधरा हक्काच्या रजा असतील, त्यांतील एक रजा ‘दामूशेठच्या तिथीने येणाऱ्याच वाढदिवसा’साठी राखीव असत. आणि क्वचित एखाद्या वर्षी जर हा वाढदिवस रविवारी किंवा सुटीच्या दिवशी आला तर त्यांना हळहळल्यासारखं होई! आपल्या आवडत्या मित्राच्या वाढदिवसाला रजा काढणं ही त्यांच्यासाठी चार लोकांत सांगण्याकरिता कोडकौतुकाची गोष्ट होती.
तर असाच दामू शेठचा बहुधा पंचावन्नावा वाढदिवस असावा. पाच-सात मित्रांनी मिळून जवळच्या एका वनराईमध्ये जायचा बेत आखला. त्या काळात आजच्यासारखी गावोगाव रिसॉर्ट सुरू झालेली नव्हती. फार काय त्या टापूला कुणी काही नाव देखील दिलेलं नव्हतं आणि बरेचसे लोक त्याला रामायणप्रेमापोटी ‘दंडकारण्य’ असंच म्हणायचे. तिथे गेल्यानंतर अर्थातच सगळ्यांचं निसर्गप्रेम उफाळून आलं. तर दामूशेठ बोलता बोलता म्हणाले, ‘‘वानप्रस्थ ही आपल्याकडची फारच मस्त कल्पना आहे. तोपर्यंत शरीराचे जे काही उपभोग असतात ते बऱ्यापैकी भोगून झालेले असतात. त्यासाठी हळूहळू शरीरदेखील कमी साथ देऊ लागलेलं असतं. शिवाय गृहस्थधर्माची कर्तव्यंदेखील पूर्ण झालेली असतात. तर अशा वेळी गृहत्याग करून वनामध्ये वास्तव्य करावं व उर्वरित आयुष्य निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गाच्या कुशीत पुन्हा विलीन व्हावं, असा काहीतरी उदात्त विचार असावा त्यामागे.’’
आणि मग त्या दिवशी बोलण्याचा सारा ओघ ह्या विषयाकडेच वळला. काही काळानंतर संसार कसा असार वाटू लागतो, त्यावर स्वानुभवातून बोलू लागले सगळे. दामूशेठचं हे मित्रांचं टोळकं तसं विझवटच होतं. सामाजिक चालीरीती, नीतिनियम, चाकोरीतलं वागणं ह्यांची उणीदुणी काढत त्यांची खिल्ली उडवणं हे ह्यांच्या मैत्रीतील एक समान सूत्र होतं. त्यातल्या एकाने तर लग्न केलंच नव्हतं. आणि ज्या कुणी केली होती, ते संसारात पाण्यातल्या लोण्यासारखे होते. त्यांतला जो कवी होता म्हणजे राघव, त्याची बायको काही वर्षांपूर्वी माहेरी निघून गेली होती, ती परत आलीच नव्हती आणि त्याने देखील नंतर ती का आली नाही ह्याची साधी विचारपूस देखील केली नव्हती. तर हे सर्व गृहस्थधर्माला नावं ठेवणं, वानप्रस्थाचं कौतुक करणं सुरू असतानाच राघवला आपली एक जुनी कविता आठवली आणि त्याने ती म्हणायला सुरुवात केली…

‘नैराश्याची पखरण
आजपर्यंतच्या हरेक वाटेवर
आता अशा काही वाटा सापडाव्यात
जिथे फुटलेले असावेत चैतन्याचे कोंब
आणि उधळलेले असावेत उत्साहाचे डोंब
तेथे मनाच्या धावण्याला उंबरठाच नसावा
आजूबाजूला झाड होऊन फुलारलेली ही स्वप्ने
बहुतेक माझी, एखादे कुणाकडून घेतलेले उसने
आता कशाला कुरवाळायचे भूतकाळ?
गात गात जर भटकायचे आहे रानोमाळ
माझ्या मनातले सगळेच रंग येथे
इथल्या प्रत्येक क्षणाशी माझे गतजन्माचे नाते
मनातला प्रत्येक सूर येथे गवसावा
असल्या निरागी संध्याकाळी काय करायचा आहे विसावा?
अशा वेळी तरी ह्या मनाच्या धावण्याला
उंबरठाच नसावा
आणि जिकडेतिकडे,
बस् चैतन्याचा, तेजाचाच पाऊलठसा उमटलेला दिसावा.’

आधीच भळभळत्या झालेल्या त्या वातावरणात ह्या कवितेने आगीत तेल ओतण्याचं काम केलं. आणि मग चर्चेने भलतंच वळण घेतलं. त्या जंगलात जणू गृहस्थीविरुद्धचा एक कट शिजला. आणि त्यातून ‘गृहत्याग’ करण्यावर गंभीर चर्चा झाली.
राघवच्या त्या आठवणींच्या खाईतून उफाळून आलेल्या कवितेला अनपेक्षितपणे भलतीच दाद मिळाली. विशेषत: ‘तेथे मनाच्या धावण्याला उंबरठाच नसावा’ ही ओळ ‘वाह वाह’ करत पुन्हा पुन्हा आळवली गेली.
राघव मग वातावरण गद्यात येण्यासाठी म्हणाला, ‘‘मनाच्या धावण्याला उंबरठाच नसावा’ वगैरे कवितेत ठीक आहे हो, पण प्रत्यक्षात जगताना पावलोपावली काटेकुटे असतात. आणि घर-संसार म्हटलं की, उंबरठे आलेच.’’ तर ह्यावर माधव म्हणाला, ‘‘आणि पोटापाण्याचं काय? पैसे काही झाडाला लागतात?’’ तो पुढे काही बोलणार तर दामूशेठ त्याला थांबवून म्हणाले, ‘‘आपण एक प्रयोग करूया का? पैशांची सर्व तजवीज मी करायला तयार आहे. माझ्याकडे दहा-बारा पिढ्या बसून खातील एवढं धन साठलं आहे. तर खर्चाची चिंता न करता आपली गृहस्थी सोडून कोण कोण यायला तयार आहेत? माझ्या फार तर एक-दोन पिढ्यांची आयतं खायची धनदौलत कमी होईल ती होऊ दे. आणि मी स्वत:देखील यायला तयार आहे. मला गेली तीन-चार वर्षं त्या धंद्याचा उबग आला आहे. रोज सकाळी जाग आल्यावर मला ह्या दुष्टचक्रातून कधी बाहेर पडतो असं होतं. घुसमट होते. तुम्हाला ऐकून हसायला येईल कदाचित, पण रात्री झोपताना बऱ्याचदा सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धाचं घर सोडून जाणं डोळ्यासमोर येतं. आणि मग शेजारी झोपलेली बायको चक्क यशोधरा वाटू लागते. सिद्धार्थाचा मुलगा राहुल तर खूप लहान होता. माझा मुलगा मनोज आता धंद्यात लक्ष घालायच्या वयाचा आहे. माझ्या घरच्यांना मला हे सहज पटवता येईल. लोक नोकरीधंदा, व्यापारउदीम करण्यासाठी जातात की वर्षानुवर्षं बाहेर. आणि नाही पटलं तर मी पळून यायला तयार आहे. पण आतून उबळच आली आहे घरदार सोडून भटकत सुटायची. अर्थात एकट्याला ते शक्य नाही. तर आता बोला अजून कुणाकुणाला आवडेल असं स्वच्छंद जगायला?’’

  • मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट आणि एक दीर्घकथा (ईबुक)
  • लेखक : सतीश तांबे

पूर्वप्रकाशित :रोहन साहित्य मैफल जून २०२०


हे ईबुक खरेदी करण्यासाठी


रोहन शिफारस

Mukkam-Post-Cover

मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट

‘‘दूर कुठेतरी एका कोपऱ्यात अभिजनांचा टिचभर तुकडा आणि दुसरीकडे हा बहुजनांचा अक्राळविक्राळ प्रदेश. मी त्याच्या मध्यावर कुठेतरी उभा… अगदी एकटा. न घर का, न घाट का!’’

– ‘मुक्काम पोस्ट सांस्कृतिक फट’ कथेतून

250.00Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *