गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून धनगर समाजातील शिक्षित तरुण आपलं जगणं आत्मकथनातून, तर कधी कादंबरीतून मांडू लागले आहेत. त्यापैकी धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. एका कुटुबांचा नव्हे, तर मेंढरं राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधिक चरित्राचा हा अस्वस्थ करणारा पटही आहे…

मेंढपाळ, मेंढरं, माळ हा मराठी साहित्यासाठी चित्रकला, संगीत आणि फोटोग्राफीसाठी ‘दुरून डोंगर साजरे’सारखा भुरळ घालणारा विषय. संशोधकांनाही तो वर्ज्य नाही. आडरानात मेंढरं राखीत असलेल्या फिरस्त्या धनगराला जाताजाता आपण, सहज विचारतो कुठल्या भागातली मेंढरं? क्षणभरासाठी कां असेना, पण वाटून राहते, खरेच मस्त! असं असायला हवे जगणं.’ ‘बनगरवाडी’ लिहिणाऱ्या व्यंकटेश माडगुळकरांना सहा महिने मेंढरं राखायची होती. वेगळा अनुभव म्हणून एक-दोन दिवसांसाठी आपल्याही सर्वांच्या मनात ती इच्छा असतेच. पण तोंडात रिकिब घातलेल्या घोड्यासारखे जन्मापासून ज्याच्या नशिबाला आलेले असते, पायांना चाके लावून परमुलखातील भटकंतीचे जगणे, त्यांनाच माहीत काय असतात धनगरांचे हाल!

MazaDhangarwadaBC
माझा धनगरवाडा : मलपृष्ठ

महाराष्ट्रात लोकसंख्येनं जवळपास बारा टक्के असलेल्या, धनगर समाजात शिक्षणाचे प्रमाण इतरांच्या तुलनेत अगदीच अल्प. गावकुसात वस्तीला असली, तरी मुळातच हा भटका समाज, वर्षातील सात-आठ महिने चारणीसाठी गाव सोडून दूर परमुलुखात असतो. अपवादानेच त्यांचा एखाद्या गावात महिना-दीड महिन्याचा मुक्काम. त्यामुळे लहान मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच संपून जाते. परत खंडी-दीड खंडी मेंढर राखण्यासाठी तीनचार माणसांची गरज, दिवसभराचे मेंढरा पाठीमागेच भटकणं, दिवसातून एखाद्याने गावातून बाजारहाट, दळण आणणे, एका ठिकाणी कसला तो विसावा नाही. या सर्व गोष्टींमधून झालेलं आरोग्य अन् स्वच्छतेचं दुर्लक्ष. रात्रीचे मुक्काम, गाव, वर्तमानपत्र अन् लोकांपासून दूर निलांड्या रानात. त्यामुळे विकास अन् बदलाच्या अनुषंगाने कुणाशी कसला संवाद नाही. कुठलाही आजार, जखम अथवा अपघातात जवळची हळद सोडल्यास तातडीचा वैद्यकीय इलाज नाही. या उपर उन्हाची झिट, थंडीची बाधा, निसर्गातील उकल न झालेले चमत्कार यामुळे समाजाच्या मनात तयार होत असावी शरणागत परात्मता. या सर्व गोष्टी आधुनिकतेपासून दूर असल्यामुळेच, शिक्षण अन् विज्ञानाचा प्रसार म्हणावा तेवढा झालेला नाही या समाजात.

अर्थात, या सर्व गोष्टींना कारणीभूत होती, व्यवस्थेने जाणीवपूर्वक राबवलेली निरक्षरता. मात्र, सत्तरच्या दशकात ही कोंडी फुटली. हातांशिवाय जगण्याचे कुठलेही साधन उपलब्ध नसलेली ही पिढी शिक्षित झाली. थोड्याफार बुद्धीच्या भांडवलावर शहरात आली. इथं आल्यावर नोकरीसाठीचा संघर्ष, वाचन, मनन, सामाजिक पातळीवरील रचनात्मक संवाद यातून दलित साहित्याची चळवळ आकाराला आली. त्यांच्या संघर्षाचा पहिला उद्रेक होते, शब्द. संवाद अन् वैचारिक संघर्षातून कविता लेख आत्मकथनं आकाराला आली. “बलुतं’, “उपरा’,”आठवणींचे पक्षी’, “मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ अशी वेगवेगळ्या दलित समाजातील कथनं मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरली. यातूनच आज इतर मागास समाजातील तरुण लिहिते होत आहेत.

गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून धनगर समाजातील शिक्षित तरुण आपलं जगणं आत्मकथनातून तर, कधी कांदबरीतून मांडू लागले आहेत. त्यापैकी रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित धनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूण मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. जूनपासून सप्टेंबरअखेर जन्मगावात पहिलीच्या वर्गात शिकत असतानाच दिवाळीनंतर मात्र आईवडिलांसोबत, मेंढ्या चारणीला सातारा जिल्ह्यातील कृष्णा खोऱ्यातील वाई तालुक्यातील एकसर या गावात ज्याने सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. रानातील वाड्यापासून रोज किमान पाचसहा किलोमीटरचं आरतपरतचं चालणं. वस्तीवर आल्यावर मेंढर वाघरं लावून वाड्यात बैजवार घालणं, जमेल तेवढी घरच्यांना मदत करणं, आई भाकरी करत असताना रात्री तीन दगडी चुलीच्या उजेडात, कधी लख्ख चंद्राच्या प्रकाशात, कधी काजव्यांच्या लुकलुकत्या उजेडात अभ्यास करून वर्गातला पहिला नंबर राखणं, यातून आकारास आलेली एका कष्टाळू मुलाच्या शिक्षणाची ही गाथा केवळ एकट्याची नाही, तर आपल्या आयुष्याला लागलेली ही पायपीट किमान मुलांच्या तरी वाट्याला येऊ नये, म्हणून चारणीसाठी मेंढरं घेऊन परमुलुखाला जाणारा बाप, डोक्यावर धनगर पाटी घेऊन सावलीसारखी सोबत करणारी आई, वय वाढण्याआधीच शहाणपण आलेला थोरला भाऊ, जिच्या भविष्याचा अजून कोणी विचारच केला नाही, कळायला लागल्यापासून हाताखाली काम करण्यात जी वाकबगार आहे, बोलता येऊन जी आजवर मुकीच आहे, अशी बहीण. अन् ज्याचे दुधाचे दातही अजून पडले नाहीत, जो दगड माळ अन् ढेकळातून चालताना हरघडी ठेचकाळत आहे, असा लहान भाऊ या एका कुटुंबाची नव्हे, तर मेंढरं राखणाऱ्या धनगर समाजाच्या प्रातिनिधिक चरित्राचा हा अस्वस्थ करणारा पट आहे, ‘माझा धनगरवाडा.’

वर्षानुवर्ष चाललेला स्थलांतराचा हा अथक प्रवास आहे. वाटेवरचे दगडधोंडे, रिकामी शेतं अन् डोंगर हे त्यांचे सोबती सगेसोयरे, प्रत्येक ठिकाणाशी निगडित असतात धनगरांच्या आठवणी. पूर्वी कधी मेंढर राखताना, एखाद्या अटंग्या माळावर एखादा म्हातारा धनगर मरतो. तेव्हा गाव तर पाठीमागे पडलेलं असतं, सोबतीला ही चारणीला आलेली मेंढर, त्यांना इथं ठेवून प्रेत कशाला घेऊन जायचं मागे, म्हणून त्याला तिथच पुरलं जातं. उरावर दगड ठेवून समोरचा माळ तुडवायचा असतो. नंतर मेंढर राखायला जाताना तो गाव आठवत राहतो. पुढे वहीवाटीतून त्या जागेवर मुक्काम पडतात. ‘राखण्या’ म्हणून कमरेएवढं देऊळ तयार होते, ‘तुझी नदर असूदे आमच्यावं’ म्हणूनचा तो नवीन देव होतो, धनगरांचा. हे अगदी दलित अभ्यासक डॉ.कांचा इलय्या सांगतात तसे, धनगरांची एकूण सांस्कृतिक विरासत, त्यांचे देव, मिथकं, गोष्ट, ओव्या, परिभाषा, रीतिरिवाज, पेहराव पूर्वापार प्रचलित संस्कृतीपासून वेगळे आहेत. लेखक आपल्या अनुभवातून इलय्यांच्या विधानाला पुष्टी देतात.

भटक्या-विमुक्तांनी गाव वाटून घेतल्यासारखी प्रत्येक मेंढक्यांचीसुद्धा गावं ठरलेली असतात. कुणी कुणाच्या गावशिवारात मेंढरं फिरवायची नाहीत, ठरलेल्या पांदीतून मेंढरं घेऊन जाताना वाटेवरची लिंब-बाभळीची झाडं वडसायची नाहीत. परमुलुखात जगताना मुर्वतीने राहायचे, ‘न्हाय आक्का, न्हाय दादा’ म्हणून दिवस काढायचं, इतकंच काय, परक्या गावाला आपलीच गावपांढर समजायचं. त्या गावच्या जत्रेची वर्गणी द्यायची, तरीही नमूनच राहायचं. लेखक नमूद करत नाही, पण सहनशीलतेलाही अंत असतोच. असं काय झालंच, तर त्या गावची वाट मोडायची. एकूणच निमूटपणे जगताना सर्वांना आपलं करण्याचे तत्वज्ञान मेंढपाळाने आपल्या जगण्यातून अंगीकारलेलं असतं. सोबतीला पाऊसपाणी अन् चारा असलेल्या भागात वर्षभर बाहेर असलेले ‘फिरते धनगर.’ डोंगरात गडपरिसरात गुरढोरांसह मेंढरं पाळणारे ‘मस्का धनगर,’ चार-आठ गावांत राहून रिकाम्या रानात रातीला मेंढरं बसवणारे ‘बसकी धनगर.’ वाचताना अशी नवीन माहिती मिळत जाते.

जवळपास चारशे पानांच्या या पुस्तकात प्रत्येक पानावर धनगरी अनुभवाचे ज्ञान आपणाला सहज मिळते. कदाचित प्रस्थापित वाचकांच्या मान्यतेसाठीच लेखकाने प्रमाण भाषा वापरली असावी, तरीही रोजच्या व्यवहारातील धनगरी परिभाषेतील असंख्य शब्द आपण नव्याने ऐकतो, शेरडामेंढराच्या आचळेला कास अन् कासेतली धार काढण्यासाठी वापरलेले जे भांडे त्याला ‘कासांडी’ म्हणतात, असे असंख्य शब्द आपल्या वाचनात येतात, त्यामुळे वापरात नसलेली आपली भाषा अधिक समृद्ध होते. सालप्याच्या बिरोबाच्या रात्रीच्या जत्रेचं वर्णन बहारदारच. आजोबा बापू जे, आता वय वाढल्याने सलग मेंढर राखत नाहीत, कधी गाव, कधी कुठला देव, जत्रा तर कुठला पै-पावणा करत मुक्त फिरत असतात. लेक-सून अन् नातवंडाची आठवण आली की चालत मजल दर मजल करीत, कुठं महाबळेश्वरच्या रानात, आपल्या वस्तीवर येतात, त्यांचे व्यक्तिचित्रण सुंदरच झाले आहे.

मला वाटते,बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा अन् संघर्ष करा,’ या आदेशातील ‘शिका’ हा पहिला धडा तरुण धनगरी लेखकांनी गिरवायचा असे ठरवले आहे. पण संघटित होण्यासाठी आता समाजाचाही विचार त्यांनी करायला हवा. सोबत आपले जवळचे नैसर्गिक आणि हाकेला ओ देणारे मित्र कोण, याचा विचारही व्हावा. दूरगामी बदलासाठी संघर्ष कोणी एकटे करत नाहीत. त्यामुळे समदु:खी इतर समाजही पाहावा.

समाजातील निरक्षरता, अंधश्रद्धा, बालविवाह, मुलींच्या शिक्षणाविषयीची अनास्था, आपसातील वैर, तरुणांत वाढणारी व्यसनं याचाही ऊहापोह आपल्या लिखाणातून परीघावरच्या सर्व लेखकांनी करायला हवा आहे. अनुभवाचे संचित, पर्यावरणाची आस्था, सांप्रदायिक सद््भावना, स्त्री-पुरुष समानता ही धनगरी व्यवहारातील शक्तिस्थळं त्याचा जोरकस उच्चार केला, तर धनगरी साहित्याचा एक समृद्ध प्रवाह मराठी साहित्यात निश्चितच तयार होणार आहे.
मला अजून एक म्हणायचं आहे, इतरही मागास समाजातील संवेदनशील कवी-लेखकांनी आपली आत्मकथनं लिहिली तर नवीन जीवनानुभव, त्या समाजाची व्यक्तिगत परिभाषा मराठीत आली तर आपली भाषा आणि वाचक म्हणून आपले जगणं समृद्ध होत जाणार आहे.

– आनंद विंगकर

(सौजन्य : दै. दिव्य मराठी, रसिक पुरवणी)


हे पुस्तक खरेदी करण्यासाठी…

Majha_Dhangarwada

माझा धनगरवाडा

आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!

500.00Add to cart


‘रोहन-समाजरंग’ मुद्रेतली आणखी काही आत्मकथनं..

Featured

हां ये मुमकिन हे!

एका डॉक्टरचा बिहारमधला स्तिमित करणारा संघर्ष


[taxonomy_list name=”product_author” include=”383″]
अनुवाद : [taxonomy_list name=”product_author” include=”457″]


प्रसूती कक्षाच्या आत बसलेली कुत्री, शेजारीच पसरलेला बायो-मेडिकल कचऱ्याचा ढीग, दुर्गंधी पसरवणारं स्वच्छतागृह, बाळंत स्त्रियांना टाके घालणाऱ्या तिथल्याच झाडूवाल्या, स्टाफरुममध्ये एकमेकींच्या हातांना मेंदी लावणाऱ्या लेडी डॉक्टर्स…

हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !

भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।



350.00 Add to cart

विंचवाचं तेल

पारधी समाजातली मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी


[taxonomy_list name=”product_author” include=”425,504″]


‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !


300.00 Add to cart

होरपळ


[taxonomy_list name=”product_author” include=”482″]


सोलापूर येथील मातंग वस्तीत ल.सि. जाधव यांचं बालपण गेलं. कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घेतलं आणि भारतीय स्टेट बँकेतून अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले. ‘होरपळ’ या आपल्या आत्मकथनात त्यांनी मातंग समाजाचे व्यावसायिक व सामाजिक जीवन, त्यांच्या अंधश्रद्धा व त्यांचे दैन्य, अत्यंत अभावग्रस्त स्थितीतही माणुसकी जपण्याची त्यांची धडपड या सगळ्यांचे पूर्वग्रहरहित दृष्टीने तसेच सहृदयतेने चित्रण केले आहे. निसर्गातील विविधतेचा ते तरल संवेदनशीलतेने अनुभव घेतात, हे त्यांचं असाधारण वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हीच संवेदनशीलता ते समाजातील घटना अथवा व्यक्तिजीवनातील दारुणता चित्रित करतानाही प्रकट करतात. त्यांची व्यापक जीवनदृष्टी, सामाजिकतेची प्रगल्भ समज, प्रसंग वा भावस्थितीचे प्रत्ययकारी चित्रण करण्याचं त्यांचं सामर्थ्य, प्रसादपूर्ण ओघवती भाषाशैली आणि निसर्गाचा अनुभव घेणारी तरल संवेदनशीलता या साऱ्या गुणांमुळे हे आत्मकथन केवळ दलित आत्मकथनातच नव्हे, तर एकंदरीतच मराठी आत्मकथनपर वाङ्मयात मोलाची भर घालणारं आहे.
साहित्यकृतीचा आल्हाददायक अनुभव देणारं तसेच वाचकांच्या सामाजिक जाणिवा समृद्ध करणारं आत्मकथन होरपळ…


250.00 Add to cart

सूळकाटा


[taxonomy_list name=”product_author” include=”482″]


प्रसिद्ध लेखक ल.सि. जाधव यांच्या गाजलेल्या ‘होरपळ’ या आत्मकथनाचा ‘सूळकाटा’ म्हणजे पुढचा भाग. संयत व प्रवाही भाषाशैली, बारीक तपशिलांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी आणि आपल्या समाजाप्रतीची कळकळ अशी होरपळ या आत्मकथनाची सगळी वैशिष्ट्यं सूळकाटातही दिसून येतात.
या आत्मकथनाचा गाभा प्रामुख्याने त्रिस्तरीय आहे. पहिला स्तर हा मातंग समाजाची दुःख, त्यांना सोसावे लागणारे चटके आणि त्याबद्दल लेखकाला असलेली कळकळ याबद्दलचा आहे. दुसरा स्तर हा लेखकाचा तरुण मुलगा अकाली गेल्याने घनव्याकूळ करणाNया दुःखाचा आहे. तर, लेखनाची निर्मितीप्रक्रिया आणि घरात तसेच समाजात लेखकाचं असलेलं स्थान याबद्दल केलेलं परखड भाष्य हा तिसरा आणि महत्त्वाचा स्तर…
हे संपूर्ण आत्मकथन एकाच वेळी वैयक्तिक व त्याच वेळी सामाजिक अशा दोन्ही पातळ्यांवरचं दुःख व्यक्त करत राहतं. ते केवळ दुःख व्यक्त करून थांबत नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन, या सगळ्याकडे उदार दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतं आणि म्हणूनच वेगळ्या उंचीवर पोचतं.
सलत राहणारा, सलता सलता अंतर्मुख करणारा, जीवनविषयक अंतर्दृष्टी देणारा… सूळकाटा !


250.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *