‘युद्धस्य कथा रम्या:’ असं म्हटलं जातं. आयुष्य पणाला लावणाऱ्या, आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांबद्दल आपणास कुतूहल असते. माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला आयुष्यात कधीही रणांगणावर जायला मिळणार नाही. अशावेळी रणांगण असते तरी कसे याचे कुतूहल प्रत्येकाच्या मनात असते. हे कुतूहल शमवून स्फूर्ती उत्पन्न करणारे वाड्मय म्हणजे ‘परमवीर-गाथा’ आणि ‘शौर्यगाथा’ ही दोन पुस्तकं होय. ‘रोहन प्रकाशन’ने या दोन पुस्तकांचा संच वाचकांसाठी एकत्रितरीत्या उपलब्ध करून दिला आहे. मराठी लिहिले आणि बोलले जाणाऱ्या भागातील सर्व शाळांमध्ये महाविद्यालयांच्या ग्रंथालयामध्ये या पुस्तकांची गरज आहे. फिल्मी चकचकाटात नायक शोधणाऱ्या आजच्या भारतीय तरुणांसाठी परमवीरचक्र विजेते सैनिक आदर्श आहेत.

‘परमवीर गाथा’ हे पुस्तक रचना बिश्त-रावत यांनी लिहिले आहे. त्याचा मराठी अनुवाद भगवान दातार यांनी केला आहे. रचना बिश्त-रावत यांचे पती लष्करात आहेत. त्यामुळे या विषयावरचा त्यांचा अनुभव त्यांनी रोजच्या जगण्यातून घेतलेला आहे. त्यांचे इंग्लिशमधील मूळ पुस्तक ‘द ब्रेव्ह : परमवीरचक्र’ या नावाने प्रकाशित झाले. त्या मुक्त पत्रकार आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिक आणि आंतरराष्ट्रीय फेलोशिप मिळाली आहे. तर अनुवादक भगवान दातार यांनी संरक्षण मंत्रालयाचा ‘वॉर करस्पॉन्डन्ट’ अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांनी कितीतरी पुस्तके अनुवादित केलेली आहेत. ही माहिती एवढ्यासाठीच दिली आहे की, लेखक आणि अनुवादक अशा दोघांनाही लष्करी वातावरणाचा अनुभव आहे. अन्यथा लेखक आणि अनुवादक अनेकदा लष्करी विषयांवर लिहिताना अनुभव नसताना अक्षम्य चुका होऊ शकतात.

या २१५ पृष्ठांच्या पुस्तकात २१ परमवीरचक्रविजेत्या शूरवीरांची कहाणी आहे. पुस्तक तयार करण्यासाठी लेखिकेने घेतलेले परिश्रम विशेष जाणवतात. कारण तिने या परमवीरचक्र विजेत्यांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय आणि समकालीन सरकारी कागदपत्रे तपासूनच ही माहिती लिहिली आहे. १९४७-४८च्या पाक विरुद्धच्या युद्धातील पाच शूर सेनानी, १९६१ काँगो कारवाईतील गुरुबजनसिंग सलारिया, चीन विरुद्धच्या १९६२च्या युद्धातील ३ शूर सेनानी, १९६५च्या पाकविरुद्धच्या लढाईतील ३ विजेते, १९७१च्या युद्धातील ६ विजेते, ऑपरेशन पवन मधील रामस्वामी परमेश्वरन आणि कारगील युद्धातील ४ वीर असे २१ जण या पुस्तकाचे मानकरी आहेत.

या वीरांचे सहकारी, अधिकारी, कुटुंबीय यांच्याशी थेट संवाद साधत परमवीरचक्र मानकऱ्यांचे नेमके योगदान काय आहे, हे सांगणाऱ्या या कथा लष्कराच्या कार्यपद्धतीची सुद्धा ओळख करून देतात.

सोमनाथ शर्मा, राम राघोबा राणे, अब्दुल हमीद ही नावे आपण पाठ्यपुस्तकात वाचलेली आहेत. ते आणि अन्य परमवीरचक्र विजेत्यांच्या कहाण्या वाचताना अंगावर रोमांच उभे राहतात हेच पुस्तकाचे यश आहे.

‘शौर्यगाथा’ हे मेजर जनरल सुभी सूद यांचे पुस्तक दातार यांनीच अनुवादित केले आहे. सूद हे नंतर फील्डमार्शल माणेकशा यांचे विशेष मदतनीस होते. १९९८ पर्यंतच्या प्रमुख लष्करी घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी ‘ब्रेव्ह हार्टस् ऑफ इंडिया’ हे मूळ इंग्लिश पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ९ परमवीरचक्र विजेते, २ अशोकचक्र व अन्य विजेत्यांची माहिती आहे.

इंडियन ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित किशनबीर नगरकोटी, व्हिक्टोरिया क्रॉस विजेते खुदादाद खान, दरवानसिंग नेगी, गंजू लामा, नंदसिंग, बंधारीराम, लछमन गुरंग, मिलिटरी क्रॉस विजेते माणेकशा, महावीर चक्र विजेते कर्नल हरिचंद, नाईक दर्शनसिंग, कॅप्टन एम.एन. मुल्ला यांच्यासारख्या अन्य शूर सैनिकांचा या ग्रंथात समावेश आहे. मराठी वाचकांना माहीत असलेले नाव म्हणजे जनरल अरुणकुमार वैद्य. त्यांना परमविशिष्ट सेवा मेडल, महावीर चक्र, अति विशिष्ट सेवा मेडल यांनी सन्मानित करण्यात आलेय. असे उदाहरण दुर्मीळ आहे. त्यांच्या पराक्रमाची गाथा सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहे.

या पुस्तकातील दोन किस्से भारतीयांचे डोळे उघडणारे आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच बराक ओबामा यांनी लष्कराचे सर्वोच्च सेनापती या नात्याने लष्करी रुग्णालयात फोन केला. यातून योग्य तो संदेश गेला. ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ विजेते भारतीय सैनिक इंग्लंडमधील बकिंग हॅम पॅलेस समोर जमले असता तेथून जाणारे ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर थांबले. त्यांनी सैनिकांची विचारपूस केली. उमराव सिंग या सैनिकास मिळणारा भत्ता ५० वर्षांपूर्वीच्या विनिमय दराने दिला जातो हे ऐकून मेजर यांनी हे सैनिक भारतात निघताना त्यांना हा दर बदलल्याची माहिती दिली. त्यांना एका पौंडास दोन रुपये भत्ता होता. आपल्या देशात राजकीय नेतृत्व सैनिकांची बाजू कधी समजून घेणार असा प्रश्न सहजच मनात उभा राहतो.

ही दोन्ही पुस्तके म्हणजे असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य गाजविणाऱ्या वीरांच्या कथा आहेत. राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी योग्य वयात मुलांच्या हातात ही पुस्तकं पडायला हवीत.

– गणेश राऊत

(सौजन्य : दै. महाराष्ट्र टाइम्स)


पुस्तक-संच विकत घेण्यासाठी…

Shourya_sanch

शौर्य संच

भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !

500.00Add to cart


Bhagwan-Datar
ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक भगवान दातार यांचा परिचय

विविध घटनांच्या वृत्तांकनासाठी पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक आदी राज्यांचा त्यांनी दौरा केला असून लोकसभेच्या कामकाजाचे वृत्तांकनही त्यांनी केलं आहे.

वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *