वस्तुमय समाजाची फॅण्टसी

प्रणव सखदेव हे नव्या पिढीतील कथाकार आणि कादंबरीकार म्हणून परिचित आहेत. वेगळ्या वाटा आणि वळणांची कथा त्यांनी लिहिली. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही त्यांची कादंबरी प्रकाशित आहे. ‘निळ्या दाताची दंतकथा’ व ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य’ हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. विशेषत: तरुणाईच्या दृष्टीने जग न्याहाळण्याची त्यांची म्हणून एक पद्धत आहे. कमी व्यक्तींच्या सहसंबंधातून नागर संवेदनेचा समाजावकाश आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ते उभा करत आहेत. उत्तर आधुनिकतावादातून आलेली काही सूत्रं; प्रणव सखदेव यांच्या साहित्यामधून व्यक्त झाली आहेत. अलीकडेच त्यांची रोहन प्रकाशनाने ‘९६ मेट्रोमॉल’ नावाची लघुकादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरीच्या मनोगतात आणि मलपृष्ठावर तिचा ‘अद्भुतिका’ म्हणून उल्लेख केला आहे. ही कादंबरी ‘अ‍ॅलिसच्या वंडरलँड’ला अर्पण केली आहे. ‘अ‍ॅलिस इन वंडरलँड’चे भाषांतर करताना या कादंबरीचं कथाबीज सुचल्याचं प्रणव सखदेव यांनी म्हटलं आहे. ‘९६ मेट्रोमॉल’ या कादंबरीतही त्यांनी असाच एक अभिनव कल्पिताचा खेळ रचला आहे. अद्भुत अनिर्बंध कल्पनाशीलतेचा वेगळा आविष्कार या कादंबरीत आहे. वर्तमान हा नव्या काळाच्या तसेच भविष्याच्या पृष्ठभूमीचे बहुमितीय दर्शन ‘९६ मेट्रोमॉल’ या कादंबरीत आहे. कादंबरीच्या आरंभी एका पृष्ठाचा मजकूर छापला आहे, तसंच निवेदकाच्या पत्नीला अ‍ॅमेझॉन डॉट कॉमवरून आलेल्या कातडी बॅगेत कोंबलेल्या कागदातून कादंबरीचं स्क्रिप्ट सापडतं अशी क्लृप्ती योजिली आहे.

कथनात विविध प्रकारचे खेळ आहेत. अ‍ॅनिमेशनसदृश कथनतंत्र आहे. आभासी तंत्रज्ञानाचा अवकाश आहे. मानवी जगण्याचं आणि त्याच्या वस्तू नातेसंबंधाचं विविध खेळांमध्ये रूपांतर झाले आहे.

जुन्या काळी वामन मल्हार जोशी यांच्या ‘आश्रमहरिणी’ या कादंबरीची आठवण व्हावी अशी ही क्लृप्ती आहे. त्या कादंबरीतही जुनीपुराणी एक पोथी सापडल्याचा उल्लेख आहे आणि त्यानंतर कथनसूत्र सुरू होतं. अशीच ही क्लृप्ती आहे. वास्तव आणि अवास्तव, वास्तव आणि अतिवास्तव, वास्तवाची पुनर्रचना आणि फॅन्टसीच्या वापरातून या कादंबरीमध्ये एक अनोखं जग निर्माण केलं आहे. भविष्याच्या पाऊलखुणा वर्तमानाच्या भूमीवर अक्राळविक्राळ रूप धारण करत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने खूप काही साध्य केलं. वरकरणी सुखकारक आणि भौतिकतेच्या पल्याडामधून मानवी संबंधाचं वेगळं जग निर्माण होत आहे. या नव्या घडण अवकाशाचे कल्पचित्र या कादंबरीत आहे. ‘बाजारकेंद्री’ जगाची घडण आणि त्याचा वर्तनव्यवहार, नवी चिन्हसृष्टी आणि अनिर्बंध कल्पनाशीलतेचा कादंबरीत वापर केला आहे. आजच्या आणि उद्याच्या भांडवली बाजारभूमीतून निर्माण झालेल्या निरंकुश सत्तेची अवकाशभूमी या कादंबरीची पृष्ठभूमी आहे. आणि त्यातून त्याविषयीचे कल व्यक्त झाले आहेत. अर्थात, हा अवकाश व्यक्तिदर्शनातून न्याहाळला आहे.

मयंक या तरुणाच्या रात्रीच्या स्वप्नावस्थेतून निर्माण झालेली कथनसृष्टी कादंबरीत आहे. मयंकच्या स्वप्नात वास्तव आणि अवास्तव कल्पनाशीलतेच्या संबंधातून कथन आकाराला आलं आहे. मानवी जीवनाचा कायाकल्पातून घडणाऱ्या भविष्यसमाजाचं चित्र आणि त्याच्या शक्यतांचा पट कादंबरीत आहे. मयंकच्या स्वप्नातील कल्पनाशीलतेचे धागेदोरे वर्तमानात आहेत. या संदर्भात विविध प्रकारचे ‘खेळ’ या कादंबरीत रचले आहेत. मानवाची विविध रूपातील अवस्थांतरणं तसंच वस्तूंच्या कायांतरणाचे चित्र कादंबरीत आहे. माणसांचं लघुतम अवयवांमध्ये रूपांतर होणं. मयंकचे अतिशय लहानरूपात काही इंचात रूपांतरण होतं. या पहिल्या स्वप्न खेळावस्थेमध्ये भांडवली समाज रचनेचे संदर्भ आहेत. मुख्यत्वे नवे जग हे बाजाराचे जग आहेत. मार्केटचा हव्यास, वस्तूंची अपरिमित निर्मिती आणि कंझ्यूमर सोसायटीला आलेले महत्त्व ही त्याची पृष्ठभूमी आहे. महाकाय वस्तूंचं मानवी जगावर प्रचंड वेगाने आक्रमण आहे. त्यामुळे मोबाईल ड्यूडवर अवलंबून असणाऱ्या आणि त्याच्या आहारी अलगद गेलेल्या समाजाचं चित्र कादंबरीत आहे. विक्रीमूल्यास अपरिहार्य महत्त्व असणाऱ्या समाजातील जुनं आणि नवं यांच्यातील ताणदेखील त्यामधून आविष्कृत झाले आहेत. नव्या काळाने मानवी सुखाची कल्पना बदलवून टाकली आहे. फ्रीजसारख्या वस्तू कृतीखेळातून कादंबरी कथनाला वेगळं परिमाण प्राप्त झालं आहे. ‘वस्तूशिवाय आहे तरी कोण आपल्याला या जगात’ या विचाराचं सूचन कादंबरीत आहे. मानवी देहाचं वस्तूंमध्ये रूपांतर झालं आहे. या वस्तू मानवी जगावर आक्रमण करत असून त्यामुळे मानवी जगण्याचा पैस अधिकाधिक संकोचत आहे. चंदेरी द्रव धारण केल्यामुळे मानवी देहाचे अवाढव्य आकारात रूपांतर होतं. केवळ आणि केवळ ‘एन्जॉय करा’ अशा एका भांडवली तंत्रज्ञानाच्या आभासी जगातील उत्सवी ‘एन्जॉयी’ आणि प्रदर्शनी समाजाचं चित्र कादंबरीत मांडलं गेलं आहे.

कथनात विविध प्रकारचे खेळ आहेत. अ‍ॅनिमेशनसदृश कथनतंत्र आहे. आभासी तंत्रज्ञानाचा अवकाश आहे. मानवी जगण्याचं आणि त्याच्या वस्तू नातेसंबंधाचं विविध खेळांमध्ये रूपांतर झाले आहे.
पोकेमॉन गोष्ट, पब्जी, कँडीक्रश खेळात माणूस विसावला आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून या खेळात सहभागी होणं ‘हीच ज्ञानप्राप्ती आहे’ हा नव्या जगाचा मंत्र या कल्पकथनात आहे. वस्तू, पदार्थ आणि माणूस यांच्यातील एकमेकांच्या मिसळणीच्या कथा आहेत. या सर्वांना केवळ आणि केवळ सादर करण्याची, प्रेझेंट करण्याची भूमिका दिलेली आहे. या नव्या आभासी जगाने आणि खेळाने माणसाला एक प्रकारची ग्लानी आणि सुखकारकता आली आहे आणि त्याचं आकर्षण नव्या समाजाला आहे. या खेळाचं रूपांतर भयकारी नाट्यात होतं. वस्तूंच्या मायावी अवकाशाची माणसावर मगरमिठी आहे. आणि तो अलगद एन्जॉयी मोहामुळे या सत्ताकक्षेत विराम पावतो. एकसूत्री आज्ञेवर चालणाऱ्या या जगामध्ये त्याचे ‘स्वातंत्र्य’ हिरावलं जातं. किंबहुना माणसाचा सहजधर्मच या नव्या काळाने हिरावून घेतला आहे. आणि या ‘एन्जॉय’ खेळात सहभागी होणं याशिवाय त्याच्यासमोर पर्याय उभा राहत नाही. किंचितही त्याला विरोध दर्शवला व अलग राहिला तरी तुम्ही या सत्ताशिक्षेस पात्र व्हावं लागतं. या कल्पित खेळात मयंकची कोर्टात रवानगी होते. जिथे न्यायाचं, लोकशाहीचं, समतेचं, मानवी स्वातंत्र्याचे कोणतेही प्रश्न शिल्लक नसतात. साऱ्या ‘वस्तूंचे चेहरे खुनशी’ असल्याचा त्याला भास होतो. ‘तिच्या’ सत्तेखाली त्याला काहीच करता येत नाही निमूट सहभागाशिवाय. ‘तिच्या’ अवयवाला नखं आणि शरीराला काटे फुटू लागतात.

Randhir Shinde

आणि ‘तिच्या’ देहाचं श्वापदात रूपांतर झाल्याचं चित्र कादंबरीत आहे. त्याच्या ‘शिक्षासोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट’ केलं जातं. ती त्याचा ‘मेंदू चटाचटा खाते’. या दु:स्वप्नातून मयंक जागा होतो वर्तमानात येतो आणि घरातून थेट बाहेर पडतो तो अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलामध्ये पसार होतो.
प्रणव सखदेव यांनी या लघुकादंबरीत तरुणांच्या जगातून एका कल्पित स्वप्नसृष्टीतून भविष्यकाळाचा कानोसा घेतला आहे. या स्वप्नसृष्टीत मानवी जीवनाला वेढून असणाऱ्या वस्तुकरणाचा विळखा आणि तिच्या एकछत्री सत्तेच्या हुकुमी अवकाशातून निर्माण झालेल्या कालावकाशाचे चित्र आहे. माणूस आता त्याच्या प्रवासवाटचालीत नव्या तंत्रज्ञानप्रणित वस्तूंच्या जगामध्ये शिफ्ट झाला आहे. बाजार आणि उपभोगवादी रचनेची व्याप्ती, पसारा यांनी मानवी जगाचा झालेला संकोच आणि वस्तूकरणाचे अपरिमित महत्त्व याचा पट कादंबरीत आहे. वस्तुमय झालेल्या काळांतरांची आणि युगांतरणाची गोष्ट कादंबरीमधून मांडली आहे. साऱ्या सृष्टीचे रूपांतर झालं आहे. त्याचा एक कानोसा तरुणांच्या जगामधून घेतला आहे. ‘युजरभाऊ’, ‘मीडियाराणी’, ‘मोबाईलड्यूड’ अशा वस्तूंशी जुळलेल्या आणि जडलेल्या नात्यांचं चित्र कादंबरीमध्ये आहे. तरुणांची नव्या काळाची बेधडक भाषा, फँटसी, वास्तवाची विपरीत पुनर्रचनेची नवी चिन्हसृष्टी कादंबरीत आहे. आजच्या आणि उद्याच्या वस्तुमय मानवसमाजाचं चित्र कादंबरीत मांडलं आहे ते महत्त्वाचं ठरतं.

-रणधीर शिंदे

(maharashtralok.com संकेतस्थळावरून साभार)

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


युवा लेखक प्रणव सखदेव यांचं कथा-साहित्य

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *