‘असा घडला भारत’ या ग्रंथामधील निवडक भाग

१५ ऑगस्ट १९४७ स्वातंत्र्याची पहाट…

ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारताचं वसाहतीकरण साधल्यावर इ.स. १८५८मध्ये भारतीय वसाहतीची सूत्रं अधिकृतपणे पूर्णत: इंग्लंडच्या राजाकडे सोपवली गेली होती. अखंड भारतावर साम्राज्यवादी सत्ता लादणाऱ्या ब्रिटिश सरकारने प्रदीर्घ अशा स्वातंत्र्य लढ्यानंतर आणि हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानानंतर अखेरीस १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ‘१४ ऑगस्ट, १९४७च्या मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य बहाल केलं जाईल’ अशी घोषणा केलेली होती. १४ ऑगस्ट, १९४७ चा तो सुदिन उजाडला. घोषणेनुसार त्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत व्हाईसरॉय माऊंटबॅटन यांनी कागदोपत्री सत्तांतराची औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली. गुलामगिरीच्या काळात देशात सर्वत्र फडकणारे युनियन जॅक त्या दिवशी संध्याकाळी उतरवण्यात आले. १५ ऑगस्ट, १९४७च्या पहाटे भारताला अधिकृतपणे स्वातंत्र्य प्राप्त झालं आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात राजधानी दिल्लीत व देशात सर्वत्र भारताचा तिरंगी ध्वज दिमाखाने फडकू लागला.

१४ ऑगस्ट : हुरहूर, काहूर आणि उत्साह
१४ ऑगस्टच्या दिवशी सगळीकडेच वातावरण आतुरलेलं होतं. उत्साहाबरोबरच मनं कातरलेली होती; आशेनं मनं ओथंबलेली असतानाच निराशेची एक धून मनात काहूर माजवू पाहत होती. देशाभिमानाने ऊर भरून येत असतानाच भविष्याबद्दलची अनामिक अनिश्चितताही भारतीय मनांना भेडसावू पाहत होती. एकंदरीत अशीच एक सार्वत्रिक संमिश्र मानसिकता घेऊन भारतीय जनमन १४ ऑगस्टच्या मध्यरात्रीला सामोरं जाऊ पाहत होतं.
१४ ऑगस्ट, १९४७ रोजी मध्यरात्रीच्या ठोक्याला स्वातंत्र्य मिळणार होतं. सुमारे ९० वर्षं दिल्लीच्या लाल किल्ल्यावर बेमुर्वतपणे फडकणारा युनियन जॅक खाली उतरवला जाऊन भारताचा तिरंगी ध्वज तेजस्वीपणे फडकणार होता. असं दृश्य प्रत्यक्षात येत असताना १४ ऑगस्टच्या त्या रात्री संपूर्ण भारतीय खंडात कुणाला झोप लागणं कठीणच होतं. कारण सर्वांनाच तो क्षण अनुभवायचा होता. फाळणीची विषण्णता मनातून दूर करून स्वातंत्र्याचं स्वागत करायचं होतं. फाळणीनंतर सुरू झालेल्या दंग्यांची दाहकता शमलेली नव्हती, पण त्याची तमा न बाळगता लोक त्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी दिल्ली गाठण्याच्या प्रयत्नात होते.
१४ ऑगस्ट हा दिवस उजाडला तोच मुळी सनईच्या स्वरांनी, तुताऱ्यांच्या निनादांनी, ‘भारतमाता की जय’च्या गगनभेदी घोषणांनी आणि हजारो लोकांच्या उत्स्फूर्त मिरवणुकांनी. विविध राज्यांतून हजारोंच्या संख्येने लोकांचे जथ्थे मिळेल त्या वाहनाने दिल्लीतील तो स्वातंत्र्यसोहळा पाहण्यास निघाले होते. दिल्लीत अलोट गर्दी जमू लागली. दिल्लीतील भव्य रस्ते निरुंद भासू लागले. प्रासादांचे आकार गडद होत गेले. दिल्लीतील लष्कर विभाग, सिमल्याचं ‘व्हाईसरॉय भवन’, जिथे ब्रिटिश रॉबर्ट क्लाईव्हने साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली तो कोलकात्याचा ‘फोर्ट विल्यम’, मद्रासचा (आता चेन्नईचा) ‘फोर्ट सेंट जॉर्ज’, मुंबईचं उच्च न्यायालय व तेथील व्हिक्टोरियन दगडी इमारती– सर्व वास्तूंवरचे ‘युनियन जॅक’ १४ ऑगस्टच्या सूर्यास्ताच्या वेळी विनासोहळा उतरवण्याचे कार्यक्रम मध्यरात्रीचे १२ वाजल्यावर होणार होते.

Asa Ghadla Bharat_BackBC
असा घडला भारत महद्गग्रंथाचं मलपृष्ठ

१४ ऑगस्टच्या दिवशी व्हाईसरॉय माऊंटबॅटन दिल्लीतील आपल्या अभ्यासिकेत व्यस्त होते. सत्तांतरासंबंधीची सरकारी कागदपत्रं अभ्यासून, तपासून सह्यानिशी तयार ठेवण्यात ते संध्याकाळपर्यंत गर्क होते. तिथे नव्या दिल्लीतील घटना समितीच्या सभागृहात आणि बाहेर लोकांची झुंबड उडाली होती. काही तासांनंतर सत्तांतराचा जो औपचारिक समारंभ होणार होता, त्याचं दृश्य डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. कॉन्स्टिट्यूअंट असेंब्ली अर्थात घटना समितीच्या सभागृहात सर्वत्र दिव्यांचा लखलखाट होता. जसजसं अंधारून येत होतं, तसतसं घड्याळाचे काटे फारच हळू फिरत असल्याचं भासत होतं…. मध्यरात्रीचे १२ वाजण्याची सर्वच जण उत्कंठेने प्रतीक्षा करत होते. जवळजवळ साडेतीनशे वर्षांपूर्वी व्यापारासाठी भारतखंडात शिरकाव करणाऱ्या आणि १८५७च्या उठावानंतर देशावर अधिकृतपणे सत्ता गाजवणाऱ्या इंग्रजांचा जाण्याचा क्षण जवळ आलेला होता.
भारताच्या सर्वच राज्यांमध्ये स्वातंत्र्यसोहळा होणार होता. तरुण, मुलं, आबालवृद्ध सर्वच रस्त्यावर आले होते; आनंदाने बेभान झाले होते. कुठे लेझीम-ढोलांच्या तालावर गुलाल उधळत मिरवणुका निघत होत्या, तर कुठे समारंभाच्या ठिकाणी शाहिरी पोवाडे गायले जात होते. महात्मा गांधी, नेहरू, लोकमान्य टिळक आदी नेत्यांची चित्रं व्यासपीठाच्या ठिकाणी लावलेली होती. इमारतींवर, दुकानांवर सर्वत्र रोषणाईचा लखलखाट, झगमगाट झालेला होता. देशात सर्वत्र असं पराकोटीच्या राष्ट्रभावनेचं दर्शन घडत होतं.
रात्री ११ वाजता घटना समितीच्या सभागृहात प्रतिनिधीजन आसनस्थ झालेले होते. उत्कंठा ताणली जात होती… बारा वाजायला पाच मिनिटं बाकी असताना वातावरणातील कल्लोळ कमी झाला. आपापसातलं बोलणं कमी झालं… सर्वत्र जणू आध्यात्मिक शांतता पसरली…
…१५ ऑगस्टच्या स्वागतासाठी….

१५ ऑगस्ट : जल्लोष आणि आनंदाश्रू
जसे घड्याळाच्या काट्यांनी बाराच्या आकड्यावर हात जोडले, तसा निमिषार्धात जल्लोषाचा एकच स्फोट झाला. १५ ऑगस्ट उजाडताच देशभर आनंदाचं उधाण आलं. दिल्ली जल्लोषात न्हाऊन निघाली. शासकीय इमारती व इतरत्र तिरंगी अशोकचक्रांकित ध्वज सरसर वर चढवला गेला. झेंडा फडकू लागताच लोकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळू लागले. काहीजण ओक्साबोक्शी रडू लागले. ज्या क्षणाची आत्यंतिक आतुरतेने वाट पाहिली तो क्षण येताच लोकांची मनं भारावून गेली. स्वतंत्र भारताची पहिली प्रभात आता उजाडणार होती… भावना व्यक्त करणं कठीण झालं होतं. काहींच्या मनात संमिश्र भावना होत्या. ‘राष्ट्रपिता’ गांधीजी अनुपस्थित होते. पंजाब व बंगाल प्रांतांत सांप्रदायिक हिंसेचा आगडोंब उसळला होता, या पार्श्वभूमीवर गांधीजी पश्चिम बंगालमधील बेलियाघाट आदी दंगलग्रस्त भागात शांती प्रस्थापित करण्यासाठी फिरत होते. त्या हिंसेने व्यथित झालेले गांधीजी १५ ऑगस्टचा पूर्ण दिवस तिथे उपोषण करणार होते.
नियतीशी करार…

Jawaharlala Nehru
जवाहरलाल नेहरू भाषण करताना…

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू अत्यंत दाटलेल्या अंत:करणाने बोलायला उभे राहिले. मन उंचबळलेलं असताना शब्द फुटणं कठीण जात होतं. पण भावनांना आवरून त्यांनी त्यांचं अत्यंत गाजलेलं असं ‘नियतीशी करार’बद्दलचं भाषण सुरू केलं.
“अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची सर्वांशानं का नसेना, पण पुष्कळशा अंगानं आपण पूर्ती करत आहोत. मध्यरात्रीच्या प्रशांत समयी सारं जग झोपलेलं असताना भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. पुन्हा एकदा नव्या भारताचा शोध हा देश घेत आहे. ही वेळ क्षुद्रपणा गाडून टाकण्याची आहे. विघातक टीकेला मूठमाती देण्याची आहे. आपल्याला स्वतंत्र भारताचा एक उत्तुंग प्रासाद उभारायचा आहे. दारिद्र्य, अन्याय, विषमता यांचा शेवट करायचा आहे. देशाची सेवा म्हणजे येथील गरीब जनतेची सेवा. या युगातील सर्वश्रेष्ठ माणसाचं, महात्मा गांधींचं, स्वप्न आपल्याला भूतलावर प्रत्यक्षात उतरवायचं आहे. प्रत्येक नेत्रातला अश्रू आपल्याला पुसून टाकायचा आहे. ही गोष्ट आपल्या शक्तीबाहेरची आहे, असं आपल्याला वाटेल. पण जोवर जगात यातना आणि अश्रू आहेत तोवर आपलं सेवेचं काम चालू असलंच पाहिजे…”
अशा भावोत्कट समारंभाने १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या इतिहासाची वाटचाल सुरू झाली आणि त्याचप्रमाणे पारतंत्र्यमुक्त भारताच्या जडणघडणीचीही सुरुवात झाली.

-कुमार केतकर लिखित नोंद

  • असा घडला भारत (१९४७-२०१२)
  • संपादक : मिलिंद चंपानेरकर, सुहास कुलकर्णी

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑगस्ट २०२०


रोहन शिफारस

असा घडला भारत

भारताचा प्रदीर्घ स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. अनेकविध समस्यांचं ओझं घेऊन आणि मोठी स्वप्नं उराशी बाळगून आपल्या नव स्वतंत्र देशाने वाटचाल सुरू केली. पुढील ६५ वर्षांच्या प्रवासात अशा अनेक महत्त्वपूर्ण घटना-घडामोडी घडून गेल्या ज्यामुळे देशाची वाटचाल नियत झाली वा ज्यातून विविध क्षेत्रांतील वळणं दिसून आली. अशा घटनांचा मागोवा या ग्रंथात घेतला आहे. स्वातंत्र्यानंतर सुरुवातीच्या काळात मूलभूत स्वरूपाच्या कोणत्या गोष्टी घडून आल्या? पुढील काळात राजकारण-समाजकारण कसं बदलत गेलं? अर्थ-उद्योग ते विज्ञान आदी क्षेत्रात कसे बदल संभवत गेले? कितपत विकास साध्य झाला आणि कशा बाबतीत अधोगती संभवली? आपल्या वाटचालीच्या दृष्टीने कोणत्या आंतरराष्ट्रीय घटना अनुकूल वा प्रतिकूल ठरल्या? चित्रकला, नाट्यक्षेत्र ते चित्रपटमाध्यम यातून बदलत्या परिस्थितीचं प्रतिबिंब किती परिणामकारकतेने प्रतीत झालं? क्रीडाविश्वात काय बदल घडले? अशा प्रश्नांची उत्तर देणाऱ्या व जनजीवन घडवणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटना आणि त्याचप्रमाणे जनजीवन विस्कळीत करणाऱ्या मोठ्या नैसर्गिक आपत्ती-दुर्घटना आदींचाही वेध या ग्रंथातून घेतला आहे. गतकाळातील घटनांचा जास्तीतजास्त तटस्थतेने मागोवा घेण्याचा आम्ही यत्न केला आहे. त्यामागे केवळ स्मृतींना उजाळा द्यावा इतका मर्यादित उद्देश नाही. ज्यांनी हा काळ पाहिला आहे, त्यांना या गतघटनांचं नव्याने आकलन व्हावं ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे उगवत्या पिढीला गतकाळाचं नेमकं भान यावं व समकालीन घटनांचा अन्वयार्थ लागावा, हे अभिप्रेत आहे. एकंदरीत, आपल्या भोवतालाचं समग्र भान देऊ पाहणारा असा हा महद्ग्रंथ असा घडला भारत !

Asa-Ghadla-Bharat

1,690.00Add to Cart


संग्रही असावा असा ‘रोहन’चा आणखी एक ग्रंथ…

Yanni-Ghadavala-Sahasrak

यांनी घडवलं सहस्रक

या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुद्धिमान नवपिढ्यांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्त्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.

555.00Add to Cart

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *