फॉन्ट साइज वाढवा
सौंदर्याला दुःखाचा अभिशाप असतो म्हणे… प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकर यांच्या आयुष्याकडे पाहिलं, की याची तंतोतंत खात्री पटते. एकीकडे आयुष्याचा जरतारी पूर्वार्ध आणि दुसरीकडे पार विटलेल्या रंगाचा उत्तरार्ध.
जन्मतःच दिसायला अतिशय देखणी म्हणून कृष्णाबाई शिरोडकरांनी मोठ्या हौसेनं आपल्या मुलीचं नाव ठेवलं – मेनका! पण आपली मुलगी, त्या स्वर्गीय अप्सरेचं, मेनकेचं केवळ रूपच नाही, तर विधिलिखितही घेऊन जन्माला आलीय, हे बहुधा त्या माऊलीला ठाऊक नसावं… अन्यथा त्यांनी तिचं नाव ‘मेनका’ कधीच ठेवलं नसतं. विश्वामित्राचा तपोभंग करण्यासाठी इंद्राच्या आज्ञेवरून स्वर्गातून भूतलावर अवतरलेल्या मेनकेलाच, कालांतराने विश्वामित्राची भुरळ पडली होती म्हणतात आणि शकुंतलेचा जन्म झाल्यावर तर ती, या मर्त्यभूमीवरील सामान्यजनांप्रमाणे आपल्या संसारात गुरफटून गेली होती. इंद्राच्या स्वर्गीय दरबारापेक्षा तिला विश्वामित्राचा साधासुधा आश्रमच आवडायला लागला होता… पण अखेर ती मेनका होती – स्वर्गीच्या सगळ्या अप्सरांहून सौंदर्याने आणि गुणांनीही किंचित उजवी. म्हणून तर विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्याच्या कामगिरीसाठी इंद्राने तिचीच निवड केली… मात्र आपल्या प्रेमाच्या माणसांत रमलेली असतानाच इंद्राने तिला पुन्हा जबरदस्तीने स्वर्गात बोलावून घेतलं आणि मग किती तरी दिवस मेनका त्यांच्या आठवणीत झुरत होती म्हणे…
…आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?
तशी तर त्यांची तक्रार कुणाबद्दलच नव्हती. आयुष्याने जे दान पदरात घातलं होतं, ते त्यांनी बिनबोभाट स्वीकारलं होतं. पराकोटीची श्रीमंती आणि पराकोटीची दैन्यावस्था… दोन्हीला त्या सारख्याच तटस्थपणे सामोऱ्या गेल्या. म्हणून तर परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेत त्यांना जेव्हा मुंबईहून गोव्यात स्नेहमंदिरमध्ये आणलं गेलं, तेव्हाही त्या शांतच होत्या… कुणाबद्दलही त्यांनी चकार उणादुणा शब्द काढला नाही. ‘माझं प्राक्तन मी भोगतेय’, एवढंच म्हणाल्या. त्यानंतर थोडीथोडकी नाही, तब्बल दहा-बारा वर्षं त्या स्नेहमंदिरमध्ये होत्या… पण आपल्या खोलीत शांतपणे बसून असायच्या. कुणी बोलायला आलं, तर निःसंकोच बोलायच्या. कुणी विचारलंच, तर आयुष्याची लडी अलगद उलगडायच्या. पण त्यांना तसं विचारणारंही फारसं कुणी नव्हतंच. कारण, त्यांचा जमाना सरल्याला तब्बल अर्धशतक उलटून गेलं होतं. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध आपल्या गायनाने आणि नृत्याने उजळून टाकणारी मेनकाबाई शिरोडकर नावाची कलावंत आपल्याबरोबर राहतेय, याची जाणीवच बहुतेकांना नव्हती… म्हणूनच मग लहर आली की कॉटवर बसल्या-बसल्याच बाई जेव्हा गुणगुणायच्या ठुमरीचे नजाकतदार बोल आणि सोबतच करायच्या नखरेल अदा… तेव्हा सारेच अवाक् व्हायचे. त्यांना कुठे ठाऊक होतं, आपल्यासोबत राहणारी ही म्हातारी म्हणजे कधी काळी एक ‘जाळ’ होती…!
जाळ नाही तर काय… काळाचा एक तुकडा आपल्या सौंदर्याने, गाण्याने आणि नर्तनाने झळाळून टाकणाऱ्या मेनकाबाई जाळच तर होत्या. अस्तनीतला निखाराच जणू. ज्याने हातात घ्यावा, तो पोळलाच म्हणून समजा… पण ते खरंच होतं- स्वतःचा आब राखायचा, स्वतःचं सत्त्व आणि स्वत्वही जपायचं, तर अंगार होण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता बाईंसमोर… त्याशिवाय का गोवा ते मुंबई, व्हाया बेळगाव-कोल्हापूर… हा त्यांचा प्रवास एवढा सहजसोपा झाला असता?
मेनकाबाई वयाच्या जेमतेम पंचविशी-तिशीत मुंबईत आल्या. पण त्यांनी मायानगरी मुंबईत पाऊल ठेवलं, तेव्हा त्यांच्या भात्यात एकेक अस्सल बाण मौजूद होते. आधीच घराणं कलावंताचं, त्यांच्या रक्तातच कला वाहत होती. त्या मेनकाबाईंनी लहान वयातच मेहनत घेऊन अधिकची भर घातली. म्हणजे- त्यांचा जन्म १९१० सालचा, गोव्यातील कामाक्षीच्या शिरोड्याचा. आई कृष्णाबाई पारंपरिक कलावंत घरातील. साहजिकच घरात गाण्याचे संस्कार होतेच. परंतु संगीताचं अधिक चांगलं वातावरण आणि संगत लाभावी, म्हणून कृष्णाबाई लवकरच बेळगावला गेल्या. त्यामुळे मेनकाबाईंवर जाणत्या वयात गाण्याचे पहिले संस्कार बेळगावातच झाले. मात्र तिथे त्या कुणाकडे आणि नेमकं काय शिकल्या, त्याचा काही थांगपत्ता लागत नाही. परंतु वयाच्या विशी-बाविशीत मेनकाबाई कोल्हापूरला गेल्या आणि तिथे त्यांना जयपूर-अत्रौली घराण्याचे संस्थापक गायक अल्लादिया खाँसाहेब यांचे धाकटे चिरंजीव भूर्जी खाँसाहेब यांची सख्त तालीम मिळाली. ही तालीम अर्थातच शुद्ध शास्त्रीय संगीत असलेल्या ख्यालगायकीची होती.
मेनकाबाई, भूर्जी खाँसोबतच त्या वेळी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध वादक आणि गायक असलेल्या घम्मन खाँ यांच्याकडे ठुमकी-कजरी-दादरा या उपशास्त्रीय गानप्रकारांचं शिक्षणही घेत होत्या. विशेष म्हणजे मेनकाबाई जेव्हा या दोन्ही गायन-प्रकारांचं शिक्षण घेत होत्या, तेव्हा त्यांची पाच-सहा वर्षांची मुलगी भानुमतीही (नंतरच्या प्रसिद्ध ठुमरीगायिका शोभा गुर्टू) त्यांच्यासोबत असायची. मेनकाबाईंचा आवाज सुरेल आणि खणखणीत होता. साहजिकच त्यांच्या गळ्याला-आवाजाला जयपूर घराण्याचं शास्त्रोक्त गाणंही उत्तम झेपायचं. मात्र तरीही मेनकाबाईंचा अधिकाधिक ओढा असायचा तो ठुमरी-दादर या उपशास्त्रीय गायनप्रकारांकडे. हे गानप्रकार गाताना त्या खुलायच्या. उस्ताद घम्मन खाँसाहेबांनी त्यांना ठुमरीच्या नाना कळा शिकवल्या होत्या आणि जन्मजात सौंदर्य लाभलेल्या मेनकाबाईंना त्या शोभूनही दिसायच्या.
एकूणच शास्त्रीय आणि उपशास्त्रीय दोन्ही प्रकारच्या गाण्यांची कडक तालीम सुरू असतानाच भूर्जी खाँसाहेब अचानक मुंबईला राहायला आले. त्यांची तालीम सुरू राहावी म्हणून त्यांच्या पाठोपाठ मेनकाबाई आणि त्यांच्या पाठोपाठ घम्मन खाँ साहेबही मुंबईत आले. या सगळ्यांचाच मुक्काम तेव्हाच्या गिरगाव परिसरात होता. मेनकाबाई गिरगाव बॅक रोडला राहायच्या, तर घम्मन खाँचा मुक्काम तेव्हाचा फोरास रोड, म्हणजे आताच्या अलिभाई प्रेमजी रोडवर होता. घम्मन खाँ तबलावादक म्हणून सर्वश्रेष्ठ होतेच, पण गायनातही त्यांची मातब्बरी होती. ठुमरीचा बाज- गाण्याचा आणि अभिनयाचाही, त्यांच्या गळ्यातून-चेहऱ्यातून असा निघायचा, की एखाद्या बाईची नजाकतही त्यापुढे फिकी पडावी…
…आणि हेच सारं मेनकाबाईंनी सहीसही उचललं. त्या अदेची ठुमरी म्हणजेच ‘बोल बाँट की ठुमरी’ (यात गायनाबरोबरच त्यातील भावही आकर्षक पद्धतीने अभिनीत केले जातात.) सादर करण्यात माहीर बनल्या. मेनकाबाईंकडे नृत्याचं अंगही होतं. साहजिकच मग जन्मजात सौंदर्य, मेहनतीने शिकलेलं गाणं आणि नृत्य या साऱ्याचा अजोड मिलाफ त्यांच्या मैफलीत दिसायला लागला नि बघता बघता मुंबईच नव्हे, तर देशभरात बाईंच्या सौंदर्याची, गाण्याची आणि नृत्याची वाहव्वा व्हायला लागली. मुंबई-पुण्यातील धनिकांची निमंत्रणं तर त्यांना यायला लागलीच, त्याशिवाय इंदूर, ग्वाल्हेर, डुंगरपूर, काश्मीर, रेवा, अशा विविध संस्थानांतून त्यांना मैफलीची आमंत्रणं यायला लागली… साधारणपणे १९४० ते १९६० चा तो काळ. त्या काळात मेनकाबाई संगीत कलावंतांच्या दुनियेत एखाद्या तारकेप्रमाणे तळपत होत्या. पैसा, प्रसिद्धी त्यांच्या पायावर लोळण घेत होती. जडजवाहिर म्हणून नका की सोन्याचे दागदागिने, त्यांना बिदागीत सगळंच मुबलक मिळत होतं. एवढं की त्यांना कधी सिनेमात काम करावसं वाटलं नाही की कधी गावंसं वाटलं नाही. त्यांच्या नावावर काही सिनेमे आणि सिनेमातील गाणी दाखवली जातात, पण त्यांनी कधीच सिनेमात काम केलं नाही अथवा त्या गायल्याही नाहीत. सिनेमात काम न करताही त्या भरपूर ऐश्वर्य उपभोगत होत्या आणि उल्लेखनीय बाब म्हणजे, हे ऐश्वर्य मेनकाबाईंनी आपलं चारित्र्य शुद्ध राखून मिळवलं होतं.
रोहन शिफारस
हितगुजातून उलगडलेली वहिदा रेहमान
आज फिर जीने की तमन्ना है’ म्हणत पडद्यावर स्त्री-स्वातंत्र्याचा उद्धोष करणारी ही अभिनेत्री पडद्यामागील जीवनाबाबत नेहमीच मितभाषी राहिली. लेखिका नसरीन मुन्नी कबीर यांनी या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभिनेत्रीला तिच्या भूमिकांबाबत, तिच्या व्यक्तित्वाबाबत आणि तिच्या जीवनप्रवासाबाबत बोलतं केलं आणि त्या बहुस्पर्शी संवादावर आधारित ‘कॉन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान’ हे इंग्रजी पुस्तक साकार केलं. त्याच इंग्रजी पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी सिध्द केलेला हा मराठी अनुवाद
₹295.00Add to Cart
गाणं शास्त्रीय असो वा उपशास्त्रीय मेनकाबाईंची गाण्यावरची पकड कधीच ढिली झाली नाही. कर्णोपकर्णी चालत आलेल्या त्यांच्या गाण्याच्या मैफलींच्या आठवणी आजही सांगितल्या जातात. कुठल्याही संगीतात ‘सा’ला सर्वाधिक महत्त्व असतं. रामकृष्णबुवा वझे म्हणायचे- ‘सा’ साधे सब सूर साधे… तद्वत मेनकाबाईंना संगीतातला ‘सा’ वश होता. त्यांच्या ‘सा’ची व्याप्ती मोठी होती म्हणे. त्यांनी नुस्ता खुल्या आवाजात ‘सा’ लावायची खोटी श्रोते बेभान होत असत. याचप्रमाणे ठुमरीवगैरे गाताना कधी तरी त्या नऊवारी नेसत म्हणे- त्या वेळी पायाजवळचा निऱ्यांचा घोळ त्यांनी नुस्ता हातांनी हलवला, तरीदेखील उपस्थित रसिकजन खुळावत असत. मग प्रत्यक्ष अदा करून त्या गायला लागल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल, याची कल्पनाच केलेली बरी…
एक आठवण तर दंतकथा म्हणावी, अशीच आहे – एकदा मुंबईतल्याच एका धनवंताकडे गाण्याची मैफल ठरली होती. त्या मैफलीत अल्लादिया खाँच्या पट्टशिष्या सूरश्री केसरबाईदेखील गाणार होत्या. मात्र सुरुवातीलाच मेनकाबाईंनी मैफलीत असा काही रंग भरला की, त्यांचं गाणं संपताच केसरबाईंनी त्यांना मिठी मारली आणि पुढे आपण गायला नकार दिला.
याचा अर्थ एवढाच होतो की- मेनकाबाई शिरोडकरांनी जी प्रतिष्ठा मिळवली होती, ती नुस्ती सौंदर्य किंवा नृत्य-अदांवर मिळवलेली नव्हती. त्यांचं गाणंही तेवढंच तपःपूत होतं… आणि त्याच्या बळावरच त्यांना त्या काळात मान-सन्मान मिळत होता.
याच टप्प्यावर कधी तरी मेनकाबाईंची बच्चूभाई मेहता यांच्याशी ओळख झाली. त्यांच्यात प्रेमापेक्षा एकमेकांवरच्या विश्वासाच्या आणाभाका झाल्या आणि मेनकाबाईंनी नाच-गाण्याचे जलसे किंवा मैफली करणं कमी केलं. ग्रँट रोडच्या नाना चौकातील ईश्वरदास मॅन्शनला त्या राहायला गेल्या. तिथेच बच्चूभाईंचंही येणं-जाणं असायचं. महत्त्वाचं म्हणजे त्या घरात भूर्जी खाँ आणि घम्मन खाँ यांचाही कायम वावर असायचा. बच्चूभाईंच्या मालकीच्या दोन मिल होत्या आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. परिणामी त्यांनी मेनकाबाईंना एखाद्या राणीसारखं ठेवलं. तेव्हा त्यांच्या घरात पैशांनी भरलेली पाकीटं इतस्ततः पसरलेली असत म्हणे… म्हणजे सरस्वती आणि लक्ष्मी दोघीही एकाच वेळी मेनकाबाईंकडे पाणी भरत होत्या…
…पण सरस्वती आणि लक्ष्मी फार काळ एकत्र नांदत नाही म्हणतात, तसंच झालं. १९८०-८५ च्या सुमारास बच्चूशेठना धंद्यात प्रचंड नुकसान झालं. त्या नुकसानीतून सावरण्यासाठी मेनकाबाईंनी आपल्याकडचा सगळा पैसा-अडका त्यांना दिला, पण उपयोग झला नाही. अवघ्या काही वर्षांत बच्चूशेठ वारले आणि त्यानंतर मेनकाबाई अक्षरशः रस्त्यावर आल्या…
मेनकाबाई काळाच्या या फेऱ्यात सापडल्या, तेव्हा त्यांचं वय ७५-८० च्या आसपास होतं… त्यांच्या या दुरावस्थेची माहिती मिळताच, मदतीचे अनेक हात पुढे आले… त्यातूनच ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’मुळे त्या या संस्थेच्याच मालकीच्या असलेल्या स्नेहमंदिरात पोचल्या आणि तिथेच २००३ साली वयाच्या ९३व्या वर्षी त्यांचं निधन झालं… आपल्या मातृभूमीतच त्या शांत झाल्या.
१९७० पासून मेनकाबाईंनी आपलं गाणं पूर्णतः थांबवलं होतं, त्यामुळे आधीच त्या लोकांच्या विस्मरणात गेल्या होत्या. त्यात त्यांच्या गाण्याचं एचएमव्हीने केलेलं रेकॉर्डिंगही शिल्लक राहिलेलं नाही… त्यामुळे त्यांचं गाणं कसं होतं, हे कळायला खरोखरच काही मार्ग नाही… परिणामी आज त्यांचं मोठेपण कळण्याजोगं काहीच मागे उरलेलं नाही… आणि तरीही मला एक वेगळीच शंका येते ती म्हणजे- मेनकाबाईंना काळाने संपवलं की तथाकथित कलावादाने संपवलं? त्या काळात मुंबई-पुण्यातील मैफलींची-जलशांची साग्रसंगीत दखल घेणारे अनेक कलासमीक्षक होते, त्यापैकी कुणीच कशी त्यांची नोंद घेतली नाही? मेनकाबाईंनी कायम खाजगी मैफली किंवा दिवाणखानेच केले, त्याचा तर त्यांनी सूड उगवला नाही? सार्वजनिक जलसे किंवा मैफली मेनकाबाईंनी केल्याच नाहीत असं नाही, परंतु त्याचं प्रमाण अगदीच नगण्य आहे. तसंच शुद्ध शास्त्रीय गाण्यापेक्षा त्यांचा कल कायमच उपशास्त्रीय स्वरूपाच्या ठुमरी-दादर-कजरी-गजलसारख्या गायनप्रकारांकडेच राहिला… पण म्हणून त्याची एवढी जबर शिक्षा- की एखाद्या कलावंताचं काही सांगीतिक कर्तृत्वच मागे उरू नये?
…मात्र जिथे दिव्यत्वाची प्रचिती असते, तिथे त्या दिव्यत्वाविषयी करुणा भाकणारेही असतात. म्हणून तर मेनकाबाईंच्या उत्तरायुष्यात त्यांना स्नेहमंदिरात भेटणारे गोव्याचे प्रसिद्ध कवी माधव बोरकार लिहून जातात-
‘स्नेहमंदिरात खाटीर
एकलीच बशिल्ली मेनकाबाय
ओढून पोटा लागी पाय
आठयत गेल्लो काळ
यादीच्या अटंग रानांत
पेटिल्लो हुलप… जाळ
ती गायता विसरून
देसकार
‘हूं तो तोरे कारन रैन जागी’
सुरांक फुटून
काळजाक घायाळ करपी धार
ती दिता पोसो भरभरून
काफी कानड्याचे सुख
तिज्या प्राणाची प्रार्थना असता
सावनीची बंदिश.
तेन्ना
नासतात त्यो स्नेहमंदिराच्यो
निखट्यो चार वणटी
त्यो जातात
शांतादुर्गेची गर्भकूड
सुरांच्या अभिशेकान
तुडुंब भरिल्ली…’
– मुकुंद कुळे
या सदरातील पहिला लेख…
बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!