READING TIME – 6 MINS
पानिपत झालं, त्याचा इतका जबरदस्त धक्का साऱ्यांना बसला, की राज्यकारभाराची घडीच मोडली. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी युद्धभूमीवर प्रेतांचे बत्तीस ढीग रचले गेले होते.
या वेळेस दोन आरोप केले जातात ते म्हणजे नानासाहेब पेशवे इथे ऐषोआरामात अन दुसऱ्या लग्नात दंग होते, अन दुसरा आरोप म्हणजे सदाशिवरावभाऊ सारख्या युद्धाचा अनुभव नसलेल्या कारकुनाला पानिपतची मोहीम दिली. हे दोन्ही आरोप धादांत खोटे आहेत हे उपलब्ध पुराव्यांच्या आधारे दिसून येतं.
नानासाहेबांच्या दुसऱ्या लग्नाविषयीचा आरोप आधी घेऊ. चाळीस वर्षांच्या नानासाहेबांचं लग्न दहा वर्षांच्या राधाबाईंशी झालं हा आरोप ठळकपणे केला जातो, पण एकंदरीत परिस्थिती पाहता हे पॉलिटिकल मॅरेज असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
१७५७ पासून सतत मोहीम सुरु होत्या, त्यात आधीच्या अटक मोहिमेतील कर्ज, त्यापूर्वीच्या कर्ज आणि आत्ताच्या मोहिमेसाठी हवा असलेला पैसा यात पैशाची ओढाताण होत होती.
नानासाहेबांनी लग्नात पैसा उडवला याला कसलाही पुरावा नाही. उलट, हे लग्न मोहिमेवर असताना झालेलं आहे ही महत्वाची बाब आहे.
दि. ८ डिसेंबर १७६० रोजी बाबुराव फडणीसांना लिहिलेल्या पत्रात नानासाहेब म्हणतात, “आम्ही दौलत वाढून करोड रुपयांचे कर्जच मिळविले. अब्दालीचे पेचाने केले व्यर्थ जाऊन पन्नास लाख कर्ज जाहले.”
दुसऱ्या दिवशीही नानासाहेबांनी बाबुरावांना कर्जबविषयी पत्रं लिहिलं आहे. आता लग्नाकडे येऊ. आपल्याकडे लग्नाच्या ज्या ज्या नोंदी आहेत त्यात सगळीकडे, “वखरे नाईक सावकार, देशस्थ ब्राह्मण याची कन्या नवरी केली” असं म्हटलं आहे.
कोकणस्थ पेशव्यांच्या घरी लग्नाचं करायचं, तर देशस्थांची मुलगी करणे गरजेचे नव्हते. इथे सावकारांशी झालेली सोयरीक ही महत्वाची आहे.
नानासाहेबांची स्वतःची तब्येत यावेळेस अत्यंत खालावली होती, तरीही ते विश्वासरावांची पत्रं पाहून, फौज घेऊन ते स्वतः भाऊंच्या मदतीला उत्तरेला निघाले होते.
दुसरा महत्वाचा आरोप म्हणजे भाऊसाहेब हे कसलेले योद्धे नव्हते हा होय. हा आरोपही चुकीचा आहे. सदाशिवरावभाऊंनी वयाच्या पंधराव्या वर्षी कर्नाटकात महादोबा पुरंदऱ्यांच्या साथीने पहिली मोहीम केली आणि यशस्वीही करून दाखवली.
यानंतर भाऊंनी निजामाविरुद्धच्या इतरही मोहिमांमध्ये भाग घेतला होता. भाऊ जेवढे फडावर तरबेज होते तेवढेच रणांगणावरही कुशल होते. पानिपतपूर्वी नुकतंच उद्गिरचं युद्ध भाऊंनी जिंकलं होतं.
मग प्रश्न हा येतो की भाऊ कमी कुठे पडले? तर त्यांचा सरळ, रोखठोक स्वभाव! या स्वभावाने अनेक जुनेजाणते सरदार त्यांना मनातून भीत असत, आणि भाऊंच्या वाटेला जायचं तालात असत.
गनिमी काव्याची मात्रा अब्दालीसमोर लागू होत नाही हे भाऊंनी ताडलं आणि इब्राहीमखानाच्या तोफखान्यावर भरवसा ठेवला हे अनेकांना रुचलं नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे अपयश पदरी आलं, तरी यामुळे भाऊंच्या कर्तबगारीवर शंका घेता येत नाही. असो..
दि. २९ जानेवारीला अब्दाली पुन्हा दिल्लीत प्रवेशता झाला. इकडे नानासाहेब उत्तरेकडे आधीच निघाले होते, त्यांची पत्रं भाऊंना सतत जात होती, की मी चाळीस हजार फौज घेऊन येतो आहे, अब्दालीला कोंडून ठेवा म्हणजे एकत्र त्याचं पारिपत्य करू.
नानासाहेबांना भेलशाच्या मुक्कामी पानिपतची बातमी समजली आणि आकांत उडाला. तरी या निग्राहक पेशव्याने फुटली फळी सावरण्याचा प्रयत्न केला. होळकर-विंचूरकरांना कामं सांगितली, नाना पुरंदऱ्यांना राजपुतान्याचं काम नेमून दिलं.
पेशवा इतकी फौज चालून आल्यास आपली धाडगड लागणार नाही हे अब्दालीला दिसत होतं. भाऊसाहेबांच्या तावडीतून दैव बलवत्तर म्हणून अब्दाली वाचला होता. पुन्हा दैव साथ देईल याची शाश्वती नव्हती.
अखेरीस त्याने याकूबअलिखानाच्या मार्फत नानासाहेबांना पत्रं पाठवून भाऊंच्या आणि विश्वासरावांच्या मृत्यूबद्दल दुखवटा दर्शवला, आणि आपल्या गुलराज या वकिलासोबत तहाचा प्रस्ताव मांडला.
नानासाहेबांनीही अखेरीस सारा रागरंग पाहता या तहाला मान्यता दिली. पण तरीही, कसलीच शाश्वती नसल्याने या तहाची खबरबात घेण्यापूर्वीच २० मार्च रोजी अब्दाली मायदेशी चालता झाला.
नानासाहेब परत पुण्याला आले आणि पुढच्या काही महिन्यातच, दि. २३ जून १८६१ रोजी पुण्यात पर्वतीवर मृत्यू पावले.
पानिपतचा वचपा लगेच काढता आला नाही. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर पेशव्यांच्याच घरात भाऊबंदकी माजली. रघुनाथरावाने आपल्या पुतण्याविरुद्ध बंड केलं आणि सत्ता आपल्या हाती घेतली.
ही घरगुती राजकारणं आणि कर्नाटक स्वाऱ्या सांभाळतानाच माधवरावांच्या उमेदीची जवळपास आठ वर्षे खर्च झाली. इ.स. १७६६ मध्ये मल्हाररावांचा मृत्यू झाला.
त्यांच्या मृत्यूनंतर लष्करी सूत्र माधवरावांनी तुकोजी होळकरांकडे, तर प्रशासकीय सूत्र अहिल्याबाईंकडे सुपूर्द केली. रघुनाथरावांनी केदारजी शिंद्यांना दिलेली सरदारी काढून माधवरावांनी महादजींना शिंद्यांची सरदारी दिली.
इ.स. १७६९ मध्ये माधवरावांनी एका भल्या मोठ्या मोहिमेचा प्रारंभ केला. त्यांची स्वतःची तब्येत ढासळू लागली होती, पण या थोरल्या मोहिमेची धुरा त्यांनी चार समर्थ खांद्यांवर सोपवली.
रामचंद्र गणेश कानडे, विसाजी कृष्ण बिनीवाले, महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर हे चार जबरदस्त सरदार फौज घेऊन पुन्हा दिल्लीकडे निघाले. जाटांचा विरोध मोडून काढून सरदारांनी आग्रा आणि मथुरा जिंकलं.
या मोहिमेतही रामचंद्र गणेश आणि तुकोजी होळकर एका पक्षात तर विसाजी कृष्ण आणि महादजी शिंदे एका पक्षात होते. अंतर्गत कुरबुरींमुळे राजकारण बिघडतं आहे हे पाहून माधवरावांनी कानड्यांना दक्षिणेत परत बोलावलं. यामुळे नजिबाला आधार वाटणारा पक्ष लंगडा पडला.
मोहिमेची मुखत्यारी आता विसाजी कृष्ण बिनीवाल्यांना देण्यात आली. विसाजी-महादजी आणि तुकोजींनी पुन्हा धडक आघाडी उघडून रोहिल्यांच्या प्रदेशावर हल्ले चढवायला सुरुवात केली.
डिसेंबर १७७० मध्ये नजीबखान मृत्यू पावला आणि लगेच दि. ४ फेब्रुवारी १७७१ रोजी दिल्लीचा लाल किल्ला महादजी शिंद्यांनी पुन्हा जिंकून घेतला. लाल किल्ल्यावर भगवा फडकू लागला.
इतकंच करूंन महादजी थांबले नाहीत, तर त्यांनी रोहीलखंडावर चाल करून नजीबचे राजधानी असलेला पथ्थरगड जिंकून घेतला. तिथे असलेली नजिबाची कबर मराठ्यांनी उध्वस्त केली.
जणू काही प्रत्येक घाव ठणकावून सांगत होता, “पाताळयंत्री नजिबा, तू आजवर जी जी कृत्य केलीस त्याचा हा हिशोब आहे. तुला मृत्यूनंतरही सुखाने झोपू देणार नाही आम्ही इथे.”
ही थोरली मोहीम बहुतांशी यशस्वी झाली. पानिपतच्या नंतर अवघ्या दहा वर्षातच मराठ्यांनी उत्तरेत गेलेलं सगळं पुन्हा मिळवलं. दिल्लीचा बादशाह मराठ्यांचा अंकित झाला.
हे सगळं होतानाच दुर्दैवाने नोव्हेंबर १७७२ मध्ये माधवराव पेशव्यांचा वयाच्या अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी मृत्यू झाला, पण आपल्या विजयी सेनापतीचं, विसाजी कृष्ण बिनीवाल्यांचं स्वागत ते पुण्यात जेव्हा केव्हा येतील तेव्हा सोन्याची फुलं उधळून करावं असं माधवरावांनी बजावून ठेवलं होतं.
माधवराव गेले, पण राज्याची धुरा दोन समर्थ हातात सोपवून गेले. एक होते नाना फडणवीस आणि दुसरे महादजी शिंदे!
- कौस्तुभ कस्तुरे